‘लोकरंग’मधील (१५ जून) ‘सुंदर ही दुसरी दुनिया’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. लेखकाने अतिशय वास्तववादी चित्र मांडलं आहे. मराठवाडाच नाही तर इतरही भागात हे लोण पसरलं आहे. बापाचा पैसा दिसणाऱ्या मुलांना शिकायचीही गरज वाटत नाही. आमदार-खासदारांच्या टवाळ कार्यकर्त्यांमध्ये आता शिक्षक वर्गही सामील होऊ लागला आहे. अशा वातावरणामुळे पुढच्या पिढीचं काही खरं नाही अशीच सर्वत्र चर्चा ऐकू येते. लेखकाने नमूद केलेल्या प्रयत्नांचे लोण आमच्यापर्यंत पोहचेल अशी आशा करते.
- सारिका चव्हाण, चाळीसगाव
लोकशाही रसातळाला जाते की काय?
‘लोकरंग’मधील (१५ जून) ‘आजच्या परिस्थितीचे कठोर विश्लेषण’ हे प्रा. राजा होळकुंदे यांनी दत्ता देसाई लिखित ‘सत्ता बदल: राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद’ या पुस्तकावर लिहिलेले समीक्षणात्मक परीक्षण वाचले. ते अतिशय आवडले. हे पुस्तक विचार करायला लावणारे आहे. आज देशात लोकशाही अतिशय गुळगुळीत झाली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत सामाजिक लोकशाही आनंदाने नांदणार नाही तोपर्यंत खरी लोकशाही यशस्वी होणार नाही. सध्या देशातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बघता बघता लोकशाही रसातळाला जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. बहुतांश नागरिकांना संविधानाचा धाक राहिला नाही. लोकप्रतिनीधीला शपथविधीतील विधानांचा विसर पडतो आहे. एक दिवसाचा शपथविधी झाला की आपली पेन्शन पक्की अशी भावना अनेक लोकप्रतिनिधींची झाली आहे. वास्तविक आपण लोकसेवक आहोत, याचे भान ते विसरत चालले आहेत.
- प्रा. दिगंबर कानडजे, बुलडाणा
फिनोलेक्सची जिंगल
‘लोकरंग’मध्ये (१३ जुलै) ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमाअंतर्गत ‘परफेक्शनचा आग्रह हवा कशाला?’ या लेखात तौफिक कुरेशी यांनी आपले विचार मांडले. तौफिक कुरेशी यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. यात त्यांनी ‘हिट’, ‘फिनोलेक्स’, आणि ‘जिंगल्स’चा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. हा उल्लेख वाचून मन थेट भूतकाळात गेले. १९७९ साली मी आणि माझा वर्गमित्र सुमंत रानडे याला तेव्हाच्या ‘फिनोलेक्स प्लास्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये (आत्ताच्या फिनोलेक्स इंडस्ट्रिज लिमिटेड) सेल्स असिस्टंट म्हणून नोकरी लागली. ही आमची पहिलीच नोकरी. आमचे तेव्हाचे व्यवस्थापक (सेल्स अॅडमिनिस्ट्रेशन) सी. के. बालानी यांनी आम्हा दोघांना ‘फिनोलेक्स पाइप्स’साठी मराठीत रेडिओ जिंगल बनवा असे सांगितले. मी आणि सुमंत समोरासमोर बसलो होतो. हाती एक बॉलपेन आणि स्क्रॅच पॅड होते. सुचलेली पहिली जिंगल फार जमली नाही. ती खोडून टाकली. मात्र सुचलेली दुसरी जिंगल ‘फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावाणी!’ ही उत्स्फूर्तपणे अवतरली आणि सी. के. बालानी यांनी तीच कायम केली आणि पुढे त्या रेडिओ जिंगलला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आज २०२५ सालीही ( तब्बल ४६ वर्षांनी ) आम्ही केलेली जिंगल रेडिओवर ‘गेय’ स्वरूपात ऐकायला मिळते याचा मनस्वी आनंद आहे. ही रेडिओ जिंगल अविस्मरणीय अशीच ठरली.
- डॉ. विकास इनामदार