सिद्धार्थ खांडेकर – siddharth.khandekar@expressindia.com

महेंद्रसिंह धोनीने नाबाद राहून सामने जिंकून देण्याची कधी नव्हे ती सवय भारतीय क्रिकेटप्रेमींना लावली. परंतु त्याने क्रिकेट किंवा क्रिकेटपटू यांच्यात एका मर्यादेपलीकडे भावनिक गुंतणूक केली नाही. आणि हेच त्याच्या दीर्घकालीन यशाचे गमक राहिले.

ही गोष्ट मुंबईतील.. २००६ मधली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा वार्षिक पुरस्कार सोहोळा सीसीआयवर होता. सोहोळ्याचे प्रमुख आकर्षण होते महेंद्रसिंह धोनी. तोपर्यंत तो काही सामनेच खेळला होता. त्यातही त्याची विशाखापट्टणमला केलेली १४८ धावांची तडाखेबंद खेळी विशेष उल्लेखनीय. पण इतक्या भांडवलावर प्रमुख आकर्षण..? त्याला अगदी जवळून पाहिले, त्यावेळी टीव्हीवर दिसला त्याच्यापेक्षा कितीतरी उंच, धिप्पाड भासला. चेहऱ्यावर केवळ स्मितहास्य होते. ‘तुझं नाव धोनी की ढोनी?’ यावर ‘आप कुछ भी बोलिये. मैं धोनी बोलता हूँ..’ इतके सहज-सरळ उत्तर. क्रिकेटच्या झगमगत्या विश्वातले अनेक तारे तिथे जमलेले होते. आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी होते. मुख्य हॉलमधल्या त्या गर्दीत धोनी अगदी सहजपणे वावरत होता. ‘सेल्फी’ची साथ सार्वत्रिक होण्यापूर्वीचा तो काळ. त्यामुळे त्याला बरेचसे स्वतंत्रपणे फिरू दिले जात होते. अधूनमधून छोटय़ा मुलाखती सुरू होत्या. काही परदेशी पत्रकारही होते. त्यांच्यासमोर याचे इंग्रजी सफाईदार नव्हतेच. पण त्याचा कसलाच गंड त्याला नव्हता. हाताची घडी घालून तो व्यवस्थित उत्तरे देत होता. अपेक्षांचे दडपण स्वतवर घ्यायचेच नाही, त्यामुळे त्याखाली चाचपडण्याचा प्रश्नच येत नाही, हा धोनीचा यशस्वी फॉम्र्युला. त्याची समक्ष प्रचीती त्या दिवशी मुंबईत त्याची थेट भेट झाल्यानंतर आली.

त्यावर्षी पाकिस्तानात फैसलाबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यात परिस्थिती आव्हानात्मक असूनही शोएब अख्तरसमोर त्याने एक-दिवसीय सामन्यास साजेशी फटकेबाजी केली होती. पाकिस्तानच्या ५८८ धावांसमोर भारताची अवस्था ५ बाद २८१ अशी झाली होती. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी पाकिस्तानला होती. शोएब अख्तर तेजीत होता. धोनीने त्याचा आणि पाकिस्तानच्या मनसुब्यांचा विचका केला. धोनीने १५३ चेंडूंमध्येच १४८ धावा चोपल्या. त्या अर्थाने विशाखापट्टणममधील त्याच्या ‘त्या’ १४८ धावांपेक्षा ‘या’ १४८ धावा श्रेष्ठ मानाव्या लागतील. त्या संघात वीरेंदर सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड असे सगळे होते. विशाखापट्टणमच्या १४८ धावा किंवा श्रीलंकेविरुद्धच्या १८३ धावा घरच्या मैदानावर केलेल्या होत्या. त्यापेक्षाही अवघड परिस्थितीत दूरच्या मैदानावर झळकवलेले शतक केव्हाही श्रेष्ठच. हा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे एक-दिवसीय क्रिकेट, कसोटी क्रिकेट आणि टी-२० क्रिकेट या प्रकारांमध्ये सुरुवातीलाच जम बसवण्याचा चमत्कार धोनीने करून दाखवला होता. झारखंडमध्ये रांची शहरात क्रिकेट प्रशिक्षणाचा पाया फार विस्तृत आणि सखोल तेव्हाही नव्हता नि बहुधा आजही नसेल. याही परिस्थितीत धोनी सुरुवातीपासूनच तिन्ही प्रकारांमध्ये चमक दाखवता झाला, याचे एकमेव कारण म्हणजे त्याची नैसर्गिक गुणवत्ता. सचिन तेंडुलकरच्या महानतेचा एक निकष म्हणजे त्याचे पदार्पण इम्रान, अक्रम आणि वकार यांच्या पाकिस्तानसमोर झाले. धोनीचा फलंदाज म्हणून फारसा गौरव होत नाही. मात्र, कसोटी आणि एक-दिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये त्याने पहिले शतक पाकिस्तानविरुद्ध झळकवलेले आहे. नवीन सहस्रकाच्या पहिल्या पाच वर्षांतील पाकिस्तानचा संघ बऱ्यापैकी बलाढय़ होता, हे इथे खास लक्षात घ्यावे लागेल. त्याच्या त्या कसोटी शतकानंतरच्या एक-दिवसीय मालिकेत एक ‘फिनिशर’ म्हणून तो नावारूपाला आला.  भारताने  ती मालिका ४-१ अशी जिंकली, त्यात धोनीच्या तीन तडाखेबंद खेळींचा समावेश होता. नाबाद राहून सामने जिंकून देण्याची सवय त्याने त्या मालिकेपासून भारतातील क्रिकेटप्रेमींना लावली. त्याच्या संपूर्ण एक-दिवसीय सामन्यांच्या कारकीर्दीत धोनी ८५ वेळा नाबाद राहिला. त्यांतील ५१ वेळा धावांचा पाठलाग करताना आणि त्यातही ४७ वेळा भारत विजयी ठरला होता. हे दोन्ही विक्रमच. पाकिस्तानचे हुकूमशहा परवेश मुशर्रफ यांनी त्याच्या लांब केसांची तारीफ एकदा सामनोत्तर बक्षीस समारंभात जाहीरपणे केली होती. त्या कौतुकाने धोनी उगीच हरखून वगैरे गेला नव्हता.

ग्रेग चॅपेल यांनी भारतीय क्रिकेटला नवे वळण लावण्याचा प्रयत्न केला. निव्वळ गुणवत्ता पुरेशी नाही, तिला तंदुरुस्तीची जोड मिळालीच पाहिजे असा त्यांचा आग्रह. त्यांच्याआधीचे प्रशिक्षक जॉन राइट आणि नंतरचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी या अवघड जागेच्या दुखण्याला स्पर्श केला नव्हता. चॅपेल यांच्या त्या हट्टाग्रहाचा त्रास सौरव गांगुली, वीरेंदर सेहवाग यांच्यासारख्या मनस्वी क्रिकेटपटूंना झाला होता. सचिन किंवा राहुल द्रविड यांना कोणी तंदुरुस्तीसाठी आग्रह धरण्याचा प्रश्नच नव्हता. पण स्वतची मते लादू नयेत, आदेशाऐवजी संवादाने परिस्थिती सुधारेल, या मतावर हे दोघे ठाम होते. अशावेळी ज्या मोजक्या क्रिकेटपटूंविषयी चॅपेल यांचे मत चांगले होते, त्यांत धोनी अग्रस्थानी होता. धोनीने त्यावेळी कोणताच पक्ष घेतला नाही. खरे तर त्यावेळी तो लहान होता आणि संघात त्याच्यापेक्षा सीनियर खेळाडू अनेक होते. या विस्कटलेल्या वातावरणातच भारताची २००७ मधील विश्वचषक स्पर्धेत गच्छंती झाली आणि एक प्रकारची निर्नायकी आणि निराशाजनक अवस्था भारतीय क्रिकेटने काही काळ अनुभवली. एप्रिलमध्ये तो विश्वचषक संपला आणि त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिला टी-२० विश्वचषक झाला. त्या स्पर्धेसाठी सचिन, राहुल आणि सौरव उपलब्ध नव्हते, म्हणून धोनीची कर्णधारपदी निवड झाली. त्या स्पर्धेत भारतीय संघ अनपेक्षितपणे जिंकला. तोपर्यंत एक चांगला यष्टिरक्षक, एक उत्तम आक्रमक फलंदाज म्हणून धोनीने स्वतला सुस्थापित केले होतेच. टी-२० विश्वचषकानंतर धोनी कर्णधार म्हणून स्थिरावला. लवकरच त्याला राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यापाठोपाठ कसोटी कर्णधारपदही मिळाले. २०११ मधील जगज्जेतेपद हा त्याच्या कारकीर्दीचा परमोच्च बिंदू.

त्याच्या आणखी एका कामगिरीचा फारसा उल्लेख होत नाही. ती कामगिरी म्हणजे २००८ मध्ये त्यावेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच देशात जाऊन सीबी सीरिजमध्ये भारताने केलेला पराभव. त्याच दरम्यान संघातील सीनियर क्रिकेटपटूंविषयी धोनीने अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. गुणवत्ता किंवा पुण्याई या गुणांना तंदुरुस्ती आणि संघभावनेपेक्षा गौण ठरवण्याची ही रीत ग्रेग चॅपेल यांच्या शिकवणुकीचाच परिणाम होती काय? धोनीच्या जवळच्या क्रिकेटपटूंविषयी काहीही लिहून आलेले असले तरी कोणीच त्याचा विशेष लाडका किंवा दोडका नव्हता. त्याने क्रिकेट किंवा क्रिकेटपटू यांच्यात एका मर्यादेपलीकडे भावनिक गुंतणूक केलीच नाही आणि हेच त्याच्या दीर्घकालीन यशाचे गमक राहिले. विराट कोहली आणि तो यांच्यातील समीकरणाविषयी अनेकदा लिहून आले आहे. पण विराटला मैदानावर धोनीचा आधार नेहमीच वाटायचा आणि सल्ला घेण्यासाठी तो मैदानावर अनेकदा धोनीकडेच वळायचा. धोनी हा भारतीय किंवा जागतिक क्रिकेटमध्ये किती महान होता याविषयी दोन्ही बाजूंनी भरभरून मते व्यक्त होतील. पण भारतासारख्या भावनाप्रधान बजबजपुरीत इतकी अविचल आणि अखंड भावनातीतता शाबूत ठेवणारा त्याच्यासारखा विरळाच. त्याला जे वाटले आणि पटले, तेच तो करत राहिला. बाकी तुम्ही काहीही म्हणा..!