पंकज भोसले

उत्तरकाळात मराठी भाषा आणि विचारवहनाचे कार्य नियतकालिकांनी केले. साठोत्तरीत त्यांत बंडखोरी प्रयोग झाले आणि शेकडा-हजारच्या संख्येने असलेल्या मासिकांची चक्रे नव्वदोत्तरीत थांबली. आधी दूरचित्र वाहिन्यांशी, नंतर संगणक-इंटरनेट युगाशी आणि सर्वात शेवटी माहितीच्या स्फोटाशी स्पर्धा करीत मराठी नियतकालिकांची मृत्युसीमा निश्चित झाली. तरीही गेल्या दोन दशकांत तगून आणि टिकून राहिलेली मासिके कशाच्या आधारावर चालतायत आणि वाचनवाहक म्हणून कार्य ती कशी बजावतायत याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे..

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार

आपल्या समुदायातील वाचक दोन गटांत विभागला आहे. त्यातला पहिला एके काळच्या ‘सत्यकथा’,‘किर्लोस्कर’ मासिकांसारखी लेखन-संपादन परंपरा आज दिसत नसल्याची तक्रार करीत नव्यात चांगले काही घडत नसल्याची समज घट्ट बनवत चाललेला. दुसरा पूर्वसूरी परंपरांचे ओझे वगैरे न बाळगता आज येत असलेल्या नियतकालिकांतून उत्तम पारखून घेण्याची क्षमता असलेला, पण हा दुसरा गट पहिल्या गटाइतका संख्येने मोठा नसल्याने वाचनाच्या संस्कृतीचे आपले गाडे कायम अडकलेल्या स्थितीत दिसते.

महाराष्ट्रात वाचकांचा मराठी टक्का एकाएकी घसरण्यात नव्वदोत्तरीतील जगण्याला आलेला वेग कारणीभूत होता; पण साहित्यिकांची-लेखकांची एक अख्खी पिढी उभी करणारी मासिके ठप्प झाल्यानंतरच्या नकारात्मक वातावरणाला प्रतिसाद म्हणून नव्वदीच्या दशकात मासिकांचे नवे पर्व सुरू झाले. महिलांमध्ये चळवळ विचारधारा रुजविणारे ‘मिळून साऱ्याजणी’ आले. रिपोर्ताजांचा समावेश असणारे ‘महाअनुभव’ अवतरले. साहित्यिक मासिकांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘अंतर्नाद’, ‘खेळ’ यांनी वसा घेतला. (पैकी ‘अंतर्नाद’ चांगले कार्य करूनही काही काळापूर्वी अंतर्धान पावले.) वैचारिक साहित्याला पोसण्यासाठी ‘मुक्तशब्द’ने धडपड केली. याच काळात नामपरंपरा असलेल्या ‘मेनका’, ‘माहेर’ या स्त्रीकेंद्री मासिकांचा, ‘साधना’ या साप्ताहिकाचा आणि ‘युगवाणी’सारख्या त्रमासिकांचा जीर्णोद्धार झाला. दोन हजारोत्तर काळात वृत्तपत्रं आणि त्यांच्या संकेतस्थळांनी सखोल विश्लेषणवादी होण्याचा विडा उचललेला असताना साप्ताहिक- मासिकांना आपल्या रूपडय़ापासून मजकुराच्या स्वरूपात बदल करण्याची गरज भासू लागली. त्या बदलांसह आज मराठी मासिके वाचनभूक उरलेल्यांना सोबत घेऊन पुढे चालली आहेत. अर्थार्जनासह नवा वाचक तयार व्हावा, जगण्यातील वैश्विक क्रांतीनंतर शहरांपासून गावातली बदलत चाललेली मराठी भाषा पोहोचावी हा उद्देश यातील प्रत्येकाचा आहे. ‘मासिके कोण वाचतो आता?’ इथपासून ‘ज्ञान-रंजनासाठी गूगल असताना मासिकांची गरज काय?’, ‘पुस्तक चर्चा-गप्पा-ओळख-खरेदी-विक्री फेसबुकवर होत असताना याच गोष्टी पुन्हा मासिकांतून का?’ असे प्रश्न पडण्याच्या काळात ही व्यासपीठं समाजमाध्यमांच्या आणि वृत्तपत्रीय लिखाणाच्या कक्षा ओलांडणारे लेखन मिळवतायत. जागतिकीकरणानंतर शहर आणि गावांतील सामाजिक-आर्थिक दरीची जाणीव करून देतायत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखक शोधून काढतायत आणि नंतर त्यांची पुस्तके गाजतायत. गरज आहे ती या मासिकांचा वाचकपरिघ आत्ता आहे, त्यापेक्षा वाढण्याची.

दोन दशकांपूर्वी पत्रकारांनी सुरू केलेले ‘महा-अनुभव’ हे मासिक आपल्या वाचकांचा वैचारिक स्तर आणि जाणिवांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांत लेखमाला-रिपोर्ताज यांच्यासह ललित लेखनालाही प्राधान्य देते. रहस्य-भूतकथांच्या मर्यादित क्षेत्रात रमलेल्या  हृषीकेश गुप्ते याची ‘हजारवेळा शोले पाहणारा माणूस’ ही दीर्घकथा प्रसिद्ध करून त्याला मुख्य प्रवाहात स्थिर करण्याचे श्रेय या मासिकाला द्यावे लागेल. तर गणेश मतकरी याला चित्रपट समीक्षेपलीकडे लिहिण्यास उद्युक्त करणारी कथामालिका छापून त्याची कथालेखक ही ओळख करून देण्यातही या मासिकाचा वाटा आहे. अनिल साबळे या तरुणापासून आडगावात राहणाऱ्या कित्येक लेखकांना ‘महाअनुभव’ने घडविले. ‘प्रयोगांवर ‘महाअनुभव’ भर देते. आज ‘महाअनुभव’ मधून आपले लिखाण प्रसिद्ध व्हावे ही प्रत्येक चांगल्या लेखकाची इच्छा असते. आम्ही दीर्घ मुलाखतीही छापतो आणि बातम्यांपलीकडे वाचकाला विचार करण्यास उद्युक्त करणारा मजकूर देतो.’ अशी माहिती ‘महाअनुभव’चे प्रकाशक आनंद अवधानी यांनी दिली.

‘अनुभव’इतकाच दर्जेदार मजकूर देण्यासाठी झगडणारे ‘मुक्तशब्द’ या मासिकाचे वय दीड दशकाचे, पण कार्य आजच्या कथात्मक साहित्याला भरपूर मोठे व्यासपीठ तयार करून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जाणिवांच्या लेखकांना पुढे आणणारे. म्हणजे कृष्णात खोत, आसाराम लोमटे, बालाजी सुतार, किरण गुरव, प्रवीण दशरथ बांदेकर ही मुंबई-पुण्याच्या पलीकडच्या ताज्या दमाच्या लेखकांची इथे हजेरी असते, तर दिवंगत जयंत पवारांचे महत्त्वाचे गिरणगावी कथासाहित्य, जी. के. ऐनापुरे यांच्या महानगरी ताणेबाणे दाखविणाऱ्या गोष्टी, हृषीकेश पाळंदे, शिल्पा कांबळे, मनस्विनी लता रवींद्र, विवेक कुडू यांच्यासारखा तरुणांबरोबर मकरंद साठेंसारख्या दिग्गज शहरी साहित्यिकांची फौज ‘मुक्तशब्द’मध्ये लिहिताना दिसते. गेली काही वर्षे साहित्य अकादमी मिळविणाऱ्या लेखकांतील बहुतांश ‘मुक्तशब्द’मधून समोर आले आहेत. ‘करोनापूर्व काळात मासिकाचे हक्काचे वर्गणीदार १३०० ते १५००च्या दरम्यान होते. करोनाकाळात मासिकाचे आर्थिक गणित कोलमडले. त्यातून आता कुठे मासिक सावरत आहे. मधल्या काळात ‘पीडीएफ’द्वारे अंक पोहोचवले. आता सलग मुद्रित स्वरूपात अंक निघत असून लवकरच काही विशेषांक काढणार आहोत.’ असे ‘मुक्तशब्द’चे संपादक आणि मालक येशू पाटील यांनी सांगितले.

‘मुक्तशब्द’ मासिकासारखेच, पण अधिक गंभीर कलाविचार, लेखकांसह नव्या कवींनाही मोठे व्यासपीठ आणि प्रदीर्घ मुलाखत अनुवादांची मालिका देणारे संपादक मंगेश नारायणराव काळे यांचे ‘खेळ’ हे मासिक दोन दशकांत ४४ अंकांसह प्रसिद्ध झाले आहे. मुखपृष्ठापासून आतमध्ये उत्तम चित्रबैठक ही ‘खेळ’ची खास ओळख. आज कविता-कथा-कादंबरी क्षेत्रात प्रस्थापित झालेल्या नव्या-जुन्या लेखकांची ‘खेळ’च्या मांडवातून उपस्थिती दिसते. ‘कथा-कादंबरी क्षेत्रात टिकायला २० एक वर्षांच्या चिंतनाची आवश्यकता असते. फेसबुकसारख्या विद्युतवेगात प्रतिक्रिया देणाऱ्या माध्यमांत वावरणाऱ्या आजच्या तरुणांकडे तेवढी फुरसत राहिलेली नाही. पण प्रत्येकाला तातडीने कादंबरी लिहायची आहे, हे सध्याचे चित्र आहे. त्यातून उत्तम शोधून छापणे ही कला आहे. लवकरच ‘खेळ’चा अरुण कोलटकरांवरचा भरगच्च अंक येणार आहे,’ अशी माहिती काळे यांनी दिली. खेळचा प्रत्येक अंक किमान एक हजार प्रतींचा असतो. 

‘माहेर’, ‘मेनका’, ‘जत्रा’ ही एके काळची लोकप्रिय मासिके. सहा दशकांतील दोन-तीन पिढय़ा या मासिकांशी जोडल्या गेलेल्या. गेल्या दशकभरात या मासिकांची मालकी आणि संपादक मंडळ बदलले. त्यांनी राज्यभरातील मराठी वाचकांचे लेखी सर्वेक्षण केले. त्यात सहा हजारांहून अधिक वाचकांनी अतिवैचारिक लेखनाऐवजी कथन साहित्य वाचायला आवडत असल्याचे लिहून दिले. भवताली वृत्तवाहिन्यांपासून समाजमाध्यमांवर गंभीर चर्चा करण्याची चढाओढ लागलेली असताना ‘मेनका’ आणि ‘माहेर’ मासिकांचे पारंपरिक स्वरूप टिकवत प्रकाशित होतात. (हिंदीमध्ये सगळीच मासिके हे मॉडेल वापरतात) म्हणजे चार-पाच कथा-दीर्घकथा दरेक मासिकात असतात. ‘फॅशन टिप्स आणि महिलांशी संबंधित ट्रेण्ड्स आम्ही देत नाही. पण दर्जेदार कथा आणि लेख देण्यासाठी  सतत प्रयत्नशील असतो,’ असे या मासिकांचे संपादक अभय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. या मासिकांची आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही की, ६० वर्षांचे सारे अंक त्यांनी डिजिटलाइझ केले. त्याला देशातूनच नाही तर परदेशातील वाचकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. मेनका’चे पाच हजार तर ‘माहेर’चे सात हजार वर्गणीदार असल्याची माहिती या मासिकांचे मालक आणि संचालक अमित टेकाळे यांनी दिली. अमेरिका, युरोपातील देशांसह एकूण  २८ देशांत या मासिकांची मुद्रित आवृत्ती जाते. करोनाकाळात काही महिनेच अंक थांबला, पण डिजिटल माध्यमांतून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचलो. पीडीएफ अंकाला परदेशातून मोठी मागणी आहे, पण  परदेशातील व्यक्ती मासिकाच्या पाच वर्षांच्या वर्गण्या आधीच भरतात हा अनुभव सुखावह आहे. आपल्याकडे रेल्वे- एसटी स्टॉलवरही हे अंक विक्रीस असतात, पण खरा वाचक हा वर्गणी भरून वाचणारा असल्याचे टेकाळे यांनी सांगितले. समाजमाध्यमे, ऑडिओ बुक्स आणि यूटय़ूब वाहिन्या आदींचा प्रभावी वापर करून मासिके वाचकांपर्यंत पोहोचवली जात असल्यामुळे नवा वाचक मिळण्यात त्यांना अडचणी येत नाहीत.समाजमाध्यमे आणि ऑनलाइन यंत्रणांद्वारे पुढल्या काळात आम्ही आणखी वाचकांना जोडू शकू, असा विश्वास टेकाळे यांनी व्यक्त केला.

‘मेनका’,‘माहेर’ने केलेल्या वाचक सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या बरोबर उलट ‘साधना’ साप्ताहिकाचे मजकुराबाबतचे धोरण आहे. विनोद शिरसाठ यांनी संपादकपद स्वीकारल्यानंतर ‘साधना’त पूर्वीपासून येणाऱ्या कथा-कादंबऱ्या-कविता पूर्णपणे बंद करून साप्ताहिकाला पूर्णपणे वैचारिक अधिष्ठान दिले. ५८०० च्या संख्येने ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रती छापल्या जातात. करोनाकाळात  इतर नियतकालिकांप्रमाणे साधनालाही अडचणी आल्या, पण आता करोनापूर्वकाळाइतकीच या अंकाची विक्री होत आहे. युवा आणि बालकांना आकर्षित करणारी भावंडे आणि डिजिटल व्यासपीठावर साप्ताहिकाहून वेगळा उभारला जाणारा मजकूर यांचाही वाचकवर्ग एकनिष्ठ आहे. नवा वाचक तयार करण्यासाठी साप्ताहिकांना वृत्तपत्रांशी प्रचंड स्पर्धा करावी लागत आहे. जाहिरातींसाठी लढताना करोनानंतर अनेक साप्ताहिकांचा मृत्यू झाला. करोनाकाळात काही कठीण महिन्यांचा कालावधी सोडला, तर ‘साधना’ने प्रकाशनात खंड पाडला नाही. विशेषांकांची मालिका पुढे करून आणि लेखकांना सर्वाधिक मानधन देण्याचा शिरस्ता पाळत साधनाने वैचारिक लेखन देण्याचा यज्ञ सुरू ठेवला आहे, असे शिरसाठ यांनी सांगितले. ‘ललित’ साहित्याला आणि विशेषत कथा- कवितांना इतर नियतकालिकांमध्ये स्थान असताना जाणीवपूर्वक आम्ही ते देण्याचे टाळत असल्याचे शिरसाठ म्हणाले.

विदर्भ साहित्य संघाचे साहित्यिक नियतकालिक ‘युगवाणी’ २०१८ सालानंतर प्रफुल्ल शिलेदार यांनी राज्यातील वाचकांच्या पटलावर आणले. या चार वर्षांच्या काळात विशेषांकाचा त्यांनी धपाटाच लावला. त्यांचा ‘अरुण कोलटकर’ विशेषांक तीन-चारदा छापावा लागला, इतकी त्याला मागणी होती. या अंकांचे ३०० ते ३५० वर्गणीदार असले, तरी ऑनलाइन यंत्रणेचा उपयोग करून विशेषांकांची विक्री उत्तम होत आहे. ‘कथा आणि कादंबरीबाबत ‘युगवाणी’ला वावडे नाही. सध्या विविध निकषांवर घासून-पुसून कथा स्वीकारली जात आहे. आम्ही मुखपृष्ठ निवडीपासून ते अंकाच्या स्वरूपाविषयी वेगळेपणा राखत आहोत. अधिकाधिक वाचकांपर्यंत हे प्रयत्न पोहोचतायत त्याचा सर्वाधिक आनंद आहे,’ असे शिलेदार यांनी सांगितले.  याशिवाय करोनापूर्वी ‘समीक्षा’ या विषयाला वाहिलेले ‘सजग’ हे त्रमासिक साहित्यिक सतीश तांबे यांनी आपल्या मित्रांसह सुरू केले. कविता-चित्रपट-नाटक आणि कलाविषयक समीक्षेला या अंकात स्थान असते. हा अंकही ऑनलाइन विक्रीद्वारे वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करीत आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ कथास्पर्धासह वैचारिक लिखाणाचा डोलारा सांभाळत प्रकाशित होत आहे. ‘सर्वंकष’ नावाचे वैचारिक मासिक नियतकालिकांच्या पटलावर उगवलेले आहे, तर नव्वदोत्तरीत गंभीर साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले  ‘अनुष्ठुभ’ मासिक  ‘नव अनुष्ठुभ’ नाव घेऊन आणखी एक भरारी मारण्यासाठी सज्ज झाले आहे. इतरही अनेक प्रयत्न उत्तम मजकुराचे नियतकालिक उभारण्यासाठी राज्यभरात केवळ भाषेच्या आणि साहित्याच्या प्रेमापोटी होत आहेत. मुद्दा आहे तो मराठी समुदायातील वाचकगटांच्या सक्रियतेचा. साडेआठ कोटीच्या संख्येने मराठी भाषा बोलणाऱ्या आपल्या राज्यात या भाषेच्या पणत्या तेवत राहाव्यात, तळपत राहाव्यात अशी इच्छा सर्वसामान्य वाचकांत कधी येणार? दक्षिणेतील आता डोळय़ात भरत असलेली सिनेमासंस्कृती विकसित होण्यामागे तिथली नियतकालिकांची, साहित्याची आणि भाषेची संस्कृती त्यांनी आजही जपून ठेवल्याची कारणे सापडतात. आपल्या भवतालातील आयुष्यांच्या समकालीन नोंदी तपशिलात केवळ नियतकालिकांच्या समृद्ध पसाऱ्यात जतन राहू शकतात. त्यामुळे केवळ अस्मितेच्या पताका मिरवत मराठी भाषा दिनाचा वार्षिक उत्सव साजरा करताना, वाचनवहनास उपयुक्त ठरणाऱ्या नियतकालिकांची सांस्कृतिक घुसळण समाजात अधिकाधिक पसरावी यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. भाषेच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने तोही अस्मितानिदर्शक मुद्दा बनू शकतो.

pankaj.bhosale@expressindia.com