खोटं बोलणं, मतलबी बातम्या तयार करणं, बनावट व्हिडीओ प्रसारित करणं, इंटरनेट मोबाइल समाजमाध्यमंवृत्तवाहिन्यांतून द्वेषमूलक किंवा हिंसक मजकूर पसरवणं यांची अमेरिकेत लाट आहे. पण तिथे या सर्व घटकांशी सजग पत्रकारितादेखील लढत आहे. या आठवड्यात या पत्रकारितेचा गौरव करणारी ‘पुलित्झर’ पारितोषिके जाहीर झाली. त्यातली काही युद्धविरोधी विचारांच्या वार्तांकनासाठी आणि युद्धाच्या बातम्या उन्मादाकडे न झुकवता संवेदनशीलतेने हाताळण्यासाठी दिली गेली. पहलगाम हल्ल्यानंतर गेले पंधरा दिवस आपल्याकडे जाणीवपूर्वक माध्यमांवर युद्ध लढविण्याचा आणि उन्माद प्रसारप्रचाराचा खेळ पाहायला मिळतोय. युद्धाला मनोरंजनाच्या पातळीवर नेऊन सांगोवांगीची कथानके आपल्यावर आदळली जात असताना इथल्या माध्यमांच्या सद्या:स्थितीची झडती…तुम्ही ‘वॅग द डॉग’ नावाचा सिनेमा बघितला नसेल तर जरूर पाहा. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात रॉबर्ट डी नीरो आणि डस्टिन हॉफमन आहेत. एका घोटाळ्यात अडकलेला राष्ट्राध्यक्ष लोकांचं लक्ष त्यापासून हटवण्यासाठी आणि उत्तरदायित्व टाळण्यासाठी युद्धाची निर्मिती कशी करतो, यावर हा सिनेमा आधारलेला आहे. एक लक्षात असू द्या. ही एक उपहासात्मक ‘ब्लॅक कॉमेडी’ आहे. त्यामुळे त्यात विपर्यास आहे. पण मी या सिनेमाचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे राजकीय ‘मॅनीप्युलेशन’ करण्यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका काय असते यावर त्यात अत्यंत प्रखर भाष्य केलेलं आहे. अवघड प्रश्न किंवा गैरसोयीच्या वास्तवापासून लोकांचं लक्ष विचलित करून अध्यक्षांना त्यांची सार्वजनिक प्रतिमा प्रस्थापित करण्याकरता प्रसारमाध्यमं कशी एक हत्यार बनतात हे यात दाखवलंय.
आज, वीस वर्षांनंतरही ‘वॅग द डॉग’ हा चित्रपटच भारतीय वृत्तवाहिन्यांमधून रोज अनुभवायला मिळतोय. राष्ट्रभक्तीचा फाजील आव आणून केलेलं अँकरिंग आणि दुसऱ्या कोणाच्या तरी जिवावर बेतलं तरी हरकत नाही, पण बहुसंख्य दर्शकांना रक्तपिपासू बनवणारं वृत्तांकन.
२२ एप्रिलला पाच दहशतवाद्यांनी पहलगाममधल्या पर्यटकांवर भयानक हल्ला केला आणि त्यात २६ निरपराधांना जीव गमवावा लागला. हे दहशतवादी पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून आले असल्याचं समजतं.
पंधरा दिवसांनंतर भारताने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानमधल्या आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या नऊ तळांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये १०० माणसांचा मृत्यू झाला- ज्यात एका लहान मुलाचा समावेश आहे असं सांगितलं जातं. दोन्ही देशांमध्ये पराकोटीचा तणाव निर्माण झालेला असताना प्रसारमाध्यमांची भूमिका अधिकच महत्त्वाची बनते.
युद्धाच्या काळात वार्तांकन करताना पत्रकारितेमधल्या मूलभूत गोष्टी बदलत नाहीत, असं अँद्रे कुलीकॉव्ह या युक्रेनच्या पत्रकाराचं म्हणणं. युद्ध ‘कव्हर’ करण्याचा भरपूर अनुभव असलेला हा अतिशय नावाजलेला पत्रकार. एका मुलाखतीमध्ये त्यानं म्हटलंय, ‘‘कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये काम करताना तुमच्यावर जास्त जबाबदारी असते आणि तुम्ही ती बांधिलकी मानून काम करायला हवं. अगदी शांततेच्या काळातही तुमच्या वाचक-दर्शकांचं भलं आणि काही वेळा त्यांचं आयुष्यही तुमच्यावर अवलंबून असतं. युद्धाच्या काळात ते अधिकच असतं याचं भान आपण ठेवायला हवं. तेवढाच काय तो फरक.’’
त्यामुळे तुम्ही माहिती जमा करा, त्याचं मूल्यमापन करा आणि मग ती तुमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवा असंही त्यानं म्हटलंय. मात्र माहिती मिळवण्यासाठी, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी पत्रकारांनी मुळात प्रश्न विचारणं गरजेचं असतं. सरकारने दिलेली प्रसिद्धी पत्रकं उत्साहाने उत्सवासारखी साजरी करणं, त्यात बसत नाही.
जवळपास दशकभर मध्यपूर्वेतल्या देशांमधून युद्धाचं रिपोर्टिंग करणाऱ्या अमेरिकेतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराला मी फोन केला होता. तो म्हणाला की, सरकार अनेकदा पत्रकारांना युद्धाच्या माहितीचे तपशील पुरवत असतं. सैन्याच्या कारवाईसाठी एक प्रकारचा वेग मिळावा यासाठी ती माहिती उपयुक्त ठरणारी असते. पत्रकारांकरता ती ‘एक्सक्लुझिव्ह’ आणि उत्तेजना वाढवणारी असते. त्याने सांगितलं, ‘‘माझ्यापुरतं बोलायचं तर माझ्या बातम्या सरकारचं काम करणार नाहीत, याची काळजी मी नेहमी घेतली. किंवा युद्धाचं समर्थन करणार नाहीत हेही मी बघितलं. माझा प्रयत्न हा कायमच तणाव कमी होण्याच्या दृष्टीने कोणते मार्ग आहेत, हे शोधण्याकडे असायचा. युद्धाच्या कल्पनेला खतपाणी घालणं म्हणजे उन्माद निर्माण करणाऱ्यांमध्ये सहभागी होणं.’’
इराक युद्धाच्या वेळेस अमेरिकेत काय घडलं हे आपण बघितलं. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी उन्माद निर्माण करण्याला हातभार लावला आणि लोकांना युद्धाला पाठिंबा द्यायला प्रवृत्त केलं. सरकारी प्रचाराला लोक बळी पडतील यासाठी केल्या गेलेल्या परिणामकारक प्रयत्नांमध्ये ही माध्यमं सहभागी झाली.
सध्याच्या घडामोडींविषयी संवेदनशीलतेने ‘रिपोर्टिंग’ करताना एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे : जगातल्या सर्वाधिक लष्करी अस्तित्व असलेल्या प्रदेशांपैकी एक असलेल्या भागात पाच सशस्त्र दहशतवादी घुसून असा हल्ला कसा करू शकले? सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या या अत्यंत गंभीर हलगर्जीपणाची जबाबदारी कोण घेणार?
२०१९मध्ये पुलवामा इथे झालेल्या महाभयंकर हल्ल्यात भारताचे ४० सैनिक मारले गेले होते. या हल्ल्याआधी गुप्तचर खात्याने दिले गेलेले ११ इशारे दुर्लक्षिले गेले होते याची आठवण आहे तुम्हाला? या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची जबाबदारी कोणाची होती, याचं उत्तर अजून तरी मिळालं का आपल्याला?
नाही मिळालं. कारण, प्रसारमाध्यमांनी बालाकोट हल्ल्यानंतर ‘वॅग द डॉग’ची आपली भूमिका पार पाडली. हा हल्ला साजरा केला गेला आणि ज्या हलगर्जीपणामुळे ४० सैनिकांचा मृत्यू झाला, त्याला जणू माफ करण्यात आलं. तुम्ही आमची माणसं मारली, आम्ही तुमची मारली, झाली- फिट्टंफाट असं म्हणून सगळं सामान्य झालं. जे टाळता आलं असतं त्या शहिदांच्या मृत्यूची जबाबदारी दुर्लक्षिली जाणं यासारखा त्यांचा दुसरा अनादर नाही.
सहा वर्षांनंतर पुन्हा तेच घडताना दिसतंय. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची क्षणचित्रं म्हणून किमान चार मुख्य वृत्तवाहिन्यांनी गाझाचं जुनं ‘फूटेज’ वापरलं. ही बातमी सांगत असताना वापरण्यात आलेली भाषा म्हणजे निव्वळ सनसनाटी होती. युद्धासारख्या गंभीर गोष्टीला प्रेक्षकांकरता एक स्वस्तातलं मनोरंजन बनवणारी. आणि हे वृत्तांकन पाहणारा तरी कोण? युद्धामध्ये ज्यांचं घर जळणार नाही, घरात येणारं अन्न आणि वीज थांबणार नाही असे!
माझ्या अगदी बालपणातल्या आठवणींनुसार, ‘युद्ध ही एक भयंकर घटना आहे,’असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. शांततेची मागणी करणं हे लोकप्रिय मत होतं, वादग्रस्त नव्हे. पण गेल्या काही वर्षांमध्ये प्रसारमाध्यमांनी आम्हाला युद्धाचे ‘चीअर लीडर्स’ बनवलं. अगदी पाकिस्तानातल्या एका अर्भकाचा मृत्यूही आम्ही साजरा करू लागलो.
या आठवड्यात डेक्लान वॉल्श आणि इवोर प्रिकेट या दोन आयरिश पत्रकारांना सुदानमध्ये चालू असलेल्या युद्धाच्या वार्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला. त्यांच्या बातम्यांमध्ये परदेशी प्रभाव आणि सोन्याचा नफा देणारा व्यापार युद्धाला कसं खतपाणी घालताहेत याचाही समावेश होता.
युद्धाने सुदानची अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडून गेली. त्यांची आरोग्य व्यवस्था रसातळाला गेली आणि त्यांच्या राजधानीच्या शहरात जिथे तिथे कोसळून पडलेल्या इमारतींच्या मातीचे ढीग दिसताहेत. या युद्धामुळे त्यांना गेल्या कित्येक दशकांमधल्या भयंकर दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे आणि अडीच कोटींपेक्षा अधिक लोक उपासमारीचे बळी होण्याच्या मार्गावर आहेत.
पण सोन्याचा व्यापार तेजीत आहे. या देशामध्ये पसरलेल्या सोन्याच्या खाणींमधून होणारं उत्पादन आणि व्यापार युद्धपूर्व काळात होता, त्याही पुढे गेलाय. आणि पराकोटीची तस्करी चालणाऱ्या या देशातली ही केवळ अधिकृत आकडेवारी आहे.
यातून मिळणारी रक्कम उपाशी आणि बेघर नागरिकांसाठी वापरण्याऐवजी सुदानमधली एकमेकांसमोर उभी ठाकलेली माणसं ते सोनं आपल्या युद्धासाठी पैसा कसा पुरवेल हे पाहताहेत. संयुक्त राष्ट्रांचे तज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे, कोट्यवधी लोकांच्या विरोधात ‘उपासमारीचे डावपेच’ (स्टार्व्हेशन टॅकटिक्स) वापरताहेत, असा पर्दाफाश ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने केलाय.
गेल्या वर्षी ‘न्यू यॉर्कर’ने ‘इन द डार्क’ नावाचा एक ‘इनव्हेस्टिगेटिव्ह पॉडकास्ट’ प्रसिद्ध केला होता. अमेरिकी नौदलाने इराकमध्ये २४ नागरिकांच्या केलेल्या हत्येच्या संदर्भातली माहिती त्यात होती. या गुन्ह्यासाठी कोणालाही जबाबदार का धरण्यात आलं नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नौदलाला प्रश्न विचारले म्हणून ही ‘स्टोरी’ काढून टाकावी अशी जबरदस्ती कोणी केली नाही. त्यावर ‘सेन्सॉर’ लागू केला नाही. आणि या आठवड्यात त्याला पुलित्झरही दिलं गेलं.
गिडिअन लेवी हे नाव गूगल करून पाहा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा एक अतिशय ज्येष्ठ इस्रायली पत्रकार आहे. या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या त्याच्या स्तंभाचं शीर्षक आहे, ‘गाझामधल्या माझ्या मित्रापाशी आता इन्शुलिनचे शेवटचे काही थेंब शिल्लक आहेत.’ इस्रायलने गाझामध्ये जो नरसंहार चालवला आहे त्याचा परिणाम म्हणून पॅलेस्टाईनमधल्या नागरिकांना योग्य वैद्याकीय उपचारही मिळत नाहीत, याविषयीचा तो अस्वस्थ करणारा रिपोर्ताज आहे.
युद्धाचं वार्तांकन कसं करावं, यांचे हे लेख म्हणजे सणसणीत उदाहरणं आहेत. माणसांच्या कहाण्यांमधून युद्धाचे फायदे कोणाला, कसे होतात यावर लक्ष वेधणारे. कोणत्याही प्रकारच्या युद्धामुळे समाजातल्या एका विभागाच्या मानवी हक्कांचं उघडपणे उल्लंघन होतं. आणि बहुतेक वेळा हे समाजातले दुर्बल घटक असतात. त्यांचं नुकसान हा युद्धाचा स्वाभाविक परिणाम आहे असं म्हणून त्याचं समर्थन न करता त्यांच्या अडचणींवर प्रकाशझोत टाकणं, हे संवेदनशीलतेने केलेलं वार्तांकन असतं. युद्ध हा कधीच चांगला पर्याय नसतो, हे आपल्या दर्शकांना सांगणं म्हणजे चांगलं ‘रिपोर्टिंग’ असतं. बेंजामिन फ्रँकलिनने म्हटल्याप्रमाणे, ‘‘देअर इज नो गुड वॉर अॅण्ड बॅड पीस.’’ चांगलं युद्ध आणि वाईट शांतता असं कधीच नसतं.
पण अशा प्रकारच्या पत्रकारितेसाठी वेळ, कौशल्य आणि महत्त्वाचं म्हणजे धैर्य लागतं. एअरकंडिशन्ड स्टुडिओमध्ये बसून युद्धज्वर पसरवणं त्यापेक्षा खूपच सोपं आहे. कारण त्यासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी रक्ताची किंमत दिली जातेय. तुमचे ‘प्राइम टाइम शोज’ पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सूड उगवण्याची भाषा बोलणाऱ्यांच्या घरांवर बॉम्ब पडणार नसतात. रात्री-अपरात्री त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागणार नसतं. किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कारही करावे लागणार नसतात.
भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने उत्तरादाखल काश्मीरच्या पुंछ भागात सीमेजवळ गोळीबार करून १३ निरपराध काश्मिरींची हत्या केली. गेली पाच वर्षं इथली कुटुंबं बऱ्यापैकी शांततेत राहात होती, कारण इतका काळ तिथे युद्धविराम होता. अचानक एका रात्रीत त्यांच्या आयुष्यात उलथापालथ झाली. आसऱ्यासाठी त्यांना बाहेर धाव घ्यावी लागली. काही त्यात यशस्वी झाले, काही मृत्युमुखी पडले.
देशभरात भारत सरकारने ‘मॉक ड्रिल’ आयोजित केलं होतं. पण मग पाकिस्तान काहीतरी गडबड करेल याचा विचार करून सीमारेषेजवळ असलेली गावं सरकारने हवाई हल्ला करण्यापूर्वी रिकामी का नाही केली? प्रश्न विचारायचेच ठरवले तर हाही प्रश्न विचारता येईलच की!
parth.mn13@gmail.com