डॉ. संजय ओक
सांगलीला धामणी रस्त्यावर आमच्या नव्या  रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे. ४५० रुग्णशय्या असलेला ‘उष:काल अभिनव वैद्यकीय संस्थे’चा पूर्णत्वास जाणारा हा प्रकल्प माझ्या आजवरच्या वैद्यकीय कारकीर्दीतील एक अभिमानाचे पान आहे. मी या नव्या रुग्णालयाचा संचालक आहे आणि त्या कर्तव्यपूर्तीसाठी महिन्यातून दोन खेपा प्रकल्पास होतात. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात दिलेल्या भेटीत संपूर्ण ११ मजले चढून प्रत्येक खोली अन् विभागाचे निरीक्षण करावयाचे ठरले. मी आणि रुग्णालयाचा मुख्य प्रणेता असलेला माझा वर्गमित्र डॉ. मिलिंद परिख- दोघेही वय वर्षे ६२- दोघांनीही ३५-४० वर्षे सर्जरीच्या खस्ता खाल्ल्या आहेत. लिफ्ट अजून कार्यरत झालेल्या नाहीत. त्यामुळे ११ मजले चढणे ही एक कार्डिआक स्ट्रेस टेस्ट होती. सात मजले चढल्यावर आम्ही धापा टाकू लागलो. जिन्याच्या विस्तृत मिडलॅंडिंगवर उभे राहून मी उघडय़ा खिडकीतून बाहेर नजर टाकली तर क्षितिजावर सप्तरंगांचे एक लोभस मंगल तोरण विधात्याने बांधले होते. नवव्या माळ्यावर जाईपर्यंत त्या तोरणाच्या वरती काहीसे अस्पष्ट दिसणारे असे दुसरेही तोरण आता उमटले होते. आकाशाच्या कॅनव्हासवरची ही रंगांची कमान मला रुग्णालयासाठी शुभशकुनी वाटली आणि मी मिलिंदला तसे बोलूनही दाखविले.

इंद्रधनुष्याने आपली सर्वाची अगदी बालपणापासून सोबत केली आहे. ‘ये रे ये रे पावसा’ म्हणणारा आपला देश असो किंवा ‘रेन रेन गो अवे, लिटिल जॉनी वॉन्ट्स टू प्ले’ म्हणणारे बारमाही पावसाचे ब्रिटन.. रंगांची तोंडओळख आम्हाला या इंद्रधनुनेच करून दिली आहे. ‘ता, ना, पि, हि, नि, पा, जा’ हा रंगक्रम लक्षात ठेवण्याचा मंत्रही आम्ही प्राथमिक शाळेत घोटला. आणि जसजसे आमचे वय वाढू लागले आणि पदार्थविज्ञान व भौतिकशास्त्र आमच्या बालपणाला खग्रास ग्रहण लावू लागले तसतसे सूर्याचे किरण, वातावरणातल्या पावसाच्या शिडकाव्याचे जलबिंदू आणि प्रकाशाचे होणारे पृथ:करण (१ीऋ’ीू३्रल्ल, ्िर२स्र्ी१२्रल्ल), परावर्तन आणि अपवर्तन या प्रक्रियांमुळे होणारा रंगांचा वर्णपट याची माहिती मिळाली. जलबिंदू घुमटाकार.. त्यात किरण शिरताना, पलीकडच्या पटलावरून परावर्तित होताना आणि मूळच्या प्राथमिक पटलातून बाहेर पडताना होणारे विशिष्ट कोन ही रंगांची किमया साधतात हे उमजले. फिजिक्सच्या पेपरातल्या या हमखास येणाऱ्या प्रश्नाने रूक्षता आणली; पण त्याने या निसर्ग चमत्काराबद्दलची प्रीती आणि आसक्ती काही केल्या कमी झाली नाही. आजही इंद्रधनू पाहिल्यावर हरखून जाणार नाही असा माणूस विरळाच! क्वचित् प्रसंगी मुख्य इंद्रधनुष्याबाहेर पसरलेले फिक्या रंगांतील व मुख्य इंद्रधनुष्याच्या वर्णपटाच्या उलटय़ा क्रमाने रंग दाखविणारे दुसरे इंद्रधनूही दिसते. इथे जांभळ्याला बाहेरची महिरप लाभते, तर तांबडा आतल्या अंगाला अ‍ॅडजस्ट करून घेतो. संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला ‘इंद्रवज्र’ असे म्हणतात. वास्तविक पाहता प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोलाकार इंद्रवज्रच असतो, पण क्षितिजामुळे तो आपल्याला अर्धवर्तुळाकार कमानीच्या रूपात दिसतो. पाहणाऱ्याचे डोके वज्राच्या बरोबर मध्यभागी असते. क्षितिजाशी ४०-४२ अंशाचा कोन करणारी ही कमान काही क्षणांत लुप्त होते आणि आपण मात्र ‘ढुंढते रह जाओगे..’

इंद्रधनुष्याचे हे सात रंग माझ्यासाठी खूप काही असतात. कधी तो शुभलक्षी संकेत असतो, तर कधी वरवर नीरस वाटणाऱ्या आयुष्यातही रंग असतात, ते शोधावे लागतात, हा उत्साही संदेश बनतो. आयुष्यात सारंच काही काळं-पांढरं नसतं; तर त्या काळ्या-पांढऱ्यातून रंगपट बरसू शकतो. फक्त तुम्हाला वाकायला आणि उलटून परतायला जमायला हवे. प्रकाशकिरण जर जलबिंदूतून माघारी न फिरते आणि आत बंदिस्त होते तर इंद्रधनू कधी न प्रकटते. तेव्हा ही रंगकमान मला  ऋ’ी७्र्रु’्र३८ (लवचिकता) ुील्ल्िरल्ल (वाकणे), पृथ:करण (गरजेचे असेल तर विभाजन) आणि १ी२्र’्रील्लूी (माघार म्हणजे हार नाही!) ही महत्त्वाची जीवनसूत्रे शिकविते. इंद्रधनुष्य फार थोडा काळ टिकते. आयुष्यातील आनंदाचे क्षणही तसेच थोडे.. त्यांचे कौतुक अनुभवा. पण त्याच्या असण्यावर आणि प्रकट होण्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा; जेणेकरून रोजचा अनुताप सहन करता येईल.

इंद्रधनुष्य मला आणखी एक महत्त्वाचा संदेश देते..

‘एकदा काय झालं,

सूर्याच्या किरणांना आला भलताच माज,

आमच्याच किमयेमुळे नभोमंडपी साज.

जलबिंदू हसले आणि म्हणाले,

अरे, तुम्ही तर रोजच असता,

पिवळी आग ओकून ताप ताप तापता

नारंगी, हिरवा, जांभळा कुठे होतो लापता

शिरता तुम्ही माझ्यात तेव्हाच बनते ही कमान

लहान जरी असलो तरी

तुमच्याइतुकाच माझाही मान

उतू नका, मातू नका, नका फुका निंदू

फुलहारातल्या धाग्यासारखा

मी एक कोवळा जलबिंदू.’

sanjayoak1959@gmail.com