‘लोकरंग’ (११ मे) मधील गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातला ‘निरोगी’ हा लेख वाचला नि एका दुर्मीळ राजकारण्याबद्दलचं लेखन मनोमन सुखावून गेलं. कोणताही पूर्वेतिहास नसताना व कोणतेही संस्थात्मक राजकारण नसताना आर. आर. आबा जननायक ठरले ही सद्या:स्थितीतली अत्यंत दुर्मीळ गोष्ट!

वेगवेगळ्या समारंभात मला आमचे गावांतील पाहुणे भेटतात. त्यांची गावं अर्थात आबांच्या मतदारसंघातील असल्यानं प्रत्येकाचा आबांशी या ना त्या कारणाने संबंध आलेलाच आहे ही गोष्ट लपून राहत नाही. ही संख्या इतकी प्रचंड आहे की असा जनसंपर्क यापूर्वी वसंतदादांचाच होता, असे गेल्या पिढीतील लोक ठामपणे सांगतात. तो ठामपणा व आबांबद्दलचा विश्वास किती असावा तर आबांच्या राजकीय विरोधकांना म्हणजे संजय पाटील यांसारख्यांच्या समोर तोंडावर बोलण्याइतका असतो. आता यात काय विशेष असे वाटेल, पण संजय पाटील यांची त्या भागातील राजकीय दहशत लक्षात घेतली तर हा किती मोठ्ठा धोका लोक पत्करत आहेत याची कल्पना येते. हे का? तर निव्वळ आबांचा जनसंपर्क आणि तोही आत्मप्रेरणेने लोकांमध्ये विश्वास पेरणारा!

चौथीच्या शिष्यवृत्त्ती परीक्षेत गुणवत्त्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आबा वस्तीवस्तीवर जात होते. नुकताच डी.एल.एड् पदविका घेतलेला एक जण मला एस.टीत भेटला. त्याने त्याच्या आबांकडून झालेल्या अशा सत्काराबद्दल माहिती दिली. आबा कसे प्रत्येकाला जवळ घेऊन भारावून सोडत होते हे त्यानं सांगितलं. प्रेरणेचं बीज कोवळ्या मनमातीत पेरणारा हा साधा, निर्धन माणूस असा कसा विसरता येईल?

एक माझा अनुभव… जेम्स लेन प्रकरण त्यावेळी राजकीय, सामाजिक अवकाश व्यापून होतं. आबा गृहमंत्री होते. सांगलीत एका हॉस्पिटलमध्ये आबा जवळच्या नातेवाईकास भेटायला आलेत असा त्या डॉक्टरपुत्राचा मला फोन आलेला… त्याला तो आनंद शेअर करायचा होता… लवकर ये असा एक निरोप त्यात दडलेला! माझ्या मनात आबांबद्दल प्रचंड राग होता. लेन प्रकरण आबांनी म्हणावं तसं लावून धरलं नाही अशी माझी भावना होती. मी तडक हॉस्पिटल गाठले. आबा बाहेर येण्याची वाट पाहिली. पोलिसांच्या वर्तुळात आबा दिसले नि कसं काय माहीत नाही, पण मी अचानक पुढे होऊन आबांना हाक दिली. ऐकू येऊनही आबा थांबले नाहीत… ते घाईत होते. मी आता रागाने हाक दिली. त्यावर जिथल्या तिथेच आबा वळले. मला जवळ घेतले. मी म्हणालो, ‘‘गृहमंत्री म्हणून तुम्ही लेन प्रश्न तत्परतेनं सोडवण्याऐवजी दुर्लक्ष करत आहात.’’ आबा बारीकसं हसले नि म्हणाले, ‘‘काय करावं मग?’’

मी म्हणालो, ‘‘लेनला जनतेच्या ताब्यात द्या… लोकभावना समजून घ्या आबा!’’ त्यावर आबांचे शब्द आजही स्पष्टपणे आठवतात, ‘‘मी अॅडव्होकेट आहे. कायदा मोडण्याचे पाप कुणाकडूनही होणार नाही हे मी आधी बघणार ना? आता तुझ्या सूचनेवर परत नीट विचार कर,’’ असं म्हणून वार्ताहरांसमोर मला जवळ घेऊन त्यांनी काही बाईट दिले. त्यात लेनप्रश्नी सरकार योग्य ती कारवाई करेल, पण तरुणांनी भावनेच्या भरात शांतताभंग होईल असे वर्तन करू नये असे आवाहनही केले. ते शेवटचे वाक्य माझ्यासारख्या असंख्य संतप्त तरुणांसाठीच होते. लेखकाने अशा या जननायकांबद्दलचे स्वानुभव तमाम मराठीजनांस कळवलेत त्याबद्दल आभार! आबांप्रतिच्या आमच्या भावना आणखी उन्नत होण्यास हे लेखन फार महत्त्वाचे ठरेल हे निश्चित !

दीपक ज. पाटील, सांगली

केवळ राजकारणी नव्हे, तर मनस्वी माणूस

लोकरंग मधील (११मे) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘निरोगी’ हा लेख वाचला. लेखकाने माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा एक वेगळाच, भावनिक आणि मानवी चेहरा उलगडला. अनेकदा राजकारण्यांकडे लोक फक्त त्यांच्या निर्णयांच्या, वक्तव्यांच्या आणि पदांमधूनच पाहतात. पण या लेखातून आबा एक संघर्षशील, संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येतात.

२६/११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी न दिलेलं एक वाक्य त्यांच्या नावावर लावलं गेलं, ही गोष्ट खूप त्रासदायक वाटते. ‘बडे बडे शहरों में…’ हे वाक्य जनमानसात इतकं रुजलं की आबांच्या प्रतिमेलाच ते भोवलं. माध्यमांनी ते चुकीचं दाखवणं आणि समाजाने ते न विचार करता स्वीकारणं, ही आजच्या माहितीच्या काळातील एक धोकादायक बाब लेखक सूक्ष्मपणे दाखवतो.

डान्स बार बंदीबाबत लेखक आणि आबा यांच्यातील वैचारिक मतभेद आणि त्यावर झालेली त्यांची भेट, ही लेखातील सर्वात प्रभावी घटना वाटते. आबांच्या आयुष्यातील दारिद्र्य, व्यसनामुळे विस्कटलेला संसार आणि त्यातून निर्माण झालेली संवेदना त्यांच्या निर्णयांना आकार देते, हे वाचताना त्यांच्या निर्णयामागचं व्यक्तिगत वास्तव समजतं. लेखकानेही हे कबूल केलं की आपल्याला त्या भावनांचा अपमान करायचा अधिकार नाही.

हे संपूर्ण चित्रण एका राजकारणातील माणसाच्या ‘माणूस’ असण्याची साक्ष देतं. आज जेव्हा बहुतेक नेते स्वार्थ, प्रसिद्धी आणि ताकद यामध्ये अडकलेले दिसतात, तेव्हा आबांसारखा नेता आठवतो आणि त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते.

राजकारणात कार्य करताना आदर्शवाद टिकवून ठेवणं आणि वैयक्तिक दु:खातून सार्वजनिक धोरणांची दिशा ठरवणं- ही आबांची मोठी खुबी होती. एकूणच, लेखकाने आबांबद्दलचा आदर, त्यांच्याशी झालेलं मतभेदांचं प्रामाणिक विश्लेषण आणि शेवटी त्यांच्या जाण्याने झालेली पोकळी हे सगळं अतिशय साध्या, पण प्रभावी भाषेत मांडलं आहे. हा लेख वाचताना एक राजकारणी नव्हे, तर एक मनस्वी, भावुक आणि खरा माणूस आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि याचं श्रेय लेखकाच्या मोकळ्या मांडणीला जातं.

सतीश घुले, अहिल्यानगर

फक्त आबा!

‘लोकरंग’ (११ मे) मधील गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातला ‘निरोगी’ हा लेख वाचला. लेखकाने आठवणींच्या हिंदोळ्यावर थेट काळजाला हात घालणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून दिली. डान्स बारबाबत माझंही मत लेखकासारखंच होतं. त्यात थोडी बेफिकिरीही होती. म्हणजे ‘जाणारे जातील ना! ही रोखठोक भूमिका होती. याच संदर्भात आंदोलनकर्त्यांच्या एका बैठकीमध्ये माझा आबांशी सामना झाला. मी जरा आगाऊ, म्हणून थेट विषयाला हात घालायची जबाबदारी माझ्यावर आली होती. मी पण ‘घाबरतो की काय?’ या थाटात होतो. गृहमंत्री आले, मी ओपनिंग बॅट्समन. मी सुरुवात केली, ‘‘हे बघा आबासाहेब!’’ ‘‘आबासाहेब नाही.’’ समोरून नरम सौम्य आवाज ऐकू आला ‘‘फक्त आबा! आबासाहेब म्हणजे थोरले महाराज! माझी तेवढी पात्रता नाही.’’ फूऽऽ स… माझी सारी हवाच गेली. पुढे काय बोलावे तेच कळेना. तयारी करून आलेले सारे मुद्देच विसरून गेलो. चक्क तत्पप् व्हायला लागलं. पहिल्याच गुगलीवर आबांनी माझी विकेट काढली होती. नंतर अनेकदा त्यांच्या चावडीवर त्यांच्याशी भेट झाली. त्यांचा दरबार असा नसायचाच, त्याला चावडीच म्हणावं असंच चित्र असायचं. तिथे खरोखरीचा गावकुसातला आणि वेशीबाहेरचा महाराष्ट्र दालनात बसलेल्या माणसांतून दिसायचा. त्यातल्या एकाही माणसात कसलीच मिजास नसायची किंवा अक्कड नसायची ‘‘ये बग आबा… ’’ अशा शब्दांनी म्हातारं आपलं गाऱ्हाणं सांगायला सुरुवात करायचा आणि शेवटी ‘आता तुम्ही म्हणाल तसं…’ या शब्दांनी शेवट व्हायचा. एकच खंत मात्र मनात आजही आहे की, युवकांना व्यसनांपासून परावृत्त करू पाहाणारा ‘आमचा आबा’ स्वत: मात्र पुडीच्या व्यसनाने गेला. नियतीचा खेळ असाच काहीसा उफराटा असतो.

– अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी, मुंबई</p>

उत्तम व्यक्तिमत्त्वाचा परिचय

‘लोकरंग’मधील (११ मे) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील गिरीश कुबेर यांचा आर. आर. पाटील (आबा) यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा ‘निरोगी’ हा लेख वाचला. आबांना तंबाखू तोंडात ठेवण्याची सवय होती हे आबा आणि गिरीश कुबेर या दोघांच्या पहिल्या भेटीच्या प्रसंगाचं वर्णन करताना लिहिलेल्या वाक्यावरून (पांढरी सफारी, पायात चपला, तोंडात बार भरलेला आणि चेहऱ्यावर मिश्कील हसू.) दिसून येतं. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या स्वत:च्या आई-वडिलांचा संसार मातीमोल झालेला आबांनी पाहिला होता. त्यांनी घेतलेला डान्स बारबंदीच्या निर्णयामागे ही पार्श्वभूमीवर होती.

– सावळाराम मोरे, नालासोपारा

आबांना विसरता येणार नाही

‘लोकरंग’मधील (११ मे) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील गिरीश कुबेर यांचा आर. आर. पाटील यांच्यावरील लेख वाचला. ‘उंची लहान, पण कीर्ती महान’ अशी छाप आपल्या राजकीय कारकीर्दीत आबांनी सोडली. घालायला नीट कपडे नाहीत, बऱ्याचदा जिल्हा परिषद कार्यालयाच्या पडवीतच रात्र काढणारी व्यक्ती स्वकष्टाने राज्याचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून छाप पाडते. विशेष म्हणजे हलाखीच्या परिस्थितीचे अवडंबर माजवून प्रतिमासंवर्धन करण्यापेक्षा, आपल्या कामाने समाजमनाने नाव कोरते. आबांनी ‘ब्लॉग’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याची सुरुवात केली होती. आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वच्छ आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून आपला ठसा उमटवला आणि म्हणूनच ते गेल्यानंतरही त्यांची दाखल पत्रकारांकडून घेतली जाते. शरद पवार यांच्यासारख्या राजकीय सोनाराला वसंतदादांच्या माध्यमातून ‘आबा’रूपी मेरुमणी सापडले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मुकुटात योग्य ठिकाणी जडवले. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या आबांना महाराष्ट्र सहजासहजी विसरणार नाही.

– परेश संगीता प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)

चॅनेलवाल्यांनी कोट्यवधींना मूर्ख बनवले!

‘लोकरंग’ (११ मे) मध्ये ‘युद्धस्य कथा!’ हा पार्थ एम. एन. आणि निळू दामले यांचा ‘माध्यमांचा धिंगाणा’ हे दोन्ही लेख वाचले. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांचे कारनामे हे काही आजचे नसून ते दीर्घकाळ चालू आहेत आणि ते कायमस्वरूपी संपणार नाहीत. कारण पाकिस्तानमधील राज्यकर्ते त्याला खतपाणी घालतात हे सत्य लपून राहिलेले नाही. आता या घटनेनंतर त्याला अतिरंजित बातम्यांचे स्वरूप द्यायचे कारण म्हणजे त्याशिवाय आपल्या बात(म्यां) ना रंग येणार नाही

हे ठरवून केल्यासारखे प्रत्येक चॅनेलवर चालू होते. यात हिंदी चॅनेल्सचा हात कुणी धरला नसता, पण मराठीतील नामवंत म्हणून गाजावाजा करणाऱ्या चॅनल्सनीही आपला टीआरपी किती आहे, आपले चॅनेल किती प्रेक्षक पाहतात याच्या ईर्षेपोटी अक्षरश: सियालकोट, लाहोर, इस्लामाबाद इतकेच नव्हे तर अगदी कराचीदेखील भारतीय लष्कराच्या बॉम्ब वर्षावात नेस्तनाबूत झाली अशा धादांत खोट्या बातम्या प्रसारित केल्या. कोट्यवधी भारतीय जनता वेडीपिशी झाली होती, कारण या चॅनलने आणि त्यांच्या साहसी पत्रकारांनी थेट तिथे जाऊन हे प्रसारित केल्याप्रमाणे बातम्या दिल्या जात होत्या. त्यामुळे भारत आता पाकिस्तानचे अस्तित्व संपवणार असाच समज झाला होता. आता राहिला प्रश्न म्हणजे उरी, पुलवामासारख्या घटना घडूनही आणि जम्मू-काश्मीरचे संरक्षण आम्हीच करू शकतो हे छातीठोकपणे सांगून पाकिस्तान फक्त आम्हालाच वटणीवर येऊ शकतो असे म्हणणाऱ्यांना मात्र पहलगाममुळे भानावर यावे लागले आणि त्यातून पाकिस्तानस्थित दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यातून याला वेगळा रंग देऊन या चॅनेलवाल्यांनी मात्र खोट्या बातम्या देऊन कोट्यवधी भारतीय लोकांना मूर्ख तर बनवलेच, पण आपला विश्वासही गमावला आहे.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</strong>

परखड भाष्य

‘लोकरंग’मधील (११ मे) ‘माध्यमांचा धिंगाणा’ या निळू दामले यांच्या लेखात विविध माध्यमे, सोशल मीडिया, टीव्ही चॅनेल्सवर सुरू असलेल्या फेक न्यूज, खोटे व्हिडीओ यावर केलेले भाष्य परखड व योग्यच आहे. जगभरात याच गोष्टींना महत्त्व आलेले असून, कोणती बातमी खरी, कोणती खोटी हेच समजत नाही. त्याचप्रमाणे एखादी घटना घडल्यावर सोशल मीडियावर जी उलटसुलट मते व्यक्त होतात त्यात कोणाची तरी बाजू घेण्याचा उद्देश स्पष्ट दिसतो. सर्वसामान्य माणसापुढे अनेक समस्या असताना ज्या गोष्टींची फारशी माहिती नसते त्यावर विचार व्यक्त करून काय होणार? वृत्तपत्रे आजही महत्त्वाची आहेत हे अधोरेखित होते. – प्र. मु. काळे, सातपूर कॉलनी, नाशिक