मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज अनेकांना हे माहिती नसेल की कारकीर्दीच्या एका टप्प्यावर मुहम्मद अली जिनांना भारतातल्या मुसलमान समाजाचे गोखले व्हायचं होतं. गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून आपल्याला परिचित आहेत आणि त्यांची तत्त्वप्रणाली काय होती, हेही आपल्याला माहिती आहे. या सगळ्याकडे मागे वळून बघताना जिनांची ती महत्त्वाकांक्षा जास्तच विसंगत आणि बरीचशी हास्यास्पद वाटते. आणि म्हणून वरील प्रश्नाचं उत्तर मी आज तरी ठामपणे नकारार्थी देऊ शकतो. ‘पाकिस्तानचे निर्माते जिना हे उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि मोठे राष्ट्रवादी होते’ या मिथकाला सीमेच्या दोन्ही भागांतील त्यांचे दिशाभूल झालेले समर्थक आणि चाहते यांनी पद्धतशीरपणे खतपाणी घातलं आहे. हे मिथक आपण एकदाच पूर्णपणे गाडून टाकलं पाहिजे असं मला जे वाटतं, त्याची मुख्य कारणं पुढीलप्रमाणे आहेत..

‘कायदे-ए-आझम’ (हे काहीतरी भव्य आहे असं वाटेल, पण याचा अर्थ ‘महान नेता’ इतकाच आहे.) जिनांचा अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीतील स्टुडंट्स युनियनच्या हॉलमधला फोटो अचानक गायब झाला, त्यावरून एक व्यर्थ वाद साधारण २०१८ च्या मेमध्ये सुरू झाला. त्यामुळे भारतातील त्यांच्या कैवाऱ्यांना या मुस्लीम नेत्याची प्रतिमा धुऊन- पुसून, गौरवांकित करून पुनस्र्थापित करण्यासाठी आयतंच एक कोलीत हाती मिळालं. जिनांचा फोटो अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी किंवा इतर कुठे लावावा, ही एक निर्थक बाब आहे असं वैयक्तिकरीत्या मला वाटतं. पण अनेक तथाकथित उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि भारतीय राष्ट्रवाद्यांच्या दृष्टीने मात्र ती तशी नाहीये असं वाटतं.

मुहम्मद अली जिना यांच्या संदर्भात दोन आणखी मिथकं आजही अस्तित्वात आहेत असं मला वाटतं. ती म्हणजे- (१) सर्वसामान्यपणे हिंदूंच्या- आणि विशेषकरून गांधीजी आणि नेहरूंच्या हेकेखोर वर्तणुकीमुळे जिनांना वेगळ्या पाकिस्तानची मागणी करावी लागली. आणि (२) जिनांपेक्षासुद्धा काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि  ग्रेट ब्रिटन हेच १९४७ सालच्या भारताच्या फाळणीला कारणीभूत होते. अर्थात हे दोन्ही मुद्दे या लेखाच्या मर्यादेबाहेरचे आहेत.

ते जे काय असेल ते असो; पण साधारण १९३० च्या सुमारास त्यांनी जेव्हा इंडियन मुस्लीम लीग या पक्षावर ताबा मिळवायचे प्रयत्न सुरू केले तेव्हाच त्यांचा बेगडीपणा उघडकीस आला. आणि यामुळेच एम. सी. छागला यांच्यासारखे महत्त्वाचे राष्ट्रवादी मुसलमान नेते- जे आधी त्यांना खूप मानत होते, त्यांनीही जिनांशी आपले संबंध तोडायला सुरुवात केली होती. त्यांचा हा धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा म्हणजे ‘नौसो चूहे खाकर बिल्ली चली हज को’ या म्हणीतल्या मांजरीसारखा होता.

जिनांनी या म्हणीचा अर्थच पूर्ण बदलून टाकला. या म्हणीतील मांजरीने तिचा शब्दक्रमच बदलून टाकला. प्रथम त्यांनी आपला ‘राजकीय हज’ केला आणि नंतर अखंड भारताचे सर्वोच्च नेते बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या आड येणाऱ्या प्रत्येक उंदरास मारावयास सुरुवात केली.

त्यांच्या पहिल्या राजकीय हजयात्रेबद्दल..

प्रथम जिनांनी लोकमान्य टिळकांचा कायदेशीर बचाव केला. आणि हे जिनांनी दोनदा केलं. पहिल्यांदा १९०८ साली आणि दुसऱ्यांदा १९१६ साली. टिळकांनी आपल्या बचावाची दिशा स्वत:च लिहून काढली होती आणि ती तशीच वापरावी, या त्यांच्या आग्रहातून पहिली योजना फारशी यशस्वी झाली नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, की त्यावेळी जिना हे केवळ ३२ वर्षांचे, फारसा अनुभव नसलेले वकील होते. आणि टिळकांसारख्या उत्तुंग राष्ट्रीय वकिलाची केस लढल्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळणार होती. पण १९१६ साली मात्र देशद्रोहाच्या आरोपाच्या खटल्यात टिळकांचा त्यांनी यशस्वीपणे बचाव केला होता, हे सत्य आहे. आणि याचा परिणाम म्हणजे सरोजिनी नायडूंनी त्यांचा ‘The best ambassador of Hindu- Muslim Unity’ या शब्दांत गौरव केला होता. याशिवाय १९२९ साली त्यांनी शहीद भगतसिंग यांना राजकीय (कायदेशीर नाही!) पाठिंबा दिला होता. अशा तऱ्हेच्या राष्ट्रवादाच्या दृष्टीने उदात्त ठरणाऱ्या काही कृती त्यांनी केल्या होत्या. पण यानंतर मात्र देशभक्त भारतीयांना त्यांच्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाली. या धूर्त राजकारण्याने मुस्लीम लीग या पक्षाला भारतीय मुसलमानांसाठी वेगळ्या राष्ट्राची मागणी करण्यापर्यंत आणून ठेवलं होतं.

पाकिस्तानच्या कॉन्स्टिटय़ुअंट असेम्ब्लीला उद्देशून जिना यांनी ‘Making of Pakistan’ या ऑगस्ट १९४७ मध्ये केलेल्या भाषणाचा उगाचच फार गवगवा केला गेला आहे. ते या भाषणात म्हणाले होते, ‘‘You may belong to any religion or caste or creed- that has nothing to do with business of state.’’ (‘तुमचा धर्म, जात, पंथ कुठलाही असू दे, त्याचा देशाच्या राज्यकारभाराशी काहीही संबंध नाही.’) भारतातील त्यांचे प्रशंसक बऱ्याच वेळा हे भाषण आणि पंडित नेहरूंनी याच सुमारास केलेलं त्यांचं संस्मरणीय भाषण.. ‘Long years ago, we made a tryst with destiny’ (‘अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी केलेला भेटीचा करार’) बाजूबाजूला ठेवून त्यांची तुलना करतात. मला तरी हा एक भलताच विनोदी प्रकार आहे असं वाटतं. जिनांच्या या भाषणाकडे त्यांचे चाहते त्यांच्या हीरोच्या उदारमतवादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरावा म्हणून बघतात. भारतीय उपखंडाच्या इतिहासातील चार ऐतिहासिक तथ्यं बघितली तर त्यांचे उद्गार बरेचसे ‘The devil quoting the scriptures’ अशा प्रकारचे वाटतात. (मी हे लाक्षणिक अर्थाने म्हणतो आहे.) ती चार तथ्यं पुढीलप्रमाणे : १) Direct Action Day पाळण्यासाठी १९४६ साली कलकत्त्यात त्यांनी केलेल्या  आवाहनामुळे भारतीय उपखंडातील सर्वात भयंकर रक्तरंजित दंगल उसळली होती. (२) भारताच्या फाळणीसंदर्भात त्यांनी बजावलेल्या खलनायकी भूमिकेमुळे सुमारे दीड कोटी लोकांना स्थलांतर करावं लागलं आणि सुमारे पंधरा लाख लोकांनी आपले प्राण गमावले. (३)  पाकिस्तानचे सर्वोच्च नेते झाल्यानंतर त्यांच्या तेरा महिन्यांच्या कारकीर्दीत त्यांनी भारतविरोधी जहरी निर्णय घेतले. आणि (४) त्याच काळात त्यांनी पूर्व पाकिस्तानात भाषिक राष्ट्रवादाची आग भडकवून बंगाली भाषेला उर्दूप्रमाणे अधिकृत दर्जा देण्याचं नाकारलं.

लंडनमधील ‘ओल्ड विक’ थिएटरमध्ये जिना रोमिओच्या भूमिकेत..? काहीतरीच काय सांगताय, राव?

वाचकहो, मी अजिबात अतिशयोक्ती करीत नाहीये. लंडनमध्ये असताना शेक्सपिअरन् नट बनावं असं खरंच त्यांना वाटत होतं. आणि तिथल्या ऐतिहासिक ‘ओल्ड विक’ थिएट’रमध्ये ‘रोमिओ ज्युलिएट’ या नाटकात रोमिओची भूमिका करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. शेक्सपिअरन् नट न होता ते लिंकन इन्मधून बॅरिस्टर झाले. आणि भारताचं दुर्दैव म्हणजे त्यांनी ग्रेट ब्रिटनमध्ये स्थायिक न होण्याचा निर्णय घेतला.

‘The birth of an Islamic Nation’ हे जिनांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस लिहिलेलं पहिलं आणि शेवटचं नाटक! ही एक अजस्र प्रमाणावर लिहिलेली कलाकृती जितकी कोलाहलपूर्ण, तितकीच मनोरंजकही ठरली. स्वत: जिना हे या नाटकाचे सुरुवातीचे निर्माते, दिग्दर्शक आणि हीरोही! जगाला संभ्रमित करेल अशी या नाटकाची कथा होती. ती प्रामुख्याने शोकांतिका असली तरी ती थोडीशी सुखांतिका आणि बरीचशी हास्यकथा पण होती. तिच्या फक्त विनोदी भागाबद्दल बोलायचं झालं तर- ‘पाकिस्तान या एका इस्लामिक राष्ट्राची संकल्पना करणं, त्याची स्थापना करणं आणि उंची स्कॉच व्हिस्की पिणाऱ्या, पोर्क (डुकराचे मांस) खाणाऱ्या, रोज तुळतुळीत दाढी करणाऱ्या आणि फक्त ब्रिटनमधील सुप्रसिद्ध ‘सेव्हिल रो’चे सूट वापरणाऱ्या माणसानं त्यावर राज्य करावं, यापेक्षा उपरोधिक आणि विनोदी काय असू शकतं? (अर्थात नंतर त्यांना आपला पेहराव बदलावा लागला. ते सलवार, शेरवानी आणि फर कराफूल घालू लागले.) यात तुम्हाला कमी विरोधाभास वाटतोय? मग पुढे वाचा.. त्यांना त्यांच्या देशाची अधिकृत भाषा उर्दू बोलता येत नसे. त्यांनी क्वचितच नमाज पढला असेल. (मला दाट संशय आहे की ते जर कधी मशिदीत गेले असतील तर ते पावसापासून बचाव करण्यासाठीच!) आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्यांनी जो विवाह केला तोसुद्धा मुस्लीम नसलेल्या स्त्रीशी. तिचं नाव : रत्तनबाई ऊर्फ रुट्टी असं होतं. आणि ती मुंबईतील अत्यंत श्रीमंत पारसी बॅरोनेट सर दिनशॉ पेटिट यांची एकुलती एक कन्या होती. (प्रख्यात मुंबईकर आणि बॉम्बे डाइंग समूहाचे मालक नस्ली वाडिया हे त्यांचे नातू आहेत.) जिनांची कारकीर्द जर एका वाक्यात सांगायची झाली तर मी असं म्हणेन की, ‘ज्या माणसाची ‘भारतीय मुस्लिमांचे गोखले’ म्हणून ओळखलं जावं अशी आकांक्षा होती, त्या माणसाची इतिहासातील नोंद मात्र पुढे ‘भारतीय मुसलमानांचे एक नेते आणि एका नवीन इस्लामिक राष्ट्राचा निर्माते’ अशी झाली.

जाता जाता दोन विचार.. एक म्हणजे- जर जिना यांनी ब्रिटिश नागरिक व्हायचं ठरवलं असतं आणि ते भारतात कधीच परत आले नसते तर त्यांनी नकळत अखंड भारताची आकांक्षा बाळगणाऱ्या कोटय़वधी हिंदूंना किती आनंदी केलं असतं!

आणि दुसरा विचार म्हणजे- लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंग यांनी, ‘जिना हे एकेकाळचे महान भारतीय धर्मनिरपेक्ष नेते होते,’ अशी स्तुतिसुमनं उधळल्याचं आपल्याला माहीत असेलच. २००५ साली अडवाणी यांनी त्यांच्या कराची भेटीत खूपच भावूक होऊन अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. तर जसवंत सिंग यांनी ‘Jinnah : India,  Partition, Independence’ या त्यांच्या पुस्तकात जिनांची अशाच प्रकारची स्तुती केली आहे. त्यावेळी अडवाणी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या तोडीचे उत्तुंग नेते समजले जात होते. आणि जसवंत सिंग यांनी एनडीए सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री ही पदं भूषवली होती. त्यांच्या या पाखंडी मतप्रदर्शनाबद्दल दोघांनाही जबरदस्त शिक्षा भोगावी लागली. अडवाणींना पक्षनेत्यांनी जाहीरपणे अपमानित केलं, महत्त्वाच्या पदावरून हटवलं आणि शेवटी ‘मार्गदर्शक’ या भाकड पदावर त्यांची रवानगी केली. जसवंत सिंगांची तर पक्षातूनच हकालपट्टी केली गेली. या घटनांबद्दल माझा मित्र सोपान याला माझी प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. मी जी प्रतिक्रिया दिली, ती अशी : ‘आपल्याला अडवाणी आणि जसवंत सिंग यांचे विचार जरी पटले नाहीत तरी त्यांनी दाखवलेला स्पष्टवक्तेपणा आणि धैर्याचं आपण कौतुकच केलं पाहिजे. त्याचबरोबर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या हटवादीपणाचा आणि असहिष्णुतेचाही आपण निषेध केला पाहिजे.’ सोपानला माझं म्हणणं पटलं आणि तसं तो म्हणालादेखील.

शब्दांकन : आनंद थत्ते

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muhammad ali jinnah sangto aika dd70
First published on: 02-08-2020 at 01:24 IST