‘लोकरंग’ मधील (२८ सप्टेंबर) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘‘अणु’दिनी ‘अणु’ न तापे’ या शीर्षकाचं स्नेहचित्र ज्यांच्यावर होतं त्या अनिल काकोडकरांचा फोन आला. त्यांना म्हटलं, ‘‘अनेकांना तुमचं गरिबीवरचं विधान आवडलं.’’ तर काकोडकर लगेच म्हणाले, ‘‘हे उद्गार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आहेत. त्या १९८१ साली नैरोबीला ऊर्जा परिषदेत गेल्या असता अनेक विकसित देशांनी पर्यावरण रक्षणार्थ भारतानं प्रदूषण कसं आवरलं पाहिजे वगैरे उपदेश द्यायला सुरुवात केली. त्या वेळी भाषणात इंदिरा गांधींनी सुनावलं… ‘‘व्हॉट आर यू टॉकिंग अबाऊट… पॉवर्टी इज द बिगेस्ट पोल्युटंट’’.
वास्तविक सद्या:स्थितीत इंदिराबाईंचं कौतुक करणं तितकं शहाणपणाचं नाही. पण काकोडकरांनी असा विचार केला नाही. ही बाब कौतुकाचीच तशी – संपादक
दोघेही कौतुकास पात्र
‘लोकरंग’मधील (२८ सप्टेंबर) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘‘अणु’ दिनी ‘अणु’ न तापे’ हा अनिल काकोडकर यांच्यावरील लेख वाचला. काकोडकरांचा ‘लोकसत्ता’च्या तरुण तेजांकितसारख्या उपक्रमातील परीक्षक म्हणून सहभागाविषयीचा उल्लेख आवडला. पुरस्कारासाठी ती व्यक्ती पुरस्कार देण्यायोग्य आहे की नाही यासाठी एक परीक्षक म्हणून ते घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक वाटले, पण त्याहूनही कौतुक वाटले ते पारितोषिक पात्र व्यक्ती निवडताना संबंधित परीक्षकाला ‘लोकसत्ता’ देत असलेल्या स्वातंत्र्याचे. अनेक स्पर्धांना परीक्षक म्हणून मीही काम केलेले आहे. बहुतेक ठिकाणी पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे नाव संबंधित संस्थेने आधीच ठरवलेले असते. किंबहुना त्याचा अर्जच मुळी मागवलेल्यातला असतो. परीक्षक निव्वळ उपचार असतो. शिवाय, परीक्षकाचे नियुक्ती पत्र पाठवताना त्यात ‘व्यवस्थापक मंडळाचा निर्णय अंतिम राहील’ ही शेवटची ओळ न चुकता लिहिलेली असते. या साऱ्या अनुभवावर काकोडकरांचे परीक्षकपण आणि ‘लोकसत्ता’ने आपल्या परीक्षकांना दिलेले स्वातंत्र्य कौतुकास्पद होय.
- अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (पूर्व)
ही मंडळी आदर्शच!
‘लोकरंग’मधील (२८ सप्टेंबर) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘‘अणु’ दिनी ‘अणु’ न तापे’ हा अनिल काकोडकर यांच्यावरील अप्रतिम लेख वाचला, पटला आणि भावलाही. शेवटच्या परिच्छेदातील विचार पटले. हल्ली सगळे एकाच क्षेत्राकडे गर्दी करत आहेत. मुलांची आवड, कल कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे काही क्षेत्रात गर्दी तर काही क्षेत्रात वानवा. याचा दोष आयटी क्षेत्रात काही लोकांना दिल्या जाणाऱ्या मोठ्या पॅकजेसना जातो. त्यामुळे समाजात दोन कुटुंबांच्या उत्पन्नात आणि राहणीमानात तफावत येते. सरकारी क्षेत्रात खाबुगिरी, निष्क्रियता, तर खासगी क्षेत्रात नफेखोरी… परिणामी समाजात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कोर्ट निर्णय देण्यात दिरंगाई आणि निकाल कायद्याला धरून आणि पटण्यासारखा असेल असं नाही, समोरचा वकील तगडा असेल तर निकाल मनासारखा मिळण्याची शक्यता जास्त. यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न. अशा वेळी काकोडकर, नारळीकर, गोवारीकर, अब्दुल कलाम हे आदर्श आणि दैवतं वाटतात.
- कृष्णा जाधव
ही पिढीच भारावलेली
‘लोकरंग’मधील (२८ सप्टेंबर) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘‘अणु’ दिनी ‘अणु’ न तापे’ हा अनिल काकोडकर यांच्यावरील लेख वाचला. लेख नेहमीप्रमाणे वाचनीय व आत्मीयता-दर्शक. त्यांच्या मातोश्रींनी लिहिलेले ‘एक धागा सुताचा’ हे चरित्रसुद्धा निर्मळ व प्रवाही आहे. २०१८ च्या ‘मौज’ दिवाळी अंकात त्यांचा ‘पोखरण १’ व तत्सम कार्याबद्दल एक छान सविस्तर लेख आहे. भिडे हे रूपारेल महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. नंतर ते प्रिन्सिपॉल झाले. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सहसा धोतर व कोट अशा वेशात असत. संध्याकाळी ते सेंट झेवियर्समधील गणिताचे प्राध्यापक डी. एस. आगाशे आणि इतर काही जण शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर गप्पा मारीत बसलेले असत. ही पिढी या नव्या युगाच्या प्रारंभाने भारावलेली होती व त्यांनी स्वखुशीने शिक्षण व पात्रता असूनसुद्धा राष्ट्र उभारणीच्या प्रेरणेने शिक्षण क्षेत्र अथवा सरकारी नोकरीची निवड केली, हे अभिमानास्पद होय. रुईयातील प्रा. आर. डी. गोडबोले हे त्या काळी एमआयटीमधून शिकून परत आले व रुईयात येऊन आयुष्यभर फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून राहिले. त्यांचा NUCLEAR PHYSICS हा विषय ते अतिशय उत्तमपणे शिकवीत असत. प्रा. प्रभुराम जोशी, माधवराव गोडबोले, रामदास भटकळ हे सर्व एलफिन्स्टनचे मित्र. गोडबोले यांनी सरकारी सेवा निवडली तर प्रभुराम जोशी यांनी शिक्षण क्षेत्र. त्यांनी रुईयामधून सुरुवात केली, नंतर पोदारमध्ये जाऊन शेवटी वेलिंगकर इन्स्टिट्यूट उभारण्यात महत्त्वाचा हातभार लावला. भटकळ अर्थातच त्यांच्या व्यवसायात स्थिर झाले.
- आल्हाद धनेश्वर
सामरिक सामर्थ्याचा पाया
‘लोकरंग’मधील (२८ सप्टेंबर) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘‘अणु’ दिनी ‘अणु’ न तापे’ हा अनिल काकोडकर यांच्यावरील लेख वाचला. अणुशक्ती प्राप्त केल्यानंतर भारतावर अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देशांनी निर्बंध लादले, पण त्याच काळात रशिया आणि नंतर चीनकडूनही वेगवेगळ्या प्रकारचे दबाव अनुभवायला मिळाले. तरीसुद्धा भारताने आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर हे आव्हान पेलले आणि काही वर्षांतच अमेरिका-भारत अणुकराराच्या स्वरूपात परिस्थितीला उलटवून टाकले. अणुचाचण्यांमुळे भारत केवळ प्रादेशिक महासत्ता राहिला नाही, तर जागतिक शक्तिसमीकरणात तो एक निर्णायक खेळाडू म्हणून उदयास आला. पाकिस्तानसारख्या शेजारी देशावरही याचा थेट परिणाम झाला आणि दक्षिण आशियातील सामरिक तोल बदलला. याशिवाय या पावलामुळे भारताने जगाला असा संदेश दिला की, भारताची धोरणे आक्रमकतेवर आधारित नाहीत, तर सुरक्षा, स्वावलंबन आणि जागतिक जबाबदारीवर आधारित आहेत. विज्ञान, राजकारण आणि मुत्सद्देगिरी यांच्या या त्रिसूत्रीने भारताला आजच्या बहुध्रुवीय जगात अधिक महत्त्वाची आणि जबाबदार भूमिका बजावण्याची ताकद दिली आहे. त्यामुळे पोखरण ही केवळ एक चाचणी नसून, भारताच्या सामरिक सामर्थ्याचा पाया मानला जातो.
- फ्रँक मिरांडा, उमराळे (वसई)