|| मकरंद देशपांडे
मागच्या ‘लोकसत्ता’च्या ‘रविवार वृत्तांत’ या पुरवणीत रवींद्र पाथरे यांनी नासिरुद्दीन शाह यांच्या ‘मोटली’ या नाटय़संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रंगभूमीवरील त्यांचा प्रवास आणि एकूणच रंगकार्यासंबंधीची त्यांची मतं जाणून घेतली. लेखाचा मथळा ‘रंगभूमी नाटककाराचीच’ हे वाचून माझ्यातल्या नाटककाराला आनंद झाला. पण ते म्हणणं पूर्णत: पटलं नाही. कारण बरीचशी नाटकं ही लिखाणापेक्षा दिग्दर्शनामुळे जास्त नाटकीय वाटतात. असो. हा चच्रेचा मुद्दा ठरू शकतो. पण जर नासिरुद्दीन शाहांना नाटककार श्रेष्ठ वाटत असतील तर माझ्यातल्या नाटककाराला आनंदच झाला; पण तो फार वेळ टिकला नाही. कारण त्यांचं पुढे म्हणणं असंही होतं की, इंग्रजीत त्यांनी नाटकं केली, पण हिंदीत मोहन राकेश आणि धर्मवीर भारती यांच्यानंतर नाटककारच नसल्यानं त्यांनी इस्मत चुगताई, मन्टो, प्रेमचंद यांच्या कथांवर आधारित नाटकं सादर केली. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, चित्रपटाच्या जन्मामुळे हिंदी रंगभूमीने राम म्हटलं. हिंदी नाटकंच लिहिली जात नसतील तर ती करणार कोण? आणि कशी? आणि नाटकच होत नाही म्हटल्यावर प्रेक्षकवर्ग तरी कसा निर्माण होणार?
नासिरुद्दीन शाह सर- अहो, गेल्या २५ वर्षांत मी पन्नासहून अधिक हिंदी नाटकं लिहून रंगमंचावर आणलीयेत. चित्रपटाच्या जन्मानंतर नाटककार, साहित्यिक चित्रपटात गेले म्हणून नाटकं लिहिली गेली नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. अहो, पण मी चित्रपट नाकारून, टेलिव्हिजन नाकारून नाटकं लिहिली. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. (आणि माझ्या नाटकांना मी चित्रपट अभिनेता आहे म्हणून प्रेक्षकवर्ग नाटक बघायला आला नाही. असो.) राग एवढाच, की फक्त तुम्हीच नाही, तर असे बरेच दिग्गज रंगकर्मी उघडपणे कधीच त्यांच्यानंतर येऊन मोलाचं काम करणाऱ्या रंगकर्मीबद्दल बोलत नाहीत. (अर्थात यालाही काही अपवाद आहेत.) त्यामुळे हिंदुस्थानच्या नाटय़-इतिहासात मोजक्याच नाटककारांची, दिग्दर्शकांची आणि नटांची नावं घेतली जातात. मग बाकीच्यांनी काय फक्त नाटकांची आणि प्रयोगांची संख्याच वाढवली? का जुन्याच नाटकांवर भागवलं आहे?
जर हिंदीत नाटकाचा प्रेक्षकवर्ग तयार झाला नाही असं म्हणणं असेल तर माझ्या नाटकांना अगदी दिल्ली, पाटणा, भोपाळ, कोलकाता, अहमदाबाद, बरेली, जयपूर, लखनौ, कानपूर, पुणे आणि अर्थात मुंबईत येणाऱ्या प्रेक्षकांना काय म्हणायचं? की जसे त्यावेळचे नाटककार हे नाटककार होते तसेच त्यावेळचे प्रेक्षक हेच प्रेक्षक होते? असो. कुंवर नारायण या श्रेष्ठ कवींच्या दोन ओळी लिहून हा क्षणिक उद्रेक थांबवतो.
‘बाकी कविता शब्दों से नहीं लिखी जाती,
पुरे अस्तित्व को खिंचकर
एक विराम की तरह कहीं छोड दी जाती है’
नाटकासाठी जीवन आणि जीवनातलं नाटक दोन्ही काव्यमय असतं आणि नाटकातल्या पात्रांचं जीवन तर महाकाव्य ठरू शकतं.. जर नाटकाच्या पात्रांची नाटकाबाहेर आपल्या विचारांत विचारपूस करत राहिलो तर! ‘सर सर सरला’ नाटकाबाबत तसं घडलं. सर, सरला, फणीधर आणि केशव पहिल्या भागाच्या मंचनानंतर चार वर्षांनी पुन्हा रंगमंचावर येण्यासाठी माझ्या डोक्यात एकत्र झाले आणि भाग २ लिहिला गेला. त्यात पहिल्या भागात खलनायक ठरलेल्या केशवची बाजू मांडण्यात आली आणि अचानक ‘सर’ तिन्ही विद्यार्थ्यांसाठी नावडते झाले. सरलाने मात्र ‘मी आणि केशव सगळ्यात प्रेमळ जोडपं होऊन दाखवू’ ही शपथ घेतली आणि दुसऱ्या भागावर पडदा पडला.
२००६ साली- म्हणजे दुसऱ्या भागाच्या मंचनानंतर दोन वर्षांनी मनात असा विचार आला- की समजा, सरांनी सरलाशी लग्न केलं असतं तर काय झालं असतं? कॉलेज कॅम्पसमध्ये त्याचे काय पडसाद उमटले असते? ऑर्थोडॉक्स विचारसरणीला किती धक्का बसला असता? प्रोफेसर-विद्यार्थिनीच्या लग्नानं राजकीय स्वरूप घेतलं असतं का? या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी पुन्हा ‘सर सर सरला- भाग १’ नव्यानं लिहिणार नव्हतो. मला असं वाटलं की फणीधर- जो आपल्या सरांच्या तटस्थतेमुळे चिडलेला आहे, पण नाइलाजास्तव सरांबरोबर कॉलेज संपल्यावरही काम करतोय- आणि आता सरांच्या निवृत्तीनंतर स्वत: प्रोफेसर झालाय, तर तो आपल्या सरांच्या निर्णयाला चुकीचं ठरवण्यासाठी स्वत: एका विद्यार्थिनीशी लग्न करू शकतो का?
भाग- ३ चं लिखाण सुरू झालं. पहिल्याच प्रवेशात कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये फणीधर सरांचा फेवरिट विद्यार्थी- ‘अनुभव’ झोपलेला असतो. दीपक आणि लीना त्याला जागं करतात व त्याला भीतीदायक बातमी देतात. सरांनी गौरीशी विवाह करण्याचा निर्णय घेतल्यानं रागावून गौरीचा लांबचा चुलतभाऊ काशिनाथ- जो एका राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचा नेता आहे- सरांचं तोंड काळं करून गाढवावरून त्यांची कॉलेज कॅम्पसमध्ये धिंड काढणार आहे. म्हणून सर लपून बसले आहेत. आपले सर लपून बसले आहेत या बातमीवर अनुभवचा विश्वास बसत नाही. काशिनाथ अनुभवची खडसून चौकशी करतो. पण अनुभवचा आपल्या सरांबद्दलचा आदर आणि प्रेम पाहून चिडून काशिनाथ अनुभवचंच तोंड काळं करतो आणि त्याची गाढवावरून धिंड काढतो. शिवाय कॉलेजमध्ये धमकीयुक्त भाषण करतो- की जो कोणी सरांच्या विवाहाला मान्यता देईल, त्याचं तोंड काळं करण्यात येईल. सर काशिनाथच्या मंचावर दाखल होतात आणि विद्यार्थ्यांसमोर आपल्या विवाहाच्या निर्णयाचं कारण सांगतात. प्रेम हे किती पवित्र आहे, हे सांगताना टागोरांच्या कविता म्हणतात. ते विद्यार्थ्यांची कविमनं जिंकतात. पण काशिनाथसारखेच ठरवून विरोध करणारे काही विद्यार्थी सरांना धमकावतात, की त्यांनी विवाहाचा निर्णय जर मागे घेतला नाही तर खूप त्रास होईल, राग कुठल्याही टोकाला जाईल. मीडियामुळे ही बातमी सरला आणि केशवपर्यंत पोहोचते; जिने भाग २ च्या शेवटी घेतलेली शपथ खरी केली आहे.
सरलाचा संसार नव्यानं फुलला आहे. सरला आता ठरवते की तिच्या कॉलेजच्या खास मित्राचं लग्न गौरीशीच होणार! केशवच्या बऱ्याच मोठय़ा (राजकीय, पोलीस, मीडिया) लोकांशी कौटुंबिक ओळखी आहेत. काशिनाथला वरून दबाव टाकून शांत केलं जातं. कॉलेजला डोनेशन दिलं जातं. लायब्ररीत एक नवीन भाग टागोरांच्या साहित्यासाठी बनवला जातो. त्याच्या उद्घाटनासाठी त्याच राजकीय पक्षाचे युवा नेते येणार असं ठरतं. सरला आणि केशव मिळून प्रोफेसर फणीधर आणि गौरीचं लग्न धुमधडाक्यात संपन्न करायचं ठरवतात. सगळं काही व्यवस्थित पार पडणार असं दिसतं, तेव्हाच सरला, फणीधर आणि केशव यांचे सर येतात आणि हे लग्न कसं तीन विद्यार्थ्यांचा अट्टहास आहे हे त्यांना पटवून देतात. जे सर करू शकले नाहीत, ते आता विद्यार्थी सर झाल्यावर करून काय मिळवणार? तर- एक विजय! त्यात प्रेमापेक्षा पूर्वग्रहाचा आणि वैयक्तिक युद्धाचा विजय आहे. ‘सर सर सरला’मधील प्रेमानं आणि अधिकारानं हाक देणारी सरला भाग ३ पर्यंत हिशेबी झाली. यात विजय आहे की पराजय? सरांचं म्हणणं फणीधरला पटतं. कारण त्याच्या निर्णयामुळे त्याच्या विद्यार्थ्यांची गाढवावरून धिंड काढलेली असते. जरी सरलाने ते प्रकरण सावरलं आणि केशवने आपल्या ओळखींनी त्याला एक इव्हेंट करायचं ठरवलं; तरी फणीधरला कुठेतरी आत पटलंय की सरलाशी विवाह न करण्याचा निर्णय सरांनी का घेतला होता! किंबहुना सरांनी सरलाच्या प्रेमालाही सीमारेषा ओलांडू दिलेली नसते. कारण असलं प्रेम शिक्षणसंस्थेसाठी बेजबाबदार आहे, विश्वासघातकी आहे. फणीधर लग्न मोडतो.
सरलाला खूप राग येतो- की सरांनी फणीधरला आपल्या रूढीप्रिय विचारांनी बांधून टाकलं. शेवटी खरं प्रेम जे सर्व बंधनं-मर्यादेपासून मुक्त असतं, तेच हरलं असं वाटून ती फणीधरला प्रेमाच्या दंतकथेतील नायकाप्रमाणे अग्निपरीक्षा करायला सांगते. हे जाणून घेण्यासाठी- की लग्न मोडायचा निर्णय फणीधरचा आहे की सरांचा? हातात जळता कोळसा घेऊन फणीधर म्हणतो की, ‘सर बरोबर आहेत, आपणच चुकलो आहोत.’ अंधार होतो आणि नाटक संपतं.
नाटक बसवताना मी पहिल्या आणि दुसऱ्या भागातील सरांचं व फणीधरच्या घराचं प्रतीकात्मक नेपथ्य काढून टाकलं. मग रिकाम्या रंगमंचावर काही कमी-अधिक उंचीच्या लेवल्स ठेवल्या आणि प्रेमाचं वैयक्तिक, सामाजिक, नैतिक, क्लासिक अशा चार पातळ्यांवरचं नाटय़ बांधलं. ते करताना प्रेमाची गळचेपी आणि नैतिकतेचं द्वंद्व दाखवता आलं. फणीधर सरांच्या लग्नाच्या निर्णयानंतर कॅम्पसमधलं टेन्शन दाखवण्यासाठी विंगेत मिलिटरीचे बूट घातलेला कोरस पाय आपटत आपला आक्रोश व्यक्त करत होता.
अनुराग कश्यपसाठी भाग ३ खूपच अवघड होता. कारण त्याला आपल्या सरांचा आदर्श समाजासमोर ठेवायचा होता आणि त्याच वेळी त्याच सरांच्या विरुद्ध क्रांती करायची होती. मला असं वाटतं की अनुरागच्या जीवनातही त्यावेळी (पांच, गुलाल, ब्लॅक फ्रायडे) चित्रपटांच्या प्रदर्शनात येणाऱ्या/ आलेल्या अडचणींमुळे मनात राग आणि स्वीकार करण्याची क्षमता आली होती. याचा प्रत्यय मला तेव्हा आला, जेव्हा मी ठरवलं की ‘सर सर सरला- १,२,३’ ही त्रिनाटय़धारा पृथ्वीला करू या. अनुराग तेव्हा म्हणाला होता की, ‘या तीन भागांत सलग अभिनय केल्यावर माझ्या मनातला राग-द्वेष निघून जाईल.’ कारण नायक हा त्रिनाटय़धारेशेवटी टागोरांच्या कवितेसारखा होतो..
‘कुछ मानते है कि रूप अरूप,
बराबर आसन पाते हैं दरबार में सृष्टि की,
दरबान लौटाता नहीं किसी को,
कवि मैं! इन तर्को से दूर दूर देखता विश्व को,
सुबह जागा तो गुलाब एक पडा था फूलदान में,
प्रश्न उठा क्या है वो किसी के लिये?
या काटों के रास्ते पहुंच गया है
गलत पते की खोज में..’
पृथ्वी थिएटरमधील ‘सर सर सरला’ ही त्रिनाटय़धारा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. पाहणाऱ्यांसाठी आणि आमच्यासाठीही. दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत चाललेले तीन भाग. प्रेक्षक भर दुपारी दोन वाजल्यापासून लाइनीत उभे. काही ‘सर सर सरला’ या नाटकाचे वेडे, तर काही सलग नऊ तास नाटक बघण्यासाठी आलेले, तर काही ‘दुसऱ्याकडून नको कळायला- की कसा होता अनुभव’ म्हणून आलेले. पण खरंच, पृथ्वी थिएटरच्या इतिहासात असा दिवस पाहिला गेला नसेल.
असो. तरीही जर कुणाला वाटत असेल की जुन्या मातब्बर नाटककारांनंतर नाटकं लिहिली गेली नाहीत, किंवा लिहिली गेलेली नाटकं उल्लेखनीय नाहीत, तर हा त्यांचा दृष्टिकोन असू शकतो. पण नाटकं लिहिलीच गेली नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल.
जय रंगभूमी! जय प्रेक्षक!
जय नाटककार! जय दिग्दर्शक!
mvd248@gmail.com