इतिहास शिकण्यापासून फायदा

१८१८ साली सातारा दरबारी ग्रांट डफ या पहिल्या इंग्रज रेसिडेंटची नेमणूक झाली होती.

nilkanth janardan kirtane book
हे पुस्तक म्हणजे कीर्तने यांनी ‘पूना यंग मेन्स असोसिएशन’ या सभेत वाचलेला निबंध होता.

अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- नीलकंठ जनार्दन कीर्तने!

मागील लेखात आपण पाहिले की, रा. भि. गुंजीकरांच्या विविधज्ञानविस्ताराचा पहिला अंक १८६७ मध्ये निघाला. त्याच वर्षी ‘कॅप्टन ग्रांट डफकृत मराठय़ांचे बखरीवर टीका’ हे नीलकंठ जनार्दन कीर्तने यांचे पुस्तकही प्रकाशित झाले. हे पुस्तक म्हणजे कीर्तने यांनी ‘पूना यंग मेन्स असोसिएशन’ या सभेत वाचलेला निबंध होता. ही विद्यार्थीसभा डेक्कन कॉलेजमध्ये भरायची. त्याचा सारांश त्यांनी सांगितला आहे तो असा-

‘‘प्रथमत: आम्ही या विषयावर ग्रंथ अगदीं कमी व ते सर्वमान्य नाहींत असें सांगून या विषयावरील एका प्रख्यात ग्रंथकाराचे गुणदोषांचे निरूपण केलें. पुढें हा विषय मनोरंजक होऊं शकतो असें दाखवून कांहीं जुनी माहिती सांगितल्यावर शिवाजीपासून मराठय़ांचा उत्कर्ष व राज्यनीति यांचें निरूपण शेवटच्या बाजीरावापर्यंत केलें. हें केल्यावर पुढें इंग्रजी राज्यावर जी आम्हीं टीका के ली ती नीट समजावी असें झालें. यावर कांहीं पुढचाही विचार केला. गोष्टीचे कथनांतच ग्रांट डफ्  साहेबांचे ग्रंथांतील गुणदोष दाखविल्यास मनोरंजक होईल असें वाटल्यावरून तसेंही केलें.’’

१८१८ साली सातारा दरबारी ग्रांट डफ या पहिल्या इंग्रज रेसिडेंटची नेमणूक झाली होती. तिथे काम करताना त्याने मराठय़ांच्या इतिहासाविषयी माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यातून १८२६ साली ‘अ हिस्टरी ऑफ द मऱ्हाटाज्’ हा तीन खंडीय ग्रंथ सिद्ध झाला. त्याचे १८३० मध्ये कॅप्टन डेव्हिड केपेन यांनी मराठी भाषांतर केले. पुढे सुमारे तीन-चार दशके हा ग्रंथ प्रमाणभूत मानला जात होता. परंतु कीर्तने यांच्या टीकात्मक निबंधाने या ग्रंथातील उणिवा दाखवून दिल्या. त्यामुळे इथला नवशिक्षित वर्ग मराठय़ांच्या इतिहाससंशोधनाविषयी सजग झाला. त्या अर्थाने तो मराठीतील इतिहास संशोधनाचा पाया ठरला. त्यातील हा उतारा पाहा-

‘‘मराठय़ांनी, ज्या देशांत शूर लोक नाहींत असा अपवाद आला होता, त्या देशांत शौर्याचीं कृत्यें करून या देशास मोठेपणा आणला. आपण कोणाचेही ताबेदार नाहीं असा आव घालून स्वतंत्र राज्याचा पाया घातला व देशाभिमान धरिला; इत्यादि स्तुत्य कृत्यें करूनच जरी ते राहिले असते तरी ते स्तुतीस पात्र होते. त्यांचें राज्य धर्माचे व हिंदूू जातीचे अभिमानानें उद्भवलें; तथापि त्यांच्या राज्यांत इतर धर्माचे लोकांस इजा पोंचली नाहीं, (- सर जान माल्कम). ज्याप्रमाणें ब्राह्मण व मराठे लोकांस मोठमोठय़ा जागा मिळत त्याप्रमाणेंच मुसलमानांसही मिळत. मराठय़ांचे मुलखांत मुसलमानांचें व मराठय़ांचें हिंदुस्थानांतील इतर भागांपेक्षां सख्य असतें व बाह्य़ात्कारींदेखील मोठय़ा शहरांतील मुसलमान खेरीज करून मराठय़ांमध्यें व त्यामध्यें कांहीं फरक दिसत नाहीं, ही गोष्ट आमच्या म्हणण्यास सबळ कारण आहे. हिंदुस्थानांतील हिंदू रहिवासी व मुसलमान रहिवासी यांचा एकमेकांशी द्वेष व एकमेकांच्या भिन्न रीतीभातीविषयीं ज्यानें विचार केला असेल त्यास हें आमचें म्हणणें अगदीं सयुक्तिक वाटेल. या गोष्टींचा विसर लोकांस पडला आहे असें लोकांचे साधारण बोलण्यावरून दिसतें. ही फार खेद वाटण्यासारखी गोष्ट आहे.’’

पुढे १८८२ मध्ये त्यांनी मल्हार रामरावकृत ‘श्रीशिवछत्रपति महाराज यांचें सप्त प्रकरणात्मक चरित्र’ ही बखर विविधज्ञानविस्तारातून प्रसिद्ध केली. त्याच्या उपोद्घातातील हा उतारा-

‘‘इतिहास शिकण्यापासून कोणकोणते फायदे होतात तें आतां बहुतकरून महाराष्ट्र वाचकांस सांगण्याची गरज राहिली नाहीं. परंतु ही गोष्ट मोठी शोचनीय आहे, कीं हिंदुस्थानच्या व विशेषत: महाराष्ट्र देशाच्या इतिहासाच्या अध्ययनापासून कांहीं उपयोग होत नाहीं असें प्रतिपादन करणारे आम्हांमध्यें अद्यापि पुष्कळ लोक आढळतात; व या वर्गात कित्येक विद्वान् लोकांचीही गणना आहे. प्रस्तुत ग्रंथ (श्रीशिवछत्रपति महाराज यांचें चरित्र) प्रसिद्ध करण्याचे पूर्वी त्यांचे अध्ययनापासून उपयोग आहे व ते प्रसिद्ध करण्यास योग्य आहेत हें सिद्ध करून दाखविलें पाहिजे. महाराष्ट्र देशाचे इतिहासाचे अध्ययन केल्यापासून कांहीं लाभ नाहीं, ही जी कित्येकांची गैरसमजूत आहे ती दूर करण्यास त्यांचे मताचें नुसतें खंडन करून उपयोगी नाहीं. या व्यतिरिक्त त्यांचें समाधान केलें पाहिजे. त्यांच्या दुराग्रहरूप वृक्षाचे मुळावरच घाव घातला पाहिजे. फांद्यांची छाटाछाट केल्यानें अरिष्ट टळणार नाहीं. या दुराग्रहाचें मूळ म्हटलें म्हणजे विवक्षित विषयाचें समूळ अज्ञान हेंच होय. ह्य़ा अज्ञानाचे नाशास्तव महाराष्ट्र देशाचे इतिहासाचें चांगलें पुस्तक करून तें स्वदेशबंधू वाचतील असें तरी करावें; किंवा या विषयावर पूर्वी जे ग्रंथ लिहिलेले असतील ते सर्वास उपलब्ध तरी करावेत; हे दोन प्रशस्त उपाय आहेत.’’

मूळचे कोल्हापूरचे असलेले कीर्तने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थानिकांच्या विद्याखात्यांत व पुढे इतर सेवांमध्ये रुजू झाले. त्याचवेळी ‘इंडियन अँटिक्वेरी’ या संशोधनपर नियतकालिकात त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. ४०० वर्षांपूर्वीचा नयनचंद्र सूरि या जैन कवीचा ‘हमीर महाकाव्य’ हा मूळ संस्कृत ग्रंथ संपादून त्यांनी प्रसिद्ध केला. पण याशिवायचे त्यांचे महत्त्वाचे लेखन म्हणजे, शेक्सपीयरच्या ‘टेम्पेस्ट’ या नाटकाचे त्यांनी केलेले भाषांतर. १८७५ मध्ये ते प्रकाशित झाले. त्याच्या प्रस्तावनेत ते लिहितात-

‘‘काही दिवसांपूर्वी रावसाहेब महादेव गोविंद शास्त्री कोल्हटकर यांनीं शेक्सपीयरकृत ऑथेल्लो नामक नाटकाचें मराठींत उत्कृष्ट भाषांतर केलें तें पुष्कळांनी वाचलेंच असेल. त्यावरून शेक्स्पीयरसाहेबाची योग्यता पुष्कळांस कळलीच असेल. त्याच प्रसिद्ध नाटककाराचें हें टेम्पेस्ट म्हणजे वादळनामक नाटक आहे.. शेक्सपीयर तर महाकवी- व त्याचा प्रथम परिचय महाराष्ट्रलोकांस कैलासवासी शास्त्रीबुवांसारख्यांचे विद्यमानें झाला, तेव्हां आतां पुढें या कामांत घुसणें तें विचार करूनच घुसलें पाहिजे; हें जरी खरें आहे, तरी हरएकानें शक्त्यनुसार सदुद्योग केलाच पाहिजे; ह्मणून भीत भीत हा ग्रंथ मी सज्जनांपुढे सादर करितों. तें हा माझा नवीनच व्यवसाय आहे हें ध्यानीं आणून प्रमादाची क्षमा करतील. हें भाषांतर सरासरी अर्थ जमेस धरून केलें नाहीं. परंतु मूळ अर्थ साधेल तितका शब्दश: मराठींत पद्धतवार आणण्याचा प्रयत्न यांत केला आहे.’’

भाषांतराविषयी त्यांनी लिहिले आहे-

‘‘भाषांतराविषयीं माझें मत असें आहे कीं, मुळांतील शब्द व मर्म न सुटता कोणत्याही भाषेंतील काव्यनाटकादि ग्रंथांचें भाषांतर कोणत्याही अन्य प्रौढ भाषेंत चांगलें होऊं शकतें. ग्रंथकाराजवळ शब्दांचा व वाक्यरचनांचा भरणा मात्र पाहिजे. या मतास अनुसरून हें भाषांतर केलें आहे.’’

पुढे नाटकाचा परिचय करून देताना ते लिहितात-

‘‘टेम्पेस्ट नाटकाविषयीं असें ह्मटलें आहे कीं, याचें कथासूत्र सरळ संगतवार आहे. व ‘रिव्हाय्जल्’ नामक ग्रंथकर्त्यांचें असें ह्मणणें आहे कीं, ही गोष्ट कथानुसार अवचित घडून आली आहे; ग्रंथकारानें बुद्धिपुर:सर अशी कथासूत्राची रचना घटिली नाहीं. माझेंही मत असेंच आहे. परंतु हेंच संविधानक करण्यांत शेक्सपीयर साहेबाचा उद्देश कोणता असेल तो असो; परंतु या कथासूत्राच्या योगें नानाविध पात्रांची योजना अद्भुत कल्पनाशक्तीनें त्यानें केली आहे, व त्या पात्रांची बतावणी व बोलणीं, ज्यास जशीं असावीं तशीं, मनुष्यस्वभावास ओळखून अतिचातुर्यानें केलीं असून, त्यायोगें ग्रंथकर्त्यांचा बहुश्रुतपणा व संसारांतील घडामोडीमुळें मनुष्याचे मानसाचे ठायीं होणाऱ्या विकृतींचें ज्ञान, उत्कृष्ट प्रकट झालें आहे. या एकाच नाटकामध्यें राजेरजवाडे, कारभारी, दरबारी, नाविक, इत्यादि नानाविधपात्रें असून त्यांची बतावणी उत्कृष्ट केलेली आहे. वायुरूपी पिशाचादि योनींचीं पात्रें यांत आणिलीं आहेत व पृथ्वीवरच उत्पन्न झालेल्या एक्या जन्मसमंधाचेंही एक पात्र आणिलें आहे. मंत्रतंत्रादि प्रकार, सागरामधील प्रचंड वातादिकांचे विडवर प्रसंग, व निर्जन बेटावर राजादिका सारख्यांवर आलेले दुर्घट प्रसंग, मुग्धजनांचें प्रथम अनुरागाचे प्रकार, इत्यादिकांचें यांत उत्कृष्ट वर्णन असून, अखेरीस दुष्टजनांचें शासन करून या नाटकांतील नायक व नायिका, ज्यांचेविषयीं वाचकांचे चित्ती बलवत्तर प्रेम उत्पन्न होतें, त्यांचा विवाह लावून देऊन ग्रंथकारानें शेवट गोड केला आहे.’’

या नाटकाचा कर्ता शेक्सपीयर. त्याची ओळख कीर्तने यांनी अशी करून दिली आहे-

‘‘नाटकामध्यें प्रथम हा सोंग घेऊं लागला. परंतु पुढें नाटकग्रंथ रचून यानें मोठी प्रतिष्ठा संपादिली, व एक दोन नाचकगृहांचा मालक झाला. यानें इंग्रेजी भाषेमध्यें सुमारें अठ्ठावीस उत्कृष्ट नाटकें रचिलीं आहेत. सर्वानुमतें यांच्याशीं समतोल असे नाटककार पृथ्वीवर कोणीही झाले नाहींत असें आहे. कालिदासास हिंदुस्थानांतील शेक्स्पीयर असें ह्मणतात. व याप्रमाणें कोणी कोणत्याही देशांत अत्युत्तम नाटककार झाल्यास, त्या देशांतील तों शेक्स्पीयर अशी ह्मणण्याची चाल इंग्रेजीत पडली आहे. याचे ग्रंथांतील पात्रांची बतावणी जशी हुबेहूब असत्ये तशी दुसऱ्यास साधत नाहीं. व ही बतावणी साधणें हा नाटकांतील मुख्य अंश होय. तसेंच यानें ग्रंथही पुष्कळ व उत्कृष्ट केले, ह्मणून याचे बरोबर दुसरा ग्रंथकार लागूं शकत नाहीं. कोणीं कोणीं एक किंवा दोन ग्रंथ याच्या ग्रंथांशीं समतोल असे केलेले आहेत. पण ते एकदोनच ग्रंथ. याच्या इतके विपुल दुसऱ्या कोणा ग्रंथकाराचे नाहींत. आमचे कविशिरोमणी कालिदास यांची नाटके जगप्रसिद्ध आहेत आणि त्यांत अभिज्ञान शाकुंतल नाटक अतिरम्य आहे. तत्तुल्य नाटकें  शेक्सपीयरसाहेबाचीं चार पांच आहेत. यावरून याचे महत्त्वाविषयीं वाचकांस सहज कळून येईल. याचे सर्व ग्रंथ पद्यात्मक आहेत. त्यांचीं भाषांतरें पृथ्वींतील बहुतेक प्रौढदशेस आलेल्या चालू भाषांमध्यें झालेलीं आहेत. तशींच मराठींत होणें इष्ट आहे. व तशीं भाषांतरें एकदमही होणें कठिण. मध्यंतरी अल्पस्वल्प आमच्यासारखे प्रयत्न झालेच पाहिजेत.’’

या नाटकातील हा काही भाग-

‘‘गोंझालो- पण या सर्वाहून हा मोठा चमत्कार आहे कीं- कोणास सांगितले तर खरें देखील वाटणार नाहीं.

सिबाश्चियन- बहुतेक खरे खरे म्हणून सांगितलेले चमत्कार जसे असावयाचे तसाच हा एक.

गोंझालो- अहो, पण हे आपल्या अंगावरचे कपडे, हे समुद्राच्या पाण्यांत भिजले असतांही जसेच्या तसेच झकाकत आहेत; इतकेंच नाहीं, पण समुद्राच्या पाण्यानें खराब होण्याचें राहून जसे नवे रंगवून काढिले आहेत असे दिसतात!

आन्तानिओ- जर याचे एखाद्या खिशास वाचा असती तर, त्यानें यास सोदा म्हणून म्हटलें नसतें काय?

सिबाश्चियन- खिशानें असें जर म्हटलें नसतें तर त्यानेंहि सत्य खिशांतच घालून ठेविलें असतें म्हणायचें.’’

कीर्तने यांच्या लेखनाला एकोणिसाव्या शतकातील मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. ते आपण सर्वानी आवर्जून वाचावे.

संकलन – प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nilkanth janardan kirtane role in marathi language development

Next Story
व्याकरणाची फणी
ताज्या बातम्या