|| मकरंद देशपांडे

तुम्ही हा विचार करत असाल की- मी नवीन नाटक केल्यावर माझ्या जुन्या नाटकांचे प्रयोग होतात का? सगळे करणं शक्य नसतं. आणि तेव्हा त्या काळात सतत नवीन करायची इच्छा असल्यानं आणि मी कधीच माझ्या नाटकांना माझं मूल किंवा माझं जीवन असं न समजता एक ‘प्रयोग’ मानत आल्यामुळे तो प्रयोग झाला की त्याच्या यशापयशाबद्दल फार चांगलं किंवा फार वाईट नाही वाटायचं. पण एवढं नक्की, की त्या काळातलं माझं अस्तित्व त्या- त्या नाटकाचं कारण ठरायचं. ‘एक कदम आगे’, ‘सा ही बेसूरा’ आणि ‘सर सर सरला’चे प्रयोग आलटूनपालटून चालू असायचे. याचं कारण- त्या नाटकातले नट प्रयोग करायला नेहमीच तयार असायचे. कधीच त्यांच्या तारखांचा त्रास नव्हता.

मला रिप्लेसमेंट कास्ट प्रयोगात शक्यतो नको असायची. कारण मी ज्या नटांबरोबर दोन महिने तालीम करतो, ती व्यक्तिरेखा नवीन नट पाच दिवसांत तालीम करून प्रयोग कसा काय करू शकतो? आणखीन एक महत्त्वाचं कारण असं की, ज्या नटाबरोबर लिहिलेलं पात्र जिवंत झालं त्यात त्या नटाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग येतोच. मग दुसऱ्याबरोबर पुन्हा नव्याने त्या व्यक्तिरेखेला त्या नटाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे पाहायला लागेल आणि मगच ते नाटकात येईल.

पात्र/ व्यक्तिरेखा या फक्त प्रयोगातच जिवंत होतात असं नाही, तर काही नाटकांतील पात्रं ही प्रयोग संपल्यावरही प्रेक्षक आपल्याबरोबर घरी घेऊन जातात. मला असा अनुभव ‘सर सर सरला’च्या बाबतीत बराच आला. अचानक दिल्लीला कोणी भेटतं आणि विचारतं की, ‘सरला’चा प्रयोग कधी आहे?’ ‘तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर विचारू का?’ मी ‘हो’ म्हटल्यावर प्रश्न असतो की- ‘सरांनी सरलाशी लग्न का नाही केलं?’ ‘केशव नाटकात नसूनही होता. पण तो सरलाशी नीट वागला नाही. का?’ असे काही साधे वाटणारे, पण महत्त्वाचे प्रश्न. मी मुंबईत आल्यावर विचार केला की- ती व्यक्ती आपल्या मत्रिणीबरोबर प्रयोग पाहून दिल्लीला गेली, पण जाताना आपल्याबरोबर घेऊन गेली.. सर, सरला आणि केशवलासुद्धा!!

मला वाटलं, की केशववर अन्याय झालाय. कारण त्याच्याबद्दल नाटकात बोललं जातं, पण तो रंगमंचावर न आल्याने त्याची बाजू मांडण्यासाठी लेखक म्हणून मी त्याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेत आहे. मग माझ्यात आणि हुकूमशहात काय फरक? मग ठरलं, की केशवला प्रवेश द्यायचा. पण मग ‘सर सर सरला’चे प्रयोग चालले आहेत त्यातच केशवला आणायचं की ‘सर सर सरला’चा दुसरा भाग लिहायचा? माझ्या डोक्यातला हा प्रश्न मी पृथ्वी थिएटरमध्ये (बॉक्स ऑफिसजवळ) आजूबाजूच्या दोन-चार लोकांना ऐकू जाईल एवढय़ा मोठय़ानं विचारला. पटकन् ‘ग्रेट आयडिया सर!’ असं उत्तर आलं. २००४ साली ‘सरला’चा दुसरा भाग लिहिला. काही वर्षांनंतर सर, सरला, फणीधर आणि केशव काय करत असतील? माणसांचे स्वभाव काही बदलत नाहीत असं म्हणतात; पण वेळ-काळ स्वभावाला वळण देतात.

दुसऱ्या भागामध्ये सर निवृत्त झाले आहेत. फणीधरने आता सरांची जागा (घर आणि शिक्षकाची भूमिका) घेतलीये. सरला आणि केशवला मुलगा आहे. त्याचा कालच नववा वाढदिवस होता. सर आज फणीधरला भेटायला आले आहेत. त्याच घरी- जिथे ते काही वर्षांपूर्वी राहायचे. सरांना घरातलं आताचं दृश्य पाहून खूपच गंमत वाटते. फणीधर आता सर आहे आणि त्याचा एक विद्यार्थी (अनुभव) सरांना (फणीधरला) प्रश्न विचारून हैराण करतो आहे. जसा फणीधर सरांना करायचं तसा. फक्त आताची नवी पिढी जास्त आक्रमक आहे. त्यामुळे फणीधरसारखं फार मनात न ठेवता सगळ्याचा जाब विचारणारी किंवा खुलासा मागणारी ही पिढी आहे. फणीधरला मात्र आपल्या सरांसमोर आपल्या विद्यार्थ्यांचं वर्तन अजिबात आवडत नाही. आणि सरांना हेच फार आवडतं.

फणीधर हा आपल्या आवडत्या सरांचा आवडता विद्यार्थी होता, तरीही त्याला कधीही सरांसारखं व्हायचं नव्हतं. याउलट, अनुभवला आपल्या सरांसारखंच (फणीधर) व्हायचं असतं. अगदी भाषा, वाचन, राग.. सगळा फणीधर!!

प्रवेशाच्या पुढच्या भागात सर फणीधरला सरलाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या गमतीजमती सांगतात. त्यात एक भिकारी कसा ताटकळत रस्त्यावरून खिडकीकडे बघत उभा राहिला होता. त्याला सरलाच्या मुलानं- सौरभनं केक, जेवण आणि पैसेही दिले. तरीही त्या भिकाऱ्याला मात्र सौरभला मिठी मारायची होती. सौरभ आधी घाबरला. मग सरलाच्या होकारानं त्याला मिठी मारू दिली. भिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं. मग तो एकही मिनिट न थांबता निघून गेला. सरांचं म्हणणं पडलं की, भिकारी असणं हे गद्य आहे, पण मिठी हवी असणं हे काव्य आहे. फणीधर या काव्याला नाकारतो आणि भिकाऱ्याच्या वागण्यात काव्य शोधणं हेच मुळी निवृत्त माणसाचं लक्षण आहे, असं म्हणून सरांना जुन्या फणीधरची आठवण करून देतो.

प्रवेशाच्या शेवटी सर फणीधरला वस्तुस्थिती सांगतात. कारण फणीधरने सरला आणि केशवशी संपर्कच तोडल्यानं त्याला काहीच माहिती नसतं. सरला आणि केशवनं डिव्होर्स घेतलाय आणि सरलानं आत्महत्या करायचाही प्रयत्न केला होता. केशवची मानसिक स्थिती असंतुलित आहे. फणीधरला बसलेला धक्का तो सरांना दाखवत नाही. सर त्याला विनंती करतात की, केशव त्याला येऊन भेटू इच्छितो आणि या भेटीला फणीधरनं ‘हो’ म्हणावं. फणीधर रागावून होकार देतो.. सरांच्या जोडलेल्या हातांना पाहून.

केशव आणि फणीधरच्या भेटीत साचलेल्या रागाचा स्फोट होतो आणि फणीधर सुंदर सरलाचं जीवन उद्ध्वस्त केलं म्हणून आरोप करत केशवला शिवीगाळ करतो. केशव मात्र सगळं ऐकून घेतो आणि आपली बाजू ऐकायची विनवणी करतो. फणीधरचा उद्रेक संपल्यानंतर केशवला तो बोलू देतो.

केशव आपली बाजू मांडताना आपल्यातल्या काव्यविहीन अंगाबद्दल दु:ख व्यक्त करतो. त्याच्याकडून त्याने सरलाला खूश ठेवण्याचे सगळे प्रयत्न केलेले असतात. पण सरलाचं प्रेम त्याला पैसे खर्च करून टिकवता नाही आलं. जीवनात ‘रोमान्स’ हा शब्दांनी येत असेल तर त्याच्याकडे शब्दांचे दारिद्रय़ होते. सरलाला झालेला त्रास हा त्यालाही झाला. त्याला हरलेला नवरा व्हायचं नव्हतं. त्याच्या घरच्यांनी तर सरलाला डिव्होर्स घ्यायला भाग पाडलं. त्यासाठी सरलाच्या केलेल्या मानसिक छळाने तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर केशवला अपराधी भावनेपोटी पॅनिक अटॅक आले. त्यातून तो हिंसक होत गेला. त्याला सायकिअ‍ॅट्रिक ट्रीटमेंट सुरू झाली. आज त्याला फणीधर आणि सरलाची माफी मागायची आहे.

सरांच्या मते, त्याच्या मनातलं सगळं बोलून झाल्यावर त्याला बरं वाटेल. आणि खरंच तसं होतंही. आता फणीधरला केशवबद्दल राग नाही, तर त्याची दया वाटते आणि तो केशवच्या या दशेला सरांना जबाबदार धरतो. केशव आणि फणीधर सरांची वाट पाहतात. सर एकटे येत नाहीत, तर ते सरलाला बरोबर घेऊन येतात. सर आपल्या तीनही विद्यार्थ्यांना वास्तवाला स्वीकारून ‘सर सर सरला’ या विश्वातून बाहेर पडायला सांगतात. रागानं भरलेला फणीधर आपल्या सरांची ही हार आहे असे घोषित करतो. कारण त्यांनी आपल्या तिन्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.

सरला मात्र वेगळाच निर्णय घेते. ती सरांनी आपल्यासाठी घेतलेल्या निर्णयाची पाठराखण करताना केशवला सांगते की, ‘‘केशव, तू आणि मी आपण फणीधरला दाखवून देऊ या, की आपण सगळ्यात समजूतदार जोडी बनू शकतो.’’ केशव एका क्षणात मानसिक आजारातनं बरा झाल्यासारखा सरलाचा हात धरतो. त्याला फिट येते. सरला त्याला सावरते. अंधार होतो. सरांच्या चेहऱ्यावर स्पॉट. सर नि:श्वास सोडतात. जणू काही सर हे होणार असं ठरवून आलेले असतात.

पहिल्या भागात आठवणींचं काव्य होतं म्हणून पावसाबरोबर कवितांच्या ओळी रिमझिम करत पडत होत्या. दुसऱ्या भागात मात्र वास्तवाशी झुंज होती. त्यामुळे वास्तव भेदकपणे समोर ठेवलं गेलं. वास्तवाच्या गरम हवेने काव्य करपलं आणि गद्यातली हिंसक भाषा आणि शिवीगाळ लिहिली गेली.

पहिला भाग केला तेव्हा अनुरागची ‘पांच’ नावाची फिल्म बंद पडली होती. तो राग काढण्यासाठी त्याला ते नाटक उपयोगी पडलं होतं. दुसऱ्या भागाच्या आधी त्याची ‘गुलाल’ फिल्म सेन्सॉरमध्ये अडकली. त्याला मी गमतीनं म्हटलं की, जेव्हा जेव्हा तुला खूप राग येईल, मी ‘सरला’चे भाग लिहीन.

प्रोफेसर फणीधर करताना अनुरागने परिपक्वता दाखवली. सोनाली (सरला) दोनच प्रवेशांत होती, पण केशवला परत नेण्याचा निर्धार केल्यानंतरचा तिचा अभिनय बऱ्याच नवरा-बायकोना आशा देऊन गेला. अभिमन्यू सिंगने अभिनित केलेला केशव दहा मिनिटांच्या स्वगतामध्ये भाव खाऊन गेला.

टेडी मौर्यानं (कला-दिग्दर्शक) पहिल्या भागात काव्यात्मक सूचक पाऊस पाडला, पण दुसऱ्या भागात मात्र वास्तव दाखवताना त्याने रंगमंचाच्या मागच्या भागात खरा पाऊस (पाणी) पाडला. संजय मौर्यानं दिलेल्या बॅकलाइटमध्ये वाऱ्याच्या साऊंड इफेक्टबरोबर तो अधिक परिणामकारक वाटला.

‘सर सर सरला’ भाग पहिला पृथ्वीला सहा वाजता आणि भाग दोन सव्वानऊ वाजता व्हायचा. प्रेक्षक दोन्ही भाग बघायचे. दिल्लीला तर अशी गंमत झाली की शनिवारी भाग एक आणि रविवारी भाग दोन केले. पण दोन्ही दिवशी बहुतांशी तेच प्रेक्षक आले. ‘असं पहिल्यांदाच घडलं..’ असं दिल्लीकर म्हणाले.

जय सरला! जय सोनाली!

जय अनुराग! जय अभिमन्यू!

mvd248@gmail.com