डॉ. किरण ठाकूर

अमेरिकेत शिकत असतानाच एखाद्या ओसाड माळरानावर तंत्रज्ञानाच्या आधारे ग्रामविकास केंद्र उभारून विकास करायचे प्रयोग यशस्वी करून दाखवायचे या वेडाने झपाटलेल्या डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग आणि त्यांची पत्नी मीरा या दाम्पत्याची ही विलक्षण यशोगाथा. हे उभयता आणि त्यांचे तितकेच ध्येयनिष्ठ वारसदार डॉ. योगेश कुलकर्णी यांनी त्यांची ही यशोगाथा आतापर्यंत सामान्य वाचकांना स्वत:हून सांगितलेली नव्हती. त्यामुळे सामान्य वाचकांना अद्याप माहीत नसलेल्या या प्रयोगाचा तपशील ‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ या पुस्तकात पहिल्यांदाच वाचायला मिळतो आहे.

swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा

पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यात पाबळच्या ओसाड माळरानावर उभा राहिलेला हा विज्ञानाश्रम. डॉ. कलबाग यांनी अमेरिकेतील शिकागोच्या युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय इथे डॉक्टरेटचा अभ्यास पूर्ण करून भारतात परतल्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून काम करताना ग्रामविकासाचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. एखाद्या खेड्यात ग्रामविकास केंद्री तंत्रशिक्षण केंद्र सुरू करायचं हे ठरवलं होतं. त्यासाठी शासनाकडून त्यांना पाबळ इथे जागा मिळाली. त्यानंतर स्थानिक मंडळींशी संवाद साधत, नातं जोडत त्यांनी काम सुरू केलं. १९८०- ८१ च्या सुमाराला पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेलं हे गाव. दिवसातून एकदाच एसटीची बस यायची. वीज नव्हती, इंटरनेट तर पुण्यातसुद्धा मिळणं दुरापास्त होतं. थोडेबहुत शिक्षण घेतलेली मुलं नोकरीसाठी पुण्या-मुंबईसारख्या शहरात वणवण भटकत असायची.

डॉ. कलबाग यांनी आपल्या ग्रामविकासकेंद्री तंत्रशिक्षण संकल्पनेचा मीरा यांच्या मदतीने नेटाने पाठपुरावा केला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘विज्ञान आश्रम, पाबळ’ या संस्थेचा डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला. शिक्षणाच्या मदतीने ग्रामविकास, रुरल डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशनल सिस्टीम, इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी असे प्रयोग त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या प्रत्येक प्रयोगात ‘हाताने काम करीत शिकणं, बहुविध कौशल्यं, लोकोपयोगी सेवा आणि उद्याोजक हाच शिक्षक’ हे तत्त्वज्ञान पायाभूत होतं . ‘ग्रामीण विकासातून तंत्रशिक्षण आणि त्या शिक्षणातून अधिक फलदायी असा विज्ञाननिष्ठ ग्रामविकास’ हे कलबाग सरांचं ध्येय होतं. १९८३ ते २००३ या जीवनाच्या अखेरच्या दोन दशकांत त्यांनी घडवून आणलेले बदल पाबळ खेड्यापुरते राहिले नाहीत. पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्यात आणि राज्याबाहेरही त्यांनी आपल्या संकल्पना राबवून पाहिल्या. लोकांनी हळूहळू त्यांना प्रतिसाद दिला. आदिवासी भाग, दुष्काळग्रस्त, नक्षलग्रस्त परिसर अशा कठीण भागात त्यांनी स्थानिक प्रश्न हाताळले. ग्रामविकासाच्या ध्येयाने प्रेरित असंख्य युवक-युवतींनी त्यांना प्रतिसाद दिला. स्वत:चा, कुटुंबाचा, आणि आपल्या गावाचा विकास करून दाखवला. हळूहळू राज्य शासने, केंद्र शासन आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात डॉ. कलबाग यांना प्रतिसाद मिळत गेला.

सध्या महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगड, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये आयबीटी अभ्यासक्रम राबवला जातो. उत्तर प्रदेशच्या साठ शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावी ते आठवी साठी ‘लर्निंग बाय डुइंग’ या नावाने व्यवसाय शिक्षणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था हा कार्यक्रम राबवतात. विविध उद्याोग समूहांना जोडून घेऊन हे काम केलं जातं. नवीन राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यानुसार हा अभ्यासक्रम ‘मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स’ या नावाने ओळखला जातो. २०१६ मध्ये आयबीटीअंतर्गत हिरकणी विद्यालयात थ्रीडी प्रिंटिंग प्रायोगिक तत्त्वावर शिकवायला सुरुवात झाली. आता सुमारे पंचवीस शाळांमध्ये थ्रीडी प्रिंटर्स आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्रामिंग ‘सेन्सर संगणकीय डिझाइन’ हे विषय देखील आता आयबीटीमध्ये समाविष्ट झाले आहेत.

आपल्या वाटचालीत आलेले भलेबुरे अनुभव आणि मिळालेले यश याचा अतिशय वस्तुनिष्ठ लेखाजोखा संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी प्रांजलपणे या पुस्तकात लिहिला आहे. विज्ञानाश्रम संकल्पनेचं देशात सार्वत्रिकीकरण झाल्यास स्थानिक समस्या सोडवताना स्थानिक युवांना ज्ञानकर्मी बनवणारी ‘लॅब्ज-कम-वर्कशॉप्स’ ही ग्रामीण भारताची आधुनिक शैक्षणिक परिसंस्था होऊ शकेल असं हे पुस्तक वाचल्यानंतर वाटत राहतं.

प्रयोगशील, विज्ञाननिष्ठ आणि विषमतामुक्त अशा स्वावलंबी समाजाची धारणा करणाऱ्या शिक्षणाची तत्त्वे सर्वत्र रुजायला हवीत. त्यातूनच देशातील प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी विज्ञान आश्रम प्रभावीपणे कार्यरत होऊ शकेल. तालुक्यातील माध्यमिक शाळा, औद्याोगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतने, इत्यादींना मार्गदर्शन मिळत राहील. कौशल्यविकास, ग्रामीण विकास, आदिवासी विकास, लघु-मध्यम उद्याोग विकास, उद्याोजकता विकास, समाजकल्याण, महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण योजनांतील कार्यकर्ते आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करणारी क्रमिक पुस्तके सध्या नाहीत. त्या विषयाच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त होईल.

– ‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’, योगेश कुलकर्णी, समकालीन प्रकाशन, पाने- १७५, किंमत- २५० रुपये.

drkiranthakur@gmail.com