मोकळे आकाश.. : ‘इकेगाई’ आणि बरेच काही!

कामाबद्दलची निष्ठा आणि कौशल्य यामुळे त्या अधिकाऱ्याचा लौकिक मोठा असतो.

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

कार्यालयातील एखादा अधिकारी अथवा सहकारी जेव्हा निवृत्त होतो, तेव्हा अत्यंत मासलेवाईक असा निरोप समारंभ घडवून आणला जातो. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यावर भाषणे होतात, स्तुतीसुमने उधळली जातात, हार-तुऱ्यांचा वर्षांव होतो आणि भेटवस्तू म्हणून टायटनचे घडय़ाळ! ज्याला यापुढे घडय़ाळाचे काटे फारसे छळणार नसतात, त्याला घडय़ाळ देण्यामागचे प्रयोजन मला आजतागायत उलगडलेले नाही. ‘पुढे काय करणार?’ या पूर्वनियोजित प्रश्नाला अनेकांकडे नेमके उत्तर नसते. कारण त्यांनी निवृत्तीनंतरच्या काळाचा नेमका विचारच केलेला नसतो.

पाटबंधारे खात्यातून वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची ती कहाणी थोडय़ाफार फरकाने प्रत्येक निवृत्तीधारकाच्या वाटय़ाला येऊ शकते. कामाबद्दलची निष्ठा आणि कौशल्य यामुळे त्या अधिकाऱ्याचा लौकिक मोठा असतो. साहजिकच निवृत्त झाल्यावर अनेक खासगी उद्योगसमूहांकडून आमंत्रणे येतात. काही ठिकाणाहून तर अगदी संचालक मंडळावर सहभागी होण्याबाबतीतही विचारणा होते. पण साहेब ‘नाही’ म्हणतात. ‘चेंज ऑफ इनिंग्ज’ हे त्यांनी सूत्र ठरवलेले असते. सकाळी उठून दूध आणणे, चहा तयार करणे, बागकाम करणे, भाजी आणणे.. एक-दोन करीत सहा महिने जातात. हळूहळू या नीरस रूटिनचा कंटाळा येऊ लागतो. शेवटी बायकोही म्हणते.. ‘ही तुमची कामे नव्हेत. तुमचे कौशल्य जेथे वाखाणले जाते, तेच काम तुम्ही करा.’ साहेब आता सहा महिन्यांनंतर पुन्हा त्या खासगी समूहांकडे वळतात. पण एव्हाना कवाडं बंद झालेली असतात. ‘‘Now we may not need your services & expertisell किंवा ‘‘Oh! what a pity sir; we will keep you on our active wait list…’’ अशी ठरावीक नकारघंटा ऐकू येते. तीस-बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर तिष्ठत राहणे सहजशक्य होत नाही. योग्य त्या वेळेला आपण त्या- त्या ठिकाणी असणे यातला मथितार्थ समजावून देण्यासाठीच आजचा हा लेखांक.

अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर ब्रेक घ्यावा, पर्यटन करावे, मनासारखा कुटुंबाला वेळ द्यावा असे वाटले तर त्यात गैर काहीच नाही. पण हा ब्रेक इतका लांबलचकही असू नये की आपली बाजारातील पत आणि किंमत कमी होऊन आपण विस्मरणाच्या गर्तेत लोटले जाऊ. मुळात हा प्रश्न आहे की, साठ वर्षे उलटून गेल्यावर आपण काम करावे का? आपल्यापैकी अनेक सुजाण वाचकांनी ‘कङकॅअक’ हे पुस्तक वाचले असेल. तुमच्या अंगी नेमके कोणते कौशल्य आहे? त्याची समाजात नेमकी कोठे गरज आहे? त्यामुळे तुम्हाला अर्थार्जन आणि वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान लाभेल का? या प्रश्नांची उत्तरे म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचा आणि अस्तित्वाचा नेमका उद्देश शोधणे होय. ज्या वाचकांनी पुस्तक वाचले नसेल त्यांनी ते जरूर विकत घेऊन संग्रही ठेवावे. आणि ज्यांनी एकदा वाचलंय त्यांनी पुस्तकाची पुन:भेट घ्यावी. यात निवृत्तीनंतरची पुढची पाच वर्षे सुखासमाधानाने घालविण्याची क्लृप्ती तुम्हाला मिळेल असे मला वाटते आहे. निवृत्ती जवळ आली की माणसे एक्स्टेन्शनसाठी धावाधाव करतात, वशिले लावतात, गळ घालतात, राजकीय दबाव आणतात, किंवा कोर्टाचे दरवाजे खटखटवतात. माझ्या  प्रशासकीय आयुष्यात मी हे सारं सारं अनुभवलं आहे. खूप वाईट वाटायचं- आपल्या वाघासारख्या कारकीर्द केलेल्या सहकाऱ्यांची शेळी झालेली पाहताना. माझ्या बाबतीत विचारलं तर मी अंदाजे चार वर्षांनंतर प्रशासकीय पदं बदलली.. स्वेच्छेनं आणि विचारपूर्वक. मला अजूनही असं वाटतं की, चार वर्षांच्या काळात तुम्ही maximum contribute करू शकता. नव्या गोष्टींचा प्रारंभ आणि उन्मेष तेव्हाच बहरत असतो. तद्नंतर तुम्ही फक्त संख्यात्मक वाढ करता; गुणात्मक नाही. माझे हे विचार अनेकांना आततायी वाटतीलही! आणि मी विनम्रपणे विरोधी विचाराचाही सन्मानच करेन. मुद्दा लक्षात घेण्यासारखा एवढाच आहे की, nobody is indispensible. आणि प्रत्येकाला एक ठरावीक शेल्फ लाइफ असते. एकमेवाद्वितीय असा कोणत्याही क्षेत्रात कोणी नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कार्यपद्धती बदलल्या नाहीत तर आपण प्रवाहातून बाहेर फेकले जातोच. अगदी सर्जरीतसुद्धा प्रावीण्य टिकवायचे असेल तर आपल्या विद्यार्थ्यांकडूनही प्रसंगी दोन गोष्टी नवीन ऐकावयाची सहिष्णुता ठेवावीच लागते. असे एकलव्य द्रोणाचार्य घडवतात.. म्हणूनच तर धनुर्विद्या प्रगत होत जाते. तेव्हा निवृत्तीनंतर पुढची पाच वर्षे हात-पाय नीट सुनियंत्रित चालू असताना आपण कमावलेले कौशल्य जेथे हवे आहे तेथे आढय़तेशिवाय वापरणे हे यशस्वी निवृत्तीचा स्वीकार आणि आपले ‘इकेगाई’ ठरावे.

कामाचे स्वरूप, ऑफिस, वेळा, जागा, इतकेच काय- आपले रोजचे टेबल बदलले जाणे हाच सर्वोत्तम ‘ब्रेक’ ठरावा. आपण अजूनही घरातल्यांना आणि अवतीभोवतीच्या लोकांना हवे आहोत, ही भावना भरभरून मिळणं यातच सारं काही भरून पावतं, हेच खरं!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mokale akash purposeful life after retirement life after retirement story of retired officer zws

Next Story
लेखकाचा कट्टा : नेटके लिहिण्याचे बीज पेरताना…
ताज्या बातम्या