अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com
जर्मनीत दीर्घ मुक्कामाला गेलात की कुठलं ना कुठलं संग्रहालय किंवा राजवाडे पाहायला मिळतातच- शतकानुशतके उत्तम प्रकारे सांभाळून ठेवलेले! म्युनिक शहराचं सांस्कृतिक खातं हेही एक वर्षांनुवर्षे सरकारी कामाचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. परदेशातून येणाऱ्या संस्कृतीकर्मीना अनौपचारिकपणे भेटणारा, कामाची आस्थेने विचारपूस करणारा मेयरही विरळाच. कलेच्या वारशाचा अभिमान आहेच; पण तो शहरात येणाऱ्या परदेशी लेखक/ कलावंतांना आवर्जून पाहायला मिळावा यासाठी ते वेगवेगळ्या संस्थांना अशा भेटींच्या आयोजनासाठी मदत करतात. प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाला बऱ्यापैकी तिकीट असतं, ते माफ झालं आणि मार्गदर्शकही मिळाला की आणखी काय हवं? राजा लुडविगचे तीन राजवाडे न्यू श्वान्स्टाईन, लिंडरहॉफ आणि हेरेनकिम्सी आपसूकच आमच्या वाटय़ाला आले.
बवारियाचा संगीतप्रेमी राजा दुसरा लुडविग (१८४५-८६) कला आणि भव्यतेने झपाटलेला परीकथेतील राजा मानला जातो. सिंहासनाचा नवतरुण वारस असूनही जनसंपर्क त्याला नकोसा. त्याच्या १८६४ च्या दैनंदिनीत त्याने कागदभर मोठय़ा अक्षरात ‘किंग’असं लिहून ठेवलं होतं. एके ठिकाणी ‘हे जग आणि मी एकमेकांसाठी नाही आहोत’ असंही! उभ्या आयुष्यात जर्मनीचे पंतप्रधान ऑटो वान बिस्मार्कना तो फक्त एकदा भेटला हे सत्यही बोलकं. राजा कसा असावा याबद्दल स्वप्नाळू आदर्शवाद मनी बाळगून त्याने सूत्रं हातात घेतली. पण राज्य करण्याऐवजी कलात्मक राजवाडे बांधण्यात आणि संगीत नाटिका (ऑपेरा ) पाहण्या-बनवण्यातच जास्त रस. फ्रान्सचा राजा चौदावा लुई आणि भव्य सुंदर व्हर्साय राजवाडय़ाचं प्रचंड गारुड याच्या मनावर.. इतकं की, स्थापत्यकारांना मुद्दाम तिथे पाठवून काही शाबूत, तर काही भग्नावशेषांतूनही आराखडे बनवून घेतले. हेरेंनींसेलची मोनॅस्टरी ताब्यात घेऊन व्हर्सायच्या तोडीस तोड असा राजवाडा ‘हेरेनकिम्सी’ तळ्याकाठी उभारला.
इथे मूळच्या मोनॅस्टरीज् (मठ), बरोक शैलीतल्या भव्य चित्रांनी नटलेली चॅपल्स आणि तळमजल्याच्या १२ कक्षांत लुडविगचं संग्रहालय आहे. अगणित कलावस्तू, राजघराण्याची तैलचित्रं, भरजरी कपडे, पियानो वगैरे. राजाच्या निवासात त्याचं शयनगृह, त्याचा वॉल पेपर अजूनही तोच आहे म्हणतात. उंच, छपरी लाकडी पलंग, नाजूक पांढऱ्या फ्रेंच लेसच्या पडद्यांनी सजलेल्या खिडक्या, पुस्तकांची शेल्फ आणि लांब-रुंद टेबलाची गंभीर अभ्यासिका, निळा साधा सोफासेट. पलंगाशेजारचा बेडलॅम्प पाहून महाराज रात्री शय्येवर पहुडून वाचत असावेत का असा विचार मनात आलाच. राजघराण्याच्या संग्रहालयात कोरीव सिंहासन, सोनेरी फ्रेमच्या खुर्च्या, पायघोळ झगे- प्रसंगानुरूप रंगांचे, त्याची लाडकी चित्रं, त्याची छायाचित्रं आणि पुतळे, रेखाचित्रं.. इतकं की इथून निघताना आपल्याला लुडविगचा चेहरा पाठ होऊन जातो. इथे हेनरिक हरझोग, बेनो अॅडम, फ्रेडरिक केस्लर, सिमोन वार्नबर्गर वगैरे समकालीन चित्रकारांचंच एक संग्रहालय व्हावं इतकी चित्रं आहेत. यातले अनेक जण आम्हाला पहिल्यांदाच भेटणारे. वार्नबर्गर लक्षात राहिले सुंदर समुद्रचित्रांमुळे! रंगांचा बादशहा म्हणवणाऱ्या, इथल्या मातीतून घडलेल्या चित्र-शिल्पकार ज्युलिअस एक्स्टरचं तर एक गॅलरीवजा स्वतंत्र दालनच आहे. प्रसन्न रंगांत पुराण आणि लोककथांवर आधारित चित्रांत सिम्बॉलिक आणि इम्प्रेशनिस्ट शैलीचा मिलाफ घडवून आणणाऱ्या एक्स्टरच्या कौशल्याला पाहताच दाद जाते. त्याच्या विक्षिप्ततेच्या कहाण्याही भरपूर.
व्हर्सायसारखाच इथेही एक ऐनेमहाल आहे : त्याच्या एका बाजूला शौर्यगाथा सांगणारी ‘रूम ऑफ वॉर’ आणि दुसऱ्या बाजूला शांतीची महत्ता गाणारी ‘रूम ऑफ पीस’! संगमरवरी जिने आणि नक्षीदार खांब. एक मोठं घडय़ाळही आहे. त्यावर स्वत:ला ‘सन किंग’ म्हणवणाऱ्या चौदाव्या लुईची सुवर्णप्रतिमा- लुडविगचा आदर्श! व्हीनस ऑफ आर्लेस, अॅफ्रोडाइटसारख्या काही शिल्पांच्या प्रतिकृती, ब्रॉन्झची झुंबरं, वैभवशाली सोनेरी दरबार कक्ष. पोर्सेलीनचंच एक दालन आहे. यातलं झुंबरापासून टेबलापर्यंत सगळंच तलम काचेचं. माझ्यासारख्या वेंधळीने तिकडे न गेलेलंच बरं, असं मी दारातून डोकावूनच ठरवून टाकलं. टेपस्ट्रीमध्ये राजाच्या प्रिय- म्हणजे गहिऱ्या निळ्या रंगाचं अधिपत्य. ‘ब्लू सलों’मधून आरशांची अशी रचना की, पुढे असंख्य खोल्यांचा आभास निर्माण व्हावा. असाच एक ऐनेमहाल िलडरहॉफच्या राजवाडय़ातही. पण या प्रयत्नांत निसर्गाला कुठे धक्का लावू न देण्याचं संवेदनशील जर्मन शिस्तीचं कसब खरोखर वाखाणण्यासारखं. इथे लुडविग एकूण फक्त नऊ दिवस राहिला. बांधकाम पूर्ण होण्याआधीच स्तार्नबर्गर सरोवरात तो वयाच्या चाळिसाव्या वर्षी मृतावस्थेत सापडला. वर्तमानपत्रांनी सतत छापलेली बदनामी आणि जनमताचा विरोधात जाणारा कौल त्याला अस होत होता. त्याच्यावर मानसोपचार सुरू असल्यानं ही आत्महत्या की खून? मृत्यूचं कारण संदिग्धच राहिलं.
याआधी त्याने आणखी दोन सुबक, देखणे राजवाडे.. आल्प्ससी सरोवराकाठी बर्फाळ पर्वतराजीच्या पुढय़ात उभा न्यू श्वानस्टाईन आणि धबधब्यांच्या शेजारी शांतपणे बागेतली रंगीबेरंगी फुलं न्याहाळणारा दुमजली िलडरहॉफ- बवारियाच्या निसर्गसान्निध्यात बांधले. पण त्या नादात राज्याचा खजिना रिकामा केला. िलडरहॉफचा लुडविगने स्वत:च्या एकांतवासासाठी कायापालट करून घेतला होता. त्याच्या जवळ एक चॅपेल, समोर बागा. राजाच्या शयनकक्षाचा एक भाग अगदी जलप्रपाताच्या आमनेसामने. वाहत्या पाण्याचं संगीत ऐकता ऐकता झोपेच्या अधीन व्हावं आणि जाग यावी तीही त्याच जीवनदायी नादानं! राजनिवासासमोरच्या कारंज्यांपलीकडे बागेतल्या खडकाळ उंचवटय़ावर संगमरवरी छत्रीखाली पांढऱ्याशुभ्र प्रेमदेवतेचं- व्हीनसचं मंदिर. लुडविग वेडसर, अतिभावनाप्रधान, अव्यवहारी होता वगैरे खरं मानलं तरी त्याने बवारियाला अनेक देखणी सौंदर्यस्थळं बहाल केली हे काळाने दाखवून दिलं आहे. त्याच्या सौंदर्यदृष्टीला एक पौर्वात्य परिमाणही असावं. हेरेनकिम्सी आणि िलडरहॉफ या दोन्हीकडे मोर आवर्जून मांडलेले दिसतात. पर्शियन गालिचे आणि रेशमी कशिदाकारीचे झगे ही त्याचीच उदाहरणं.
नाटय़संगीतकार, लेखक रिचर्ड वॅग्नर आणि लुडविगच्या दोस्तीच्या किस्से-कहाण्यांनी भरलेली दास्तान आहे. ते दोघे भेटले तेव्हा वॅग्नरने लिहून संगीतबद्ध केलेल्या ‘लोहनग्रीन’ ऑपेरावर फिदा असलेला आणि नव्याने राजा झालेला लुडविग अवघ्या १९ वर्षांचा होता आणि वॅग्नर ५१ वर्षांचा. वॅग्नरच्या आत्मचरित्रातही त्या दोघांच्या प्रथमदर्शनी जन्मलेल्या मैत्रीची तारखेनिशी सविस्तर नोंद आहे. आयुष्यभर पुरणारे भावबंध. दोघांची आजन्म मैत्री आणि कामाचा सविस्तर इतिहास, एकमेकांबद्दलच्या प्रेमादराने ओतप्रोत पत्रव्यवहार हेरेनकिम्सीत पाहता येतो. वॅग्नरच्या संगीतकलेतून जगभरातले शेक्सपीअर ते गेएटेसारखे ताकदीचे लेखक लोकांसमोर आणून जनमानसाचं उदात्तीकरण होईल, लोकांना खरीखुरी कला पाहायला मिळेल असं लुडविगचं लिहून ठेवलेलं स्वप्न होतं. एका प्रशस्त दालनात दोघांनी मिळून बनवलेल्या संगीतिकांचे काही भव्य सेट्सही सांभाळून ठेवलेत. ‘िरग ऑफ नीबेलुंग्ज’ या लिहून घेतलेल्या संगीतिकेसाठी तर लुडविग नवंकोरं थिएटर बांधायला तयार होता. प्रजेच्या विरोधामुळे तो प्रकल्प बारगळला. वॅग्नरच्या ‘रायेंन्झी’, ‘हॉलंडर’, ‘ट्रिस्टन उंड आयसॉल’ आणि ‘ऱ्हाइनगोल्ड’सारख्या सरस संगीतिकांनी त्याला अगोदरच प्रसिद्धी मिळवून दिली होती; पण लुडविगच्या पाठबळाखेरीज, पैशाची चिंता न करता इतक्या सुंदर रचना करून नीत्शे, टॉल्स्टॉय किंवा तायकोवस्कीसारखे चाहते स्वत:कडे ओढून आणणं वॅग्नरला शक्यच नव्हतं. व्यक्तिगत जीवनात बेबंद वागण्याने वॅग्नरची कायम कडकी असायची, हेही सर्वश्रुत. लुडविगने त्याला म्युनिकला बोलावून घेऊन राजाश्रयाने व्यावहारिक चिंतामुक्त केल्यावर वॅग्नरची कला बहरण्याऐवजी दोघांची घसरगुंडी सुरू झाली. वॅग्नरला लठ्ठ वार्षिक मानधनाव्यतिरिक्त वेगवेगळ्या खर्चासाठी खास भत्ते, महागडय़ा भेटवस्तू मिळत- लुडविगच्या खासगी खिशातून. एकदा तर तो राजाच्या लोकोमोटिव्हमधून (आगगाडी) इटलीत सुट्टीला जाऊन आला. वॅग्नर लुडविगच्या एकाकी जीवनातील हिरवळ होता, हे नि:संशय. संगीत नाटिकांना उत्तेजन देण्यासाठी त्याने न्यूश्वानस्टाईनमध्ये काही खास दालनं बनवून घेतली होती, ती आजही सांभाळून ठेवण्यात आली आहेत. वर्षभर राजवाडय़ात राहायला आल्याने या दोघांवर विकृत मैत्रीचेही आरोप झाले आणि राजघराण्याच्या प्रतिष्ठेसाठी वॅग्नरला बाहेर काढावं लागलं. पण अनेकदा कलेच्या सादरीकरणाबद्दल मतभेद असूनही लुडविगने आयुष्यभर त्याला आर्थिक पाठबळ पुरवलं. वॅग्नरला संवाद, पात्रं आणि संगीतयोजना महत्त्वाची वाटे. तर लुडविगला भव्य सेट्सची उभारणी हवी असे. वॅग्नरला प्रस्तुतीच्या कला आणि संगीतावर संपत्तीच्या झळाळीने अन्याय होतोय असं तीव्रतेनं वाटायचं. म्हणून कलेला नवं रूप, नवी दिशा देण्याचे त्याचे प्रयत्न बारगळले. त्याने नितांतसुंदर राजवाडय़ात राहून (आजूबाजूला सदाहरित वृक्षराजी, अनेक लहान-मोठे धबधबे.. एकावर तर अतिशयच सुंदर पूल- कातळांच्या मधोमध.) सुंदर रचना करण्याबरोबर लोकांना दुखावलेच जास्त. ‘इतका घसरलेला, छळवादी माणूस इतकं सुंदर संगीत कसं बांधू शकतो याचं आश्चर्य राजवाडय़ातल्या कर्मचाऱ्यांना वाटे..’ असं एका अधिकाऱ्याच्या पत्नीने लिहून ठेवलं आहे. संगीतिकांच्या सादरीकरणासाठी न्यूश्वाइनस्टाईनमध्ये एक भव्य म्युझिक हॉल बनवून घेतला होता. पण वॅग्नरला इथे बांधल्यासारखं वाटत असावं. त्याला आखीवरेखीव दरबारी प्रेक्षकांपेक्षा संगीतप्रेमी जनतेच्या उत्स्फूर्त कौतुकाची आस होती; जी लुडविगला कळू शकत नव्हती. त्यावरही मतभेद झाले. वॅग्नरची राजवाडय़ातून उचलबांगडी झाल्यावर लुडविग एकटा पडला. वॅग्नरच्या आर्थिक विवंचना मिटल्या, पण त्याला लुडविगची फारशी फिकीर नसल्याचं पत्रांमधला सूर सांगतो. हेरेनकिम्सीत जर्मनीच्या संविधानाचा इतिहास आणि देशाची फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीकडे झालेली वाटचाल सचित्र दाखवणारं डॉक्युमेंटेशन आहे. मठाच्या संग्रहालयात िभती आणि छतावरल्या भव्य रंगीत चित्रांसोबत जुनी हस्तलिखितं आणि दुर्मीळ (धार्मिक का असेनात!) पुस्तकं जपणारं वाचनालय पाहून माझ्यासारख्या किताबी किडय़ाचा जीव सुखावलाच. लुडविगचं संगीतप्रेम लक्षात घेता आजही त्याच्या या दगडी शिल्पांनी नटलेल्या राजवाडय़ात जे अभिजात संगीताचे कार्यक्रम मोजक्याच प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात येतात ते या राजस वास्तूला आणि तिच्या निर्मात्याला सुखावणारेच असणार. इथे आम्हा पाश्चिमात्य संगीतातल्या निरक्षरांना बीथोवनचा ‘स्ट्रींग क्वार्टेट’ ऐकायला मिळाला, हा खरोखरच अलभ्य लाभ.. शब्दांपलीकडचा!