|| मेधा पाटकर
‘नारी के सहभाग के बिना हर बदलाव अधुरा है’.. ही घोषणा देताना महिलांचा उर भरून आला नाही तरच नवल! दुय्यम लिंगसमुदाय म्हणून हिणवल्या जाणाऱ्या स्त्रियांना समाज हा ‘सीमान्त’ सहभागी म्हणून स्वीकारतो, ते त्यांच्या अपरिहार्य अशा योगदानापोटीच. स्त्री या समाजघटकाचे समाजात नेमके स्थान काय, विशेष गुणच नव्हे तर मर्यादांसकटही कर्तृत्वशील कार्यभाग काय, हे मात्र एकमताने आणि एकमुखाने मानणारा आणि सांगणारा समाज अजूनही घडणे आहे. परिणामी कधी देवी तर कधी दासी म्हणून स्त्रियांना लेखणे सुरू आहे. महाभारतातली द्रौपदी वा कुंती, रामायणातली सीता यांविषयी बरेच काही वर्णिले गेल्यावरही, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी वा सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांच्या आगळ्यावेगळ्या कालखंडातील कथा अधिक वास्तववादी म्हणून आजही देशभरातल्या स्त्रियांना प्रेरणा देत आहेतच. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तिची दलित झुंजारू सहकारी झलकारी यांच्यापासून स्वातंत्र्यलढय़ातील गांधीवादी सरोजिनी नायडू ते समाजवादी अरुणा आसफ अली यांच्यापर्यंत अनेकींच्या संघर्षांच्या गाथा पुढे आल्या आहेत. आजतागायत अनेक क्षेत्रांत लढल्या जाणाऱ्या, लढाव्याच लागणाऱ्या स्वातंत्र्यसंग्रामांचे नेतृत्व करणाऱ्या, तसेच पुरुषांना लाजवेल असे कर्तृत्व दाखवणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या घरातील युवतींपर्यंत पोहोचल्या तर कदाचित त्यांच्यातील स्त्रीत्व हे ‘अस्मिते’पुरते नव्हे तर ‘अस्तित्वा’साठी चाललेल्या संघर्षांतून फुलून येईल असे वाटत राहते.
हे सारे आजच प्रकर्षांने लिहावेसे वाटले याचे कारण- नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल सलमान तडवी या खानदेश म्हणजे आमच्याच क्षेत्रातील आदिवासी – मुस्लीम (हो! आदिवासी असून इस्लामही स्वीकारणाऱ्या समुदायातील) युवतीने केलेली आत्महत्या. अघोरी, अत्याचारी आणि छळवणूक हेच हत्यार बनून हिंसक बनलेल्या तीन सुखवस्तू घरांतील युवती या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या! वकील, माजी न्यायाधीश अशा उच्चशिक्षित कुटुंबातील या सुशिक्षित युवती असल्याची माहिती तेवढी बाहेर आली आहे. याविरोधात निदर्शने झाली ती जनसंघटनेमार्फतच! समाजाच्या मन:पटलावर मात्र अजूनही, ‘अशा तरुण डॉक्टर मुली असे करू शकतील?’ ‘स्त्रिया एवढय़ा निर्घृण होऊ शकतात?’ ‘स्त्रीच स्त्रीला इतकी छळू शकते?’.. अशा अनेक प्रश्नांचे जाळे निर्माण झाले आहे. या प्रसंगानिमित्ताने आठवल्या त्या जेव्हा जेव्हा मी जेल भोगली तेव्हा महिला वॉर्डात भेटलेल्या आणि मनाला भिडलेल्या अनेकानेक स्त्रियांच्या कहाण्या.. अगदी ३०२ कलमाखाली खुनी म्हणून आरोपी वा गुन्हा शाबित झालेल्या अशा स्त्रियांची आयुष्ये उलगडून पाहायला मिळाली. त्याच भडभडून बोलायच्या, तेव्हा मीही दिवसरात्र जणू संशोधकच बनायचे. पती भेटायलाही येत नाहीत म्हणून हळहळणाऱ्या नर्मदाबाईंना आत्म्हत्येच्या विचारापासून, तर जेलमध्ये तंबाखू पुरवावा म्हणून फुगलेले पोट दाखवत मला सतावणाऱ्या मंजूपर्यंत- प्रत्येकीतला स्वाभिमान, नऊ काय, तेरा वर्षेही जेल भोगल्यानंतर नव्याने जगण्याचे स्वप्न रेखाटण्याची आशा.. भिंतीआडची खुलणारी नझमाची कलाकुसर आणि चकाचक स्वच्छ परिसर राखण्यामागची मेहनती वृत्ती.. सारे स्त्री गुण तिथेही प्रत्येकीत आढळायचे तेव्हा आदिवासी, दलित, सवर्ण, धनिक-गरीब, शहरी-ग्रामीण या साऱ्या विभागणी पलीकडचे स्त्रियांमधले साम्यतत्त्व उठून दिसायचे.
आजच्या करिअरवादी असो वा आरक्षणासाठीच रस्त्यावर उतरणाऱ्या मुली असोत, त्यांच्या नजरेत आणि मनात, इंटरनेट-व्हॉटस्अॅप, फेसबुकातून उघडय़ा नागडय़ा स्त्रियांचे दर्शन तर होतेच, पण स्त्रीत्वाच्या खूणगाठी मात्र बांधल्या जात नाहीत. पुरुषप्रधान व्यवस्थेतली हिंसा हाही त्यांच्या स्पर्धेतला एक निकष आणि आधार बनत जातो असेच जाणवते. म्हणूनच आजच्या शहरी, शिक्षित युवती, विद्यार्थिनी नर्मदेतल्या लढय़ाकडे विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून आल्यावर आंदोलन पाहताना कसे अप्रूप वाटून भारावतात; आणि सेक्सी वा सेल्फीच्या पलीकडे मानवी स्त्री भेटल्यागत थोडय़ा लाजतातही, हे आम्हाला सतत जाणवते. याचसाठी तरुण विद्यार्थिनींचा प्रवाह नर्मदेत येतच रहावा आणि इथल्या स्त्रियांच्या प्रेरणा देत – घेत रहावा हे ‘नर्मदा विद्यापीठ’ म्हणून बनलेल्या आंदोलनाचे कार्य म्हणून मानतो आम्ही!
तर नर्मदेच्या खोऱ्यातील ३४ वर्षांच्या लढय़ात स्त्रियांनी गाजवलेलाच नव्हे, तर व्यवस्थेपुढे उठवलेला एकेक मुद्दा आणि त्यामागची विचारसारणी आणि रणरागिणींची रणनीती ही आंदोलनासाठी एक अमूल्य ठेवाच होऊन राहिली आहे. आज आमची ही ताकद न केवळ पुनर्वसनाच्या लाभांसाठी विविध हक्कांसाठी तर आंदोलनाचे प्रत्येक उद्दिष्ट न्यायाचे, समतेचे साकार करण्यासाठी अमूल्य अशीच आहे. जिथून लढा सुरू झाला, त्या महाराष्ट्रातील पहाडा – पाडय़ातील स्त्रियांमध्ये उठून दिसणाऱ्या डेडलीबाई, खात्रीदायी, खियाली, पिंजारीबाई, कविताबेन, जडीकाकी अशा अनेक! डेडलीबाई आणि पिंजारी या प्रखर वक्त्या. दिल्लीच्या एका संमेलनात हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक प्रभाष जोशींनीच हे बिरुद तिला देऊन वाखाणल्याचे विसरणे अशक्य. आपल्या परिवेशातील जंगल, जमीन, नदी, करहण (धनधान्य) देवेदाणी साऱ्यांबद्दल भडभडून बोलणाऱ्या पिंजारीबाईला आपले जग इतरांसमोर मांडायला मेहनत लागत नव्हती. मात्र तिला पुनर्वसनात पर्यायी जमिनीचा लाभ मिळवण्यासाठी अनेक वर्षे लढावे लागले आणि अखेरीस जमीन मिळाली तोवर तिला सर्वागी प्रोत्साहन देणारा नवरा, आमचा लाडका उल्याभाऊ निघून गेला होता. हे दु:ख सहन करूनही आज ती बोलतेच आहे! डेडलीबाईचेही असेच. डोमखेडी गावच्या सत्याग्रहाच्या लढय़ातील ती एक हिराच होती. देशभरातून तिथे येणाऱ्या विविध क्षेत्रांतील सत्याग्रही- अरुणा रॉयपासून केरळच्या प्रसादपर्यंत आणि वय विसरून डोंगरात पोहोचणाऱ्या भाई वैद्यांपासून वसाहतीतील नवे विश्व पाहून हरखलेल्या सदाशिव अमरापूरकरांपर्यंत सर्वाच्याच डोळ्यांत भरेल अशी. तिच्या मुलांनी काही वेडेवाकडे केले तरी ते निपटण्यासाठी तिच्यावरच विसंबणारा जहांगीरभाऊ तिचा गुणी नवरा. एकीकडे सत्यवानाची सावित्री तर दुसरीकडे प्रबोधनकर्ती सावित्रीबाई.. अशी यांची रूपे! जमीन मिळाल्यानंतर तोही जास्त काळ जगला नाही. डेडलीबाई तासभर बोलू शकणारी. प्रत्येक घटनेचे तपशिलासह वर्णन आणि त्यातच राजकीय, सामाजिक विश्लेषण सामावून या बाया आपली अनोखी राजकीय समज जाणवून द्यायच्या आणि आजही वेळप्रसंगी देतात. त्यांचे राजकारण म्हणजे सरकार आणि जनतेतील संबंधांविषयीचे पारायण.. रामायण नव्हे; कारण या अग्निपरीक्षा देणाऱ्या सीता नव्हत्या, शासनपरीक्षा आणि जनपरीक्षा घेणाऱ्या रणरागिणी आहेत.
महाराष्ट्राच्या गावांतील पूर्णत: अशिक्षित ठेवल्या गेलेल्या, तरी अत्यंत दिमाखदार, काष्टा साडीतल्या कष्टकरी स्त्रिया म्हणजे मुंगी, सती, खियाली. या पावरी बाया कलेक्टर असो की पोलीस, यांच्यापुढे केवळ आवाजी तोफांनी जिंकायच्या. डोमखेडीत पोलिसांची फौज पोहोचली तेव्हा यांनी प्रश्नांचा भडिमार पाऊण एक तास चालवून ‘अखंड ज्योती’चाच प्रकाश पाडला. पुनर्वसनाची खोटी स्वप्ने दाखवणारे निरुत्तर होऊन परतायचे. यांचे प्रश्न ‘जमीन दाखवा’पासून ‘तुला मुलंबाळं, आयाबहिणी नाहीत का? तुझे घर उजाडले न विचारता, पुसता तर चालेल का?’ या तोडीचे असायचे. ज्येष्ठ वकिलांकडूनही कुणी न्यायाधीश ऐकून घेणार नाही, अशा त्यांच्या प्रश्नांना अडवणार कोण? आज पहाडातून पुनर्वसाहतीत आल्यावर महिला सरपंच म्हणून खियालीच एकमताने निवडली जाते, यावरूनच तिचा प्रभाव उमजतो. मात्र, भावांच्या मदतीने पंचायत कारभार चालविणाऱ्या खियालीचे शिक्षण झाले ते अशा लढय़ांतून; चार बुकांतून नव्हे!
मणिबेलीच्या गुजरात सीमेवर पोलिसांचा डेरा शूर्पण मंदिरात असताना कधी कुठे रस्ता काढायला आले म्हणून, कधी गावाची एकी तोडायला आले म्हणून, तर कधी गावात चाऱ्यालाच आग लावून दिली म्हणून धावत रणमैदानात उतरून येणाऱ्या स्त्रियांची खरी चौकीदारी असायची. तीही विकासाच्या नावे चोरी करण्यास टपलेल्या अधिकारी, नेते, पोलीस, दलाल यांच्या गटबंधनास आव्हान देणारी. अगदी तोडीस तोड अशा गुजरातमधल्या बायकाही सतत पोलिसांना सामोरे जाणाऱ्या. गुजरातमध्ये तर आंदोलनाबद्दल वाचून कुतूहलयुक्त समर्थन घेऊन येणाऱ्या प्रत्येकालाच भोगावे लागायचे. आपल्या हाडामासातली अहिंसेची ताकद घेऊन लढणाऱ्या बलिबेन, जसूबेन, कविताबेन, अंबाबेन यांनी ना कधी गुलामी पत्करली ना कधी भेदरटपणा दाखवला. बाहेरून येणारे आंदोलनाचे कार्यकर्ते असोत वा देश-विदेशांतले अभ्यासू विद्यार्थी- सर्वानाच गुजरातमधले मूठभर नेते आतंकवाद्यांगत घेरले जायचे, तेव्हा या बेनच मदतीला यायच्या. सरदार सरोवर धरणाच्या कॉलनीमुळे उद्ध्वस्त झालेल्या या बायांना घडीभरही शांती नसायची, असा तो काळ. कधी पोलीस घरावर येऊन थडकायचे, तर कधी कॉन्ट्रॅक्टरची माणसे. एक दिवस त्यांनी हल्ला करून घरघरची घंटी म्हणजे जाते फोडले. त्यानंतरही आंदोलनाचे पीठ पाडत भाकऱ्या शेकतच राहणाऱ्या या बायका. त्या कमरेवर हात ठेवून उभ्या ठाकल्या तरी पोलीसही मनातून चरचरलेले मी पाहिलेत!
बलिबेनच्या घरात नि ओसरीत आमचा डेरा असायचा. त्यांची चूल आमच्या ताब्यात नि मुले, सुना दिमतीला. इतरांप्रमाणेच या साऱ्यांचे आदिवासी पती यांच्या साथीला. मातृसत्ताक नसली तरी आदिवासींची कुटुंबव्यवस्थाही अधिक स्त्रीवादी असल्याचे आम्हाला यातूनच समजले होते. यातील प्रत्येक बाई ही काही ना काही कमाई करायचीच. यांच्यात मुलालाच दहेज म्हणजे हुंडा द्यावा लागतो. वधूकडच्यांना म्हणूनही नव्हे, यांच्यात मुलाला दहेज म्हणजे हुंडा द्यावा लागतो. वधूकडच्यांना म्हणूनही नव्हे तर मुली-बायकांच्या कर्तबगारीने घरचे-दारचे पाहणारी ही बाई प्रत्येक घरापर्यंत आंदोलन खेचून नेत राहायची. एकदा आंदोलनाच्या धरणा आणि नदीकाठच्या पहिल्या वडगाम गावात घुसून भर पावसात आदिवासींची घरे पोलिसांनी उद्ध्वस्त केली. पोरा-ढोरांना उघडय़ावर भिजत ठेवले. आम्ही नदीपलीकडून महाराष्ट्रातल्या सत्याग्रहस्थळाहून धावत येऊन पोलिसांचेच पत्रे काढून निवारा केला. तर त्याच पहाटे आमच्या महिला कार्यकर्त्यांना पोलीस झोपेतून उठवून घेऊन गेले. मात्र, दिवसभर खाणे-पिणे न देता डांबलेल्या या साऱ्या लढाऊ तडक पोलीस ठाण्यातच रात्री दहा वाजता पोहोचल्या. घरी न जाता, न खाता-पिता अशी चिकाटी पुरुषांमध्ये कधी नाही आढळली आम्हाला.
गुजरातमध्येच शहरांत आम्हाला भेटल्या त्या कवयित्री सरूपबेन, पत्रकार शीला भट्ट नि तनुश्रीही तशाच. गुजरात सीमेच्या अल्याड नि पल्याड आमचे घाटीतले हजारो लोक ३६ दिवसांच्या जनविकास यात्रेत पोलिसांनी बलपूर्वक अडवल्याने डेरा घालून होते. २१ दिवसांचे उपोषण घडले होते. १९९० च्या डिसेंबर-जानेवारीची कडाक्याची थंडी नि गुजरातमध्ये आमच्याविरोधात पेटलेल्यांची गर्मी! यातली अभेद्य भासणारी भिंत भेदून दुसऱ्या बाजूस पोहोचलेल्यांमध्ये होत्या त्यावेळच्या ‘अभियान’ मासिकाच्या संपादिका शीला भट्ट! त्यांनी दुसऱ्या बाजूचा- गावागावाने ट्रॅक्टरवर लादून आणलेला धान्यसाठाच नव्हे तर तिथे घरदार सोडून बसलेल्या स्त्रियांची ताकद, बांधिलकी, स्वावलंबन सारे पाहिले आणि विदेशी पैसा, विकासविरोध आदी गुजरातमध्ये चढवलेल्या आरोपांची भांडेफोडच केली एका लेखातून. एका महिलेच्या संवेदनेमुळेच हे शक्य झाले. स्त्रीवादी वृत्ती आक्रमक सत्तावाद फोडून जनामनांत प्रवेश करू शकते याचेच हे उत्तम उदाहरण. आजच्या अनेक स्त्री पत्रकार हे आव्हान स्वीकारू लागल्या, तर पत्रकारितेतील भांडवलशाही हस्तक्षेप आणि राजेशाही तंत्रमंत्रांचा दबाव निश्चितच कमजोर करतील.. माध्यमांना जनवादी बनवू शकतील!
मध्य प्रदेशातील पहाडी स्त्रियांमध्ये सर्वात दुबळी पेरवी. ती अखेर क्षयरोगाने गेली. पण शेवटच्या क्षणापर्यंत तिने पहाड चढून-उतरून आपली ताकद हरप्रसंगी शासकांना दाखवून दिली. एका फार मोठय़ा आदिवासी परंपरेत रुजलेल्या, गावात मुखियाची भूमिका बजावणाऱ्या कुटुंबाची ही सून. तिला चार मुली आणि तीन-चार मुलगेही. त्या प्रत्येकाची थेरं सांभाळून पेरवीने आंदोलनाला बळ दिले ते तिच्या मौखिक आव्हानातल्या व्यापक विचारांनी. ‘आमरी खेती, आमरी नदी, आमरी जिंदगी तुमू उखडी टाकणार काय?’ असे ठणकावून विचारणारी पेरवी राणीकाजलपासून खाज्या नाईक, भीमा नाईक या ब्रिटिशांशी लढणाऱ्या आदिवासी नेत्यांचे स्मरणही अशा भावनेसह करायची, की त्या शहिदांचे हौतात्म्य जणू समोरच्याला घेरायचे. वनविभागच ‘बुडीत येणार’ म्हणत खालचे आणि न बुडणारे वरचेही जंगल तोडायला येऊ लागले, तेव्हा याच पेरवी आणि अन्य बायांसह तीन दिवस जंगलातच चुली पेटवणारे गावकरी जणू यांच्याच नेतृत्वाखाली जंगल वाचवू शकले होते. गुजरातची बुधीबेन, महाराष्ट्रातली टिमकाबाई, मणिबेलीची जडीकाकी.. अशा अनेक बायांनी खऱ्या जंगलरक्षकाची भूमिका बजावली होती आणि भ्रष्टाचारापोटी तडजोड करून जंगल स्वत:च खाणाऱ्या वनविभागाला अनेक प्रसंगी धडा शिकवला होता. आदिवासींनी जे काही वाचवले तेवढेच जंगल आज नकाशावर दिसते आहे. आणि आता नेमके त्यांनाच उठवून, हाकलून जंगल वाचवण्याचे निवाडे देणाऱ्या न्यायालयात स्वत: उभे राहून आपली ‘मन की बात’ मांडता येण्याइतपत ही निर्णयव्यवस्था पारदर्शी, उत्तरदायी, निदान खुली जरी करता आली तरी या बायाच वैचारिक आणि खऱ्या अर्थाने राजकीय लढाईही जिंकतील इतके यांचे पर्यावरणवादी विचार स्पष्ट आहेत. पाच जूनला पाच उद्घाटने करणारे राजकीय नेतेच काय, पण शुद्ध पर्यावरणवादीही या खऱ्या संरक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचे विचार ऐकतील का? करू या ना सुरुवात येत्या पर्यावरण दिनापासून!
मध्य प्रदेशातील नर्मदाकाठचा मैदानी प्रदेश म्हणजे निमाड. नीमच्या (कडुलिंब) झाडांनी भरलेला. हे शेतीप्रधान क्षेत्र अनुसूचित जनजाती क्षेत्र म्हणून मान्यता आणि बहुसंख्यही असताना विविध जातीसमाजांचे शेतकरी येथे आहेत. त्यांच्याबरोबरच हजारो शेतमजूर, मच्छीमार, छोटे व्यापारी, कारागीर.. या साऱ्यांची जीवनराहणी आणि देवेदाणीही वेगवेगळी. मात्र, अलीकडे आपल्या मूळ देवतांबरोबरच राम, कृष्ण, शिवाची उपासना आणि त्यासाठी धार्मिक स्थळे, मंदिरेही बेसुमार वाढू लागली आहेत. भिलटबाबा, नागदेव, सातेरी आईचे छोटेसे पूजास्थान बाजूला पडल्यागत वा बेकायदेशीर रेतखाणीने घेरल्यागत, पडीक झाल्यासारखेही आढळते अनेक ठिकाणी.
या क्षेत्रात अर्थात पहाडी क्षेत्रापेक्षा धार्मिकता अधिक जोपासली आणि फैलावलेली. बायका या कर्मकांडात आणि अलीकडे भागवत-रामायण प्रवचनांमध्ये अधिक गुंतलेल्या. मात्र चूलमूलही कसेबसे सांभाळत आंदोलनातही त्यांचीच ताकद सर्वाधिक! जगातले दोन तृतीयांश श्रम स्त्रियांचे- हे सत्य आंदोलनाच्या जनशक्तीतही उमटलेले. १९९० मधल्या त्या पायी यात्रेतही पाच हजार कार्यकर्त्यांपैकी दोन तृतीयांश स्त्रियाच! अशा एक ना अनेक दीर्घकालीन वा अनिश्चितकालीन कार्यक्रमांमध्ये स्त्रियांचा सहभाग हा चिकाटीने अखेपर्यंत टिकणारा, शासनकर्त्यांना खडा सवाल करणारा, पोलिसांशी सामना करणारा, तसेच सुंदरता आणि सृजनशीलता आणून कार्यक्रम सजवणारा असा. रंगीबेरंगी साडय़ांचाच नव्हे, तर महिलांच्या गाण्यांचा, स्त्रीवादी घोषणांचा आणि प्रखर वक्तृत्वाचा साज काही आगळाच. मच्छीमार महिलांची प्रतिनिधी आणि ३१ सहकारी सोसायटय़ांच्या प्रस्तावित मत्स्यसंघाची उपाध्यक्ष श्यामा बोलू लागली, की भले भले यादव नि जाट शेतकरी बांधवही कान टवकारतात. तिच्या भाषणाच्या वेळी साऱ्याच बायका टाळ्यांनी आनंद व्यक्त करतात. ‘शेतकऱ्यांना पुनर्वसनात कुटुंबामागे पाच एकर जमीन मिळाली आणि उरलेल्यांचा हक्क आहेच, पण मच्छीमारांचे शेत मात्र ४० हजार हेक्टर्सचे (जलाशयाच्या क्षेत्राएवढे) आहे,’ असे सांगून दाद घेणारी श्यामा- ‘जहाँ जमीन डूबी हमारी, पानी मछली कैसे तुम्हारी?’ ही समर्पक घोषणा देऊन शासनाला निरुत्तर करते. ‘पक्षाचे तुणतुणे वाजवू नका, गेल्या पाच वर्षांत काय केले ते या हजारोंच्या सभेत मांडा’ असे ‘लोकमंचा’वर अवतरलेल्या सर्व उमेदवारांनाही सुनावते! श्यामाचे निमाडी भाषेतले राकट बोलणे ‘विकासाचे राजकारण’ या विषयास हात घातल्याविना कधीच संपत नाही. श्यामा आणि भारत ही पती-पत्नीची जोडी देशभरात कुठेही जायला तयार असते. पुस्तक डोळे फाडून वाचणे, नोट्स घेणे हे काही इयत्ता शिकलेल्या भारतभाईंचे काम, तर परिस्थितीला साजेशे मुद्दे घेणे आणि संघटनांचे अनुशासन मानणे ही श्यामाची विशेषता!
निमाडची मंजूबहन आणि मच्छीमार सुमन या तर नर्मदा प्राधिकरणाच्या कुठल्याही कार्यालयात ताकदीने प्रवेश करून ठाण मांडणाऱ्या! अनेकदा सत्तेची खुर्ची बळकावण्याच्या प्रतीकात्मक कृतीनेच नव्हे, तर एकेक पायरीवर महिलाशक्ती प्रदर्शित करत यांनी कितीतरी हक्क मिळवलेत. अर्थात महिला खातेदारांचा पुरुष खातेदारांच्या बरोबरीने अधिकार मानला गेल्यावर अनेक मुलांनी आपल्या आईचे सातबारा उताऱ्यावरचे नाव शोधून काढून आईला आमच्या कार्यालयात आणले, तेव्हा आम्हीही भरपूर सुनावले. परंतु आंदोलनात एकदा आलेल्या, तुरुंगात नाचत-गात जाऊन आलेल्या वृद्ध वा तरुण स्त्रिया भक्कम पायावर उभ्या राहतात, हा अनुभव सर्वाचाच! आपापल्या कुटुंबात जमिनीऐवजी नगद पैसा स्वीकारणाऱ्यांना म्हणजे जमिनी विकणाऱ्यांना थांबवण्याचे काम अनेक महिलांनी केले. अनेकींना नाही जमले, तरी चूक कबूल करून पुन्हा आंदोलनाशी नाते बांधणाऱ्याही स्त्रियाच! त्यांचा उपोषणात असो वा धरणे कार्यक्रमात, दीर्घकालीन सहभाग हाही घरदार तात्पुरते विसरून! पोलिसांच्या गुंडागर्दीचेही अनेक प्रसंग त्यांनी पाहिले, भोगले. १९९५ मध्ये धुळ्यात झालेल्या लाठीमारानंतर पिसाट होऊन पोलिसांना जाब विचारणारी कमळूजीजी ही तर तरुणाई ते वृद्धत्व आंदोलनातच अनुभवत आजही स्त्रियांच्या शक्तीला प्रेरणा देणारी. घरा-गोठय़ात गाई-म्हशींसारख्या अडकून पडलेल्या युवतींना दाटणारी! ‘बहनों की इज्जत है किसमें, घर-गाव बचाने में!’ यांसारख्या घोषणाच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीने विश्व बँकेसमोर बॅरिकेड्सवर चढून, संवादासाठीच त्यांना मजबूर करण्यात आणि त्यातून महिलांना उत्तेजित करण्यात कमळूजीजी माहीर! पुरस्कार मिळाले म्हणून नव्हे, तर लोकपुरस्कृत म्हणून ती खोऱ्यात आणि आंदोलनात, प्रत्येक डॉक्युमेंटरीत ‘हिरॉईन’ बनून राहिलेली!
स्त्रीची नजर ही पृथ्वी, भूमी, नदी जोडणारी आणि निसर्ग व मानवाच्या नात्यास उजळवणारी अशीच असते. खरे तर ही सारी स्त्रीचीच रूपे! निसर्ग हा जीविकेचा आणि जगण्याचाही आधार असे हे कष्टकरी समुदाय. यांच्यावर २०१७ सालच्या उपोषणात पोलीस बळ सोडून, तसेच बाराव्या दिवशी अटक करून इस्पितळालाही पोलीस कोठडी बनवून हैराण करू पाहणाऱ्या मध्य प्रदेश सरकारला बळजबरीने सलाइन दिले तरी मुखी घास न घेता उपोषण चालूच ठेवणाऱ्या या हट्टी स्त्रियांचे आंदोलनातले योगदान हे इतिहासात किती नोंदले जाईल, ते येणारा काळच सांगेल; पण आमच्या मनावर मात्र ते निश्चितच बिंबलेले आहे. ओरिसातील बलियापाल, एन्रॉन हा महाराष्ट्रातील, केरळच्या मच्छिमारांचा, बंगालच्या नंदिग्रामचा, झारखंडच्या नेतरहाट आणि तमिळनाडूच्या कुड्डनकुलमच्या अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्धचा तसेच ओरिसातील नियमगिरीचा संघर्ष असो.. महिलांचे जगण्याच्या हक्काशी नातेबंधन हे त्यांच्या सामाजिक-आर्थिक भूमिकेवरही आधारित असते आणि आंदोलनासाठी हेच नाते पायाचा दगड तेव्हा बनते, जेव्हा त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आंदोलन जीवापाड कष्ट करते. नर्मदेतल्या स्त्रियांची सर्व संघर्षांना हीच पुकार आहे!
medha.narmada@gmail.com