जैन : त्यासम तेच!
गिरीश कुबेर यांचा अशोक जैन यांच्यावरील ‘ओळख ठेवा!’ (२३ फेब्रुवारी) लेख खूप आवडला. जैन अजातशत्रू असावेत. ते उत्साहाने कायम रसरसलेले असत. ते समोरच्याला परकेपणा वाटू न देता दिलखुलासपणे वागायचे. ज्याप्रमाणे जयवंत दळवी यांच्या ‘ठणठणपाळ’च्या नकला झाल्या, पण त्या कुणालाच जमल्या नाहीत, तसेच जैन यांच्या ‘कानोकानी’प्रमाणे लिहिण्याचासुद्धा काहींनी प्रयत्न केला; परंतु त्यांचे सूक्ष्म अवलोकन, तिरकस दृष्टी आणि खेळकरपणा या गोष्टी त्यांपैकी कुणाकडेच नसल्याने त्या नकला फसल्या.
श्रीराम बापट, दादर

‘हम दोनो’चा उल्लेख नाही
२३ फेब्रुवारीच्या ‘लोकरंग’मध्ये मृदुला दाढे- जोशी यांनी बुजुर्ग संगीतकार खय्याम यांच्यावर लिहिलेल्या ‘रहे ना रहे हम’ या सदरातील लेखात त्यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांचा परामर्श घेतला आहे. लेख अभ्यासपूर्ण आहे. मात्र, त्यांनी खय्याम यांच्या गाजलेल्या ‘हम दोनो’चा उल्लेख कसा केला नाही याचे आश्चर्य वाटले. त्यातली साहिरची शायरी आणि खय्यामसाहेबांच्या मधाळ चाली अजून रसिकांच्या ओठावर आहेत. देव आनंदचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन यथार्थपणे रंगवणारे ‘मं जिंदगी का साथ निभाता चला गया..’ कोण विसरेल?
 रवींद्र चित्रे, मुलुंड.

रॉकचा माहितीपूर्ण परिचय
‘लोकरंग’मधील आशुतोष जावडेकर यांचे ‘लयपश्चिमा’ सदरातील रॉक संगीतावरचा लेख आवडला. त्यांनी रॉक संगीत खूप छान पद्धतीने समजावले आहे. Elvis Presley हा माझा अतिशय आवडता गायक. त्याच्या आवाजाची जातकुळीच विलक्षण होती. That’s All Right , Baby, Let’s Play House, One Night, Mean Woman Blues ही माझी खूप आवडती गाणी.. अगदी त्याच्या राजिबडय़ा रूपाइतकीच!    
 मनोज आचार्य

अर्धवट माहितीआधारे लेख
संजय पवार यांचा ‘या देशात अल्पसंख्य नेमके कोण?’ हा लेख वाचला. लेखात त्यांनी, खऱ्या अर्थाने अल्पसंख्य कोण, हे शेवटी सांगितले आहे. त्यांचे म्हणणे योग्यच आहे. परंतु त्यांनी जैन समाजाचा संपूर्ण अभ्यास केलेला नाही असे दिसून येते. जैन समाजातील वरवरच्या गोष्टींचा- म्हणजे धनाढय़, सुखवस्तू, दानशूर, धार्मिक, व्यापार-उद्योगात अग्रेसर असा समाज- एवढय़ापुरताच मर्यादित उल्लेख केला आहे. याचा अर्थ त्यांनी फक्त नाण्याच्या एकाच बाजूचा अभ्यास केला आहे. दुसऱ्या बाजूकडे पाहिलेलेच नाही. तसेच त्यांनी असेही लिहिले आहे की, अल्पसंख्य समाजाचा दर्जासंबंधीचा जी. आर. मंजूर करण्यासाठी या समुदायाने कधीही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे, धमक्या देणारे मेळावे भरवल्याचे, हिंसाचार केल्याचे आठवत नाही. परंतु हे लिहिताना ते हे विसरलेत, की जैन समाज हा मुळातच ‘अहिंसा परमो धर्म:’ आहे. आंदोलन, धमक्या, मेळावे, हिंसाचार हे सर्व करावेच लागते आणि त्यानंतरच काहीतरी मिळते, ही प्रचलित समजूत चुकीची आहे. असे करणे नैतिकतेत बसणारे नाही. संजय पवार यांनी अर्धवट माहिती घेऊन, तसेच चांगल्या-वाईट अशा दोन्ही बाजूंचा विचार न करता अशा प्रकारे लेख लिहावा याचे वाईट वाटते.
अ‍ॅड. राजेंद्र आर. केरे

दावोस: लक्षात घेण्याच्या काही गोष्टी!
जागतिक आíथक मंच म्हणजे आíथक आणि राजकीय सत्ताधीशांचा मेळावा! हा मेळावा दरवर्षी स्वित्र्झलडमध्ये दावोसला भरतो. या मेळाव्याच्या नयनरम्यतेचं भूषण गगराणींनी केलेलं मनोरम वर्णन (२ फेब्रुवारी) वाचायला मिळालं. मात्र, या मेळाव्यात कोणते प्रश्न मंचावर आले, त्यांचा कुठेच उल्लेख नाही. वास्तविक पाहता अशा मेळाव्यांत सामाजिक संघटनांनासुद्धा आमंत्रण असतं आणि कधी कधी महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर अशा संघटना आपले मुद्दे समोर ठेवत असतात. 
यावर्षीच्या दावोस मेळाव्यापूर्वी ‘ऑक्सफॅम’ या संघटनेने दावोससाठी आपले मुद्दे विचारार्थ प्रसिद्ध केले आहेत- जे लक्षात घेणं आवश्यक आहे. ‘ऑक्सफॅम’च्या मते, जगातील विषमता वाढत आहे.  जगातल्या फक्त ८५ व्यक्तींच्या हातात असणारी संपत्ती ही तळागाळातल्या ३५० कोटी लोकांच्या (जगाची अर्धी लोकसंख्या!) संपत्तीएवढी आहे. जगातल्या संपत्तीचं इतक्या स्वल्प व्यक्तींच्या हातात इतक्या प्रचंड प्रमाणात एकवटलेलं असणं, हा सर्वसमावेशक राजकीय-आíथक व्यवस्था आणण्याच्या मार्गातला मोठा धोका आहे. आíथक आणि राजकीय शक्तींमुळे जनतेत आपापसात फारकत होत आहे. त्यामुळे समाजात ताणतणाव वाढून त्यांचा उद्रेक होण्याचं संकट आपल्यासमोर आहे. 
जगातील श्रीमंतांनी सुमारे २१ लाख कोटी डॉलर एवढी रक्कम कर-सुरक्षित बँकांमध्ये (उदा. स्विस बँका) लपवून ठेवली आहे. दुसरं, आíथक नियंत्रणं हटवण्याचा आणि जगातील एक टक्के लोकांच्या हातात संपत्ती एकवटण्याचा थेट संबंध आहे. भारतात शतकोटय़धीशांच्या संख्येत गेल्या दशकात दहापटीने वाढ झाली आहे. मात्र, गोरगरीबांच्या कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च अद्यापि अल्पच आहे. ब्राझील, भारत, द. आफ्रिका, स्पेन, इंग्लंड आणि अमेरिका या देशांत ‘ऑक्सफॅम’ने जे सर्वेक्षण केलं, त्यांत हे मुद्दे समोर आले आहेत. जागतिक विषमतेच्या संदर्भात असे इशारे देणारी ‘ऑक्सफॅम’ ही एकमेव संस्था नव्हे. अनेक समाजहितषी व्यक्तींनी आणि संस्थांनी असे इशारे यापूर्वीच दिले आहेत. पर्यावरणाच्या असमतोलाबरोबर हा मुद्दाही प्रकर्षांने समोर येत असतो. खुद्द जागतिक आíथक मंचाने नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात विषमतेच्या गंभीर धोक्याची नोंद घेतली आहे. पुढील वर्षभरात जागतिक स्थर्याला यामुळे धोका उत्पन्न होईल असा इशारा त्यात दिला आहे.   जगात २०११ पासून सुरू झालेले लोकउद्रेक आणि संपत्तीचं केंद्रीकरण यांचा काय संबंध आहे, हा मुद्दा विविध प्रकारे समोर आला आहे आणि त्याचे पडसाद भारतातही उमटले आहेत. त्यामुळे तो दुर्लक्षिण्यासारखा नाही. जागतिक आíथक मंचावरून केलेल्या चर्चाचा मागोवा घेणं, हे तिथल्या निसर्गाचं वर्णन करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. 
अशोक राजवाडे, मुंबई</strong>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्हणीय चारित्र्यहनन
‘समाचार मेकॉलेच्या मारेकऱ्यांचा’ हे ‘मेकॉले काल अणि आज’ या पुस्तकाचे रवि आमले यांनी लिहिलेले परीक्षण वाचले. मेकॉले यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये १८३५ साली केलेल्या कथित भाषणाचा उतारा पूर्वी वाचनात आला होता. प्रथमवाचनीच त्यातील खोटेपणा जाणवला. भारत उभा-आडवा पालथा घालावा अशा दळणवळणाच्या सुविधा १८३० साली नव्हत्या. भारतात रेल्वे १८४० साली सुरू झाली. तसेच त्याकाळी देश समृद्ध आणि सक्षम नव्हता. शेतकऱ्यांची स्थिती दयनीय होती. चातुर्वण्र्य समाजव्यवस्थेमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेला दलितवर्ग अज्ञानी आणि दैन्यावस्थेत होता. उताऱ्यात म्हटले आहे तसा भारत त्याकाळी सक्षम, समृद्ध होता, देशात एकही भिकारी-चोर-लुटारू नव्हता, हे खरे मानले तर त्या सुस्थितीचे श्रेय इंग्रजी राजवटीला (त्याकाळी त्यांचेच राज्य होते!), तसेच तत्पूर्वीच्या इस्लामी राजवटीला जाते. कारण तेराव्या शतकापासून आपण मुस्लिमांच्या गुलामगिरीत होतो. आणि देशाचा ताठ कणा कसला? मुसलमानी बादशहांपुढे कुíनसात करकरून अनेक िहदू सरदार-शिलेदारांचे कणे वाकले होते. ही वस्तुस्थिती तो खोटा उतारा लिहिणाऱ्याच्या ध्यानी आली नाही. सनातनी धार्मिकांना सत्य नकोच असते. ते सतत गूढ, भ्रामक, अवास्तवातच मग्न असतात. कोणाशी मतभेद असतील तर त्याच्यावर टीका अवश्य करावी. प्रजासत्ताक भारतात प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण कोणाचे चारित्र्यहनन करण्यासाठी खोटे पुरावे तयार करणे, त्यांचा प्रसार करणे अत्यंत गर्हणीय आहे.
प्रा. य. ना. वालावलकर