गिर्यारोहण हा आबालवृद्धांचा आवडता विषय. लहान मुलं, युवावर्ग ते अगदी निवृत्त झालेली मंडळीही मोठय़ा उत्साहाने गिर्यारोहणाला- ट्रेकिंगला जाताना दिसतात. उंचच उंच कडे, मनाला प्रसन्न करणारी वृक्षराजी, ऐतिहासिक गडकिल्ले सगळ्यांनाच भुरळ घालतात. गिर्यारोहण मनाला अपार आनंद देणारे असले तरी त्यासाठी आरोग्यापासून प्रत्यक्ष गेलेल्या ठिकाणावरील सुरक्षिततेपर्यंत अनेक बाबींची काळजी घ्यावी लागते. गिर्यारोहण करण्यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यावी, पूर्वतयारी कशी करावी, त्यासाठी कोणती साधने आवश्यक असतात, प्रशिक्षणाची गरज असते का, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देणारं ‘मुलासांठी गिर्यारोहण’ हे उमेश झिरपेलिखित पुस्तक प्रकाशित झालं आहे. लेखक स्वत: अत्यंत अनुभवी गिर्यारोहक असल्याने त्यांच्या अनुभवांतून उतरलेलं हे पुस्तक गिर्यारोहणशास्त्र समजून घेण्यास मदत करते. गिर्यारोहण म्हणजे काय, ते कुठं करावं अशी तपशिलानं दिलेली माहिती, तसंच गिर्यारोहणाशी संबंधित संस्थांची यातील माहिती उपयुक्त आहे. लहान मुलांपासून हौशी व व्यावसायिक गिर्यारोहकांनांही यातील मूलभूत माहिती उपयुक्त ठरणारी आहे.

‘मुलांसाठी गिर्यारोहण – उमेश झिरपे’,

रोहन प्रकाशन

पृष्ठे -४४, किंमत- ७५ रुपये.