मंगला नारळीकर
सुनीताबाई देशपांडे यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या समोर आहे. त्यांचा निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी केलेलं व्यवस्थापन, जीएंशी असलेली त्यांची अपूर्वाईची पत्रमैत्री… सगळंच आपण अनेक दशकं जवळून पाहिलेलं, आदरानंअप्रूपानं अनुभवलेलं. त्याबद्दल नव्यानं सांगण्याजोगं काही नाही, असे वाटेल कदाचित… पण तसे नाही. सुनीताबाईंची कागदोपत्री जन्मतारीख ३ जुलै १९२६ असली, तरी त्यांच्या आप्तांच्यानातेवाईकांच्या माहितीनुसार १९२५ हे त्यांचं जन्मवर्ष. त्यामुळे जन्मशताब्दीनिमित्ताने तीन पिढ्यांतील लेखिकांनी सुनीताबाईंविषयी व्यक्त केलेली शब्दांजली…

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे, अर्थात पुलंच्या पत्नी यांची ही कायम लक्षात राहणारी आठवण. पुराणातील हरिश्चंद्राची गोष्ट आपण ऐकलेली असते. सत्यव्रती असण्याच्या बाबतीत हरिश्चंद्रालाही मागे टाकेल, अशी सुनीताताईंची ही आठवण आहे.

हेही वाचा : निरंकुश सत्ताधाऱ्यांचा धांडोळा

पुल आणि सुनीताताई यांचा आणि आमचा स्नेह जुना. तो पुण्यात आल्यावर अधिक दृढ झाला. ते दोघे आयुकाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या घरी आले, आयुकाचे काम पाहून खूश झाले. आम्हीही त्यांच्या घरी त्यांना भेटण्यास मधून मधून जात होतो. आधी रूपालीमध्ये आणि नंतर मालतीमाधवमध्ये. कारण ते १९९७ मध्ये रूपालीमधून मालतीमाधवमध्ये राहण्यास गेले. ते आपुलकीने विचारत आणि आम्ही आयुकाच्या प्रगतीबद्दल सांगत असू. लहान मुले किंवा तरुण काही चांगले काम केले की ज्या उत्साहाने घरातील ज्येष्ठांना ते दाखवतात, त्याच उत्साहात आम्ही त्यांना सांगत होतो. अपेक्षा फक्त शाबासकीची असे. १९९९ किंवा २००० साली अशा एका भेटीत सुनीताताईंनी आश्चर्य आणि आनंद यांचा धक्का दिला. त्या दोघांनी आयुकाला त्यांचे जुने राहते घर म्हणजे रूपालीमधील त्यांचा फ्लॅट देणगी म्हणून देण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही तर अशी काही अपेक्षाच केली नव्हती.

हेही वाचा : ‘रजनी’च्या पुनर्शोधासाठी ‘रजिया’चा लढा

आयुकामध्ये साधारणपणे खगोलशास्त्रातील संशोधन आणि तत्संबंधी काम केले जाते. तिथे शिकणारे तरुण-तरुणी पदवीधारक असतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी खास असे काही प्रथम नव्हते. पण चांगले विज्ञानशिक्षण देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे खरे तर शालेय जीवनात व्हायला हवे. याची जाणीव असल्यामुळे जयंतने ठरवले की देशपांडे दाम्पत्याच्या देणगीचा उपयोग शालेय मुलांसाठी संशोधिका बनवण्यासाठी करावा. ती कल्पना पुल आणि सुनीताताई दोघांना आवडली. त्यांनी अनेक समाजोपयोगी कामांना देणग्या दिल्याचे माहीत होते. विज्ञानशिक्षणाबद्दल त्यांची आस्था पाहून आमचा त्यांच्याबद्दलचा प्रेमादर दुप्पट झाला. आता रूपालीमधल्या जागेचा कसा उपयोग करायचा हे ठरायचं होतं. आयुकामध्ये ही बातमी दिल्यानंतर आम्हाला वेगळाच धक्का बसला. आमचे अकौंटंट श्री. अभ्यंकर यांनी सांगितले की, आयुका ही सरकारी संस्था आहे आणि तिला स्थावर मालमत्ता देणगीरूपात स्वीकारणे सोयीचे होणार नाही. रूपालीमधील जागा विकून आलेल्या पैशात काही उपक्रम करताना प्राप्तिकराच्या नियमांचा खूप त्रास होईल. हे सुनीताताईंना समजावून सांगण्याचे कामही श्री. अभ्यंकर यांनी पार पाडले. ही गोष्ट इथेच संपेल अशी अपेक्षा होती. पण ही गोष्ट आयुकापेक्षा सुनीताताईंना अधिक दु:खदायक झाली असे दिसले. रूपालीच्या अपेक्षित किमतीएवढे म्हणजे अंदाजे २५ लाख रुपये त्यांनी आयुकाला देण्याचे ठरवले. एवढी मोठी रक्कम लवकर उभी करणे सोपे नव्हते. आयुकाची तर काहीच मागणी नव्हती. तरीही सुनीताताईंनी स्वत: खटपट करून डिसेंबर २००० मध्ये एक कायदेशीर करार केला. त्यात नमूद केले की, त्या एकूण २५ लाख रुपये आयुकाच्या स्वाधीन करतील. मात्र ते काम २-३ वर्षांत, हप्त्याहप्त्याने होईल. आता हा असा एकतर्फी करार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. सुनीताताईंनी ती रक्कम मुदतीच्या खूप आधीच आयुकाच्या स्वाधीन केली. धन्य त्या सत्यव्रतीबाईची. हरिश्चंद्राच्या स्वप्नात तरी विश्वामित्रांनी त्याच्याकडून वचन घेतले होते राज्य देण्याचे. इथे तर तेही नव्हते. सुनीताताईंनी स्वत:च देणगी देण्याचे ठरवले होते. मुळात आयुकाची मागणीही नव्हती. पण अशी देणगी देण्याचे त्यांनीच ठरवले आणि सांगितले होते. तो स्वत:चा शब्द पाळण्याचा त्यांचा निश्चय खरेच अलौकिक होता. म्हणून वाटते की सुनीताताई हरिश्चंद्राच्या भगिनी शोभल्या असत्या.
आयुकाची विद्यार्थ्यांसाठी बांधलेली संशोधिका पूर्ण झाली आणि तेथे विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक विज्ञानशिक्षण सुरू झाले ते आजतागायत चालू आहे.
(गणितज्ञ मंगला नारळीकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेले, आजवर अप्रकाशित असलेले टिपण.)