आशीष पेंडसे- ashpen6@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘युरो २०२०’च्या निमित्ताने स्टार फुटबॉलपटूंच्या कौशल्याचा आविष्कार पाहावयास मिळणार आहे. साहजिकच ‘युरो कप’ कोण उंचावणार, याबाबतची उत्कंठादेखील शिगेला पोहोचली आहे. फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, की.. या सर्वाना चकित करणारा वेगळाच अनपेक्षित विजेता? या लाख ‘युरो’च्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा लेखाजोखा..

‘बेल्जियमच जिंकणार! जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) क्रमवारीत ते सर्वोच्च स्थानी आहेत..’ ‘छे! विश्वविजेत्या फ्रान्सशिवाय आहेच कोण..?’ ‘अब की बारी, इंग्लंड की बारी..!’ ‘पाहाच तुम्ही- रोनाल्डोचा पोर्तुगाल पुन्हा मुसंडी मारणार..’ ‘‘स्पॅनिश फिएस्टा’ मैदान जिंकून जाणार..’ ‘नाही हो, आमचे इटली-हॉलंड गतवैभव प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहेत..’

..‘युरो कप’ स्पर्धेचा रोमांच सुरू होत असतानाच विजेता कोण होणार, याबाबत अशा दाव्या-प्रतिदाव्यांच्या चर्चेलादेखील रंगत चढत आहे.

अखिल फुटबॉल-विश्वावर युरोपचा दबदबा असणे स्वाभाविकच आहे. इंग्लंडमधील प्रीमियर लीग, स्पेनची ला-लिगा, जर्मनीची बुंडेसलिगा, फ्रान्समधील लिगा वन, इटलीची सेरीआ आदी राष्ट्रीय व्यावसायिक साखळी फुटबॉल स्पर्धा जगप्रसिद्ध आहेत. त्याहीपेक्षा युरोपचे चॅम्पियन होण्याचा बहुमान काही औरच. फुटबॉलच्या वर्ल्ड कपखालोखाल ‘युरो कप’ स्पर्धेची प्रतिष्ठा आहे. त्यामुळेच ‘युरो कप’वर अखिल विश्वातील क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असतात. १९३० पासून आतापर्यंत २१ फिफा वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या आहेत. त्यामध्ये तब्बल १२ वेळा युरोपीय देशांनी विजेतेपद पटकावले आहे. यावरूनच फुटबॉल जगतामध्ये युरोपचा असलेला दबदबा स्पष्ट होतो.

यंदाच्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी काही प्रमुख दावेदार नक्कीच आहेत..

१) फ्रान्स- २०१८ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर फ्रेंच खेळाडू पूर्ण भरात आहेत. एकतर हा तरुण संघ आहे. आणि गेल्या पाच वर्षांमध्ये फ्रेंच खेळाडूंनी आपापल्या क्लब संघांकडून धडाकेबाज कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा विजेता चेल्सीचा अँगेलो कान्टे, रियल माद्रिदचा तारणहार, अनुभवी करीम बेन्झिमा, मँचेस्टर युनायटेडचा पॉल पोग्बा, अँथनी मार्शल, टॉटनहॅम हॉटस्पर्सचा अनुभवी गोलकीपर ुगो लॉरीस सध्या जबरदस्त खेळत आहेत. बार्सिलोनाचा अनुभवी अँन्टोनी ग्रिझमन आणि चेल्सीचा ऑलिव्हर जिरू यांच्या माध्यमातून फ्रान्सची आघाडीची फळी भरात आहे.

फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू मायकेल प्लॅटिनी याच्या नेतृत्वाखाली १९८४ साली त्यांनी युरो कप उंचावला होता. त्यानंतर झिनादिन झिदानच्या फ्रेंच संघाने १९९८ साली वर्ल्ड कप आणि २००० साली युरो कप उंचावण्याची किमया केली होती. अतिशय शैलीदार, वेगवान खेळ हा फ्रेंच फुटबॉलचा ट्रेडमार्क आहे. सध्याचा किलियन एम्बापे हा एखाद्या १०० मीटर स्प्रिंटरच्या वेगाने चेंडूविना आणि चेंडूसकट गोल लगावण्यासाठी धाव घेतो. अर्थात त्याला जोड असते ती कौशल्यपूर्ण अचूक पासेसची.

२) इंग्लंड- इंग्लंडला फुटबॉलची पंढरी मानले जाते. पण १९६६ साली वर्ल्ड कप उंचावल्यानंतर इंग्लंडने कोणतीही महत्त्वाची ट्रॉफी जिंकलेली नाही. पण सध्या पूर्ण भरात असलेले फुटबॉलपटू ‘इंग्लिश समर’ नक्कीच ऐतिहासिक करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्पर्सचा फॉरवर्ड हॅरी केनच्या जोडीला मँचेस्टर सिटीचा वेगवान रहीम स्टर्लिग सज्ज आहे. सिटीचा फिल फोडेन याचे कौशल्य भारतीयांनी २०१७ साली आयोजित फिफा १७ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये पाहिले होते. सिटीचे मार्गदर्शक पेप ग्वाडिओला यांच्या देखरेखीखाली त्याचा खेळ आता परिपक्व होतो आहे. युनायटेडचा मेसन ग्रीनवूड आणि जर्मनीतील बरुशिया डॉर्टमंडचा जॉर्डन सँन्चो हे विशीतील युवा शिलेदार धमाका करण्यास सज्ज आहेत. लिव्हरपूलचा हेन्डरसन, चेल्सीचा मेसन माऊंट हे मिडफिल्डर आणि लिव्हरपूलचा ट्रेंट अरनॉल्ड, चेल्सीचा बेन चिलविल, युनायटेडचा मॅग्वायर, लुक शॉ, सिटीचा केल वॉकर हे भक्कम बचावपटू अभेद्य आहेत.

पूर्वी इंग्लिश फुटबॉल अगदीच एकसुरी होते. एका बाजूने चेंडू हवेतून पुढे किक मारायचा, मग विंगर जोरदार धाव घेऊन तो चेंडू क्रॉस करणार आणि फॉरवर्ड हेडिंग करून गोल करणार.. असा साधारण त्यांच्या खेळाचा पॅटर्न होता. तेथील हवामानामुळे दम लागणे वगैरे काही प्रश्नच नाही. तसेच युरोपीय-इंग्लिश खेळाडू धडधाकट, तगडे. मग काय, फुटबॉलच्या मैदानावर जणू काही मस्तवाल बुलफाइटच सुरू असे. इंग्लिश लीगमध्ये जगभरच्या फुटबॉलपटूंनी खेळण्यास प्रारंभ केल्यानंतर इंग्लिश फुटबॉलची शैलीदेखील परिपक्व झाली. वेगवान खेळाला लॅटिन अमेरिकन नजाकत आली. जणू काही आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील दोन घराण्यांचे फ्युजनच! त्यामधूनच मग कौशल्यपूर्ण ड्रिबलिंग आणि जमिनीलगत अचूक पासेस देणारे इंग्लिश खेळाडू तयार झाले. कालांतराने आता इंग्लिश फुटबॉल हा जगातील सर्वोत्तम शैलींचा सुंदर मिलाफ झाला आहे. अर्थात थ्री लायन्स- म्हणजेच इंग्लिश राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये उणीव आहे ती विजिगीषु वृत्तीची.

३) बेल्जियम- ‘फिफा’च्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी विराजमान असलेला बेल्जियम कमालीचा प्रतिभावान संघ. पण क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेप्रमाणे आयत्या वेळेस कच खाणारा ‘चोकर’! ‘युरो २०२०’मध्ये मात्र कप उंचावण्यासाठी सिटीच्या केव्हिन डे ब्रुइन याच्या नेतृत्वाखाली ते सज्ज आहेत. इंटरमिलानला इटलीमधील लीगचे विजेतेपद मिळवून देणारा धडाकेबाज फॉरवर्ड रोमेलो लुकाकू, रियल माद्रिदचा एडन हझार्ड, गोलकीपर थिबुट कोर्तुआ अशा स्टार खेळाडूंची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. अभी नहीं तो कभी नहीं.. करिअरच्या अशा टप्प्यावर ते असल्याने विजेतेपदासाठी ते सर्वस्व पणाला लावणार, हे नक्की!

४) हॉलंड- देदीप्यमान इतिहास असलेला डच फुटबॉल म्हणजे गुणवत्तेची खाण. शिक्षण-करिअरच्या क्षेत्रात डच अ‍ॅप्टिटय़ूट टेस्ट प्रसिद्ध आहेत. तसेच बालवयातील फुटबॉलपटूंना प्रशिक्षित करण्यासाठीची डच मॉडेल्स जगभर वापरण्यात येतात. ‘टोटल फुटबॉल’ या संकल्पनेचे जनक योहान क्राएफ यांच्या नेतृत्वाखाली हॉलंडला १९७४ आणि ७८ च्या वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गुलिट, रायकार्ड आणि बॅस्टन या त्रिकुटाच्या खेळामुळे १९८८ चा युरो कप उंचावत हॉलंडने प्रथमच गुणवत्तेला विजेतेपदाची जोड दिली. पण त्यानंतर ते सातत्याने ‘बेस्ट लूजर’ या घटकामध्येच राहिले. ‘विद्या विनयेन शोभते’ असे आपण घोकत आलो आहोत. पण डच फुटबॉलच्या बाबतीत ‘विद्या विजयेन शोभते’ हे वास्तव आहे. आणि त्याच लक्ष्यासाठी ते यंदा युरोमध्ये उतरत आहेत.

५) जर्मनी- ‘दी मानशाफ्ट’ हे जर्मनीच्या संघाचे टोपणनाव. म्हणजे एकसंध असलेला संघ! जणू काही एखादे यंत्रच ते. जर्मनीचा खेळ कायमच शिस्तबद्ध आणि लक्ष्यपूर्ती करणारा असतो. पर्यायाने त्यांच्याकडे जादुई फुटबॉलच्या कौशल्याची प्रचीती देणारे खेळाडू तुलनेने कमी तयार होतात. जर्मन लीगमध्ये प्रति सामना सरासरी तीनपेक्षा अधिक गोल होतात. जगभरातील व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये ही सरासरी सर्वाधिक आहे. तसेच जर्मन लीग सामन्यांना सर्वाधिक प्रेक्षकांची उपस्थिती लाभते. त्यावरूनच जर्मन फुटबॉलची लोकप्रियता दिसून येते. पण जर्मनीमधून फ्रान्झ बेकरबोर, लोथार मथायस या वर्ल्ड कप विनर्सचा अपवाद वगळता अभावानेच ग्लोबल स्टार घडवले जातात. कारण त्यांचा सर्व भर हा सांघिक खेळावर असतो. सांघिक खेळानेच ते प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करतात. २०१४ साली वर्ल्ड कप जिंकताना त्यांनी याच संघ कामगिरीची प्रचीती दिली. बायर्न म्युनिकचा जिगरबाज गोलकीपर मॅन्यूएल नॉयर, चेल्सीचा बचावपटू रुडिगर, मध्य फळीतील रियल माद्रिदचा टोनी क्रूझ, चेल्सीचा फॉरवर्ड टीमो वेर्नर यांचा खेळ निर्णायक ठरणार आहे.

६) स्पेन- रियल माद्रिद, बार्सिलेला, अटलेटिको माद्रिद अशा जगप्रसिद्ध क्लबच्या माध्यमातून स्पेनमधील ला-लिगा आणि तेथील खेळाडू जगप्रसिद्ध! २०१० मध्ये स्पेनने आपला पहिलावहिला वर्ल्ड कप उंचावला. तत्पूर्वी २००८ साली युरो कप उंचावला आणि २०१२ साली विजेतेपद कायम राखत त्यांनी इतिहास घडवला होता.

स्पॅनिश फुटबॉलला काहीसा ब्राझील-अर्जेटिनासारखा लॅटिन अमेरिकन टच् आहे. टिकी टाका शैलीचा- म्हणजेच छोटे छोटे पासेस देत चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या गोलात फटकावण्यासाठी चाली रचण्याची स्पॅनिश शैली. भारतीय फुटबॉलवरदेखील स्पॅनिश प्रभाव आहे. इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) बहुतांश प्रशिक्षक व परदेशी खेळाडू हे स्पॅनिश आहेत.

गेल्या काही वर्षांत मात्र इंग्लिश लीगमधील चुरस, तेथील क्लबचे मार्केटिंग आणि खेळाडूंच्या झंझावातापुढे एकूणातच स्पॅनिश फुटबॉलची भरारी काहीशी ओसरली आहे. यंदाच्या स्पर्धेत पुन्हा नवीन संघबांधणी करीत ते आव्हान देत आहेत. अनुभवी गोलकीपर युनायटेडचा डेव्हिड डिया, बचावपटू बार्सिलोनाचा जॉर्डी अल्बा, चेल्सीचा अझफिलिक्वेटा, मध्य फळीतील बार्सिलोनाचा सर्जिओ बुस्केट, लिव्हरपूलचा थिएगो, सिटीचा रोड्री, नापोलीचा फॅबियान, आघाडीला ज्युव्हेंटसला अल्व्हारो मोराटा, भारतामध्ये झालेल्या १७ वर्षांखालील वर्ल्ड कपमधील उपविजेता धडाकेबाज फेरान टोरेझ हे त्यांचे यंदाचे शिलेदार. कर्णधार सर्जिओ रॅमोस दुखापतीमुळे युरो खेळू शकणार नाही. तसेच रियल माद्रिदचा एकही खेळाडू यंदाच्या स्पॅनिश राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही.. ही ब्रेकिंग न्यूज!

७) पोर्तुगाल- रोनाल्डो.. सिर्फ नाम ही काफी हैं! २०१६ मधील युरो कप स्पर्धेत रोनाल्डोने आपले जिगरबाज, प्रेरणादायी नेतृत्व व तितक्याच कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर पोर्तुगालला पहिलेवहिले विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर आता युवा खेळाडूंची चांगली साथ त्याला मिळत आहे. विजेतेपद राखत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची स्वप्नवत अखेर करण्याचा रोनाल्डोचा मानस आहे. पण त्याचा हा मार्ग यंदाही नक्कीच खडतर आहे.

..याव्यतिरिक्त इटली प्रस्थापितांना धक्के देऊ शकतो. इटलीच्या संघाने नवीन बांधणी केली आहे. पण  बचावावर अतीच भर आणि आक्रमक खेळ करत गोलचा धडाका लावण्याचा अभाव हा त्यांचा कायमच वीक पॉइंट राहिलेला आहे. इटालियन फुटबॉल हा कधीच जगभरातील फॅन्सना आकर्षित करून घेणारा नाही. तसेच इटालियन क्लबभोवती असलेल्या माफियांच्या विळख्यामुळे तेथील फुटबॉलला एक गूढ वलय प्राप्त झाले आहे. वर्ल्ड कप जिंकण्याची किमया त्यांनी साधली असली तरी ग्लोबल स्टार निर्माण करण्यात वा जगभरातील फुटबॉलवर छाप पाडण्यात त्यांना फारसे यश आलेले नाही. कायमच ‘शापित राजपुत्र’, ‘बॅड बॉईज’ अशीच इटालियन फुटबॉलची गणना झाली आहे.

रियल माद्रिदच्या लुका मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उपविजेते झालेल्या क्रोएशियाचे आव्हान मर्यादित आहे. एखादी ट्रॉफी जिंकण्यासाठी केवळ जिगर असून चालत नाही, त्याला त्याच गुणवत्तेचा संघ व खेळाडू लागतात. स्वीडन, युक्रेन, डेन्मार्क हेही तगडे संघ आहेत, पण त्यांची धाव कायमच मर्यादित राहिली आहे. टॉटनहॅम हॉटस्पर्स आणि रियल माद्रिदचा स्टार गॅरेथ बेल आता थकला आहे. त्यामुळेच गेल्या स्पर्धेप्रमाणे तो वेल्स संघाला एकहाती किती भरारी मारून देऊ शकेल याबाबत शंकाच आहे. परिणामी गेल्या खेपेस आईसलँड संघाने मारलेल्या मुसंडीप्रमाणे यंदाच्या स्पर्धेत डार्क हॉर्स, अंडरडॉग असा सध्या तरी कोणताच संघ दिसत नाही. प्रमुख मातब्बर दावेदारांमधील तुल्यबळ लढाई असेच यंदाच्या युरो कप स्पर्धेचे चित्र दिसते आहे.

 (लेखक व्हिवा फुटबॉलमासिकाचे संपादक आहेत.)

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Predicting the winner of euro 2021 european championship euro cup 2021 zws
First published on: 06-06-2021 at 01:06 IST