|| संजय मोने

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तशी काही फार वेगळी गोष्ट सांगत नाहीये. थोडय़ाफार फरकाने आपल्या सगळ्यांचीच ही कथा आहे. फार फार तर रडकथा म्हणू या. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी मी गिरगावातून माहीम-माटुंगा रोड या पत्त्यावर राहायला आलो. मी आलो म्हणजे माझ्या वडिलांनी ही इथली जागा घेतली म्हणून आलो. मध्यमवर्गीय असून उच्च मध्यमवर्गीय गटात स्वत:ची गणना व्हावी म्हणून गिरगाव किंवा आसपासच्या भागातून- म्हणजे खऱ्याखुऱ्या मुंबई शहरातून थोडं दूर राहायला गेलेले जे काही हजारो लोक त्या काळात होते, त्यापकीच आम्ही. हा काळ म्हणजे गिरगावातून किंवा लालबाग-परळमधून आमच्यासारखेच इतर लाखो लोक पार दहिसर- डोंबिवलीला राहायला गेले त्याच्या आधीची काही र्वष- म्हणजे सुमारे पंधरा-वीस र्वष म्हणू यात. माटुंग्याला आलो तेव्हा तिथे माझ्या आठवणीत खूप मळे होते. विहिरी होत्या. पालेभाजी विकत घ्यायची असते, हे फार नंतर कळलं. किरीस्ताव लोकांचे बंगलेही होते पाच-दहा. घरापर्यंत नीट रस्ताही नव्हता. टॅक्सीने घरापासून थोडं लांब कोपऱ्यावर उतरायला लागायचं. अर्थात टॅक्सीने जाण्याचा योग क्वचितच यायचा. मूळ घर गिरगावात होतं. आठवडा-पंधरवडय़ातून कधीतरी तिथे जायचं आणि येताना जरा उशीरबिशीर झाला- म्हणजे आठ-साडेआठ वाजले की आम्ही परतीचा प्रवास टॅक्सीने करायचो. तब्बल साडेचार रुपये व्हायचे. आणि कोपऱ्यावरून मग पाय ओढत घरी. रस्ता सुनसान असायचा. रस्त्यावर एखाद् दुसराच दिवा असायचा. बाजूला माडाची झाडं होती. त्यातून वाऱ्याचा आवाज यायचा. ‘सूऽऽऽ’ असा. अशा या वाऱ्याच्या आवाजावर चार ओळी खरडून पुढच्या काळात लोक कवी म्हणून मिरवतील असं बिलकूल वाटलं नव्हतं. त्यावेळी फक्त भीती वाटायची. आई-बाबा मात्र (मराठी मुलं आपल्या पालकांना ‘मम्मी’ आणि ‘पप्पा’ म्हणायला लागले, किंवा पालकांनी त्यांना तसं म्हणायला लावलं तो  काळ आमच्यानंतरचा.) आम्हाला धीर देत घरापर्यंत घेऊन यायचे. गाडय़ा वगरे जवळजवळ नव्हत्याच. असल्या तरी तुरळक पाच-सहा. स्कूटर किंवा मोटारसायकल या आजकालच्या अत्यंत भीतिदायक आणि उपद्रवी वाहनांचा वाराही आमच्या भागाला शिवला नव्हता. हल्ली ज्या प्रकारे ही वाहनं चालवली जातात ते पाहता महात्मा गांधी यांनी जी कायदेभंगाची चळवळ पूर्वी चालवली होती ती आता बंद झालीय, हे त्या चालकांना एकदा सांगायला हवं. असो. आमचा भाग अत्यंत शांत होता. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर खेळायला मोकळी जागा मुबलक होती. मदानाच्या मागणीसाठी कोर्टात जायचा काळ फार नंतरचा. जवळच शिवाजी पार्क होतं. ते मुळात खेळण्यासाठी आहे, हे सगळ्या राजकीय पक्षांना माहीत होतं. त्यामुळे सभाबिभाही फार होत नसत. ‘मोगल लेन’ ही आमच्या घराजवळची गल्ली. आता आतापर्यंत ती त्याच नावाने ओळखली जायची. कदाचित मोगलांचे वंशज तिच्यावर आपला हक्क सांगायला येतील म्हणून घाबरून जाऊन पालिकेने ते बदलून आता तिला वेगवेगळी तीन-चार नावं दिली असावी. त्यापकी एका गल्लीला ‘पंडित सातवळेकर मार्ग’ असं नाव आहे. ते लिहिताना ‘पंडित सातावाडेकर’ असं लिहिलं गेलं आहे. अर्थात त्याबद्दल कोणालाही खेद, खंत नाही. त्या नावाबद्दल एकदा पत्रव्यवहार केला तेव्हा त्याची पोचही दिली गेली नाही. हे सातवळेकर कोण आहेत, हेही बऱ्याच लोकांना माहीत नाही. इंग्लिश ते संस्कृत असा शब्दकोश निर्माण करणारे पहिले गृहस्थ म्हणजे पंडित सातवळेकर. अजून एक ‘हरळय्या चौक’ आहे. कोण हा हरळय्या? देव जाणे! नावं जरी बदलली तरी अजूनही पत्र ‘मोगल लेन’ या पत्त्यावरच येतं. या आमच्या शांत मोगल लेनवर पहिल्यांदा खूप माणसं बघायला मिळाली ती १९६७-६८ साली. तेव्हा आमच्या रस्त्याचा  बराचसा भाग काँक्रीटचा झाला. बरेच महिने त्या आवाजाने आमचं शांत जीवन घुसळून निघालं असावं. असावं अशासाठी, की आम्हा मुलांना तर बुवा सगळ्या आवाजांची फार मौज वाटत होती. ती गोल गोल फिरणारी मशिन्स, रस्ता फोडून काढणारी भाल्यासारखी हत्यारं, घमेली घेऊन शिस्तीत ओतकाम करणारे मजूर, दिवसभराचं काम संपवून रात्री रेखा भारद्वाजसारख्या- कदाचित तिच्याहून जास्त बऱ्या आवाजात- गाणाऱ्या त्यांच्या बायका किंवा स्त्री-मजूर, त्यांची झोपडीवजा घरं.. सगळंच आमच्यासाठी नवीन होतं. रस्ता पूर्ण झाल्यावर ते सगळे निघून गेले तेव्हा चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. आजही तो रस्ता नव्वद टक्के ठणठणीत आहे. आज ‘रस्ता चांगला राहिलाय..’ असं घडलं तर पालिकेतल्या सत्ताधारी लोकांना दु:ख होईल कदाचित. रस्ता झाला, त्यानंतर दिवे आले- तेव्हा आमच्या रस्त्याने पहिल्यांदा रात्रीच्या वेळी उजेड पाहिला. घराच्या कोपऱ्यावर सितलादेवी आणि काशी-विश्वेश्वर अशी दोन देवळं होती. असं म्हणतात की, ती चारशेबिरशे र्वष जुनी आहेत. एक चर्च होतं. थोडं पुढे गेल्यावर एक दर्गाही होता. पण तिकडे कधी आम्ही जायचो नाही. कारण ‘आपला धर्मबिर्म काय असेल तो आपण आपला पहावा..’ या मतावर सगळ्या धर्माच्या लोकांचा विश्वास होता. त्या काळातले राजकीय पक्षसुद्धा ‘अमुकतमुक मुबारक’ किंवा ‘सण मांगल्याचा’, ‘साई प्रकट दिन शुभेच्छा’ वगरे फलक लावायच्या भानगडीत पडत नसत. दोन बिल्डिंग्ज सोडून आमच्या रोजच्या खेळातले अजीज आणि नसरू, फिरोज राहायचे. पण त्यांची नावं आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहेत यापलीकडे आम्हाला काही जाणवायचं नाही. त्यातल्या अजीजला तर सगळे- तो तिथून सोडून जाईपर्यंत ‘अजित’च म्हणायचे. बाकी पीटर, आयर्वनि होते. सत्वींदर नाव असून ‘मिकी’ म्हणवला जाणारा होता. त्याची असंच काहीतरी लांबलचक नाव असूनही ‘बिल्लू’ या नावानं ओळखली जाणारी बहीण होती. पण कोणाला कसलाच फरक पडत नव्हता. ‘सेक्युलर’ नावाच्या खोटारडय़ा संबोधनाची बाधा तेव्हा ना आम्हाला झाली होती, ना आजूबाजूच्या लोकांना. मोठय़ा प्रमाणावर मराठी वस्ती होती. आणि त्यामुळे सगळे सणवार साग्रसंगीत साजरे होत असत. आणि ते इतके होते, की फादर्स डे, मदर्स डेची गरज कधीच भासली नाही. आम्हाला नाही; आणि पालकांना तर नाहीच नाही. सगळ्या वयाच्या मुलांसाठी ‘सातच्या आत घरात’ हा अलिखित नियम होता. कारण नंतर सगळं सामसूम होत असे. खरं तर माझ्यातल्या ‘मी’चा शोध घ्यायला हल्ली जे निघतात, त्यांना अत्यंत योग्य वातावरण तेव्हा होतं. पण त्याचा लाभ घेताना काही कोणी तेव्हा दिसायचं नाही. आणि कोणी दिसलाच तसा, तर त्याची गणना ‘पियेला है’ किंवा ‘दिमाग गया है उसका..’ इतक्या थोडक्यात व्हायची. दहीहंडी लागायची आणि फार फार तर पाच-पन्नास रुपये इनाम असायचं. पण आज ज्या ईष्र्येने लाखोंच्या हंडय़ा सर केल्या जातात, त्याच ईष्र्येने त्या सर केल्या जायच्या. मनोजकुमारच्या गाण्यांनी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी साजरे व्हायचे. दिवाळीत फटाके प्रदूषण होणार नाही इतकेच वाजायचे. कारण त्याहून जास्त कोणाला ऐपतच नव्हती. गणपतीच्या मिरवणुकीला आम्हा शाळेतल्या मुलांची आर. एस. पी. म्हणून तनात व्हायची. आणि विसर्जनाला शाळकरी मुलांना पेलेल इतकीच गर्दी असायची.

क्वचित कधीतरी आजूबाजूच्या दोन गटांत मारामाऱ्याही व्हायच्या. पण त्याचीसुद्धा वेळ ठरलेली असायची. मात्र, पोलिसांच्या गाडीचा भोंगा वाजल्यावर क्षणार्धात पांगापांग व्हायची. पोलिसांची नेमणूक त्या काळात खूप मुलांना भीती दाखवण्यासाठी होत असे. त्या काळात आमच्या घराच्या बाजूला वानकर म्हणून एक पोलीस अधिकारी राहायचे. एकदम रुबाबदार आणि कडक माणूस. दिसायला हुबेहूब अरुण सरनाईक. ते साध्या कपडय़ात जरी फिरायला बाहेर पडले तरी लोक चपापायचे. एकदा असेच ते घरातल्या लोकांबरोबर बाहेर पडले होते आणि ‘चोर! चोर!’ असा आवाज आला. एकजण पळत येत होता. वानकरांनी त्याची गचांडी धरली आणि ‘फाडऽऽऽ’ असा मोठा आवाज झाला. दुसऱ्या सेकंदाला त्या चोराची पँट ओली झाली होती. ‘मी आता डय़ुटीवर नाही. मग मला काय करायचंय?’ हा विचार त्यांच्या डोक्यात आला नाही.

पाऊस, थंडी आणि उन्हाळा आपापल्या रुबाबात असायचा. पाणी तुंबणे हा प्रकार होत नसे. एकदा एका वर्षी बांधकामाची माती अडकून एका गटाराजवळ पाणी गोळा झालं. तिथून आमच्या भागातले आमदार जात होते. चालत. एकटेच. आपल्या जीवाला धोका असू शकतो, हा विचारही कधी त्यांच्या मनात आला नाही. ताबडतोब त्यांनी चार लोकांना गोळा करून त्या पाण्यात हात घालून तो गाळ दूर केला आणि पाणी वाहायला लागल्यावरच ते पुढे चालू लागले. या सगळ्या वातावरणात आम्ही वाढत होतो.

वय बदलत होतं. आणि त्याचबरोबर हळूहळू सगळीकडे बदलली तशी परिस्थिती बदलत होती. आता आमच्या मोगल लेनमध्ये सगळं काही आहे. प्रत्येक गोष्ट हाताशी आहे. सगळ्या गोष्टी घरपोच मिळतात. प्रचंड प्रमाणात गाडय़ा वाढल्या आहेत. दोन-चाक्यांचा तर उच्छाद होतो. सगळीकडे कामाला किंवा भेटायला जाण्याच्या वेळा बदलल्या आहेत. जिथे दहा मिनिटं लागायची, तिथे तास लागतो. त्यामुळे कुणाला भेटायला वगरे जाणं नष्ट झालंय. सगळे मळे गेले, बंगले गेले. त्याबरोबर झाडंही गेली. मग काही वर्षांपूर्वी नवीन झाडं आणून लावली गेली. हे म्हणजे खरी दाढी काढायला लावून एखाद्याला नाटकात खोटी दाढी लावायला देण्यासारखं आहे. उन्हाळा सोडल्यास कुठलाच ऋतू जाणवत नाही. मालिकांमध्ये सगळे सण साजरे होतात म्हणून प्रत्यक्षात काही साजरं केलं जात नाही. आई-वडील ओळखता यावेत म्हणून त्यांचे ‘डेज्’ साजरे केले जातात. सगळं सगळं बदलून गेलं आहे. याला म्हणायची की सूज?

आता सूर्य आमच्याकडे पूर्वेला उगवत नाही, तर एका पंचवीस मजली इमारतीच्या मागून उगवतो.

sanjaydmone21@gmail.com

मराठीतील सर्व मी जिप्सी.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang marathi articles
First published on: 08-07-2018 at 05:54 IST