|| मकरंद देशपांडे
मागच्या सदरात ‘लैला’ या नाटकाबद्दल लिहिताना निर्धारित शब्दसंख्या पूर्ण झाल्यामुळे राहून गेलेली गोष्ट आता लिहितोय. नाटकाच्या शेवटी नाटककार हा आपल्या तिन्ही लैला आणि रोमिओला घेऊन पृथ्वी नाटय़गृहात येतो आणि प्रेक्षकांना विचारतो की, ‘‘कोणती लैला निवडू?’’ माझा जवळचा मित्र हेमंत चतुर्वेदी हा अफलातून कॅमेरामन (मकडी, कंपनी, कुर्बानी, मक़बुल) मला म्हणाला, ‘‘मी करतो शूट.’’ मग एक मर्सिडिज गाडी एका लैलाच्या (त्रिशलाच्या) ओळखीने फ्री मिळाली. त्यात सगळे बसले आणि जुहूच्या सुंदर गल्लीत त्यांचं येणं शूट झालं ते थेट पृथ्वी थिएटरमध्ये प्रवेश करण्यापर्यंत. हे सगळं पृथ्वीच्या सायक्लोवर प्रोजेक्ट केलं गेलं आणि शेवटचा सीन झाला.
दोन वेगळी माध्यमं एकत्र आणली गेली. ते स्वीकारलं गेलं की नाही, सांगता येत नाही; पण प्रेक्षकांना धक्का बसला, एवढं पक्कं. हेमंतनेच प्रकाशयोजना, डिझाइन आणि ऑपरेटसुद्धा केलं. त्याला नाटक या माध्यमाची जादू अनुभवायची होती. त्यानं लैलाला ‘सिनेमॅटिक’ बनवलं की लैलानं त्याला ‘थिएटरवाला’ बनवलं, माहीत नाही. पण प्रयोग रंगला.
माझ्या चित्रपटातील कारकीर्दीमुळे माझ्या नाटकवाला यात्रेला भरपूर काही मिळालं. जानेवारी-फेब्रुवारी २००० मध्ये मी रामगोपाल वर्माच्या ‘जंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बांदिपुरा जंगलात गेलो होतो. तिथं नेटवर्क नव्हतं. तेव्हा आवर्जून फोन वापरायची सवय आणि गरज नसायची. जयदीप साहनी- ज्यांनी बऱ्याच हिंदी फिल्म्स तसेच फिल्म्सची गाणी लिहिली आहेत आणि जो यशराज फिल्म्समध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे असे ऐकिवात आहे, तो माझा रूममेट होता. त्याला नाटकाच्या माध्यमातलं काव्य कळत होतं- की रंगमंचावर क्षणात जंगल उभं करता येतं. त्यासाठी तीनशे लोकांना घेऊन एवढय़ा लांब यावं लागत नाही. आणि मलाही याचं अप्रूप वाटायचं, की बांदिपुरा जंगलातलं हत्ती झाकला जाईल एवढं उंच गवत चित्रपटामुळे पाहता येतंय. असो!! आमच्या दोघांची विचारांची अशी (टोकाची) देवाणघेवाण चालायची.
रामूला खूपच गंमत वाटायची. रामू मला १९९२ सालापासून ओळखतो. त्याला कधीच कळलं नाही, की मकरंद फिल्मला नाही म्हणून नाटक का करतो? ते किती लोक पाहतात? त्यामागचं अर्थकारण काय असतं? असे बेसिक प्रश्न त्याला पडले होते. पण त्याला एक माहिती होतं, की मकरंदला नाटक सोड किंवा काही दिवस करू नकोस असं सांगता येणार नाही.
आम्ही अशा सुंदर रिसॉर्टमध्ये राहिलो होतो, जिथे सभोवताली अगदी चारही दिशेला जंगल आणि डोंगर. जेवढी भीती जंगली प्राण्यांची, तेवढीच वीरप्पनचीसुद्धा होती. कारण त्या परिसरात त्याचं येणं-जाणं आहे असं ऐकलं होतं. त्याच्या बऱ्याच दंतकथा ऐकायला मिळाल्या. काहींचं म्हणणं, तो जंगलातल्या लोकांसाठी देव होता, तर काहींसाठी दानव! मला असं वाटलं की, या निसर्गाने वेढलेल्या परिसरात राहून देव-दानव दंतकथेसाठी नाटक लिहू या.
छोटे राजेसाहेब एका सात वर्षांच्या सातव्या मुलीला- लक्ष्मीला विकत घेतात आणि मग ती मोठी होईस्तोवर स्वत:च्या लग्नाची वाट पाहतात. तिला आपल्या हजारो एकरांच्या साम्राज्याची मालकीण बनवतात. पण तिला पाहायची कोणालाही परवानगी नसते. तिच्यासमोर जाणाऱ्या लोकांना डोळ्यावर पट्टी बांधावी लागते. ती छोटय़ा राजेसाहेबांची राणी असते. तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्यांनी लहानपणी तिला देव-दानवांच्या गोष्टी सांगितलेल्या असतात. मोठी होता होता तिचे मित्र-मत्रिणी म्हणजे आंब्याची झाडं, ऊस, भारद्वाज पक्षी, विहीर, विहिरीतला साप!
एके वर्षी वसंत ऋतूबरोबर गावात खबर येते की, तालुक्याकडे एक सर्कस आलीय आणि त्यात एक महाशक्तिमान दानव आहे. तो हत्तींना कैची घालून खाली पाडतो. लक्ष्मीला त्या दानवाला पाहायचं असतं. छोटे राजेसाहेब तिच्यासाठी ती सर्कस आपल्या राज्यात आणतात. पण ठरवतात, की लक्ष्मीला दाखवण्याआधी आपण ती स्वत: पाहू. पण ते जेव्हा त्या दानवाला पाहतात तेव्हा आता मोठे झालेल्या राजेसाहेबांना त्याच्या अमानवी शक्तीबद्दल हेवा वाटतो. ते ती सर्कस परत पाठवतात.
लक्ष्मीला दानवाला बघायला न मिळाल्याने ती रागावते आणि रुसून विहिरीत उतरते. त्या दिवशी मध्यरात्री राजेसाहेब लक्ष्मीला सांगतात- बाहेर ये. मी तुझ्यासाठी सर्कशीचा दानव विकत आणलाय. आता त्या आमराईत लक्ष्मीबरोबर तो दानव राहायला लागतो. लक्ष्मी खूप आनंदी होते. कारण तिला वाटतं, की लहानपणी ऐकलेल्या देव-दानवांच्या गोष्टीतले दोघे तिला मिळाले. पण राजेसाहेब लक्ष्मीचं ते दानवासाठी असलेलं निरागस प्रेम पाहू शकत नाहीत. आणि ठरवतात की या दानवाला संपवायला हवं. खरं तर दानवात हत्तीचं बळ असतं. पण लक्ष्मीच्या प्रेमानं भावुक झालेला दानव मानव होऊन जातो. आणि देवस्थानी असलेले राजेसाहेब तलवारींनी दानवावर प्रहार करतात. दानव काहीच करत नाही. लक्ष्मीसाठी असंख्य वार तो देहावर झेलतो. राजेसाहेब दानव झालेले असतात. आता दानवाला मारून ते पुन्हा शक्तिमान राजेसाहेब होऊन लक्ष्मीला भेटतात, तर तिनं आपले डोळेच फोडून घेतलेत. कारण तिला आपल्या देवाला दानव झालेलं पाहायचं नसतं.
पंडित सत्यदेव दुबेंना भेटायला आलेली एक सुंदर मुलगी मी पाहिली आणि तिला विचारलं, ‘‘नाटकात काम करणार का?’’ ती फक्त दिसायलाच सुंदर नाही, तर खरंच अप्रतिम नटी! नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. पक्ष्यांबरोबर बोलणं, आमराईत एकटंच राहणं.. तिनं तिचं विश्व बनवून टाकलं त्या तालमीच्या खोलीत. आणि मग राजेसाहेबांबरोबरचं खेळकरपण, हट्टी प्रेम आणि दानवाबरोबर दंतकथेसारखं आगळंवेगळं नातं दाखवताना मला दिग्दर्शक म्हणून तिच्यातला सहज, पण अधोरेखित अभिनयाचा परिचय झाला. सोनाली कुलकर्णी अशी लक्ष्मी वाटली की माझे तंत्रज्ञ, बॅकस्टेजवाले सगळेच तिच्या प्रेमात पडले होते.
नेपथ्यात एक विहीर तयार केली होती आणि ती खोटय़ा विटांची नव्हती. कारण आम्हाला ती पाडायची होती. म्हणजे दानवाची शक्ती दाखवताना ती विहीर पाडणं किंवा उभं केलेलं झाड पाडणं या कृतींनी दृश्य नाटकीय, पण दंतकथेतलं वाटून गेलं.
अभिमन्यू सिंगने त्याच्या रोखठोक पद्धतीनं राजेसाहेब उभा केला. पण त्याचं प्रेम फार गमतीशीर वाटायचं. त्याचं हसणं हे गोड आणि भीषण वाटायचं.
दानव मी केला होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सदुसष्ट किलो वजनाचा मी दानव कसा वाटलो असेन? तर नाटक या माध्यमाची हीच तर मजा आहे. अगदी डोक्याच्या वरून पडणारा प्रकाश शरीराला रेखीव करतो. तर फूट स्पॉट लावला की तो नटाची मोठ्ठी सावली सायक्लोवर उभी करतो आणि मग एक खरोखर दंतकथा वाटावी असं धमाल दृश्य उभं करता येतं. त्यात मी थोडं हास्याची पुटं जोडली होती. मी असं म्हणणार नाही, की हे नाटक रंगमंचावर पूर्णपणे सफल झालं. पण एवढं नक्की, की मी याआधी असं नाटक केलं नव्हतं.
नाटकाचा प्रयोग झाल्यावर थिएटरला पुढचा आठवडाभर जाण्याची एक वेगळी मजा असते. कारण जो भेटतो तो प्रयोगाबद्दल अनौपचारिक दिलखुलास बोलतो. ‘बसंत का तिसरा यौवन’ असं नाव होतं नाटकाचं. नाटकप्रेमींकडून शाबासकी स्वीकारताना मनात एक गोष्ट आली की, गेली अनेक वष्रे माझं विचारविश्व नाटकात येऊन थांबतंय. मी लिखाण ते मंचन यामध्ये बांधलो तर गेलो नाही ना? हा प्रश्न डोक्यात आला आणि मी रवी काळेला (अभिनेता) विचारलं, ‘‘अरे रवी, जवळपास आमराई कुठे असेल?’’
रवी म्हणाला, ‘‘मिळाली. पुढे बोल.’’
‘‘मला त्यात फिरावंसं वाटतंय,’’ मी म्हणालो.
रवी म्हणाला, ‘‘चल मग माझ्याबरोबर घोडेगावला. मंचरजवळ. माझीच आंब्याची झाडं आहेत. आणि आपल्या ओळखीच्यांची तर मोठी आमराई आहे. चल.’’
मी घोडेगावला ताबडतोब गेलो आणि योगायोगानं वसंत ऋतूच होता. मी रवीच्या भावाला- राजूला भेटलो. राजूने मला अगदी भावाप्रमाणे वागवलं आणि बागा फिरवल्या. मग त्याच्याच ढाब्यावर जेवलो. आणि मी मनातला विचार सांगितला, की ‘बसंत का तिसरा यौवन’ हे नाटक मी केलं, पण ते मला या खऱ्या बागेत जिवंत करावंसं वाटतंय आणि त्यासाठी मी प्रेक्षक म्हणून कॅमेरा आणणार आहे. ठरलं.. मी फिल्म बनवणार.
कशी? पुढे काय झालं? ते पुढच्या लेखात. कारण नाटक ते फिल्म हा प्रवास खूपच नाटय़मय आणि अगदी एखाद्या दंतकथेसारखाच!
जय देव! जय दानव!
जय वसंत! जय दंतकथा!
mvd248@gmail.com