डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
जीवनातील विसंगती, त्यातील हास्यास्पदता आपल्या स्वत:च्या टवटवीत विनोदी शैलीत मांडताना त्यात प्रभुत्व राखणाऱ्या परेरांचे ‘तिसरा पंच’ हे नवे पुस्तक नुकतेच विनोदी साहित्य आवडणाऱ्या वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. आधीच्या दोन लेखसंग्रहांप्रमाणेच प्रस्तुत संग्रहातदेखील वाचकांना सुखावणारे असंख्य पंच लगावत सॅबी परेरांनी विनोदाची आतषबाजी उडवली आहे.
सोशल मीडियाचा वापर करून लेखक म्हणून नाव मिळवते झालेले परेरा हे प्रासंगिक विनोदाचा धागा पकडून त्याला सर्वकालीन संदर्भांची जोड देत त्या धाग्यातून सर्वांना सुखावणारा विनोदाचा शेला वाचकांना बहाल करत असतात. ‘तिसरा पंच’ हे पुस्तकही असेच आहे. यातील लेखांपैकी काही लेख दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाले असले तरी बहुतांश लेख हे विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेले आहेत.
लोकांना हसवणे हा सर्वात कठीण प्रकार असून, संवादातून किंवा लिखाणातून हसवण्यासाठी फार मोठे कौशल्य लागते. लिखाणातून हसवताना कोणत्याही विनोदी लेखकाला आपल्या लिखाणाच्या शीर्षकातून वाचकाचे कुतूहल जागे करता आले की वाचक त्या लेखनाकडे आकर्षित होतो. या संदर्भाने बघितले तर परेरांच्या काही लेखांची शीर्षके वाचूनच त्यात काय मजकूर असेल याची उत्सुकता जागी होते. वानगीदाखल सांगायचे झाल्यास ‘सेमीप्रामाणिक मुंबईकर’, ‘ऑनलाइन समाजसेवक’, ‘तुंबईचा पाऊस’, ‘जग उंदरांनी आक्रमिले’, ‘मासेपियंस’, ‘पुरुष नामशेष होताहेत’, ‘पाकिस्तानची गाढवं’, ‘भ्रष्टाचार झालाच पाहिजे’ ही शीर्षके प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी आहेत.
आपले लिखाण वाचण्यासाठी उत्सुक झालेल्या वाचकाचा कुठेही रसभंग होऊ न देता त्रयोदशगुणी विड्याचे पान जसे रंगावे तसा परेरांचा विनोद रंगत जातो. स्तंभलेखनाच्या शब्दमर्यादेचा एक फायदा असा झालाय की, लेखक परेरा हे त्यांना सुचलेला विनोदाचा विषय, फापटपसारा टाळून अतिशय नेटकेपणाने फुलवत असतात. त्यांच्या लिखाणात कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अशा सर्व विषयांना स्पर्श केलेला दिसून येतो.
अर्थात त्यामागे त्यांचे चतुरस्रा व्यक्तिमत्त्व आहे. सूक्ष्म असे सामाजिक निरीक्षणाचे त्यांचे सामर्थ्य त्यांना विनोद फुलवताना कामाला येते.
सूक्ष्म निरीक्षणाचे सामर्थ्य असलेल्या लेखकाला रूढ विषयांमध्ये नव्याने विविध रंग भरता येतात. उदाहरणार्थ, कौटुंबिक विनोदात पती-पत्नीचे नाते हा एक रूढ विनोद विषय असून, याबाबत या पुस्तकातील परेरांच्या दीन ‘ए मर्द’ या लेखामध्ये दुबईचे राजे शेख महंमद यांना घटस्फोटानंतर जी मोठ्या रकमेची पोटगी द्यावी लागली त्यावर केलेले भाष्य वाचकाला स्वत:शी खळखळून हसायला लावणारे आहे.
अलीकडच्या दोन दशकांतील सामाजिक स्थित्यंतराचा विचार करायचा झाला तर म्हणता येते की, आता सोशल मीडियाचा अतिरेक झाला आहे. या संदर्भातच ‘ऑनलाइन समाजसेवक’ या लेखात परेरांनी आभासात जगणाऱ्या मंडळींची आपल्या लेखणीतून जी धुलाई केलेली आहे ती निर्विवादपणे अजोड आहे. ‘तिसरा पंच’मधील हा लेख म्हणजे समकालीन वास्तवदर्शी विनोदाचा एक महत्त्वाचा दाखला आहे.
राजकीय लोकांचा निगरगट्टपणा सर्वसामान्यांना माहीत असतोच. जो तो राजकारणी अहं ब्रह्मास्मि म्हणूनच जगत असतो. या सर्वांच्या वृत्तीचे दर्शन घडवणारा ‘राजीनामाख्यान’ हा या पुस्तकातील लेख म्हणजे राजकीय विनोदाचा एक अप्रतिम नमुना आहे.
परेरा त्या लेखात एके ठिकाणी म्हणतात की, ‘‘सगळे पदाधिकारी आपापल्या पदाला आणि खुर्चीला चिटकून राहतात. राजीनामा मागणारे खूप आहेत, पण देत कुणीच नाही. यामुळे मागणी आणि पुरवठा यात कमालीची तफावत निर्माण होऊन राजीनामा या यत्किंचित पदार्थाचा भाव गगनाला भिडला आहे.’’ याच लेखात राजीनाम्याचे अनेक प्रकार दिलेले असून, राजकीय राजीनाम्यामागील अनेक संदर्भ अतिशय खुमासदारपणे उलगडले आहेत. हे संदर्भ वाचताना वाचकाला आपल्या अगतिकतेचीही जाणीव होते. विनोदाचे हेच तर सामर्थ्य असते.
आजवरच्या मराठी साहित्यातील रूढ विनोदी लेखनाच्या परंपरेत विनोदी लेखकाचे स्वत:चे असे पात्र असावे असे एक मानक आहे. इथे परेराच
निवेदक म्हणून सदैव जाणवत असल्यामुळे त्यांना नव्याने पात्र निर्माण करण्याची गरज नाही. स्वत:वरचे विनोद करताना त्यांनी ही ओळख निर्माण करून नवा पायंडा पाडला आहे हे निर्विवादपणे म्हणता येते.
मुखपृष्ठ आणि लेखांच्या विषय-वस्तूला अतिशय समर्पक अशी चित्रे निलेश जाधव यांनी रेखाटलेली आहेत.
‘तिसरा पंच’, – सॅबी परेरा, ग्रंथाली, पाने-१५२, किंमत- २५० रुपये.
