प्रिय तातूस,

दिवाळीत सारखी माणसांची ये-जा असल्याने तुला लिहायचे राहूनच गेले. दिवाळीत कुणाकडेही गेले तरी लाजेकाजेस्तव चकली-चिवडा घेणार का, विचारतातच. आणि आपल्यालाही नाही म्हणणे जीवावर येते. दिवाळीचे चार दिवस कुरिअरवाले येण्याच्या वेळी मी सहसा बाहेर जात नाही. अनेक जण यानिमित्ताने भेटवस्तू पाठवतात. घराला कुलूप बघून कुरिअरवाले परत गेल्याचे कळले की आपल्याला उगाचच हुरहुर वाटत राहते. वस्तू परत गेल्याचं फारसं दु:ख नसतं रे; पण त्यामागचं प्रेमच जणू काय परत गेलं असं वाटत राहतं! मोबाइल-एसएमएस्चं जग आलं असलं तरी अजूनही मी माझ्या हस्ताक्षरात पत्र पाठवून जवळच्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नुसत्या अक्षरावरून मला ओळखणारे लोक आहेत. अरे तातू, ते दिवस अजूनही आठवतात.. आपण तारखांचे चौकोन पाडून ठळक अक्षरात तारखा व वार लिहून कॅलेंडर बनवायचो. त्याची मजा काही और होती!

शाळेत असताना प्रदर्शनामध्ये आपले कॅलेंडर ठेवले होते. त्याला साळगावकरांनी पहिले बक्षीस दिले होते, त्याची आठवण होते. या गोष्टी घरात सांगितल्या की, ‘वीस-पंचवीस रुपयांत रेडीमेड कॅलेंडर मिळते. त्याच्यासाठी एवढी डोकेफोड कशाला करत होतात?’ म्हणत मूर्खात काढतात. अरे, सगळं रेडीमेड जग झालंय. चकली काय, चिवडा काय, आणि कंदील काय.. सगळंच विकतचं! यावर्षी पाऊसपाणी सगळं वारेमाप झाल्याने दिवाळी एकदम आनंदात गेली. गेल्या दोन-तीन वर्षांतल्या दुष्काळामुळे यंदा त्यामानाने दिवाळसण फारसे नव्हते.

अरे, दिवाळी म्हणजे भाजणीचा खमंग वास.. बेसन भाजलं जातंय.. लाडू वळले जातायत.. अनारसा फुलून येतोय.. असं काय काय आठवतं! अरे तातू, मला सगळे लोक खादाड म्हणतात. अरसिक लेकाचे! पण चवीने खाणारा माझ्यासारखा माणूस दुर्मीळ- असं तुझ्याकडे आलं की वहिनी म्हणायची! अरे, पण आपण सारेच आता वाढत्या वयाकडे चाललोत. असो.

मी तुला मागच्या पत्रात साहित्य संमेलनाबद्दल बोललो होतो. पण मी अध्यक्षपदासाठी उभे राहायला नकार दिला. एका बाजूला लोकांचे प्रेम दिसत होते आणि दुसरीकडे सगळ्या मतदारांना मध्य प्रदेशापासून हैदराबादपर्यंत भेटायची दगदग, आणि लाख- दोन लाख खर्च येणार, असं मला सांगितल्याने मी गप्प बसलो. या वर्षीपासून म्हणे उमेदवाराला आपले आणि कुटुंबाचे सर्व उत्पन्न अर्जासोबत जाहीर करायची नवीन अट घातली आहे. तसंच या निवडणुकीत करोडोंचा व्यवहार होणार अशी अफवा असल्याने प्राप्तीकर खातेदेखील नजर ठेवून असल्याचे मला नानाने सांगितले. नानाची सगळीकडे ओळख असल्याने त्याला सगळ्या आतल्या बातम्या माहिती असतात. एवढी परदेशातली चॅनेलं बोंबलून ट्रम्पवर गरळ ओकत होती; पण नाना निश्चिंत होता. त्याच्या मते, ट्रम्पच विजयी होणार. असो. आता या वयात आपली दिवाळी म्हणजे दिवाळी अंक. हल्ली नेटवरून बुकगंगाला कळवलं की दुसऱ्या दिवशी झाडून सगळे दिवाळी अंक आपल्याला घरपोच! अरे, चेष्टा करणारे म्हणतात, काय अनंतराव, किती किलो दिवाळी अंक घेतलेत? असो.

लक्ष्मीपूजनाला नव्याकोऱ्या करकरीत नोटा लागतात. त्या मी सगळ्या बँकांमधून आधीच गोळा करून ठेवतो. अरे, शेजारीपाजारी सोड; पण बाहेर सगळीकडे माझे सर्वाशी चांगले संबंध आहेत. अरे, कॅशियर स्वत:च सांगतात- नव्या नोटा घेऊन जा म्हणून. तर सांगायचा मुद्दा म्हणजे अशा घराघरांत करकरीत सगळ्या नोटा आणि ८ तारखेला रात्री साडेआठ वाजता मोदींनी दणकाच दिला. अरे, काल-परवा ज्या पाचशे-हजाराच्या नोटांचं आपण पूजन केलं, त्या नोटा म्हणजे रद्दी होणार म्हटल्यानं घाबरलो. पण त्या बदलून देणार आहेत म्हटल्याने जीव भांडय़ात पडला. अरे तातू, एखाद्यानं बायकोला उद्यापासून तू माझी बायको नाहीस म्हटल्यावर काय वाटत असेल, तसं मला त्या पाचशे-हजाराच्या नोटांकडे बघून वाटलं. अरे, सगळीकडे नुसता हाहाकार उडालाय. काहींनी माळ्यावर पोत्यात भरून ठेवलेल्या नोटा पावसाळ्यानंतर सुकवण्यासाठी बाहेर काढल्या होत्या. अरे, आपल्यासारख्या चिटूर लोकांचं सोड, पण ज्यांच्याकडे लाखोंच्या नोटा आहेत ना त्यांचं धाब दणाणलंय. अरे, काहींनी आपल्या नियोजित जावयाला आधीच सगळी लग्नातली भेट म्हणून ही बंडलं दिलीत. अरे, घरोघर कामवाल्या बायामाणसांना वर्ष-दोन वर्षांचे पगार आधीच दिलेत. आता हा सगळा पैसा ते लोक खात्यात जमा करणार. मी अजून बँकेत जायचं धाडस केलेलं नाही, पण प्रत्येक बँकेसमोर मोठाले मंडप आणि बसायला फळ्या बांधून बाकडी बनवलीत. लांबलचक रांग बघून मला तर शिर्डी-तिरुपतीची आठवण झाली. व्हिसासाठी कसं पूर्वी रात्रीपासून रांगा लावायचे, तसे सगळेजण बँकेसमोर तासन् तास उभे आहेत. ‘महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे वाचती’ असं तुकोबांनी म्हटलंय ना- बघ. दहा-वीस-पन्नास-शंभरच्या नोटा वाचल्या; पण पाचशे-हजाराची वाट लागली. अरे तातू, नोटा मोजायचं मशीन आलंय; पण बंडले मोजायचं मशीन मी बघितलेलं नाही. नानाचा जावई बँकेत आहे. त्याला इंटरवूच्या वेळेला कागदांची बंडलं मोजायला दिली होती. अरे, कंडक्टरचा इंटरवू असतो ना, तेव्हादेखील अंकगणितात किती मार्क होते, एस. एस. सी.ला गणित विषय होता का, विचारतात आणि खच्चून भरलेल्या बसमधली माणसं मोजायला सांगतात. अरे तातू, माझ्याजवळची शंभरची एकेक नोट कमी होताना जीव तीळ-तीळ तुटतो. इथून पुढे आयुष्यात सुटे पैसे जवळ ठेवायचे, हा विचार मी कायम कोरून ठेवणार आहे. ‘नथिंग इज पर्मनन्ट; एक्सेप्ट चेंज!’ असं कृष्णमूर्तीनी की कुणीतरी म्हटलंय म्हणतात.

मी मात्र यापुढे नाणी आणि छोटय़ा नोटा जवळ ठेवणार. सगळीकडे बँका आणि पोस्ट ऑफिससमोर रांगा बघून नानाला तर व्हेनेझुएलाची आठवण झाली. तिथे म्हणे अनेक लोक मैलोन् मैल रांगेत उभे असतात. त्यांना आपण कशासाठी रांगेत उभे आहोत हेच माहीत नसतं. आणि दुकानदाराला वा मॉलला विचारलं तर त्यांनादेखील हे लोक तासन् तास कशासाठी उभे आहेत हे माहीत नसतं. तातू, तुला माझं म्हणणं पटणार नाही, पण काळा पैसासुद्धा असा सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. अरे, माळ्यावर किंवा तळघरात ठेवलेल्या नोटा- त्यांची किंमत शून्य होणार म्हटल्यावर काय होत असेल! अरे, परदु:ख शीतल असं म्हणतात. तुला-मला दु:ख कळणार ते फक्त रांगेत तासन् तास उभं राहून दोन-चार नोटा बदलून घेणाऱ्या रस्त्यावरच्या गावखात्यातल्या माणसांचं! तातू अरे, हल्ली जगात सगळ्या धनंतर माणसांचे- म्हणजे मिलियन-बिलियनमधल्या लोकांचे व्यवहार ‘बिटकॉइन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल करन्सीमध्ये होतात. परमेश्वर कसा आपल्याला दिसत नाही, पण तो आहे; तसं या चलनाचं आहे. डोकं फिरवून टाकणाऱ्या अशा एकेक गोष्टी येतायत. मलादेखील मोदींच्या कानावर काही गोष्टी घालायच्यात. पण मी दिल्लीला गेलो की ते विदेशात असतात, आणि ते इकडे येतात तेव्हा नेमका मी विदेशात असतो. आमच्या घरातल्या पिगी बँकमध्ये चार आण्याची नाणी असलेले दोन-चार किलोचे डबे आहेत. तुझी रिझव्‍‌र्ह बँकेत कुणाशी ओळख असेल तर मला कळव!

तुझा,

अनंत अपराधी

अशोक नायगावकर – ashoknaigaonkar@gmail.com