संजय पवार यांचे ७ डिसेंबरचे ‘तिरकी रेघ’ हे सदर वाचले. ‘कोण करेल जात-धर्ममुक्त भारत?’ या लेखात त्यांनी पंढरपूरची वारी आणि महापरिनिर्वाणदिन यांची तुलना करताना मध्येच शिवाजी पार्कवासीयांवर व्यर्थ आगपाखड केली आहे. ती खटकली. वारकरी पंढरपूर घाण करतात म्हणून दादरकरांनीही घाणीबद्दल सहनशीलता दाखवावी, हा कुठला युक्तिवाद? पंढरपूर गलिच्छ अवस्थेत आहे याबद्दल दुमत नसावे. तेथील राखीव मतदारसंघातून एकदा निवडून आलेल्या खा. रामदास आठवले यांनी परिसर स्वच्छतेबाबत आणि डोक्यावरून मैला वाहण्याच्या घृणास्पद पद्धतीबद्दल काय पावले उचलली, ते समजले तर बरे होईल.
शिवाजी पार्कला माझे स्वत:चे लग्न चैत्यभूमीच्या शेजारी असलेल्या सूर्यवंशी क्षत्रिय समाजाच्या सभागृहातच ६ डिसेंबर १९७८ रोजी झाले आहे. माझ्या महितीतली आणखीही काही लग्ने त्याच तारखेला १९८० ते १९८५ सालापर्यंत झालेली आहेत आणि सांगण्यास आनंद वाटतो की, तेव्हा कोठल्याही प्रकारची घाण अथवा गैरसोय त्या परिसरात होत नसे. ही झुंबडीची प्रथा नंतरची होय. तसेच त्या दिवसाला राजकीय परिमाण मिळाल्यानंतर गर्दीची बेसुमार वाढ होत गेली. तेव्हा पंढरपूर कसे स्वच्छ होईल यावर उपाय शोधला जावाच; पण शिवाजी पार्कला होणारा त्रास व घाण कशी समर्थनीय आहे याबद्दल ‘तिरपागडय़ा रेघा’ मारू नयेत.
– आल्हाद (चंदू) धनेश्वर
काही अप्रतिम गाण्यांवर अन्याय
डॉ. मृदूला दाढे-जोशींनी ७ डिसेंबरच्या लेखातून सी. रामचंद्र यांच्या आठवणी जागवल्या. पण या लेखात काही अप्रतिम गाण्यांचा अनुल्लेख मात्र खटकला. त्यांना ‘आशा’ चित्रपटातल्या ‘इना मिना डिका’ या लोकांच्या मनावर गारुड करणाऱ्या गाण्याचा कसा विसर पडला? कवी प्रदीपजींनी लिहिलेलं आणि लताबाईंनी गायलेलं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे अजरामर गाणं- जे गाणं ऐकून पं. जवाहरलालजींच्या डोळय़ांत अश्रू उभे राहिले.. त्याचं संगीत सी. रामचंद्रजींनी दिलं होतं. त्या गाण्याचा उल्लेख वगळून या महान संगीतकारावर मोठा अन्याय झाला आहे, असे वाटते.
– राजन कोचर (माजी न्यायमूर्ती), मुंबई.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2014 रोजी प्रकाशित
व्यर्थ आगपाखड
संजय पवार यांचे ७ डिसेंबरचे ‘तिरकी रेघ’ हे सदर वाचले. ‘कोण करेल जात-धर्ममुक्त भारत?’ या लेखात त्यांनी पंढरपूरची वारी आणि महापरिनिर्वाणदिन यांची तुलना करताना मध्येच शिवाजी पार्कवासीयांवर व्यर्थ आगपाखड केली आहे.

First published on: 21-12-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reply on lokrang