‘दीमो’क्रसी आणि मीडिया : उलटतपासणी’     (२८ डिसेंबर) या लेखात जयदेव डोळे यांनी माध्यमांचा केलेला पंचनामा वाचला, पण तो एकांगी वाटला. यूपीए शासनाला कंटाळलेली जनता व त्यासमोर मोदींसारखे कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्त्व देशाला लाभत असल्याने माध्यमेच काय, पण जनताही हरखून गेली. कारण राजकारणात सामान्य व प्रामाणिक व्यक्तीला पंतप्रधानपदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणे शक्यच नाही, अशी धारणा काँग्रेसी शासनाने करून ठेवली होती. माध्यमांनी वाहून जाऊ नये ही लेखकाची अपेक्षा स्वागतार्ह वाटली. परंतु विरोधी पक्ष कमकुवत असताना माध्यमांनी ती भूमिका बजावावी, हे वरकरणी योग्य वाटले; तरी विरोध हा विरोधासाठी नसावा तर नवीन सरकारला थोडा अवधी देऊन नंतर त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन नि:पक्षपातीपणे व्हावे अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे याचे भान असावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असाही अनुभव
‘लोकरंग’मधील ‘रहे ना रहे हम’ हे सदर अतिशय वाचनीय असे होते. या लेखमालेने खूप आनंद दिला. येथे माझा एक वैयक्तिक अनुभव सांगावासा वाटतो. १९७२ साल; मी नागपूरहून अभियांत्रिकी करून उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या न्यूकॅसल विद्यापीठात शिकत होतो. Masters / Ph.D च्या विद्यार्थ्यांचे छोटेसे वेगळे वसतिगृह होते. मी एकटाच भारतीय. खूप एकटा होतो. करमणुकीची काही साधने नव्हती. नुकतीच एका ब्रिटिश मुलाशी मैत्री झालेली. त्याच्या खोलीमधून रात्रीच्या बर्फाळ शांततेत अचानक हेमंतकुमारच्या एका प्रसिद्ध गाण्याची धून ऐकायली आली. ती नाही संपत तर दुसरी अखंडित चालू! मी चकित झालो. हिय्या करून त्याच्या रूममध्ये घुसलो. त्याला विचारले, ‘भारतीय चित्रपट संगीत केव्हापासून आवडायला लागले?’ आता चकित व्हायची त्याची पाळी होती. तो म्हणे, हे Western classical music आहे. मी तसा संगीतशास्त्रामध्ये शून्य; पण भारतीय संगीताचा प्रचंड अभिमानी होतो. तेव्हा २२ वर्षांचा होतो. जोरजोरात वाद घालायला लागलो. ‘आमचे संगीत तुम्ही चोरताय,’ असेपण माझ्या तोंडातून निघून गेले. त्याने शांतपणे ती तबकडी थांबवली व मी त्यावरचे नाव वाचले – Mozart, symphony in (some) major (G major). मला अर्थातच काहीही न समजल्यामुळे त्याने मोझार्टचा काळ, त्याचे योगदान वगैरे मला समजावून सांगितले. मी दिग्मूढ झालो. त्यानंतर बऱ्याच विविध पाश्चात्त्य संगीतकारांच्या तबकडय़ा तिथे ऐकल्या. मला अती-आनंद देणारी कित्येक so-called भारतीय चित्रपट संगीतकारांनी त्यांची गाणी त्या तबकडय़ांमधील सुरावटींमध्ये अक्षरश: काडीचाही बदल न करता आपल्या नावावर खपवली आहेत, या कटू सत्याचा परिचय चांगलाच झाला. माझ्यासारख्या संगीत-अज्ञानी माणसाचा कोवळ्या वयातील भाबडा आनंद, भारतीय संगीतकारांबद्दलचा अभिमान तेव्हापासून राख झाला. नंतर काहीही ऐकले की हे कुठून चोरलेय, ते शोधायचा छंदही करून बघितला. आजही हिंदी चित्रपटांच्या ‘सुवर्णकाळा’तील गाणी ऐकताना मी पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. ‘त्यांनी’ श्रेय योग्य ठिकाणी दिले असते तर कदाचित इतके कडवट वाटले नसते. तरीही जिथे या दिग्गजांनी सरसकट उचलेगिरी करून वाहवा/सन्मान घेतलेले आहेत त्याचीही नोंद घेणारे लिखाण विशेष कुठे बघितलेले नाही.              
– इंद्रनील भोळे, घाटकोपर, मुंबई.  

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One side democracy
First published on: 04-01-2015 at 05:14 IST