विनम्र स्पष्टवक्तेपणा

‘आपण कोणते नाटक बघू या?’ असे प्रियाला विचारले की ‘मला माहीत नाही.. म्हणजे निश्चित सांगता येत नाही. तुला कोणते बघायचे आहे तेच बघू..’ हे तिचे ठरलेले आणि सवयीचे उत्तर. अशाने समोरच्या व्यक्तीच्या आवडीचे नाटक पाहिले जाते आणि मग ‘आपल्याला जे नाटक पाहायचे होते ते आपण सांगितले का नाही?’ याबद्दल प्रियाला पश्चात्ताप होतो. मित्र-मैत्रिणींच्या गप्पा तिला […]

‘आपण कोणते नाटक बघू या?’ असे प्रियाला विचारले की ‘मला माहीत नाही.. म्हणजे निश्चित सांगता येत नाही. तुला कोणते बघायचे आहे तेच बघू..’ हे तिचे ठरलेले आणि सवयीचे उत्तर. अशाने समोरच्या व्यक्तीच्या आवडीचे नाटक पाहिले जाते आणि मग ‘आपल्याला जे नाटक पाहायचे होते ते आपण सांगितले का नाही?’ याबद्दल प्रियाला पश्चात्ताप होतो. मित्र-मैत्रिणींच्या गप्पा तिला आवडतात. पण आपले मत ती त्यात क्वचितच मांडते. आणि मांडते तेही इतक्या सौम्य स्वरात, की इतरांनी त्याची नोंद घेणेही कठीण!
याउलट, सोहमला आपले मत मांडण्यात कसलेच अडथळे वाटत नाहीत. किंबहुना, ते मांडताना तो इतका आक्रमक होतो, की इतरांवर सहज हावी होऊन स्वत:ला हवे तसेच नेहमी तो करून घेतो. गप्पांमध्ये मत मांडताना इतक्या तीव्र स्वरात तो मांडतो, की इतर त्याला हुकूमशहा मानतात आणि त्याच्या संगतीत ते अस्वस्थ असतात.
या दोन्ही टोकांच्या स्वभावाचा सुवर्णमध्य साधते ती श्रद्धा! तिला तिचे मत विचारल्यास ती ते खंबीरपणे, प्रामाणिकपणे आणि नि:संकोच सांगते. तिचे एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद असल्यास ती विनम्रतेने, परंतु स्पष्टपणे सांगते. त्या स्पष्टवक्तेपणात उद्धटपणा नसतो. इतरांच्या मतांबद्दल तिला आदरही असतो. त्यामुळे मतभिन्नता असूनही इतरांना तिच्याप्रति आदर वाटतो. थोडक्यात, श्रद्धा ही Assertive वागणारी मुलगी आहे.
Assertiveness म्हणजे आपला दृष्टिकोन खंबीरपणे मांडणे, निश्चित विधान करणे, आपला अभिप्राय स्पष्ट कळवणे. आपली बाजू विनम्रतेने सुस्पष्ट करणे. आपल्या व इतरांच्या गरजा, मते, भूमिका व दृष्टिकोनाचा आदर ठेवून प्रामाणिकपणे बोलणे, विनम्र स्पष्टवक्तेपणा हा सशक्त आणि परिणामकारक संवादाचा महत्त्वाचा पैलू आहे. प्रियासारखा स्वभाव हा इतका मवाळ ठरतो, की त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो. अशा व्यक्तींना सतत दुखावले गेल्याची किंवा रागाची भावना सतावत राहते. आपल्याला काय म्हणायचे आहे हे आपणच नीट न मांडल्यास इतर लोक आपली मते व दृष्टिकोनासंदर्भात अनभिज्ञ राहतात. त्यांना आपली निश्चित भूमिका कळत नाही आणि त्यांना त्याचा लाभही मिळत नाही. अशाने आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होण्याची शक्यता वाढते. आपल्याकडच्या चांगल्या कल्पना आपल्यापाशीच राहतात व त्या ऐकून मिळू शकणाऱ्या सकारात्मक अभिप्रायापासून आपण वंचित राहतो. या स्वभावाची पाळेमुळे आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत सापडू शकतील. आपल्या गरजांना प्राधान्य देणे हे स्वार्थीपणाचे लक्षण आहे असे बरेच लोक मानतात. काही अंशी महिलांना या मानसिकतेचा जास्त ताण सोसावा लागतो. (ही स्थिती आता बदलत चालली असली तरीही त्याचे प्रमाण किती, हा प्रश्न अभ्यासण्याजोगा आहे.) या स्वभावाचा स्रोत आपल्या संगोपनाच्या अनुभवांत आढळतो. लहानपणापासून आपल्या गरजांबद्दल वाच्यता करू देण्याचे नाकारले गेल्यास काहींना या स्वभावाची इतकी सवय होते, की ती त्यांची जीवनशैलीच बनते. याउलट, या दबावाचा निषेध म्हणून कधी कधी असा माणूस आक्रमकतेचे दुसरे टोक गाठतो असेही आढळून आले आहे. वरील उदाहरणातील सोहमसारखे! आपण ज्या व्यक्तींना प्रेरणास्थान मानतो, त्यांच्या स्वभावातले पैलू आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. अशा निरीक्षणांतूनही स्वभाव प्रभावित होऊ शकतो. बऱ्याचदा इतर लोक आपल्याबद्दल,आपल्या प्रतिमेबद्दल काय विचार करतील, या अनिश्चिततेमुळेही आपण कच खातो. आपल्या स्पष्टवक्तेपणाने त्यांना वाईट वाटेल, राग येईल म्हणून आपण बोलणे टाळतो. त्याकरता स्वत:चे नुकसानही कित्येकदा सहन करतो, पण इतरांच्या भावनांना आपण भितो. स्वतंत्र विचार करण्यास आपण कंटाळा करतो आणि इतरांच्या मताबरोबर जाणे सोयीचे समजतो व पुन्हा बोलणे टाळतो. या सगळ्याबरोबरच योग्य शब्दांच्या अभावीही आपण काही वेळा कच खातो.
याउलट, सोहमसारख्या वागण्याने आपल्या मित्र-आप्तेष्टांना अपमानित वाटू शकते. ते आपल्याला टाळू शकतात. स्नेह ओसरू शकतो. अशाने आपण आपले मत समोरच्यांवर बिंबवूही, किंवा आपली कामे करून घेऊही; पण दरम्यान इतरांचा आपल्याप्रति असलेला आदर व प्रेम मात्र आपण गमावून बसू.
या दोन्हींत समन्वय साधणारे वागणे- श्रद्धाचे! विनम्र स्पष्टवक्तेपणा हे शिकण्याजोगे कौशल्य आहे. ते आत्मसात केल्यास आपल्या आत्मविश्वासाची पातळी उचित राहील. ना अति, ना कमी. आपल्या विचारांवर आपण ठाम राहू आणि आपली बाजू सुयोग्यपणे मांडणे हा आपला अधिकार व जबाबदारी आहे हे आपल्याला जाणवेल. आपण इतरांच्या आवडी-निवडींचा आदर राखू. गरज भासेल तेव्हा मदत मागू शकू. आपल्या शंका, प्रश्न विचारू शकू. इतरांपेक्षा आपली मते भिन्न असूनही ती मांडण्याचे धाडस एकवटू शकू.
हे कौशल्य नेमके कसे साध्य करावे?
हे कौशल्य शब्द व देहबोलीतून साध्य होणे गरजेचे आहे. एखाद्या प्रसंगात आपल्याला हे कौशल्य दाखवण्याची गरज आहे हे प्रथम अचूक ओळखावे. सुरुवात कमी ताणाच्या, साधारणत: सोप्या, पण आपल्याला कठीण वाटणाऱ्या प्रसंगापासून करावी. उदा. आपल्याला एखाद्याने सिनेमा/ नाटक/ खाद्यपदार्थ याविषयी आपली आवड/ मत विचारल्यास ते देण्याचा आग्रह धरावा. हा आग्रह तेव्हाच धरता येईल- जेव्हा पहिल्यांदा आपण आपल्या मनाशी खंबीरपणे संवाद साधू. ‘मला हे आवडते.. ते आवडत नाही. हे पटते.. ते पटत नाही’ यावर आधी स्वत:ची म्हणून एक भूमिका तयार करू. स्वत:ला आधी ठामपणे एखादी गोष्ट पटवून सांगितल्याविना इतरांना ती सांगणे कठीण जाऊ शकते. ही पहिली पायरी यशस्वीरीत्या पार केल्यास पुढची पायरी म्हणजे आपली भूमिका व दृष्टिकोन इतरांपर्यंत पोहोचवण्याची! हे करताना आपल्या देहबोलीत आत्मविश्वास हवा. नजर स्थिर व आदरपूर्ण असावी. बोलण्याचा स्वर व आवाजाची पट्टी सौम्य, पण खंबीर असावी. उदा. समजा- आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या उद्दाम वागण्याचा त्रास होत असेल, किंवा रागीटपणाचा वीट आला असेल तर आपण आपली भावना पुढीलप्रमाणे व्यक्त करावी..
‘‘जेव्हा तुम्ही अमुक (वर्तमानाचे वर्णन करावे. केवळ वस्तुस्थितीवर आधारित परिस्थितीचा आपण आपल्या ठोकताळ्यांनी लावलेला अर्थ नव्हे. पूर्वग्रहाने तर अजिबात नाही.) असे वागता तेव्हा माझ्यावर असा परिणाम होतो. मला अमुक अमुक वाटते. (नेमक्या भावनांचे व मानसिक स्थितीचे वर्णन करावे.) मला आवडेल (आपल्याला अपेक्षित असलेल्या बदलाचे वर्णन करावे.)- तुम्ही अमुक बदल तुमच्यात घडवून आणू शकलात तर!’’
उदा. ‘‘जेव्हा तू माझ्यावर ओरडतोस तेव्हा मला घाबरल्यासारखे व अस्वस्थ वाटते. अपमानित वाटते. जर तू तुझी आवाजाची पट्टी नियंत्रणात ठेवून बोललास तर तुला निश्चित काय अपेक्षित आहे ते मला कळेल व आपण एकत्रितपणे एखाद्या गोष्टीवर तोडगा काढू शकू.’’
अशा पद्धतीने सांगण्याचा हेतू हा, की समोरच्या व्यक्तीला अहिंसकपणे व जबाबदारीने आपण सांगतो की, त्याच्या/ तिच्या वागण्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, आणि समन्वयाने आपल्या बरोबरीने समोरच्या व्यक्तीला होणारा लाभही उल्लेखिला जातो. ही प्रक्रिया समन्वय साधेपर्यंत, सुवर्णमध्य गाठेपर्यंत सुरू ठेवावी लागू शकते.
हा खंबीरपणा अंगी बाणवणे हे मोठे प्रयासाचे काम आहे व त्याची अचूक वेळ निवडणेही महत्त्वाचे ठरते. या स्पष्टवक्तेपणाचा अवलंब इतरांवर बोचरी टीका करण्यासाठी वा उपहासात्मक विधाने करण्यासाठी केल्यास ते अनुचित ठरेल. तेव्हा एखादी गोष्ट दोन्ही व्यक्तींकरता न्याय्य व सामोपचाराच्या स्वरूपाची होण्यासाठी आपली भूमिका हिमतीने, चिकाटीने, खंबीरपणे व थेट मांडण्याची गरज आहे. अर्थात एकमेकांच्या वैयक्तिक मर्यादांचा योग्य तो आदर राखून!
ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Modest outspokenness

ताज्या बातम्या