शलाका देशमुख

आजकाल ‘मुलं वाचत नाहीत.’ अशी ओरड पालक, शिक्षक सर्वच करताना दिसतात. कॉम्प्युटर, मोबाइल, टीव्ही याला दोष देऊन मोकळेही होतात. मात्र, यावर कोणती उपाययोजना करता येईल याची माहिती नेमकेपणाने कुणालाच नसते. ‘मुलांचे ग्रंथालय’ या पुस्तकाच्या रूपाने ज्योत्स्ना प्रकाशनाने याचं तपशीलवार मार्गदर्शनच केलं आहे. मंजिरी निंबकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!

शाळेतलं ग्रंथालय कसं चालवावं याबद्दल नीट माहिती देणाऱ्या पुस्तकाची मराठीत वानवा होती, ती या पुस्तकानं भरून निघाली. ग्रंथपालांना आणि शिक्षकांनाही मुलांनी वाचतं व्हावं म्हणून अनेक उपक्रमांची मोठीच मदत या पुस्तकामुळे हाताशी आली. अनेक वर्षांच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव ही पुस्तकाची ताकद सर्वच लेखकांच्या लिखाणातून जाणवते. पहिल्याच प्रकरणाची सुरुवात मंजिरी निंबकर ‘ग्रंथालय कसं दिसावं’ या लेखाने करतात. ग्रंथालयात मुलांनी जावं असं वाटत असेल, तर तिथे त्यांना जावंसं वाटावं यासाठी ग्रंथालयाची जागा कशी असावी हे सांगताना त्यांनी भिंतींना रंग कसा असावा इथपासून तपशील दिले आहेत. तिथल्या भिंती, तिथली मांडणी याचे अगदी छोटेछोटे तपशीलही त्यांनी दिले आहेत. ग्रंथालयाच्या कोपऱ्यात पुस्तकांचा दवाखाना मांडावा, असं सांगत मुलांनीच फाटलेल्या पुस्तकाची दुरुस्ती करून जबाबदारी उचलण्याचे भान त्यांनी अधोरेखित केले आहे. मंजिरीताईंचे एकूण चार लेख पुस्तकात आहेत. त्यातला ‘पुस्तकांनी विस्तारले शिक्षण’ हा पूरक वाचनाचे महत्त्व विशद करणारा लेख आहे.  हा एक लेख वाचला तरी साहित्याचं शिक्षणातलं स्थान शिक्षकांना कळू शकेल. त्याचबरोबर अवांतर वाचन- फार तर भाषांच्या तासाला- हे गृहीतकही मोडीत निघेल. याच लेखात मुलं एखाद्या पुस्तकाकडे कसं बघतात, त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो याचं उदाहरणही फार बोलकं आहे. ‘स्वयंवाचन’ या लेखात मुलांनी वाचायला हवं असेल तर लहानपणापासून त्यांनी घरात, शाळेत मोठय़ा माणसांना वाचताना बघितलं पाहिजे, याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्याचबरोबर मुलांना वाचून दाखवलं तर पुढे जाऊन ती वाचती होण्याच्या शक्यता वाढतात. त्यांना भाषेचं व्याकरण समजायलाही त्याची मदत होते. वाचून दाखवण्याचे महत्त्व या लेखात सांगितलं आहे. आताच्या काळात हळूहळू रुजत चाललेल्या ई-बुक्स या माध्यमाची ताकद त्या सांगतात. त्याचवेळी छापील पुस्तक अधिक परिणामकारक का आहे, हेही स्पष्ट करतात.

या पुस्तकातल्या इतर लेखकांमध्ये मुख्यत: वेगवेगळ्या ठिकाणी ग्रंथपाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या लिखाणाला स्वानुभवाची जोड आहे. विद्यादेवी काकडे या फलटणच्या कमला निंबकर बालभवन शाळेच्या ग्रंथपाल. ‘ग्रंथपालाची भूमिका’ आणि ‘पुस्तकांची व संसाधनांची निवड’ असे दोन लेख या पुस्तकात आहेत. आपली भूमिका मांडताना त्या म्हणतात, ‘‘मुलांच्या मनातील पुस्तके व ग्रंथालय याविषयीची भीती काढून टाकणे, हे ग्रंथपालाचं पहिलं काम आहे. ही व्यक्ती स्वागतोत्सुक असली पाहिजे.’’  ग्रंथपालाने ग्रंथालयातली शक्यतो सर्व पुस्तके वाचलेली, निदान हाताळलेली तरी असावीत याचं कारणही त्यांनी आपल्या लेखात नमूद केलं आहे. मुलांसाठी पुस्तकं निवडताना बऱ्याचदा आदर्श वाटतील अशी बोध असणारी किंवा माहितीपर पुस्तकेच मोठय़ा माणसांच्या मनात असतात. पण मुलांना मौज वाटेल, खुदुखुदु हसू येईल अशी पुस्तके ग्रंथालयात हवीच. कल्पनेच्या भराऱ्या मारायला लावणारी, त्यांचे अनुभवविश्व विस्तारणारी पुस्तकं का हवीत याचं महत्त्वही त्यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या वयाच्या मुलांसाठी कोणती पुस्तकं असावीत याची उदाहरणं देतानाच कोणत्या प्रकारची पुस्तकं नसावीत, हेही त्या अगदी ठामपणे सांगतात.

अमृता धडाम्बे या ग्रामीण भागात ग्रंथपालाचं काम करतात. अतिदुर्गम भागातल्या, ज्यांच्या घरात पुस्तकंच काय, पण वाचणारंही कुणी नसण्याचीच शक्यता अधिक अशा मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी केलेल्या उपक्रमांची आणि त्यातून आलेल्या अनुभवांची मांडणी त्यांनी त्यांच्या लेखात केली आहे. वाचनामुळे मुलांमध्ये झालेले बदलही त्यांनी छान टिपले आहेत.

निवासी शाळेत मुलांकडे भरपूर वेळ असतो. याचा फायदा घेऊन मुलांबरोबर केलेल्या पुस्तक प्रदर्शन उपक्रमाबद्दल सुप्रिया महामुनी यांनी आपल्या ‘जिवाभावाचे सोबती’ या लेखात लिहिले आहे. या मजकुराला छायाचित्रांची जोड असल्यामुळे उपक्रम नेमकेपणाने कळायला मदत होते.

मधुरा राजवंशी यांच्या लेखात त्यांनी मुलांना गोष्टी लिहायला कशा सांगितल्या आणि मग त्याची पुस्तकंही केली.. या संपूर्ण प्रक्रियेबद्दल लिहिलं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ वाटण्याच्या शक्यतेचाही त्यांनी उल्लेख केला आहे. तरीही एकूण वाचनाच्या संदर्भातला मुलांनी ‘लिहितं होणं’ हा महत्त्वाचा टप्पा आहे म्हणूनच पुस्तकात या लेखाचा आवर्जून समावेश केलेला आहे. गोष्टी ऐकल्यामुळे ऐकण्याचं, अंदाज बांधण्याचं कौशल्य प्राप्त होतंच, पण त्यांचं जग विस्तारतं, असं प्रा. कृष्णकुमार त्यांच्या ‘गोष्टी सांगण्याचे महत्त्व’ या लेखात सांगतात.

पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात वाचनाशी जोडलेले तीस वेगवेगळे उपक्रम दिले आहेत. त्यामुळे हे छोटेखानी, अतिशय सोपी मांडणी असलेलं असं पुस्तक अधिक परिपूर्ण झालं आहे. लेखांमधल्या जागा उलगडून दाखवणारी छायाचित्रं असलेलं हे पुस्तक प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात तर ते असावंच, पण शिक्षकांनी स्वत:साठी संदर्भ पुस्तक म्हणूनही वापरावं असं आहे.

मुलांचे ग्रंथालय- पुस्तकांशी नाते जोडताना..

संपादन- मंजिरी निंबकर

ज्योत्स्ना प्रकाशन,

पृष्ठे- ८६ रुपये, मूल्य- १००रुपये.

smg.deshmukhsy@gmail.com