लहान मुलांच्या पुस्तकांतून चित्रं असावीत का? ती किती असावीत, कशी असावीत, कुठे कुठे असावीत – याबद्दल पालक, प्रकाशक, शिक्षक आणि एकूणच लहान मुलं सोडून सगळ्यांना ठाम मतं असतात. आजही, एखाद्या पुस्तकात लिखित मजकूर कमी असेल आणि भरपूर चित्रं असतील तर ते पुस्तक विकत घेण्याआधी पालक थोडा विचार करतात. किंवा मग ते घेतच नाहीत. पण एखाद्या लहान मुलाच्या हातात भरपूर चित्रं असलेलं एखादं पुस्तक दिलं तर ते आजूबाजूचं जग विसरून लगेच पुस्तकात हरवून जातं ही वस्तुस्थिती आहे.

लहान वाचक हरवून जातील अशी चित्रं असलेलं एक पुस्तक नुकतंच प्रथम बुक्सनं प्रकाशित केलं आहे. लेखन आणि चित्रकला दोन्ही माधुरी पुरंदरेंची आहे आणि पुस्तकाचं नाव आहे ‘सुर्की आणि तिर्की’. स्वरमयी आणि त्रिसुपर्णा अशी क्लिष्ट नावं असलेल्या दोन जिवलग मैत्रिणींची ही गोष्ट आहे. गोष्ट लहान मुलांना आपलीच वाटेल अशी आहे. दोन मैत्रिणींच्या घट्ट मैत्रीत एक छोटंसं वादळ येण्याची. कदाचित मोठ्या माणसांनाही ती आपली वाटेल. गोष्टीबरोबरच या गोष्टीतली चित्रंही मुलं पुन्हा पुन्हा ‘वाचतील’ अशी आहेत.

हिरव्या आणि मातकट रंगछटांच्या वेगवेगळ्या आकारांचे चौकोनी तुकडे वापरून सुर्की-तिर्कीचं गाव रेखाटलं आहे. मध्येच, त्याच छटांमध्ये रंगवलेला एक चट्टेरी-पट्टेरी डोंगर आहे. पुस्तकाच्या प्रत्येक पानावर एखादं झाड आहे. त्यातली बरीच झाडं निरखून बघितली तर परिकथेतली वाटतील, पण लांबून बघितली तर आपल्याच आजूबाजूची आहेत असं वाटेल. एका झाडावर सुर्की-तिर्की चढून बसलेल्या दिसतील, तर दुसऱ्या झाडाच्या पारावर बसून डबा खाताना दिसतील. एका चित्रात, एका डुंबणाऱ्या म्हशीच्या पाठीवर बसलेल्या सुर्की-तिर्की दिसतील. त्यांचं गाव, त्यांची शाळा, शाळेतल्या विस्कटलेल्या सतरंज्या आणि त्यांवर अगदी जमिनीला नाक टेकेपर्यंत वाकून लिहीत बसलेल्या मुली – असे अनेक बारीकसारीक तपशील असल्यामुळे आपण तिथे बराच वेळ रेंगाळतो याची जाणीव होते.

हेही वाचा

चित्रांसाठी आपण नेहमी ‘बघणं’ हे क्रियापद वापरतो, आणि जोपर्यंत लहान मुलांना लिपी वाचता येत नाही तोपर्यंत त्यांनी चित्रं बघावीत असा समज आपण करून घेतलेला आहे. पण चित्रं वाचण्यातही गंमत आहे. लिखित मजकूर आणि चित्रं एकमेकांचे हात धरून जेव्हा गोष्ट सांगतात तेव्हा त्या गोष्टीकडे वाचक, वेगवेगळ्या वयात पुन्हा पुन्हा येतात. या पुस्तकात चित्रं आणि मजकूर असेच विचारपूर्वक एकत्र आणलेले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारख्या रंगछटा आणि प्रत्येक पानावर पुन्हा पुन्हा दिसणारे काही नाजूक आकृतिबंध, यामुळे वाचता वाचता ती चित्रं ‘सवयी’ची आणि परिचित होतात. त्यामुळेच, असं काहीतरी आपणही काढू शकू का ते बघायला मुलं लगेच हातात कुंचला घेतील असं हे पुस्तक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सुर्की आणि तिर्की’, – माधुरी पुरंदरे, प्रथम बुक्स, पाने-८, किंमत- ८० रुपये.