scorecardresearch

मोकळे आकाश.. : सजावट आणि निर्माल्य

अनंतचतुर्दशीला बाप्पाची उत्तरपूजा झाली.

मोकळे आकाश.. : सजावट आणि निर्माल्य

डॉ. संजय ओक

अनंतचतुर्दशीला बाप्पाची उत्तरपूजा झाली. ‘चैन पडेना आम्हाला’ म्हणता म्हणता बाप्पा घरी गेले आणि उरले कोनाडय़ातले रिकामे मखर. दहाच दिवसांपूर्वी हवी तशी रंगसंगती साधण्यासाठी मी जीवाचा आटापिटा केला होता. दादर मार्केटला जाऊन विशिष्ट व्हायोलेट कलरची ऑर्किडस्, बुटकेसे- पण प्रमाणबद्ध केळीचे खुंट, जर्मेनियमची उतरंड, जास्वंदीचा बहर हे सारं करताना भक्तीचा भाव होता अन् किमतीतला भाव करण्याची वृत्ती नव्हती. हे सगळं बाप्पाच्या जाण्यानंतर रंगहीन झाले होते. जड अंत:करणाने ती महिरप उतरवली. पर्यावरणाचा मान राखून बायोड्रिगेडेबल बॅग्ज भरल्या आणि विसर्जनाची तयारी झाली. नगरपालिकेच्या नियमानुसार निर्माल्य थेट पाण्यात न टाकता काठावरच्या निर्माल्यकुंडात ठेवून देण्याचे नागरी कर्तव्य पार पाडले आणि अगदी ढसाढसा रडायला आले. सजावटीचे निर्माल्य होणे आणि शोभिवंतांची शून्यता होणे हा संपूर्ण काळाचा महिमा होता. फुलं-पानं तीच होती, रंगा-रूपात अजूनही शान होती, पण दिवस सरले होते म्हणून मान संपला होता.

वाडिया रुग्णालयात सर्जरी शिकवणारे डॉ. विनोद कपूर मला नेहमी सांगायचे, ‘‘समय बडा बलवान.’’आज त्याची प्रचीती येत होती. प्रत्यक्ष परमेश्वरही त्याला अपवाद नव्हता. प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत शाडूची मूर्ती आणि उत्तरपूजा बांधल्यावर विसर्जनीय पुतळा.. हा काळाचाच महिमा होता.

भाद्रपद शु. चतुर्थी ते भाद्रपद शु. अनंत चतुर्दशी हा काळ सरल्यावर दर्शन संपले होते आणि सजावट सुकली होती. देवत्त्व संपले नव्हते, पाना-फुलांचा गंध विरला नव्हता; फक्त तो कुठे शोधायचा, हुंगायचा त्याचे स्थान बदलले होते.

सारे कालाचे माहात्म्य होते. मला अचानक बहिणाबाईंची आठवण झाली. जगण्या- मरण्याचं न्यारं तंतर उलगडून सांगताना त्या लिहित्या झाल्या होत्या.. हे फक्त चार श्वासांचं अंतर.. रुग्णालयात काम करताना गेल्या ४० वर्षांत अनेक मृत्यू पाहिले, साहिले, अनुभवले आणि रिचवले आहेत. कधी अपेक्षित, कधी आमंत्रित, कधी रेंगाळणारा तर कधी झडप घालणारा.. कधी वाट पाहायला लावणारा तर कधी पुढच्या वाटचालीसाठी वाटाडय़ा बनणारा. मृत्यू हा माझ्यासाठी कधी सर्जनचा सूडकरी तर कधी सुहृद बनून आला आहे. जगण्याचे कर्ज अति झाल्यावर एका क्षणी येऊन त्याने ते ‘राईट – ऑफ’ केले आहे. अगदी इंटर्नशिपपासून आजपर्यंत मी ते थिजणारे डोळे आणि थांबणाऱ्या श्वासांचा साक्षीदार राहिलो आहे. प्रचलित आधुनिक वैद्यकाच्या सर्व प्रयत्नांना अपुरे ठरविणारी एकच गोष्ट पुरून उरली आहे आणि ती म्हणजे ‘समय.’ वेळ हे सत्य- माणसं जितकं लवकर आणि परिपूर्णतेने स्वीकारतील तितकं ते त्यांच्या आयुष्यात अर्थ आणि आनंद भरू शकतील. मी अनंत नाही; पण मिळालेल्या क्षणा- क्षणांचा हिशोब हसरा ठेवण्यासाठी मी कणाकणाने रांजण भरेन हा निग्रह महत्त्वाचा! प्रत्यक्ष परमेश्वरही जेथे प्रवासी बनून पृथ्वीवर येतो आणि नियत कालानुसार प्रस्थान ठेविता होतो तेथे मर्त्य मानवाची काय कथा?

मला वाटतं, विशिष्ट काळाचं, दिवसाचं बंधन लागू होतं तेव्हाच प्रयत्नांना शिस्त मिळते. ठरावीक दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याचा शिरस्ता जीवनाला सकारात्मक वळण देतो. इंग्रजीत बोलायचे झाले तर accountability अर्थात एखाद्या पूर्ण करावयाच्या गोष्टीचे घेतलेले उत्तरदायित्व, अंगीकारलेली जबाबदारी ही त्याच्या पूर्णत्वाचा विश्वास वाढवते. समय हा बंधन घालतो आणि प्रयत्नांचे कंगणही घालतो. त्या कांकणांचा नाद आयुष्याला जगण्याचे बळ देतो.

..नदीपात्रात जलौघात दूरवर वाहत जाणारे आपल्याच घरातील पाना-फुलांचे सुकलेले हार मला अक्षय सत्य सांगून जातात.

शेवटी निर्माल्यच सत्य; सजावट आभास. पण निर्माल्य होईल म्हणून आपण सजावट करणं थोडंच थांबवतो?

 sanjayoak1959@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2021 at 00:32 IST

संबंधित बातम्या