‘लोकरंग’मधील (२० मे) ‘आइन्स्टाइन अमर आहे!’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. आइन्स्टाइनसारख्या प्रज्ञावंताने समस्यांच्या सोडवणुकीविषयी केलेले भाष्य अर्थात आपल्या जागी योग्य, नव्हे वादातीतच आहे. मात्र राजकारणाच्या क्षेत्रात मुळात ‘प्रामाणिकते’लाच फारसे स्थान उरलेले नसल्याने वैज्ञानिक/वैचारिक क्षेत्रात निर्विवाद असणारे हे भाष्य राजकारणात तितकेसे लागू पडत असल्याचे दिसत नाही. याचे अधिक स्पष्टीकरण असे :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) ‘भ्रष्टाचार’ ही देशापुढील समस्या आहे; ‘काँग्रेस’ नव्हे. हे जर प्रामाणिकपणे मान्य केले असते, तर लेखात उद्धृत केलेल्या आइन्स्टाइनच्या तत्त्वानुसार भाजपला भ्रष्टाचाराच्या पातळीच्या वर राहून (‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ या प्रसिद्ध घोषणेनुसार) भ्रष्टाचाराचा मुकाबला करता आला असता. तरच ‘वेगळा पक्ष’ ही भाजपची प्रतिमा सार्थ ठरली असती. ‘भ्रष्टाचार विरुद्ध साधनशुचिता’ असा संघर्ष जुन्या भाजपप्रेमींना (ज्यांच्या मनात भाजपची ‘भ्रष्टाचारविरोधी’ अशीच प्रतिमा होती) बघायला आवडला असता. मुख्य म्हणजे अशा संघर्षांत हरणे हेसुद्धा हौतात्म्यच ठरले असते! परंतु असे काही झालेच नाही. कारण भाजपने ‘भ्रष्टाचार’ ही देशापुढील समस्या आहे; काँग्रेस नव्हे, हे मुळी मान्यच केले नाही.

२) भाजपने हे मनोमन मान्य केले आहे, की राजकारणात एवढे प्रामाणिक, साधनशुचितासंपन्न, वगैरे असून चालणार नाही. म्हणून ते आधीच एक पायरी खाली आले. त्यांनी मुळात आपली समस्याच बदलून टाकली! देशापुढील (खरी) समस्या भ्रष्टाचार नव्हे, तर काँग्रेस आहे हे त्यांनी ठरवून टाकले. त्यामुळे आता संघर्ष ‘समस्ये’विरुद्ध नसून ‘शत्रू / प्रतिस्पध्र्या’विरुद्ध आहे. या संघर्षांला अर्थातच आइन्स्टाइनचे तत्त्व लागू पडत नाही.

३) या संघर्षांत लागू होणारी तत्त्वे अगदी उलट आहेत. इथे ‘जशास तसे’, ‘ठकास महाठक’, ‘काटय़ाने काटा काढावा’, ‘विषाने विष उतरवावे’ हीच तत्त्वे लागू होतात, हे भाजपने पूर्ण ओळखलेले आहे. म्हणूनच वाल्याचे वाल्मिकी बनवण्याचा घाऊक ठेका घेतल्याप्रमाणे प्रवीण दरेकर, नारायण राणे किंवा तत्सम मंडळी पक्षात आवर्जून घेतली जातात, पाठीशी घातली जातात.

४) आता दोन्ही पक्ष (काँग्रेस व भाजप) एकाच पातळीवर आलेले आहेत, हे सत्य नाकारण्यात काही अर्थ नाही. जुन्या भाजपच्या चाहत्यांना (त्या पक्षाच्या मूळच्या स्वच्छ प्रतिमेवर प्रेम असलेल्यांना) अजूनही विश्वास आहे, की ‘जशास तसे’, ‘ठकास महाठक’ या न्यायाने नव्या भाजपने अंगीकारलेली धोरणे / भ्रष्टाचार भाजपचा स्थायीभाव बनणार नाही! या दिशेने जास्त वाहवत जाण्याच्या आधीच त्यांना आठवण होईल (किंवा करून द्यावी लागेल?) की, त्यांचे खरे ध्येय ‘काँग्रेसमुक्त भारत’ नसून ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ हेच आहे.

 श्रीकांत पटवर्धन, मुंबई</strong>

सिमेंटच्या जंगलात शब्दवैभव टिकावे

‘लोकरंग’मधील (१३ मे) ‘त्या उजड माळावरती.. बुरुजाच्या पडल्या भिंती।’ हा ना. धों. महानोर यांचा लेख वाचला. लेखात बालकवी, मराठी निसर्गकवितेचा प्रवास आणि जुन्या काळातील निसर्ग सारे काही आठवणींतून उलगडताना आमच्या पिढीने जे काही अनुभवले त्याबद्दल कृतज्ञता दाटून आली. बालकवींच्या कविता कवितासंग्रहांत, पाठय़पुस्तकांत वाचायला मिळतात, पण निसर्ग आता सिमेंटच्या जंगलात छोटय़ा बागा आणि कुंडीतच बहरताना दिसतो. बरेच काही हरवताना किमान हे शब्दवैभव तरी टिकावे, नव्या पिढीला त्याचा परिचय व्हावा, ही अपेक्षा! शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान लाटेत निसर्गसंवर्धनाचे भान असावे; अन्यथा निसर्गवैभव जुने लिखाण, कविता आणि चित्रांमध्येच पाहावे लागेल.

– सिमंतीनी काळे, नाशिक

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letters from lokrang readers
First published on: 27-05-2018 at 01:01 IST