|| उमेश झिरपे
जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याचे गिर्यारोहकांचे स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते एव्हरेस्ट मोहिमेवर जातात. परंतु या चढाईसाठी आवश्यक प्रशिक्षण, अभ्यास, शारीरिक-मानसिक कणखरता, सराव ते करतात का? कारण यंदा आतापर्यंत एव्हरेस्ट चढाईत ११ गिर्यारोहक मृत्युमुखी पडले आहेत. एव्हरेस्ट शिखरावरही ‘ट्रॅफिक जॅम’ होत आहे. त्यामुळेही हे मृत्यू घडले आहेत.
दरवर्षी २० मे ते २७ मेदरम्यान ‘माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला!’ अशा प्रकारच्या बातम्या येणे हे आता नित्याचे झाले आहे. आम्हीदेखील अशा बातम्या ऐकण्यासाठी उत्सुक असतो. त्यातून गिर्यारोहण क्षेत्र विस्तारते आहे याची प्रचीती येते. या वर्षी मात्र या बातम्यांचा सूर काहीसा गंभीर होता. शिखर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांच्या बातम्यांसोबतच काही गिर्यारोहकांना अतिउंचीचा त्रास होत आहे, काहींना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर या प्रयत्नांत अपयश आल्याने काही जणांचा मृत्यू ओढवल्याच्या बातम्याही धडकू लागल्या आहेत. मी यादरम्यान नेपाळमधील काठमांडूतच असल्याने या घडामोडींकडे माझे विशेष लक्ष होते. या दुर्घटनांत मृत्युमुखी पडलेल्या गिर्यारोहकांमध्ये भारतीयांचे प्रमाण जास्त होते. त्यापैकी काही जण तर आपल्या महाराष्ट्रातले आहेत- ज्यांच्याशी माझा परिचय होता. हे मृत्यू का घडले, यामागे अनेक कारणे असली तरी एक अनुभवी गिर्यारोहक म्हणून सांगतो की, या सर्व मृत्यूंमागे मानवी चुका हेच प्रमुख कारण आहे.
दरवर्षी मे महिन्यातील १५ दिवस हे एव्हरेस्टवर चढाईसाठी तुलनेने अनुकूल असतात. यापैकी एक-दोन दिवस तर तिथले हवामान चढाईसाठी सर्वात जास्त अनुकू ल असते. त्या दिवशी सगळ्या गिर्यारोहकांना हे सर्वोच्च शिखर चढायची ओढ आणि घाई झालेली असते. या वर्षीचा प्रसंग तर अभूतपूर्वच होता. अगदी मुंग्यांची रांग लागावी तशी गिर्यारोहकांची लांबलचक रांग एव्हरेस्टच्या शिखरमाथ्यापाशी लागली होती. तब्बल २५० हून अधिक गिर्यारोहक एकाच दिवशी एकाच वेळेला शिखर चढाईसाठी रांग लावून उभे होते. जगातील सर्वोच्च ठिकाणी असे ‘ट्रॅफिक जॅम’ होण्याचा हा अभूतपूर्व, पण तेवढाच काळजी करायला लावणारा प्रसंग होता.
जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टची उंची तब्बल ८८५८ मीटर इतकी आहे. ८००० मीटरहून अधिक उंच ठिकाणांना ‘डेथ झोन’ म्हटले जाते. येथे हवेतील प्राणवायूचे प्रमाण अत्यंत विरळ असते. हवेचा वेग ताशी ४० कि.मी.हून अधिक असतो. हिमप्रपात, हिमवृष्टी अशा अनेक नैसर्गिक आव्हानांचा सामना येथे करावा लागतो. तापमानदेखील उणे चाळीस अंश इतके कमी असते. अशा वातावरणात चढाई करण्यासाठी कृत्रिम प्राणवायू सोबत बाळगावा लागतो. तसेच इथे दर पावलागणिक शरीरातील ऊर्जा प्रचंड प्रमाणावर खर्च होत असते. या साऱ्याचा विचार करता योग्य नियोजन करूनच एव्हरेस्टसारख्या अतिउंच शिखरांवर चढाई करणे क्रमप्राप्त असते. मात्र, या सर्व गोष्टी दृष्टीआड करून अगदी एखाद्या पर्यटनस्थळाप्रमाणे लोक एव्हरेस्ट चढाईसाठी येऊ लागले आहेत आणि त्यातूनच मानवनिर्मित संकटांची वाढ होते आहे.
एव्हरेस्ट म्हणजे सर्वोच्च ठिकाण, एव्हरेस्ट म्हणजे वलय, एव्हरेस्ट म्हणजे प्रसिद्धी असे चित्र जगभरात रूढ झाल्याने अनेक लोक एव्हरेस्टच्या वेडय़ा ध्यासापायी नेपाळमध्ये धडकू लागले आहेत. ही सर्व मंडळी गिर्यारोहक नाहीत असे माझे ठाम मत आहे. गिर्यारोहकाला शिखर चढाईचे जसे ध्येय असते, तसेच सुरक्षित उतराई करणे हेही तितकेच आवश्यक असते याचीही जाणीव असते. शिखर चढाईचा अट्टहास कधीही कोणत्याही सच्च्या गिर्यारोहकाला नसतो. आणि त्याच्याकरता एव्हरेस्ट म्हणजेच गिर्यारोहण असे समीकरण तर कधीच नसते. परंतु वलय आणि प्रसिद्धीच्या मागे धावणारी मंडळी मात्र याच्या अगदी विपरीत वर्तन करतात. त्यांना हवी असते ती एव्हरेस्ट चढाईतून मिळणारी वारेमाप प्रसिद्धी. गंमत पहा- हिमालयात अतिउंचीवरील म्हणता येतील अशी तब्बल ९० शिखरे आहेत. मात्र, एव्हरेस्ट सोडून इतर शिखरांवर जगभरातील फार कमी मंडळी चढाईसाठी जातात. सगळ्यांना खुणावत असते ते फक्त एव्हरेस्ट शिखर!
या सगळ्यात नेपाळ सरकारही आपली पोळी भाजून घेते. एव्हरेस्ट चढाई करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रत्येक परवान्यामागे नेपाळ सरकारला तब्बल ११ हजार अमेरिकी डॉलर्स- म्हणजेच तब्बल सात लाख रुपये मिळतात. यातून होणारी नेपाळ सरकारची कमाई मोठी असल्याने तेदेखील एव्हरेस्ट सर करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची काहीही शहानिशा न करता येईल त्यास परवाने देत सुटतात. या परवानावाटपास गुणात्मक आणि संख्यात्मक असे कसलेच बंधन नाही. आणि जी काही थोडी बंधने आहेत ती तोकडी आहेत. या धोरणात बदल घडवू असे नेपाळ सरकार दरवर्षी फक्त म्हणत राहते. मात्र, कोणत्याही प्रकारची हालचाल त्या दिशेने होताना दिसत नाही.
या वर्षी एव्हरेस्टवर जे घडले ते अत्यंत हृदयद्रावक आणि विचार करायला लावणारे आहे. जी माहिती हाती येते आहे त्यानुसार, ज्या गिर्यारोहकांचे आतापर्यंत मृत्यू झाले आहेत, त्यांची एव्हरेस्टची तयारी अत्यंत कमकुवत होती. याआधीचा ६००० मीटर, ७००० मीटरची शिखरे चढण्याचा त्यांचा अनुभव तोकडा होता. आपली क्षमता ओळखण्यात ते सपशेल चुकले. त्यात आणखी एव्हरेस्टवरील गर्दीची भर पडली. शिखरमाथ्याजवळ ही अशी गर्दी करणे म्हणजे ‘मृत्यूचा भाग’ असे संबोधल्या जाणाऱ्या आठ हजार मीटरहून अधिक उंचीवर जास्त काळ अडकून पडणे. यंदा बहुतेक गिर्यारोहकांचा अधिक वेळ या ‘डेथ झोन’वर खर्ची पडला. परिणामत: शरीरातील ऊर्जादेखील तेवढीच खर्ची पडली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम प्राणवायू पुरवणाऱ्या सिलिंडर्सचे गणितदेखील बिघडले. तसेच अनेकांना आपण थकलो आहोत, हे जाणवत असतानादेखील त्यांनी शिखर चढाईच्या वेडय़ा हट्टापायी चढाई चालूच ठेवली. त्यामुळे अनेकांची शिखर चढाई तर यशस्वी झाली, पण उतरताना मात्र त्यांच्यात ताकद उरली नव्हती. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. तर काहींना अतिउंचीवरील विविध आजार झाले. अनेक जण जायबंदी झाले. त्यांना शेर्पाकरवी किंवा हेलिकॉप्टरच्या साहाय्याने ‘रेस्क्यू’ करावे लागले. सर्वात वाईट गोष्ट ही की, यातून काहींना मृत्यू आला तरी फक्त शिखर चढाई केली म्हणून त्यांना हिरो ठरवण्यात आले. हे कळल्यानंतर माझ्या मनात कींव आणि राग अशा दोन्ही भावना दाटून आल्या. कुठल्याही शिखर चढाईपेक्षा गिर्यारोहकाच्या सुरक्षिततेलाच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. जीव टांगणीला लावून किंवा तो धोक्यात घालून अशी चढाई-उतराई चालू ठेवणे दु:खद आहे.
गिर्यारोहणात शिखर चढाई म्हणजेच अंतिम यश असे कधीही नसते. महत्त्व असते ते शिखर चढाई करून तेवढय़ाच सुखरूपपणे उतराई करत पायथ्याला येणे. पायथा ते शिखरमाथा आणि पुन्हा शिखरमाथा ते पायथा असा प्रवास सुरक्षितपणे पूर्ण झाला तरच ती मोहीम यशस्वी झाली असे म्हटले जाते. मात्र, या विचारापासून सध्याचे गिर्यारोहक आणि त्यांचे संचालन करणाऱ्या संस्था खूप दूर आहेत.
या वर्षीचा हा सर्व घटनाक्रम पाहिल्यावर एव्हरेस्टचा आशय लोकांसाठी बदलैला आहे का, असे वाटू लागते. पैसे ओतले आणि सहा-आठ शेर्पाना साथीला घेतले की वैष्णोदेवीला जसे भक्तांना डोलीमध्ये बसवून वर घेऊ न जातात, तसे शेर्पा त्या व्यक्तीला एव्हरेस्टच्या दर्शनाला शिखरावर घेऊ न जातील, अशी भावना काही प्रमाणात रुजल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. लोक हे लक्षातच घेत नाहीत, की शेर्पा हे चढाईतील साथीदार आहेत; सारथी नव्हे! पैसे ओतून सुविधा उपलब्ध करता येतात; कौशल्ये नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, गिर्यारोहणाचा ध्यास असावा लागतो. हे सर्व पाहिल्यानंतर मला हे आवर्जून सांगायचे आहे, की एव्हरेस्ट हा आहे तिथेच आहे. या शिखरावर चढाई करण्याची आव्हानेही तेवढीच कठीण आहेत. पैशांनी किंवा अधिक लोक चढाईला येत आहेत, यामुळे शिखर चढाईतील आव्हाने कधीच कमी होत नाहीत. गिर्यारोहणासाठीची कौशल्ये आत्मसात केली नसतील तर दुर्घटना ही होणारच; मग तुम्ही कोणीही असा. बहुतांश लोक हे विसरत चालले आहेत याची खंत वाटते.
भारतीयांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आपल्याकडे ‘एव्हरेस्ट चढाई’चे फॅड आले आहे. एक प्रकारे पेवच फुटले आहे. २०१२ साली जेव्हा ‘गिरीप्रेमी’ संस्थेने एव्हरेस्टवरील भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम यशस्वी केली, तेव्हा देशभरातील गिर्यारोहकांच्या एव्हरेस्टविषयीच्या आशा पल्लवित झाल्या. आपणही शिखर चढाई करू शकतो असा आशावाद निर्माण झाला. आमच्यासाठी हा सुखद धक्का होता. मात्र, या आशावादाचे रूपांतर जीवघेण्या स्पर्धेत होईल असे आम्हाला कधी वाटले नव्हते. या वर्षी एव्हरेस्ट शिखर चढाईचे जे परवाने नेपाळ सरकारने दिले त्यात सर्वाधिक- म्हणजे ७७ परवाने हे भारतीयांचे होते. एकाच देशातून एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गिर्यारोहक एव्हरेस्ट चढाईला येण्याची ही पहिलीच वेळ होती. यातून दुर्दैवाची गोष्ट अशी घडली, की एव्हरेस्टवर मृत्युमुखी पडलेल्या गिर्यारोहकांमध्ये भारतीय लोक अधिक आहेत. फक्त एव्हरेस्टच नव्हे, तर माऊंट मकालू, माऊंट कांचनजुंगा व इतर शिखरांवरील मोहिमांत तब्बल आठ भारतीय गिर्यारोहक मृत्युमुखी पडले आहेत. यातील एक-दोन अपवाद वगळता इतर सर्व मृत्यू हे शत-प्रतिशत मानवी चुकांतून झाले आहेत. ते टाळता येणे शक्य होते. या घटनांमुळे संपूर्ण गिर्यारोहण क्षेत्रावर आज अनाठायी व हकनाक टीका होते आहे. आमच्यासारखे गिर्यारोहक आणि गिरीप्रेमीसारख्या संस्था- ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गिर्यारोहणासाठी वेचले, त्यांना याचे अतीव दु:ख होते आहे. सुरक्षित मोहीम हेच आमच्यासारख्या सच्च्या गिर्यारोहकांचे ध्येय असते. एक वेळ शिखर चढाई नाही झाली तरी चालेल, मात्र सहभागी प्रत्येक गिर्यारोहक हा सुखरूपपणे त्याच्या घरी परतलाच पाहिजे, यावर खऱ्या गिर्यारोहक संस्था व आयोजकांचा भर असतो. आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे.. जगातील सर्व पर्वतशिखरे आहे तिथेच आहेत, असणार आहेत. ती सर करण्याचा ध्यास जरूर बाळगा; पण हे करताना तुमचा जीव गेला तर तो परत येणार नाही. म्हणूनच गिर्यारोहण टिकवायचे असेल तर ते का करायचे याचा योग्य ध्यास असणे खूप महत्त्वाचे आहे.
(ज्येष्ठ गिर्यारोहक, गिरीप्रेमी संस्था)
umzirpe@gmail.com