‘इचलकरंजी’ हे पुस्तक म्हणजे इचलकरंजी गावाचा संपन्न इतिहास होय. या गावाला महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या व्यक्तींची माहिती, या गावाचा वैभवशाली इतिहास, परंपरा आणि संपन्न सांस्कृतिक वारसा अशा विविध गोष्टींमधून हे पुस्तक उलगडत जाते. अनेकदा एखाद्या गावाचा इतिहास हा केवळ गावातील पर्यटनस्थळं, देवालये आदींची जंत्रीच ठरते,  परंतु या पुस्तकाचे असे नाही. अर्थात याला कारणीभूत आहे तो इचलकरंजीचा गौरवपूर्ण इतिहास. ‘हा इतिहास प्राचीन नाही, त्याला रोमहर्षक कहाण्यांचे पदर नाहीत, पण तरीही आपल्या गावाचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला तो अभिमानास्पद वाटेल यात शंका नाही,’ असे प्रस्तावनेत नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला इचलकरंजी संस्थानाची माहिती दिली आहे. इचलकरंजीकर नाटक मंडळी या प्रकरणात मराठी नाटय़सृष्टीच्या इतिहासात, सर्वात प्रदीर्घ काळ अत्यंत यशस्वीपणे चाललेल्या नाटक कंपनीचा कौतुकास्पद इतिहास वाचायला मिळतो. जुन्या गावाचे वर्णन वाचताना तेथील राजवाडे, संस्कृती यांची जंत्री मिळते. इचलकरंजी नगरपालिकेचा इतिहास, तेथील नाटक, संगीत आणि वस्त्रोद्योग यांची माहिती मिळते. संगीताची वैभवशाली परंपरा असलेलं हे गाव. संगीत नाटक मंडळी, इतिहास निर्माण करणारी देशातील पहिली सहकारी सूतगिरणी, गणिताचार्य कुंभोजकर, पंडितराव कुलकर्णी, आपटे वाचन मंदिर अशा अनेक गावाच्या अभिमानास्पद गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात आहे. इचलकरंजीचा गौरवशाली इतिहास वाचताना वाचक रंगून जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इचलकरंजी’, बापू तारदाळकर,

प्रकाशक- उदय कुलकर्णी,

पाने- ३१९, किंमत- ३५० रुपये.

फसलेल्या वैवाहिक जीवनाची कहाणी

‘घट रिकामा’ ही भ. पुं. कालवे यांची कादंबरी विवाहोत्तर जीवनात पती आणि पत्नी यांचे सूर न जुळलेल्या जोडप्याची कहाणी सांगणारी आहे. अशोक हा प्राध्यापक असलेल्या तरुण नायकाची आणि त्याची पत्नी यांची कहाणी सुरू होते ती अशोकच्या मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमापासून. विवाहोत्सुक अशोक त्याच्या सावत्र काकाच्या शिफारशीवरून उर्मिलेला बघायला जातो आणि कविता करण्याचा छंद असलेली मुलगी म्हणून तो तिला पसंत करतो. साखरपुडा होतो आणि पुढे लग्न होतं. पण या दोघांचं फारसं पटत नाही याविषयीचं हे कथानक आहे. यात घर मालकांच्या विविध स्वभावाचे, त्रासाचे, पत्नीला सक्तीने माहेरी पाठविल्यानंतरच्या वैषयिक भावनांच्या कोंडमाऱ्याचे, त्यातून उद्भवलेल्या नव्याच अडचणींचे प्रसंग लेखकाने रेखाटले आहेत. पत्नी समजूतदार नसल्याने तिच्या वागण्याने, अशात जन्माला आलेल्या अपत्याच्या- मुलीच्या काळजीने नायकाची होणारी घुसमट कादंबरीभर व्यक्त झाली आहे. कवी मनाच्या प्राध्यापक असलेल्या अशोकच्या मानसिक अस्वस्थतेची आंदोलने अनेक प्रसंगांमधून वाचकाला जाणवतात. त्यातून अशोक या पात्राविषयी सहानुभूती काही प्रमाणात निश्चितच निर्माण होते.

कादंबरीच्या विषयाचा मुख्य गाभा हा अशोकच्या फसलेल्या वैवाहिक जीवनातील घुसमट सांगणे आहे, हे वाचकाच्या लक्षात येते.  लेखकाने निवडलेला विषय सामाजिकदृष्टय़ा संवेदनशीलही आहे.

‘घट रिकामा’, भ. पुं. कालवे, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, पाने-२४० , किंमत : ३०० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi books review ichalkaranji book ghat rikama book zws
First published on: 26-02-2023 at 06:34 IST