‘लोकरंग’ (१६ एप्रिल) ‘आंबा नादिष्टांची हौसमोड..’ हा सतीश कामत यांचा कोकणच्या आंब्याची यंदा झालेली दर्दभरी कहाणीवजा लेख वाचला. सहा-सात दशकांपूर्वी आमच्या लहानपणी कानात घुमणाऱ्या ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो’ या ओळी बदलून ‘आंबा लावतो, घाम गाळतो, कोकणचा राजा बाई जीव देतो’ अशा ऐकायला येऊ लागल्या आहेत. कारण नैसर्गिक असो किंवा मानवी असो, कोकणी माणसाचा रसाळपणा जिवंत ठेवणारा हा आंबा धोक्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे आंब्याचा मोहोरच गळाला तर बागायतदार आणि दलाल यांना हाताची घडी घालून बसणेच क्रमप्राप्त झाले आहे.

एप्रिल महिना आला की हापूसचा रसाळ आंबा तोंडात पडणार या आशेने ताटकळत असलेले मुंबईकर आ वासून प्रतीक्षा करीत आहेत. आंब्यावरील कीड मरावी म्हणून वापरली जाणारी घातक कीटकनाशकेच या फळाला उद्ध्वस्त करीत आहे. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा रचनीय अवस्थेत सापडलेला कोकणातील कित्येक पिढींचा हा मुकुटमणी आता जमीनदोस्त होत आहे ही या कोकणाची शोकांतिका आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने जातीने लक्ष घालावे, जेणेकरून कोकणचा राजा पुन्हा मनाजोगा झिम्मा खेळू लागेल.

सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व)

निकोप चर्चेची आवश्यकता

‘लोकरंग’मध्ये समिलगी विवाह या विषयावरील ‘यंदा आमचेही कर्तव्य आहे..’ हा नक्षत्र बागवे यांचा लेख वाचला. मुळात समिलगी लोक ठामपणे आपल्या जाणिवा आणि अस्तित्व मांडू लागलेत ही बाब आश्वासक आहे. मुदलात छॅइळद याविषयी आपलं सामाजिक ज्ञान, माहिती, जाणीव पूर्वग्रहदूषित आणि गढूळ आहे. आपण या घटकातील लोकांना फक्त जोगता, नाच्या, हिजडा, छक्का अशा विकृत शब्दांपुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे. माणूस म्हणून असलेलं त्यांचं अस्तित्व आपल्यासाठी नगण्य असतं. लेस्बियन, गे, बायसेक्स्युअल, ट्रान्सजेंडर आणि क्वीर या भिन्न संकल्पना आहेत आणि मुळात त्या नैसर्गिक आहेत, ही गोष्ट आपण स्वीकारत नाही. त्यामुळे  छॅइळद या विषयासंबंधी अभ्यासक्रमांमध्ये माहिती हवी, याविषयी योग्य माहिती आणि निकोप चर्चासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सुशिक्षितांनी पुढे येणं गरजेचं आहे. शिवाय समुपदेशनाचा मार्ग सुखकर झाला पाहिजे.

– गणेश गलांडे, इचलकरंजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lokrang@expressindia.com