ऋषितुल्य अब्बाजी

उस्ताद अल्लारखाँसाहेब यांना सर्वच जण आपले समजून ‘अब्बाजी’ म्हणत.

|| पं. सुरेश तळवलकर

तबल्याला स्वतंत्र वाद्य म्हणून जगभरात प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ‘तबल्याचे जादूगार’ उस्ताद अल्लारखाँसाहेब यांची जन्मशताब्दी २९ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने..

उस्ताद अल्लारखाँसाहेब यांना सर्वच जण आपले समजून ‘अब्बाजी’ म्हणत. अब्बाजींना मी फार जवळून पाहिले, अनुभवले. मीच काय, पण ज्यांनी ज्यांनी अब्बाजींना जवळून पाहिले आहे, ते कोणीच त्यांना विसरू शकत नाहीत. अब्बाजी ईहलोक सोडून गेले आहेत हे स्वीकारायला आजही मन तयार होत नाही. कारण माझ्या संगीताच्या साधनेच्या वेळी त्यांची मूर्ती सदैव माझ्या डोळ्यांसमोर असते. आजही त्यांचे विचार मार्ग दाखवीत राहतात, प्रेरक ठरतात.

मला आठवतं, माझ्या वयाच्या नवव्या वर्षांपासून मी त्यांना ऐकत आलो आहे. आणि तेव्हा त्यांच्याबद्दल वाटणारी आसक्ती व ओढ आज ते हयात नसतानाही तशीच आहे.  उस्ताद झाकीरभाई आणि अब्बाजींचे पट्टशिष्य योगेश सम्सी यांच्या वादनातून अब्बाजींचा कलाविचार जेव्हा प्रकटतो, तेव्हा त्या कलाविचारातील सौंदर्य आजही मूर्तीरूपाने अनुभवास येते. अशा कलाकृतींतून अब्बाजींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. आजही तबलावादक एखादी कलाकृती सादर करताना आणि तो कलाविचार तिहाईने संपवताना चटकन् अब्बाजी डोळ्यांसमोर येतात आणि मार्ग दाखवून जातात. तबल्याच्या विश्वात त्यांचे आम्हावर किती उपकार आहेत याची मन सतत ग्वाही देत राहते.

अब्बाजींचे नाव बराच काळ पं. रविशंकर यांच्या बरोबरीने घेतले जात असे. पं. रविशंकर आणि उ. अल्लारखा या जोडीने जगात सर्वत्र भारतीय संगीताचा झेंडा रोवला. विशेषत: पाश्चात्त्य देशांत या जोडीने नावलौकिक, कीर्ती, समाजमान्यता तर मिळवलीच; परंतु लोकप्रियतेचे शिखरही गाठले. त्यामुळे पाश्चात्त्य जनसमुदाय व पाश्चात्त्य संगीतकार भारतीय संगीताकडे आकर्षित होऊन खेचले गेले. त्यामुळेच आज भारतीय संगीतातील कलाकारांना सुगीचे दिवस आले हे अमान्य करता येणार नाही. आज कितीतरी भारतीय कलाकार पाश्चात्त्य देशांत कायम वास्तव्य करून आहेत. कित्येक कलाकारांच्या पिढय़ा आपले आयुष्य सुखासमाधानात घालवीत आहेत. या साऱ्याचे श्रेय पं. रविशंकर आणि उ. अल्लारखा या जोडीने केलेल्या कार्यास जाते.

आज तंतुवाद्याची संगत करताना कुठल्याही तबलावादकास अब्बाजींची आठवण येत नाही असे नाही. कुठल्याही घराण्याचा तबलावादक असो; आशय संपवून मुखडय़ावर येताना त्याच्यासमोर अब्बाजी येतातच; एवढे अब्बाजींचे कार्य महान आहे. तबल्याच्या क्षेत्रात आजपर्यंत तीनतालात काम अधिक झाले. परंतु अब्बाजींनी वेगवेगळ्या तालांत लीलया वादन करून अवघड सांगीतिक आशय सहजरीत्या व आकर्षिकरीत्या श्रोतृवर्गापर्यंत पोहोचवला. कलाकारापासून सामान्य श्रोतृवर्गापर्यंत एखादी कलाकृती प्रभावीरीत्या पोहोचते, यात त्या कलाकाराची तपश्चर्या दिसून येते. लय-तालातील त्यांच्या कार्याने नवे आदर्श निर्माण केले आहेत. लय-तालाच्या क्रियेत मी त्यांना अशा अवस्थेत पाहिले आहे, की फार क्वचितच या दर्जाचे कलाकार पाहायला मिळतात. अनेकांनी त्यांना अनेक वेळा देहभान हरपलेल्या स्थितीत पाहिले आहे. मी त्यांना अनेक वेळा त्या योग्याच्या वा ऋषीमुनीच्या स्थितीत पाहिले आहे. स्वररागाच्या तुलनेत लय-ताल क्रिया ही अधिक बौद्धिक असूनही त्यांची लय-तालातील समाधीवस्था मी अनुभवली आहे. या अवस्थेला ते भौतिक विश्वात यावयास उत्सुक नसत. जगात काय चालले आहे याची त्यांना पर्वा नसे.. भान नसे. ते कायमच संगीतमय वातावरणात मग्न असायचे. घरात काय चालले आहे यात त्यांना फारसा रस नसे. एरवीच्या लौकिक जगतात शिष्यांकडून, समाजाकडून, सरकारकडून त्यांनी काही अपेक्षा ठेवल्या नाहीत. कधीही त्यांच्या बोलण्यात असे आले नाही की.. ‘फलाणा पुरस्कार मुझे अब तक मिला नहीं’! त्यांच्यासमोर नेहमी प्रश्न असायचा- की एखादी चक्रधार या तालात कशी येईल? संगीतसाधना हेच त्यांचे जीवन झाले होते.

तबलावादनातील मोलाचा विचार त्यांनी आमच्या पिढीसमोर ठेवला. तबला वाद्यास स्वत:ची प्रगत अशी बोलीभाषा आहे. ही बोलीभाषा आणि त्यातील प्रस्थापित वाक्यरचना यांस वेगळेपण देऊन नवीन भाषाविचार अब्बाजींनी श्रोत्यांसमोर आणला. ती भाषा वेगवेगळ्या तालांच्या आवर्तनात कशी बांधून सादर करायची, हा मोलाचा विचार त्यांनी पुढील पिढीसमोर ठेवला. एकच रचना वेगवेगळ्या तालांत कशी सादर करता येईल याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी मांडला. त्या काळात या विचारास आक्षेप घेणारी कलाकार मंडळी होती. परंतु अब्बाजींचे महत्त्व खऱ्या अर्थाने आज कळते आहे.

अब्बाजी हे विचारवंत तबलावादक होते. अब्बाजींनी तिहाई व चक्रधारातील कितीतरी नवीन हिशेब व त्यातील दम प्रस्थापित केले. काहींच्या मते, ते गणिती होते. माझ्याही मते, ते होते. (शाळेत न जाताही!) लय-तालात गणित असते, परंतु गणितात लय नसते हे इथे ध्यानात घेणे जरूरीचे आहे. एखादी रचना गणिताने बरोबर आली म्हणजे लयीत बरोबर आली असे नाही. अब्बाजींच्या रचनेतील ही कलाकृती त्यांच्या नजरेत दिसे. त्यामुळेच पुढे ती त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होताना दिसे, हेच त्यांच्या पढंतचेही वैशिष्टय़ होते.

तबल्यातील पंजाब घराणे हे अविस्तारक्षम रचनेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु विस्तारक्षम रचनेत भाषयुक्त व तंत्रयुक्त विचाराने पंजाब घराण्यात मोलाची भर घातली. पेशकार, कायदा, रेला, रव यामध्ये त्यांनी अनेक रचना निर्माण करून पंजाब घराण्याला परिपूर्ण केले. हा मोलाचा विचार त्यांनी हातचा न राखता पुढील पिढीपर्यंत पोहोचवला.

अब्बाजींचे तबल्यातील गुरू उस्ताद मियाँ कादरबक्ष, तर गायनातील गुरू उस्ताद आशक अली खाँसाहेब होते. अनेक रागांतील चिजा त्यांना मुखोद्गत होत्या. त्यांच्याकडून अनेक गायकांनी बंदिश घेतल्या. पं. भीमसेन जोशी ‘चंगे नैनवा’ हा तोडीतील खयाल गात. तो उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडून मिळाल्याचे भर मैफिलीत त्यांनी सांगितले होते.

गायनाच्या अभ्यासामुळेच त्यांची गायनाची साथही अप्रतिम असे. मी रेकॉर्ड्सच्या रूपात त्यांच्या काही गायकांबरोबरच्या साथी ऐकल्या आहेत. यामध्ये उ. बडे गुलामअली खाँसाहेब, पं. रामकृष्णबुवा वझे, उ. सलामत नजाकत अली खाँसाहेब, पद्मावती शाळीग्राम, ज्योत्स्ना भोळे अशी कित्येक नावे सांगता येतील. यावरून तबलावादकास गायकी कळलीच पाहिजे हे ध्यानात येईल.

कलाकार म्हणून अब्बाजी जितके थोर होते, तितकेच माणूस म्हणूनही ते मोठे होते. अत्यंत प्रेमळ स्वभाव, प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे. त्यांच्यासाठी कला हेच जीवन होते आणि त्यांचे जीवन हे संगीतजगतासाठी एक संदेश होता.

२९ एप्रिल रोजी अब्बाजींची जन्मशताब्दी साजरी होत आहे. २७ व २८ एप्रिल रोजी पुण्यात आणि २९ एप्रिल रोजी मुंबईला एन.सी.पी.ए.मध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने पुढील १०० वर्षेही संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवतील अशा ऋषितुल्य अब्बाजींना मानाचा मुजरा!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta lokrang marathi article 4

Next Story
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : मातीचे डाग पायावर घेऊन वावरणारा साहित्यिक