सातारच्या प्रासादातील शयनकक्षात विश्रांती घेत असलेल्या राजांच्या दारावर प्रधानाने टकटक केली तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. त्यांनी दरवाजा उघडताच प्रधान हर्षोल्हासित होत म्हणाले ‘झाली एकदाची यादी जाहीर, तीही कमळवाल्यांकडून’ ऐकताच राजे हसले. ‘किती वाजता’ असा प्रश्न त्यांनी विचारताच प्रधान चाचरतच म्हणाले ‘दहा वाजून दहा मिनिटांनी’ हे ऐकून त्यांचा चेहरा त्रासिक झाला. हे घडय़ाळ पिच्छाच सोडायला तयार नाही असे पुटपुटत त्यांनी धाडकन दार लावले.
दुसऱ्या दिवशी १२च्या सुमारास त्यांना जाग आली तीच सनई-चौघडय़ांच्या आवाजांनी. प्रासादाबाहेर गर्दी उसळलेली. ‘आता लग्न धूमधडाक्यात’ अशा घोषणाही त्यातले काही देत होते. त्या ऐकून राजे मंद हसले. अष्टप्रधान मंडळातले सहकारी जवळ येताच ते उत्साहाने बोलू लागले. ‘मतदारसंघातले सारे मतदार आजपासून आपले वऱ्हाडी. त्यांना प्रचाराच्या काळात ज्या चिठ्ठय़ा द्याल त्यांचा आकार लग्नपत्रिकेसारखाच असायला हवा. त्यावर माझे व कमळाबाईचे छायाचित्र मोठे हवे. वरवधूचे असते तसे. होऊ द्या खर्च. निमंत्रकांमध्ये महायुती असा शब्द अजिबात नको. फक्त युती टाकायचे. आपली व शिवसेनेची युती. त्या तिसऱ्या घटकपक्षाचे नाव टाकायची गरज नाही. माझा नेता व्हायला निघाला होता. शेवटी दिलीच ना धोबीपछाड. फार काळापूर्वी जिव्हारी लागलेला अपमान मी विसरलेलो नाही. धनुष्यबाण पत्रिकेवर चालेल. घडय़ाळाचे लाड बंद! चिठ्ठीवाटप असो वा प्रचार. सुरुवात दहा दहाला झालेली मी खपवून घेणार नाही. रात्री सभा थोडी जास्त काळ चालली तरी या वेळेवर संपवायची नाही म्हणजे नाही. होऊ द्या दाखल गुन्हे. बघून घेईन मी.
माझ्यासाठी चांगले शर्ट शिवून आणा. मोठी कॉलर असलेले. या सोहळय़ात कुणीही कॉलरचा शर्ट घालायचा नाही. ‘अहेरा’साठी प्लास्टिकचे कमळ तयार करून त्यात अक्षता घाला. वाडय़ावरून आलेल्या अक्षता असेच सर्वाना सांगा. प्रचारात तुतारी वाजवायची नाही. तुताऱ्यासुद्धा माजघरात टाकून द्या. त्या मोठय़ा साहेबाला दाखवूनच द्यायचे आहे राजा काय असतो ते. १९च्या पराभवाचा हिशेब चुकता करायचा आहेच. ती बारामतीची धाकटी पाती प्रचारासाठी इकडे फिरायला नकोत. संस्थानाची प्रतिष्ठा दाखवूनच द्यायची आहे त्याला.
हे बघा मीपण हातातले घडय़ाळ काढून टाकले. तुम्हीही काढा. आता मतदानापर्यंत ही ब्याद नकोच. कुणी विचारलेच तर सांगा, आम्ही तेराव्या वंशजाचे सोबती. वेळ ठाऊकच असते आम्हाला अशी उत्तरे दिली तरी हरकत नाही. प्रचारासाठी बाहेरून फक्त विश्वगुरू आलेले चालतील. शेवटी तेही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजेच. माझ्यासारखे (स्वत:च गडगडाटी हसतात). अष्टप्रधानातले कुणी नको. मला दिल्लीत तीन दिवस तंगवणारे तर नकोच. रयतेचा राजा काय चीज असतो ते दाखवूनच द्यायचे आता एकेकाला. काहीही करून सत्ता हवीच, तेव्हा उडवून द्या लोकशाहीतल्या या शाही लग्नाचा बार!’