‘लोकरंग’ (२४ डिसेंबर) मध्ये ‘खुदा की आवाज!’ हा डॉ. चैतन्य कुंटे यांचा लेख वाचला. रफी म्हणजे भारतीय सिनेसंगीताला पडलेले स्वप्न आहे. मित्रत्वाचे उपकार मानणारे गीत ‘एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो’ असो, ‘एहसान तेरा होगा मुझ पर’ हे प्रेमगीत असो वा ‘दोनों ने किया था, प्यार मगर’ हे विरहगीत असो. ‘मन तडपत हरी दर्शन को आज’ हे भक्तिगीत असो वा ‘यह देश है वीर जवानों का’ हे देशभक्तिगीत असो. गीतकाराचे शब्द संगीतकाराच्या रचनेद्वारे स्वराच्या माध्यमातून आपल्या हृदयापर्यंत पोहोचवून दु:ख, आनंद, विरह अशा विविध भावनांचे रंग जिवंत करण्याचे जेवढे सामर्थ्य महम्मद रफी यांच्या गायनात आहे; तेवढे अन्य गायकांमध्ये खचितच आढळते. रफीसाहेबांच्या गाण्यांवर आजही जेवढे लोकप्रिय रिमिक्स बनतात, तेवढे अन्य कुणाचे होताना दिसत नाही. गाण्यातून स्वर्गीय आनंद मिळवून देण्याचे सामर्थ्य असलेल्या या स्वर्गीय गंधर्वगायकाला जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन! -किशोर बाजीराव थोरात
मुकेश, किशोरशी तुलना योग्य नाही
‘लोकरंग’ (२४ डिसेंबर) मध्ये ‘खुदा की आवाज!’ हा डॉ. चैतन्य कुंटे यांचा लेख वाचला. महम्मद रफी हे नि:संशय एक उत्तम गायक होते. परंतु त्यांना मुकेश व किशोर कुमारच्या रांगेत बसविणे अजिबात पटले नाही. मुकेशच्या आवाजात दर्द तरी आहे, किशोर कुमारकडे तर काहीच नाही आणि अशा गायकांशी तुलना करून लेखकांनी महम्मद रफीवर अन्याय केला आहे. वास्तव हे आहे की, या दोघांची महम्मद रफींशी तुलनाच होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा असा की, महम्मद रफी मंद्र व मध्य सप्तकात जेवढे श्रवणीय आहेत तेवढे श्रवणीय तार सप्तकात नाहीत. याचं उत्तम उदाहरण ‘ओ दुनिया के रखवाले’ हे गाणे आठवा. गाण्याच्या शेवटी वरील ओळ तीनदा तार स्वरात गायली जाते. त्यातील पहिल्यांदा ओळ सह्य वाटते, दुसऱ्यांदा असह्य वाटते तर तिसऱ्यांदा चक्क आरडाओरडा वाटतो. संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी हा प्रयोग करून काय साधलं हे त्यांचं त्यांनाच माहीत! संगीत दिग्दर्शकाच्या हट्टापायी महम्मद रफींना उगाच उणेपणा आला, असं खेदाने म्हणावे लागतं. बाकी मंद्र सप्तकात रफींना तोड नाही, मध्य सप्तकात उत्तम, तर तार सप्तकात सह्य, हे रफींचे यथार्थ वर्णन होऊ शकेल. ‘बेटा बेटी’ चित्रपटातील ‘राधिके तुने बन्सी चुरायी’ हे गाणे ऐका. यातील सुरुवातीचा मंद्र सप्तकातील आलाप तर निव्वळ मधाची धार आहे. त्यापुढे सगळे गायक फिके पडतात! -मधुकर पानट, तळेगाव दाभाडे
आणखी वाचा-खुदा की आवाज!
मोठे गायक आणि माणूसही!
‘लोकरंग’ (२४ डिसेंबर) मध्ये ‘खुदा की आवाज!’ हा डॉ. चैतन्य कुंटे यांचा लेख वाचला. पुण्यातील मंतरलेले दिवस आठवले. एक महान अष्टपैलू गायक असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यांच्या गाण्यातील आणि अर्थातच गायकीतील वैविध्य खरोखरच अचंबित करणारे आहे. ‘प्यासा’ चित्रपटातील सामाजिक विषमतेवर कोरडे ओढणारी, आग ओकणारी भाषा लिहिणारा साहीर जेव्हा ‘हम दोनो’मधील ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं’सारखे हळुवार रोमँटिक गीत तितक्याच सहजतेने लिहितो तेव्हा आपण अचंबित होतो. तशीच परिस्थिती रफीसाहेबांच्या आवाजाची आहे. ‘प्यासा’मधील ‘जला दो, जला दो, जला दो ये दुनिया’ हे गीत ते इतक्या त्वेषाने सादर करतात की, समाजव्यवस्थेवर ओढलेले कोरडे आपल्याला जाणवतात आणि संतापाने आपल्या मुठी वळतात; पण त्याचबरोबर साहिरचेच ‘हम दोनो’मधील ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं’ किती हळुवारपणे सादर करतो, प्रेयसीला मनवणारा प्रियकर नजरेसमोर साकारतो. जॉनी वॉकरपासून दिलीपकुमापर्यंत आणि मेहमूदपासून ते राजकुमापर्यंत कुणालाही त्यांचा आवाज चपखलपणे बसतो. इतकेच नव्हे तर गाण्यातून नायकाचा अभिनय प्रतिबिंबित होत असे. ‘गुमनाम’मधील ‘हम काले है तो क्या होगा दिलवाले है’ हे गीत तो मेहमूदच्या गूढ, गंभीर मूडमध्ये सहजतेने गातो, तितक्याच तादात्म्यतेने तो ‘चित्रलेखा’मधील ‘मन रे तू काहे न धीर धरे’ हे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे गीतही सादर करतो. त्याच्या आवाजातील या बहुरंगी छटा मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत आणि म्हणूनच ‘खुदा की आवाज’ हे त्यांच्या गायकीचे वर्णन मनोमन पटते. गायक म्हणून ते हिमालयाएवढे उंचीचे होतेच, एक संवेदनशील माणूस म्हणून त्यापेक्षाही फार मोठे होते. एक अतिशय साधा सरळ आणि पापभिरु माणूस अशीच त्यांची ओळख होती. नौशादसाहेबांनी एका कार्यक्रमात त्यांची संवेदनशीलता अधोरेखित करणारा एक प्रसंग सांगितला होता. असेच एकदा ते ध्वनिमुद्रण संपवून घरी जात असताना रस्त्यात थंडीने कुडकुडत झोपलेले भिक्षेकरी पाहिले आणि ते कमालीचे व्यथित झाले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी २००/२५० ब्लँकेट्स खरेदी केले आणि त्या भिक्षेकऱ्यांना दिले. खरं तर रफीसाहेब अल्पायुषी ठरले हे आपले दुर्दैव. -अशोक आफळे, कोल्हापूर</p>