|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

सगळीकडेच जमले होते सगळे. गार सरोवरांकाठी, गर्द राईत, मनुष्यवस्त्यांत, बर्फात, पर्वतात अन् तप्त वाळवंटातही! तसे ते नेहमीच जमत. फार बडेजाव न करता, निमंत्रण-आमंत्रणाचा खेळ न मांडता, ऋतुबदलाचा सर्वमान्य संकेत पाळून पाखरोपाखरी निरोप जात. कधी वाऱ्याचे गंध आठवण देत, तर कधी झळांच्या ज्वाळा. अतिउत्तरेहून सलग भराऱ्या मारीत चित्रबलाकांनी ती गोष्ट दशदिशांत पोहोचवली होती. खरं म्हणजे, गेली काही वष्रे ती सगळीच मनुष्यांच्याच गोष्टीची चर्चा करीत असत. हळहळत असत. पण नंतर मात्र निश्चित जबाबदाऱ्यांचं वाटप करीत कामाला लागत. या वेळीही अनेकांना ‘मनुष्याची गोष्ट’ चर्चिली जाणार म्हणता बिलकूल नवल वाटलं नव्हतं. चित्रबलाक प्रवासात गोष्ट रंगवतात अन् पसरट उथळ पाणथळाच्या प्रीतीपोटी गोष्टीही उगाच ओल्या, भावनिक अन् पारदर्शी करतात, अशी टीका मागे कधीतरी कावळ्यांनी केली होती. त्यातील तथ्य पटूनही अनेकांना चित्रबलाकांच्या या रंगीत गोष्टी आवडत होत्या. त्या हळुवार साकारत अन् नजरबंदी घालत मनात स्थिरावत. काळ्या मनेनं तर – ‘ऊलुकी स्थितप्रज्ञ दृष्टीचं कारण म्हणजे त्यात अडकलेली चित्रबलाकी गोष्ट’ असं एकदा म्हटल्यानं चांगलीच चिवचिव अन् फडफड माजवली होती.

असोऽऽऽऽऽ! एक हलकी टुणूक उडी मारीत गरुडबुवानं जरा उंच कातळ गाठला.

‘‘काय गोष्ट आहे?’’

‘‘हे पहा, करकोच्यांकरवी धाडली म्हणून गोष्टीतला पसरटपणा कमी होईल असं समजू नका. कारण करकोच्यांनी ती इथवर खंडय़ाला आणायला सांगितली होती, पण तो रानात हरवला तेव्हा घाईनं त्यानं साळुंखीला गळ घातली. आता गोष्टीला जोड मिळाली नसली म्हणजे मिळवली.’’ पोपटी पोपटपंची करून रावे ‘क्वॉक’ करीत हसले.

‘‘आता सुरुवात करा. म्हणजे सूर्यास्ती वेळेवर परतता येईल.’’ गरुडबुवानं गांभीर्य आणलं. तशी साळुंखीजोड पुढे झाली अन् तिनं किलबिलाट सुरू केला.

‘‘माणसाचं पिल्लू म्हणे कुणी..’’ पहिली.

‘‘पिल्लूच, पण मादी पिल्लू हो..’’ दुसरी.

‘‘उत्तरपूर्व गोलार्धात काही माणसं असं जोडीनं गातात.’’

ही ऊलुकउक्ती कानी पडताच गृघानं फेंगडी पावलं फिस्कटत अंतर साधलं.

‘‘उगा नको ती माहिती.’’ घशातली गोटी वरखाली हलवीत तो चोचकारला.

‘‘होय होय मादी पिल्लूच. छोटंसं.’’

‘‘तिनं बरं का, पहिल्यांदा आपण सगळे जे ओरडून सांगत होतो ते माणसांच्या भाषेत मांडलं.’’

‘‘एकटं पाडलं तिला इतर पिलांनी.’’

‘‘इतरच का, तिच्या स्वत:च्या आई-बापांनीही तिचा उत्साह टोचून फोडायचा प्रयत्न केला.’’

पहिली-दुसरी साळुंखी आता एका सुरात सांगत होती.

‘‘तिकडे उत्तर गोलार्धातच असते ती. तर तिनं माणसांना प्रथमच स्पष्ट सांगितलं की आपला वंश धोक्यात आलाय.’’

‘‘हूंऽऽऽ आम्ही काय वेगळं सांगत होतो.’’ ऊलुकाचे डोळे लुकलुकले. साहजिक होतं. त्यानंच प्रथम लक्षात आणून दिलं होतं. इतकंच काय, पुरावे गोळा करीत मांडणी केली होती- ‘मनुष्यवंश धोक्यात आहे!’ तेव्हा अनेकांनी त्याच्या बोलण्याकडे त्याच्यासारखीच काटकोनात मान फिरवीत कानाडोळा केला होता. आणि आता ही साळुंखीजोड ज्या माणसाच्या चिमुरडीची गोष्ट सांगत होती, तीत तेच सांगितलं असतानाही सारी चिडीचोच ऐकत होती. त्यानं मान गरागरा फिरवीत सभोवार नजरनिषेध नोंदवला. या त्याच्या नजरफेऱ्यात त्याला थव्यानं बसलेल्या चिमुरडय़ा चिमण्या अन् लाल चोचीचे राघू दिसले. उभार छातीची अन् फुलार शेपटाची कबुतरं दिसली तशी मात्र तो मनोमन वरमला. या साऱ्यांनीच तर त्याचं ऐकून माणसांना जागं करण्याचा प्रयत्न केला होता. थव्याथव्यानं मनुष्यवस्तीत दाणे टिपणाऱ्या चिमण्या विखरून चहुदिशी उडाल्या होत्या. नानातऱ्हेची वृक्षबीजं चोचीत धरून सुदूर रुजवून आल्या होत्या. त्यांच्या अचानक नाहीसं होण्यानंही माणसांतली काही सावध झाली होती. राघूंनी गच्च गर्दीच्या मनुष्यवस्त्यात थवे नाचवीत कर्णकटू रुदन केलं होतं. कबुतरांनी तर थेट माणसांच्या घरटय़ात घुसण्याची छाती दाखविली होती. या गोष्टी माणसांच्या अगदीच नजरेत आल्या नव्हत्या असं म्हणता येत नव्हतं. समुद्रपक्ष्यांनी तर सप्तसागरात फिरून वर्दी दिली होती. देवमाशांनीही आपल्या परीनं समुद्रात माणसानं फेकलेला कचरा गिळंकृत करीत मदतीचा पहिला हुंकार भरला होता. या सकारात्मक आठवणींनी ऊलुकास पुढील वृत्तांत ऐकण्यास पुनरुत्सुक केलं. एव्हाना साळुंखीजोड झाल्याचं गायन करू लागली होती. आणि झालं होतं ते असं की, स्वीडन की कायसं नाव असलेल्या मनुष्यवस्तीत एका चिमुरडीनं सगळ्या मनुष्यनियमांविरुद्ध बंड पुकारलं होतं. भविष्य घडवणारी ‘शाळा’ नावाची मानवी व्यवस्था नाकारत ‘आज’च्या वर्तमानाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. पार्लमेंट, पक्षी पंचपाणवठा गाठीत स्वच्छ मानवी भाषेत निसर्गबदलांकडे मनुष्यजमातीचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला होता. आज, आत्ता कृती केली नाही तर मनुष्यवंश धोक्यात येईल, नव्हे हमखास नष्ट होईल, असा इशारा देणारा फलक हाती धरून ती बसून राहिली. शाळेत जाण्यास नकार दिला. तेव्हा माणसांनी तिला भविष्य काळवंडेल अशी समज दिली.

‘‘फुकाचे भविष्य देखावे रचायची मानवी खोड निर्थकच असते नाहीतरी.’’ कावळ्याने महत्प्रयासाने साधलेले मौन तोडीत म्हटले. काहीही झालं तरी मनुष्यजातीचा त्यानं काकदृष्टीनं अभ्यास केला होता. शतकानुशतकं. नुसता पाहुणाच नव्हे तर अनेक आगंतुक समस्यांच्या सूचना तो माणसांस देत आला होता. हल्ली मात्र माणसांस त्याचे बोल कळेनासे झाले होते आणि त्यावर ‘‘माझेच काय स्वत:चेही बोल हल्ली त्यांना कळेनात.’’ ही मल्लीनाथी त्यानं केली होती.

‘‘पण बरंका, अखेर चिमुरडीला साथ मिळाली. तिच्यासारखीच इतर शाळकरी पिलं पुढे झाली अन् त्यांनीही शाळेत जाण्यास नकार दिला. टाहो फोडून मोठय़ा वयस्कांस सांगितलं की, उठा अन् कामाला लागा. निसर्गबदल न्याहाळत माणसानं प्रगती साधली, पण आज मात्र माणूस यंत्रबदल करण्यात मग्न झालाय. त्यास स्वत:हून महत्त्वाचे दुसरे उरले नाही. झाडे, वने, पशू, पक्षी, नद्या, कुरणे, राने, प्रवाह अन् प्रपात, कीटक कृमी या साऱ्यांचा बेसुमार विध्वंस करणारी रचना माणसांनी मांडली अन् आता त्यातूनच त्याचा नाश संभवतो. पक्षी निश्चिंत होतो आहे.’’ साळुंखीस्वर रसाळ असला तरी चित्रबलाकाच्या या गोष्टीनं ऐकणाऱ्या नजरा पाणावल्या.

‘‘आपण मदत करूया त्या चिमुरडय़ांना.’’ चिमणी टिपल्या दाण्याशी इमान राखत म्हणाली.

‘‘होय तर. करतोच आहोत की आपण. आणि आपणच का, पशू अन् वृक्षही आहेत जोडीला. किती म्हणून उदाहरणं सांगायची. हजारो वृक्षांनी आत्मदहनाचे वणवे पेटवले. अनेक प्राणी जमातींनी आपली समूळ वंशाहुती देत अवनीवरून प्रस्थान ठेवलं. माणूस सृजनशील आहे, सम्यक आहे, कल्याणकर्ता आहे या त्याच्या मूळ ओळखीशी बांधिलकी जपत त्याच्या प्रागतिक सृजनाला आम्ही नेहमीच साथ दिली. आता मात्र निकराची घडी येऊन ठेपली आहे. काहीतरी करावं लागेल हे तर खरंच- आपल्यालाही अन् माणसांनाही. माणसाला त्याची मूळ ओळख शोधावी अन् पटवावी लागेल.’’ गरुडबुवा बोलत तेव्हा वृक्षवेलीही स्थिर होत ऐकत राहत.

तप्त वाळवंटी जमलेल्यातल्या गृधाने मात्र चोच उघडली.

‘‘होऊ दे की नष्ट मानवजातीला. आणि मला मेजवानी मिळेल या क्षुद्र हेतूनं मी हे म्हणतोय असं कृपा करून समजू नका.’’ सवयीनं त्यानं मुद्दय़ाची चीरफाड केली.

‘‘आजवर अनेक नष्ट झाले. रूपस्वरूप बदलत गेले. तेव्हा ना मेळावे भरले ना रुदन घडले. माणसाचे काय ते मोठे कौतुक? तोही या सृष्टीतील यमनियमांना बांधील आहे. समतोल राखण्याच्या सृष्टीच्या व्यवच्छेदक गुणाची मी सभेला आठवण करून देतो. याचा अर्थ, आपण मदत न करणे असा मुळीच नाही. मात्र निद्रिस्तततेचे ढोंग करणाऱ्यास जागे करणारे स्वप्न आजवर ऊलुकासही रचता आलेले नाही.’’

ठरली वेळ येताच दिवसाचा दिवा विझला. अंधार माजायच्या आत तुटलेल्या ताऱ्याने जणू साराच विराम दिला. मावळतीचे रंग काळवंडून गेले. वारा पडला अन् परतीला पंखात बळ उरले नाही. गरुडबुवांनी उंच भरारी घेत कसेबसे सूर्यवंदन साधले अन् साऱ्याच सभा पिलांपाशी परतल्या.

बहरहाल, ग्रीष्माच्या काहिलीतही मृगजळ दाखवण्याची हिकमत असते. तप्त रेषांचे उभे-आडवे भ्रम पसरवीत झळा नाचत राहतात. अन् अशा वेळी महाराष्ट्र नावाच्या मनुष्यवस्तीत सारा भ्रमनिरास करणारा, दृष्टिदोष घालवणारा एक खेळ सुरू होतो. मृगजळ नव्हे, तर प्रत्यक्ष पाणी दाखवणारा अन् जोखणारा हा खेळ. माणसाचा वंश वाचवण्याचाच नव्हे तर सृष्टी समतोल साधण्याचा हा खेळ. घेतलेलं देण्याचा हा खेळ. त्याचं सोपं नाव ‘वॉटर कप’. ८ एप्रिलला माणसांच्या पवित्र दिवशी मुहूर्त साधून सुरू होणारा हा वार्षकि खेळ यंदाही रंगेल. महाराष्ट्र देशातली एक कोटभर लोक हा सृष्टीसमतोलाचा यज्ञ आरंभतील. प्रत्यक्ष सृष्टीनंच दिलेलं आव्हान आपल्या निसर्गदत्त ताकदीवर पेलत या आव्हानाशी दोन हात करतील. त्या स्वीडनमधल्या ग्रेटा थुनबर्ग या चिमुरडीसारखी इथलीही लहानगी त्यात सामील असतील. जिल्हा परिषदेच्या हजाराहून जास्त शाळांमधून ‘धम्माल निसर्ग शाळा’ चालवून ही हजारो पोरं तयार झाली आहेत निसर्ग रक्षणाला. एक मे हा प्रदेश दिन साजरा करणारं महाश्रमदानही होणार आहे माळामाळावर अन् डोंगरउतारांवर. लाखो शहरी मंडळीही कामाला लागली आहेत. देशात निवडणुका असल्या तरीही सारी जमणार आहेत. या देशातल्या एकाही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात वास्तवाबद्दलची निसर्गजाग दिसत नाही हे दुर्दैव. निसर्ग रक्षणाचा ‘वॉटर कप’चा कार्यक्रम राबवणारे अनेक तरुण नेते मात्र गावागावांत उभे होतायत. ते सत्तेसाठी लढणार नाहीत तर निसर्ग रक्षणासाठी एकवटणार आहेत. ८ एप्रिल ते २२ मे असा भर उन्हात चालणारा हा श्रमयज्ञ चालू घडीला सर्वात महत्त्वाचा आहे. याची नोंदणी..‘‘मग? आता मनुष्यवंश नष्ट होणार?’’ रडवेल्या स्वरात घरी अंमळ उशिरा आलेल्या आपल्या आईला ते चिमणपिल्लू विचारीत होतं. तेव्हा त्याला निजवीत चिऊताई म्हणाली, ‘‘छे गं! तुझ्यासारखी अनेक पिल्लं त्यांच्या इवल्या डोळ्यांनी स्वप्नं पाहतायत तोवर तरी तसं व्हायचं नाही खास.’’

मग ते पिलू स्वप्न पाहण्याकरिता शांत निजलं.

बुवा गातात ते बोल खरे करून दाखवायची वेळ आलीये.

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो

मी दान आसवांचे फेकीत चाललो

girishkulkarni1@gmail.com