दर बारा मैलांवर भाषा बदलते असं म्हटलं जातं. ही भाषा त्या प्रदेशातली ‘बोली’ असते. ती त्या भागातील भाषिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्टय़ांचा अंश असते. अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांत बोलल्या जाणाऱ्या बोलींची ओळख करून देणारं, त्यांचं वेगळेपण व सामथ्र्य सांगणारं सदर..
नुकताच शिक्षक म्हणून शाळेत दाखल झालो होतो. उत्साह ओसंडून वाहत होता. एकदा सातवीच्या विद्यार्थ्यांना ‘मी केलेली धमाल’ हा विषय निबंधासाठी दिला आणि त्यांना ‘आपले खरेखुरे अनुभव लिहा,’ असं सांगितलं. कसलंही बंधन विद्यार्थ्यांवर नव्हतं. नंतर सगळ्या विद्यार्थ्यांचे अनुभव वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली, ती ही की, विद्यार्थी स्वत:च्या भाषेत चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. आपल्या निबंधांतून मुलांनी स्वत:च्या भाषेचा.. बोलीभाषेचा मुक्तपणे वापर केलेला होता. एका विद्यार्थ्यांने लिहिले होते- ‘‘मी खटकाळीला जाऊन आलो. घरी हात धुलो. मग गाडवलोळी वलांडून तळ्याकड आलो. बाया धुनं धिवलालत्या. मधी पाण्यात कधी कधी माशेबी दिसत्यात म्हणून मी पाण्यात वाकून बघलालतो. बघताना माझा पाय घसरला अन् मी बाबऱ्यातच पडलो.’’
परीक्षेत प्रश्नांची उत्तरं लिहितानाही विद्यार्थी बोलीभाषेचाच वापर करीत होते. ती त्यांनी प्रमाणभाषेत लिहिणं अपेक्षित होतं. विद्यार्थ्यांची अडचण माझ्या लक्षात आली. त्यांच्या बोलीतल्या शब्दांना प्रमाणभाषेत कोणते शब्द आहेत, हेच त्यांना माहिती नव्हतं. तसंच प्रमाणभाषेतील शब्दांना बोलीभाषेत कोणते शब्द आहेत, तेही माहीत नव्हतं. विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी मी ‘बोलीभाषा-प्रमाणभाषा’ हा शब्दकोश तयार करण्याचं ठरवलं. आणि बोलीभाषेतील शब्द जमा करण्यास सुरुवात केली. त्यातून ‘मायबोली’ हा शब्दकोश तयार झाला. आता तो विद्यार्थी नियमितपणे वापरतात.
हा शब्दकोश तयार करताना माझ्याच बोलीचा मला नव्यानं परिचय झाला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व थोडय़ाफार लातूर जिल्ह्य़ात ही बोली बोलली जाते. ही बोली मराठवाडी असली तरी तिच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. या भागातील संस्कृतीचा खास टच् या भाषेला आहे. त्यात एक वेगळीच नजाकत आहे. बोलताना कानडीचा हेल असतो. काही क्रियापदांवर कानडीचा परिणाम होतो. पण कानडी भाषेचा प्रभाव मात्र या भाषेवर नाही. इथे निजामांचं राज्य होतं. म्हणून थोडाफार उर्दूचाही परिणाम आहे. पण तरीही ही अस्सल मराठवाडीच बोली आहे.
दिवसभर शेतात राबून घरी आलं, जेवणं झाली की तंबाखूचा बार भरून मारुतीच्या पारावर, नाहीतर कोणाच्या तरी घराच्या कट्टय़ावर बसलं की अस्सल सीमावर्ती मराठवाडी बोलीची देवाणघेवाण सुरू होते.
‘‘आज का केलास गा रानात?’’ किंवा ‘‘मायला कुठं हायीस गा आजकाल? अवसच्या चंद्रावानी गायबच हायीस.’’ अशा कानडी हेलातील संवादातून ही बोलीभाषा सुरू होते, आणि मग उत्तरोत्तर गप्पा रंगतच जातात.
या बोलीमध्ये उच्चारांच्या सुलभीकरणासाठी क्रियापदांच्या रूपामध्ये बदल होतो. उदा. रडत होता-रडलालता, झेपत नाही- झेपतनी, जाणार नाही- जातनी, घेणार नाही- घेतनी वगरे.
या बोलीमध्ये एका वाक्यात दोन दोन क्रियापदेही वापरतात. उदा. ‘साखर घेऊन ये’ असे सांगायचे असेल तर ‘जा साखर घेऊन ये जा’, असे म्हणतात किंवा ‘राहिलास तर राहिलास रहा’ इत्यादी.
‘लाव’, ‘लास’, ‘आव’ असे कारकवाचक प्रत्यय या सीमावर्ती बोलीचे वेगळेपण स्पष्ट करणारे आहेत. जसे की-धरलालाव, पळलालाव, जेवलालाव, चाल्लास, ठिवताव, घेताव, करलालेव, बसलेव वगरे.
दैनंदिन बोलण्यात ‘कडू’ या विशेषणाचा सर्रास वापर होतो. रागाने आणि प्रेमानेही. उदा. ‘अई, कडू माझा हाटय़ा’ किंवा ‘माझा कडू किती छान हाय ग’ इत्यादी.
या बोलीमध्ये रंगाबद्दल वेगळीच विशेषणे वापरली जातात. उदा. पांढरंशिप्पट, पिवळंजरद, काळंभोर, हिरवंगार, लालभडक वगरे.
सीमावर्ती बोलीमध्ये ‘पासून’ या शब्दयोगी अव्ययाऐवजी ‘धरून’ हा शब्द वापरला जातो. उदा. ‘सकाळपासून’ऐवजी ‘सकाळ धरून’, ‘गावापासून’ऐवजी ‘गाव धरून’, ‘केव्हापासून’ऐवजी ‘कवा धरून’ असे म्हणतात.
तसेच ‘विचार’ या शब्दाऐवजी ‘पुस’ या शब्दाचा वापर केला जातो. उदा. ‘विचारलंस का?’ऐवजी ‘पुसलास का?’ असे म्हणतात. तसेच ‘पुस महिना’ याचा अर्थ ‘पौष महिना’ असा होतो.
या सीमावर्ती बोलीमध्ये स्वरलोपाची प्रवृत्ती दिसते. उदा. पेईल-पील, घेईल-घिल, येईल-यील, गेले असतील-गेलासतील, पोहोचले असतील-पोचलासतील वगरे.
या बोलीमध्ये केवलप्रयोगी अव्ययही जरा हटकेच आहेत. उदा. आय्यो ऽ।ऽ।, बाब्बोऽ।ऽ।, आड्डीऽ।ऽ। इ. ‘अई’ हा आश्चर्य दाखवणारा स्त्री आणि पुरुष दोघेही वापरतात. ‘अई’, ‘आय्यो’ आणि ‘आड्डी’ या अव्ययावर कानडीचा प्रभाव जाणवतो.
या बोलीतील वाक्यरचनेतही वेगळे वैशिष्टय़ आढळते. उदा. ‘काय’ ऐवजी केवळ ‘का’चा वापर होतो. जसे की-‘का करावं की का नाही की?’
‘ढ’ ऐवजी ‘ड’ वापरले जाते. उदा. ओढ-ओड, दाढ-दाड.
‘घ’ ऐवजी ‘ग’ वापरले जाते. उदा. बिघडले-बिगडले, माघार-मागार.
‘त’ ऐवजी ‘ट’ वापरले जाते. उदा. घेतले-घेटले, घातले-घाटले.
‘आ’ ऐवजी ‘हा’ वापरला जाता. उदा. आम्ही-हामी, आहे-हाय.
‘ण’ ऐवजी ‘न’ वापरले जाते. उदा. कोण-कोन, कोणीच-कोनीच, कोणतीच-कोनतीच, पाणी-पानी.
‘ध’ ऐवजी ‘द’ वापरले जाते. उदा. मध्ये-मदे, साधा-सादा, मध-मद.
‘ना’ ऐवजी ‘ळा’ वापरला जातो. उदा. घेताना-घेताळा, देताना-देताळा, जाताना-जाताळा, जेवताना-जेवताळा.
‘ख’ ऐवजी ‘क’ वापरले जाते. उदा. दाखव-दाकव. याच्यातही कधी-कधी ‘क’ लोप पावतो. आणि ‘दाखव’ ऐवजी ‘दाव’ असे क्रियापद वापरले जाते. जखम-जकम इत्यादी.
‘उ’ या स्वराचा उच्चार ‘हु’ असा केला जातो. उदा. उभारणे-हुभारणे.
‘ऐ’ ऐवजी ‘य’ वापरला जातो. उदा. एक-येक, एकदा-यकदा, ऐवढे-येवढे.
‘क्ष’ ऐवजी ‘कश’ वापरले जातो. उदा. शिक्षक-शिकशक.
स्त्रियांना संबोधताना ‘ग’ ऐवजी ‘ये’ वापरले जाते. उदा. ‘आज रानात गेलनीस का ये’. तसेच पुरुषांना संबोधताना ‘रे’ ऐवजी ‘गा’ वापरला जातो. उदा. ‘आज लवकर आलास गा’ किंवा ‘जेवलास का गा?’
कोणत्याही बोलीभाषेतील वाक्प्रचार, म्हणी व शब्दसंग्रह ही त्या बोलीची खरी ओळख व संपत्ती असते. सीमावर्ती मराठवाडी बोलीमध्ये ही संपत्ती आहे. उदाहरणादाखल हे काही वाक्प्रचार- गुडाक उटणे (नुकसान होणे), आवचिंदपणा करणे (खोडय़ा करणे), फुकुन टाकणे (विकून टाकणे), हिल्ले हवाले करणे (उलाढाली करणे), हाडत-हुडूत करणे (झिडकारणे), भोंड जिरणे (खोड मोडणे), कड लावणे (कडेला लावणे), दिवसा लगीन लावणे (खोड मोडणे), बोलून गाबन करणे (फक्त बोलून काम साध्य करून घेणे), हावला बसणे (धक्का बसणे), गंड वाण्यार असणे (माजलेला असणे), परतपाळ करणे (पालनपोषण करणे), व्हडी-व्हडी करणे (रागावणे), तु-म्या करणे (भांडण करणे), उकान काढणे (आभाळ भरून येणे), मन उचाट खाणे (मन उडणे), फुकट म्हातारं होणं (नुसते वय वाढणे), केंडा निवणे (पोट भरणे), शिमगा उटणे (बोंब उटणे), हातचं मिठ आळणी असणे (केलेल्या प्रयत्नाला यश न येणे) इत्यादी.
सीमावर्ती भागात विशेषत: उस्मानाबाद-लातूर जिल्ह्य़ांत वेळाआमवस्येला ‘येळवस’ हा सण रानात साजरा केला जातो. पाच पांडव व एक द्रौपदी असे सहा दगड रानाच्या मध्यभागी झाडाच्या बुडात ठेवून पूजा केली जाते. या ‘येळवस’ सणाशी संबंधित जे शब्द आहेत, ते फक्त याच बोलीमध्ये आढळतात. जसे की-िबदगं, अंबिल, खिचडा, उंडे, भज्जी, कानवले, पाणी िशपडणे, चर िशपडणे, आसरा, हेंडगा फिरवणे, कोप, दुध ऊतू घालणे वगरे.
प्रत्येक सणाशी संबंधित काही वेगळे शब्द या बोलीत वापरले जातात. पण तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यापासून
यातील बरेच शब्द लोप पावत आहेत. आता बलगाडी कोणी फारशी वापरत नाही, त्यामुळे तिच्याशी संबंधित सापत्या, दांडी, खिळ, रोगण, धावपट्टी, आऱ्या, साठा, तिपई, चाक, आरं, आक, नळा, मुंगसं वगरे साठ ते सत्तर शब्द आज वापरले जात नाहीत. तसेच बारा बलुतेदारांची बलुतेदारी आता जवळ-जवळ संपत आली आहे. त्यामुळे या जमातींचे बोलीतले अनेक शब्द आता वापरले जात नाहीत. आता खळं करून रास होत नाही, मशीनने राशी केल्या जातात. या खळ्याशी संबंधित शब्द आता कोणी वापरत नाहीत. उदा. सौंदर, जाणवळ, फास, सऱ्या, रासणी, मोगडा, बडवणं, तिवडा, धवरा, मदन, मातरं, सर्वा, कडप, सडमाड, सनकाडी, कुस, ओंब्या वगरे. सुतारकी, कुंभारकी आता नावापुरती शिल्लक राहिली आहे. तेव्हा या व्यवसायाशी संबंधित असणारे शब्द आता मोजकेच लोक वापरतात. आजच्या पिढीला हे शब्द माहितीदेखील नसतात. जरी माहिती झाले तरी त्यांचा अर्थ कळत नाही. जसे की-वाकस, चिकराणी, भरमा, किक्र, गिरमीट, रंदा, पक्कड, अंबुरा, आवा, येळणी, केळी, कोथळी, मोगा, कचकुल, थापना, गुंडा, गणी, सुत्या, घन, गंपा, मगुड, कुरा वगरे.
विहिरीतून पाणी काढायची मोट, गावात खेळायचे देशी खेळ, पारंपरिक अवजारे, सोयरीक, सण-समारंभ, जत्रा, तमाशा हे सगळं आता संपत आल्यामुळे या सगळ्यांशी संबंधित बोलीभाषेतील शेकडो शब्द आज वापरले जात नाहीत. आज खूप थोडी माणसे या सर्वाशी संबंधित शब्दांची जाण असणारे आहेत. हळूहळू त्यांच्याबरोबर हे अस्सल शब्दही संपून जाणार आहेत. म्हणून हा सीमावर्ती बोलीतील अमूल्य ठेवा जतन करणे आवश्यक आहे. आता गावोगाव टीव्ही, मोबाइल आले, त्याचा बोलीभाषेवर परिणाम झाला. आताची बोलीभाषा हे सगळे नवीन शब्द स्वीकारून वाटचाल करत आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’