र. धों. कर्वे यांच्या क्रांतिकारी विचारांचा वसा पुढे नेणारी त्यांची नात प्रियदर्शिनी कर्वे यांनी त्यांच्या कार्याचे आणि कर्वे घराण्याच्या बुद्धिप्रामाण्यवादी वारशाचे केलेले परिशीलन..
र. धों. ऊर्फ रघुनाथ कर्वे म्हणजे माझे आजोबा प्रा. दिनकर कर्वे यांचे थोरले बंधू. त्यांचे वडील महर्षी धोंडो केशव कर्वे हे माझे पणजोबा. महर्षी कव्र्यानी स्त्रियांना शिक्षणाद्वारे स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी आयुष्यभर काम केले; तर र. धों.नी त्याच्या कित्येक पावले पुढे जाऊन स्त्रियांच्या लंगिक स्वातंत्र्याचा हिरीरीने पुरस्कार केला. संततिनियमनाचा प्रसार- प्रचार आणि समाजाचे लंगिक शिक्षणाद्वारे प्रबोधन हे त्यांनी आपले जीवनकार्य म्हणून स्वीकारले आणि त्यांच्या पत्नी मालती कर्वे यांनी घर चालवण्यासाठी अर्थार्जनाची जबाबदारी पेलली. खांद्यावर शिवधनुष्य घेतलेले असताना त्यात आणखी आव्हानांची भर नको म्हणून आपल्याला अपत्य होऊ द्यायचे नाही, असे या पती-पत्नीने परस्परसंमतीने ठरवले. र. धों.नी स्वत: नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणीही केली. अतिशय निष्ठेने आणि धर्याने त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाच्या माध्यमातून आयुष्याच्या अंतापर्यंत आपले विचार लोकांपुढे मांडले. र. धों. आणि मालती कर्वे यांच्या या वेगळय़ा जीवनवाटेवर त्यांना समाजाकडून आणि तात्कालिक सरकारकडून विरोध सहन करावा लागला. पण त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र त्यांना नेहमीच पािठबा दिलेला होता.
मला र. धों.ची माहिती ही मुख्यत: त्यांच्याबद्दल इतरांनी केलेल्या लिखाणातून आणि त्यांच्या स्वत:च्या लेखनातूनच झाली आहे. एका कुटुंबातले जरी आम्ही असलो, तरी आमच्यात दोन पिढय़ांचे अंतर आहे. र. धों.चा मृत्यू १९५३ साली झाला, तर माझा जन्म १९७१ साली झाला. त्यामुळे त्यांच्याबद्दल इतरांना जितपत माहिती आहे, तितपतच माहिती मला आहे. इतरांना लाभली नाही अशी एक गोष्ट मात्र मला लाभली : माझा शाळेचा सर्व अभ्यास र. धों.नी लेखनासाठी वापरलेल्या टेबलाशी बसून झाला! अर्थात हा फारच बादरायण संबंध आहे. पण तरीही खोलवर कुठेतरी आमची नाळ जुळलेली आहे, हे निश्चित.
वयाच्या २५ व्या वर्षी मी स्वेच्छेने माझा एकटीचा स्वतंत्र संसार मांडला. लग्न, अपत्य आणि त्याबरोबर येणाऱ्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या मी जाणीवपूर्वक नाकारल्या आहेत.  ‘विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत विकास’ हा माझ्या जिव्हाळय़ाचा विषय आहे आणि माझा व्यवसाय, संशोधन, अध्यापन, लेखन.. माझे सर्व आयुष्यच या विषयाभोवती केंद्रित आहे.
सर्वसाधारणत: मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण मुले (स्त्री किंवा पुरुष) लग्न केल्यानंतरच घराबाहेर पडतात. तरुण मुलीला किंवा मुलालाही नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी किंवा परदेशी जायची वेळ आली तरच त्यांना ‘एकटय़ाने’ राहावे लागते. माझ्या बाबतीत तसे काहीच नव्हते. माझे आई-वडीलही पुण्यातच आहेत आणि मीही पुण्यातच आहे. पण आíथकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्यावर आपल्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी आपली आपणच घ्यायची आहे, ही माझी मानसिक धारणा होती. आणि महत्त्वाचे म्हणजे माझ्या आई-वडिलांचीही माझ्याकडून तीच अपेक्षा होती. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची इतरांचीही धडपड मी जवळून पाहिली आहे; पण बहुसंख्य बंडखोरांना शेवटी त्यांच्याच जिवलगांपुढे, कुटुंबीयांपुढे हार पत्करावी लागते. त्यामुळे मीना कर्वे व आनंद कर्वे या माझ्या आई-वडिलांचा पािठबा हा माझी वेगळय़ा मार्गावरची वाटचाल सुकर करण्यात माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला आहे.
महर्षी कर्वे किंवा र. धों.ना समाजाकडून ज्या पद्धतीचा विरोध आणि हेटाळणी सहन करावी लागली, त्याचा अंशही माझ्या स्वत:च्या वाटय़ाला आला नाही. मी एकटी स्वतंत्र राहू लागल्यावर माझ्या आई-वडिलांना त्यांच्या काही परिचितांनी दोष दिला आणि अनाहूत सल्लेही दिले. (उदा. ‘तुम्ही आत्महत्या करण्याची धमकी द्या म्हणजे तुमची मुलगी लग्न करायला तयार होईल..’ हा माझ्या आईला मिळालेला एक प्रेमाचा सल्ला होता!) पण तरीही हा विसंवादी सूर खूपच क्षीण आणि अल्पकालीन होता. माझ्या पिढीकडून मात्र आम्हाला भरपूर समर्थनच मिळाले. माझ्या कित्येक मित्र व मत्रिणींना माझ्या वेगळय़ा जीवनशैलीचा आणि माझ्या आई-वडिलांकडून मला मिळणाऱ्या पािठब्याचा हेवा वाटतो. पण मी कर्वे कुटुंबात जन्मले नसते तर हे सारे इतक्या सहजपणे शक्य झाले नसते याची मला पूर्ण जाणीव आहे. महर्षी कर्वे आणि र. धों. कर्वे यांच्या उत्तुंग बंडखोरीच्या कर्तृत्वामुळेच माझी ही थोडीशी बंडखोरी फारसा त्रास सहन करावा न लागता खपून गेली, ही वस्तुस्थिती आहे.
र. धों.ची विचारधारा केवळ संततिनियमन आणि लंगिक आरोग्य किंवा स्त्रियांच्या लंगिक स्वातंत्र्याच्या मुद्दय़ापुरतीच मर्यादित नाही. एकंदरीतच समाजाच्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत आणि स्त्रियांच्या मानवीपणाबद्दल एक अतिशय तर्कशुद्ध अशी समानतावादी भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. पुरुष आणि स्त्री एकसमान आहेत, हे दाखवण्यासाठी स्त्रीत्वाचे उदात्तीकरण करण्याची    त्यांना गरज वाटली नाही. जे मानवी गुण-दोष, आशा-अभिलाषा पुरुषांमध्ये दिसून येतात, तशाच त्या स्त्रियांमध्येही आहेत. आणि पुरुषांचे गुण-दोष, आशा-अभिलाषा ज्या सहजतेने स्वीकारार्ह मानल्या जातात, त्याच सहजतेने स्त्रियांमध्येही त्या स्वीकारार्ह मानल्या पाहिजेत, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. पण आज सत्तर-पंचाहत्तर वर्षांनंतरही त्यांचे विचार वादग्रस्त वाटतात, कारण अगदी जागतिक पातळीवरसुद्धा र. धों.च्या कल्पनेतल्या स्त्रीच्या माणूसपणाच्या जाणिवेपासून समाज अजून फार लांब आहे असे दिसते.
गर्भनिरोधक साधने आणि कुटुंबाच्या निर्णयप्रक्रियेत वाढलेला सहभाग यामुळे स्त्रियांना आता आपल्याला किती अपत्ये व्हावीत, हे ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे असे आपण समजतो. पण आजही काही पुरुषप्रधान देशांमध्ये स्त्रीला गर्भनिरोधक साधने हवी असतील तर नवऱ्याची परवानगी आणावी लागते. अगदी अमेरिकेसारख्या स्वत:ला व्यक्तिस्वातंत्र्याचे पाईक समजणाऱ्या देशातल्या समाजातही एखादी जननक्षम वयाची अपत्यहीन महिला जर आपल्या डॉक्टरकडे मुले न होण्यासाठीच्या शस्त्रक्रियेची मागणी करू लागली तर तिला नकार दिला जातो आणि तिला मानसोपचाराचा सल्लाही दिला जातो. म्हणजेच अगदी पुरोगामी मानल्या जाणाऱ्या समाजाच्या लेखीसुद्धा मातृत्वाच्या भावनेशिवाय स्त्रीला काही अस्तित्वच नाही. त्यामुळे अशी भावना नसलेली स्त्री अमानुष समजली जाते. अगदी बळजबरीच्या संबंधांतून आलेले मातृत्व नाकारण्याचाही अधिकार कित्येक देशांमधील स्त्रियांना नाही. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधानांना आपले पद मानहानीकारकरीत्या सोडावे लागले. यामागे त्यांच्या पक्षांतर्गत राजकारणाचा जितका वाटा होता, त्यापेक्षाही जास्त वाटा त्यांच्या बाईपणाचा होता. ‘एक बाई आणि तिही अविवाहित, विनापत्य बाई देशाचा कारभार हाकूच शकत नाही,’ असे जाहीर विधान त्यांच्या एका प्रमुख विरोधी नेत्याने केले होते आणि त्याला कोणीही आक्षेप घेतला नव्हता.
आपल्या देशात महिलांनी वेगवेगळय़ा क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाची पदे भूषवली आहेत म्हणून आपण पाठ थोपटून घेतो, पण मानसिकतेच्या पातळीवर आपल्याकडची परिस्थितीही काही फार वेगळी नाही. जणू काही स्त्रीचे अस्तित्व हे केवळ कुणाची तरी माता, भगिनी, कन्या किंवा पत्नी म्हणूनच आहे; एक व्यक्ती म्हणून तिला काही अस्तित्व, कर्तृत्व तसेच हक्क किंवा जबाबदाऱ्याही नाहीतच! आपल्या देशातल्या एका प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या महिला नेत्यांवर कडवट टीका झाली, तेव्हा ‘एका महिलेवर अशी टीका (त्या टीकेमागचा मुद्दा बरोबर आहे किंवा नाही, ही बाब गरलागू आहे!) करता कामा नये,’ असा युक्तिवाद त्या पक्षाचे प्रवक्ते करतात. दुसरीकडे इतर काही प्रमुख राजकीय पक्ष जाहीर मोच्रे काढून अकार्यक्षम अधिकाऱ्यांना उपरोधाने ‘बायकी’पणाचे द्योतक म्हणून बांगडय़ा भेट देतात. सार्वजनिक जीवनात उघडपणे घेतल्या जाणाऱ्या अशा भूमिकांमध्ये बहुसंख्यांना काही आक्षेपार्ह दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत बलात्काराच्या वाढत्या घटनांवर वेगवेगळय़ा क्षेत्रांतल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी केलेली एकेक वक्तव्ये म्हणजे तर अकलेच्या दिवाळखोरीची स्पर्धा आहे की काय, असे वाटायला लावणारीच होती!
मध्यंतरी पुण्यातल्या एका महिला महाविद्यालयात एका परिसंवादासाठी मला आमंत्रित केलेले होते. तिथले प्राचार्य आलेल्या पाहुणे मंडळींना आपल्या महाविद्यालयाने मिळवलेल्या वेगवेगळय़ा मानसन्मानांची माहिती देताना सतत ‘आमचे फक्त मुलींचेच महाविद्यालय असले तरीही आम्ही अमुक अमुक कामगिरी करून दाखवली,’ अशी विधाने करत होते. जणू काही फक्त मुलींसाठीची शिक्षणसंस्था असेल तर काही विशेष दर्जा गाठणे ही त्या संस्थेची स्वाभाविक जबाबदारी असूच शकत नाही!
नवरा बायकोला स्वयंपाकघरात ‘मदत करतो’ म्हणजे त्या घरात स्त्री-पुरुष समानता आहे असा प्रामाणिक समज मध्यमवर्गीयांमध्ये प्रचलित आहे. म्हणजे स्वयंपाक करून कुटुंबाला जेऊखाऊ घालणे हे निसर्गत: घरातल्या बाईचेच काम आहे, हा विचार अजूनही जात नाही! जगातले आणि भारतातलेही सगळे यशस्वी आणि प्रसिद्ध बल्लवाचार्य (शेफ) हे पुरुषच आहेत, हा मुद्दा अलाहिदा! लग्नाच्या बाजारात आजही वधूपेक्षा वर सर्वच बाबतीत वरचढ असणे आवश्यक मानले जाते. आणि तामिळनाडूसारख्या राज्यात एका उच्च जातीच्या मुलीने दलित तरुणाशी विवाह केला असता त्यावरून दंगली उसळतात.
र. धों.नी संततिनियमनाचे महत्त्व सतत अधोरेखित केले. विशेष म्हणजे साधारण १९७० पर्यंत वाढती जागतिक लोकसंख्या हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अजेंडय़ावरचा महत्त्वाचा चिंतेचा विषय होता. परंतु धार्मिक संघटनांच्या दबावामुळे आता लोकसंख्यावाढीचा मुद्दा आंतरराष्ट्रीय चच्रेतून जवळजवळ गायब झाला आहे. भारतात संततिनियमनाची साधने मिळण्यावर आणि वापरण्यावर कोणतीही बंधने नाहीत. आणि सर्वसामान्यांनाही कुटुंब नियोजनाचे महत्त्व बऱ्यापकी पटलेले आहे. पण याचा एक परिणाम म्हणून स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रमाण वाढले आहे.
या अशा साऱ्या आजच्या परिस्थितीत पुन्हा एकदा र. धों.च्या विचारांचा दणका र. धों.च्याच रोखठोक शैलीत देणे आवश्यक आहे यात शंका नाही. पण तसा दणका दिल्यानंतर होणारे परिणाम पेलण्याचा र. धों.चा ठामपणाही नव्याने ‘समाजस्वास्थ्य’ मासिक सुरू करणाऱ्या संपादकांना अंगी बाणवावा लागेल. कदाचित त्यांचे आव्हान र. धों.पेक्षाही खडतर असेल. कारण आज विरोधी विचारांचा प्रतिवाद विचाराने करण्याचा काळ राहिलेला नाही. हा जमाना गुंडगिरीने विरोधी विचार दडपून टाकण्याचा आणि विरोधकांनाच संपवून टाकण्याचा आहे.  
र. धों.चे सर्व क्रांतिकारी विचार अजून समाजात रुजलेले नाहीत. पण कुटुंब नियोजन, लंगिक शिक्षण हे शब्दही ज्या समाजात वज्र्य होते, तिथे या संकल्पना स्वीकारार्ह बनवण्यात त्यांच्या जीवनकार्याचे निश्चितच योगदान आहे. र. धों.ची मते सर्वमान्य झाली नसतील; पण त्यावर समाजात चर्चा झाली, विचारमंथन झाले, हीही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनेच ज्ञाननिर्मिती होते आणि नवे विचार मूळ धरू शकतात. शिवाय ‘समाजस्वास्थ्य’च्या त्यावेळच्या नियमित वाचकांच्या सार्वजनिक व्यवहारात नाही, तरी व्यक्तिगत जीवनात या नव्या आणि वेगळय़ा विचारांचे काही ना काही सकारात्मक प्रतििबब पडलेच असणार याची मला खात्री आहे.
तेव्हा र. धों.च्या विचारांचा वारसा घेऊन आयुष्य जगणारी त्यांची एक वंशज या नात्याने त्यांचे ‘समाजस्वास्थ्य’मधील विविध विषयांवरील क्रांतिकारी विचार समाजमनात रुजावेत; ज्यामुळे समाजात खऱ्या अर्थाने ‘समानता’ येईल असे मला मनापासून वाटते.