‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ यांसारख्या प्रायोगिक नाटकांमधून आणि पुढील काळात सिनेमा-मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ प्रयोगशील कलावंत रमेश मेढेकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे सुहृद ज्येष्ठ कलावंत चंद्रकांत काळे यांनी जागवलेल्या आठवणी..

१९६९ – ७० चा काळ. सर परशुरामभाऊ महाविद्यालय. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला. कलाविभागाची बैठक. प्रा. विजय देव आमचे कलाप्रमुख. पुरुषोत्तम करंडकची एकांकिका आणि एक पूर्ण लांबीचं तीन अंकी नाटक असा कलाविभागाचा मुख्य कार्यक्रम असायचा. तेव्हा देव सरांनी एकांकिका आणि नाटक दिग्दर्शित करण्यासाठी एकाला निमंत्रित केलं होतं. मग सरांनी बैठकीत त्या पंचविशीतल्या तरुणाची ओळख करून दिली.. रमेश मेढेकर!

त्यापुढील दोन वर्षांत रमेशनं ‘कैद’ आणि ‘लिफ्ट’ या दोन गंभीर एकांकिका आणि ‘प्रेमा, तुझा रंग कसा?’ व ‘घेतलं शिंगावर’ अशी दोन विनोदी नाटकं बसवली. मी आणि मोहन गोखले ही त्याच्या टीमची प्रमुख पात्रं असायची. शाळेत ‘राजकन्येची सावली हरवली’ आणि ‘पाटलाच्या पोरीचं लगीन’ या बालनाटय़ांनंतर आमची गाठ पडली होती ती एका कडवट प्रायोगिक दिग्दर्शकाशी. तेव्हा तो पी.डी.ए. (प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन) या संस्थेत होता. त्याची गाठ पडेपर्यंत मला पुण्यातील प्रायोगिक घडामोडींची काहीच कल्पना नव्हती. त्याच्यामुळेच ‘प्रायोगिक रंगमंच’ हे शब्द आणि तो एकदमच आयुष्यात आले.

तो ‘भसाभसा’ या विशेषणाला लाजवील असा सिगरेटी ओढून फुकत असे. पी.डी.ए.मध्ये भूमिका आणि प्रकाशयोजना अशी दुहेरी जबाबदारी त्यानं घेतली होती. तालमीच्या काहीच दिवसांत तो अरे-तुरेवर आला. तो कडक शिस्तीचा नाटय़धर्मी दिग्दर्शक होता. जब्बार पटेलांसारख्या खंद्या दिग्दर्शकाच्या मुशीत तो तयार होत होता आणि त्या प्रयोगशील-कलात्मक मुशीची तोंडओळख त्याच्या निमित्तानं आम्हाला होत होती. रंगमंचीय हालचाली, प्रकाशयोजना, नेपथ्य, पाश्र्वसंगीताचे तुकडे, अभिनय या बाबतीत तो कमालीचा सजग आणि आग्रही होता. प्रायोगिकतेतल्या व्यावसायिकतेचे दर्शन तो आम्हाला घडवत होता.

.. आणि ‘कैद’च्या रंगीत तालमीच्या दिवशी ‘‘ए आज रंगीत तालीम बघायला येणारेय, नीट तालीम करा’’ मोठा धूर काढीत रमेशनं आम्हाला बजावलं. जब्बार पटेल हे त्यावेळी हौशी रंगमंचावरलं फार दबदबा असलेलं नाव. त्याची नाटकं, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याची महती रमेशच आम्हाला सांगत असे. जब्बार तालमीला येऊन गेला आणि मग माझं उभं आयुष्यच बदलून टाकणारी घटना घडली. रमेशचं बोट धरून मी आणि मोहन गोखले पी.डी.ए.त दाखल झालो. मग वर्षभरातच जब्बार पटेलांनी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाची जुळवाजुळव सुरू केली. आणि मी त्या नाटकात ठसठशीतपणे आलो. रमेशनं आम्हाला कुठं आणलं होतं याची तेव्हा कल्पना आली होती की नाही, ते नाही सांगता येणार. पण आता, या घडीला मनात केवळ कृतज्ञताच दाटून येते.

‘घाशीराम..’नंतर तो माझा सहकलाकार झाला. ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ याही नाटकांमधून त्यानं माझ्याबरोबर काम केलं. त्याच्या आवाजाला एक खणखणीत धार होती. ‘महानिर्वाण’मधला चाळकरी आणि त्याचा तो पिंडाचा सीन. या सीनच्या शेवटी तो कावळ्याला झापतो- ‘‘इतका वेळ लावलास पिंडाला शिवायला भाडखावं. पुढच्या वेळी दर्भाचा लावून तुझी ठासतो थांब. वर आंबेमोहोर मागतोय चुत्तड!’’ थिएटरचं छप्पर तो अक्षरश: उडवीत असे. ‘बेगम बर्वे’मधल्या बावडेकरच्या हताश मध्यमवर्गीय बारीकसारीक छटांसह रमेश ती भूमिका भन्नाट रंगवीत असे.

संसार ऐन भरात असताना रमेशची बायको मृत्यू पावली. तो धक्का त्यानं पचवला. पण तसा तो एकटा झाला. पण हा एकटेपणा निराशेत घोळवत त्यानं कधी मिरवला नाही. पण सल कुठंतरी राहिला असेलच ना.

त्यानं कलाकार म्हणून व्यावसायिक रंगमंच कधीच जवळ केला नाही. निवृत्तीनंतर गेली १४-१५ र्वष तो सिनेमा आणि मालिकांमध्ये बारीकसारीक कामे करीत राहिला. त्यावरून त्याला मी चिडवत असे. तर- ‘‘तू कशाला बघतोस, साला आपला वेळ जातो ना.’’ आणि मग मलाही ते खरं वाटायला लागलं.. वेळ जातो.

‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेनं मात्र त्याला मालिकेतल्या लोकांसारखी चांगली प्रसिद्धी दिली. ते वर्षभर त्याच्या चेहऱ्यावर ती छान दिसत राही. टपरीवर कटिंग चहा आणि सिगरेटच्या भरघोस धुरामध्ये त्याचे डोळे लुकलुकत.. ‘‘चंद्या, च्यायला कमाल झाली. लोक सोडत नाहीत रे! गर्दी करतात. बायकासुद्धा फोटोबिटो काढतात. मजा आहे रे या मीडियाची..’’

त्यानं ती मजा छान लुटली. पुढे ते संपलं. मग पुढची र्वष असंच टपरीवर भेटणं. सिगरेटचे झुरके. टपरीपुढच्या साचलेल्या पाण्यात ती जळतीच फेकणं. दिवसभरात १००-१५० पानं वाचन, इत्यादी..

तो गेला त्याच्या आदल्या आठवडय़ात टपरीवर भेटलो. कटिंग चहा आणि सिगरेटी. म्हटलं, ‘‘मेढेकर, पंचाहत्तरी होत आली. थांबवा ही सिगरेट.’’ ‘‘जाऊ दे रे चंद्या, आपलं ठरलेलं आहे- आपण सिगरेटवरच जाणार.’’

.. आणि तो गेला.

chandrakantkale51@gmail.com