सुभाष अवचट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेखाचित्र : अन्वर हुसेन

ओतूरच्या मैदानातील चिमुकल्या शाळेतून मी पुण्याला दगडी भावे स्कूलमध्ये आलो. ते पुणे साठ सालच्या आसपासचे होते. धोतर, कोट, टोपीतले ताटके प्राचार्य बुटेलवर शाळेच्या पोर्चमध्ये यायचे, तेव्हा सारे शिपाई रांगेने उभे राहायचे. बुलेटच्या आवाजाचा धाक साऱ्या भावे स्कूलला असायचा. एक शिपाई तर दिवसभर फडके घेऊन बुलेट पुसताना दिसे. मला याचे फार नवलच वाटे. ओतूरचे शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक मला कधी वेगळे वाटलेच नाहीत. ते सारे गावकरीच वाटायचे. अशा कडक शिस्तीच्या जागा, माणसं मला आवडत नाहीत. त्यामुळे मी ताटके प्राचार्याच्या कडक शाळेत फार टिकलो नाही, हे ओघाने आलेच.

शिवाजी नगर एस.टी. स्टँडवरून आम्ही भावंडं टांगा करून सदाशिव पेठेत आलो होतो. सामानामुळे दोन-तीन टांगे करावे लागले. उन्हाळी दिवस होते. मी प्रथमच डांबरी रस्ते पाहत होतो. झाडांमध्ये दडलेले बैठे दगडी बंगले, जुन्या लाकडी जिन्यांची, महिरपी खिडक्यांची चिरेबंदी घरं, मधूनच धोतराच्या क्लिप्स लावून, हँडलला पिशव्या लावून जाणारी सायकल्सवरची माणसं.. उन्हाळ्यातल्या त्या दिवशी सारं पुणं वामकुक्षीत होतं. फाटकं बंद होती, त्यावरच्या कमानीवरच्या वेली, घरातून भुंकणाऱ्या कुत्र्यांचे झोपाळलेले आवाज ऐकत आम्ही गल्लय़ा पार करीत सदाशिव पेठेत आलो.

राजवाडे मंगल कार्यालयाच्या समोर ही वाडेकर बिल्डिंग होती. मी अशी सुंदर, सुबक इमारत कधीही पाहिली नव्हती. अशा इमारती लंडनमध्ये असाव्यात. आर्ट डेको स्टाईलची इमारत आता पाहायलाही मिळणार नाही. त्याचे प्रवेशद्वार, त्याला लागूनच नक्षीदार खांबांची कंपाऊंड वॉल. कातीव दगडातील बांधकाम, प्रपोरशनेट, कमानीतल्या खिडक्या, सर्व इमारतीतले व्हरांडे, हॉल, खोल्यांचे, षटकोनी सिरॅमिक टाइल्सने मढलेले फ्लोरिंग जणू गालिचेच अंथरलेले वाटावे! पहिला, दुसरा, तिसऱ्या मजल्यावर जाणारे सागवानी, सहजतेने चढून जाताना/ उतरताना आनंद व्हावा असे नक्षीदार जिने! एकही कोपरा अथवा जागा, बेजोड वाटत नव्हती. अशा या सुबक इमारतीत आम्ही काही वर्षे राहिलो. मी तर दिवसभर अख्खी इमारत खाली-वर उधळवायचो. मनस्वी, हवाहवासा आनंद देणारी ती वास्तू होती.

तरीही तिचा इतिहास क्लेशदायक होता. वाडेकरांपैकी एकाचा जयंत नावाचा मुलगा माझ्यापेक्षा मोठा होता. त्याची माझी दोस्ती झाली. वाडेकर घराणे आणि आमचा काय संबंध हे सिक्रेट मला आजतागायत समजले नाही. नाही म्हणायला ओतूरला वाडेकरांचे गोपाळ कृष्णाचे असेच सुबक मंदिर आहे. त्याची धाटणी पाहता पुण्यातल्या वास्तूचे अंश तेथेही दिसतात. हे देऊळ नव्हे; त्याची घर आणि देऊळ अशी अद्भुत रचना आहे. गोकुळाष्टमीला उरलेसुरले वाडेकर ओतूरला यावयाचे. एका खोलीत झाकून ठेवलेले बेल्जिअम झुंबर, खांबावरचे दिवे बाहेर यायचे, त्यांची साफसफाई होऊन संध्याकाळी त्यात वाडेकर मंडळी लोखंडी आकडय़ाचे दिवे लावायचे. तो एक सोहळा असे. त्या झुंबराच्या लोलकांच्या माझ्या लहानपणातल्या रंगीबेरंगी आठवणी आहेत. त्यांच्या घरात गोपाळकृष्णाची संगमरवरी मूर्ती, देव्हारा तसाच देखणा! एका गोकुळाष्टमीला तर मलाच मोरपीस, पीतांबर नेसवून कृष्ण बनवला होता. साला भलतेच!

वाडेकर मंडळी निघून गेली की कडय़ाकुलपात ते देऊळ बंद व्हावयाचे. त्याच वाडेकरांबरोबर आम्ही आता पुण्यात वास्तूत राहायला आलो. जयंतानं मला अनेक सिक्रेट्स सांगितली. त्यांच्या वाडेकरांचा एक कर्ता पुरुष हा मोठा कंत्राटदार होता. फुले मंडई त्यांनीच बांधली, ती बांधत असताना त्यांना पायामध्ये पेशवेकालीन सोन्याच्या लगडी सापडल्या. त्यातून त्यांना गडगंज पैसा मिळाला, त्या पैशातून त्यांनी आर्ट डेकोमधल्या दोन-तीन इमारती पुण्यात बांधल्या. त्यांच्याकडे मोठय़ा बग्ग्या होत्या. बग्गीवाले मोठे फेटे बांधत असत. त्यातून मुले शाळेला जात असत. मग जसे नेहमी घडते तसेच झाले. कर्ता पुरुष गेला आणि त्यांनी उभी केलेली ही दौलत कोणालाही सांभाळता आली नाही. आम्ही जेव्हा तेथे राहायला गेलो, तेव्हाच उतरती कळा सुरू झालेली होती.

राजवाडे मंगल कार्यालयाच्या बाल्कनीत पांढऱ्या केसांचा माणूस कठडय़ावर हात ठेवून तासन्तास उभा असायचा. मला त्याची भीती वाटत असे. जयंतनं सांगितलं, आतल्या घरात अहोरात्र अग्निकुंड पेटलेलं असतं. त्या घरात धोतर नेसलेली, जानवी घातलेली उघडीबंब माणसं येता-जाता दिसत. त्यामुळे अजूनच माझं कुतूहल जागं झालं. मी तेथे कधीच गेलो नाही. डावीकडे वळलं की खालकर तालीम, पुढे चौकात एक मारुतीचं जाळीदार देऊळ होतं. तेथे एक चित्रकार बसत असे. शाळेतल्या मुलांचे तक्ते तो भराभर रंगवून देत असे. पुढच्या चौकात विजय टॉकीज होतं. तेथे गेटपाशी केस वाढवलेली लुकडी मुलं चित्रपटाच्या गाण्याची पिवळी, गुलाबी गाण्याची चौकोनी कागदं विकत उभी असत. जयंतनं मला एकदा चित्रशाळा प्रेसही बाहेरून दाखवला होता. एकदा जयंत नसताना मी एकटा खालकर तालमीपाशी गेलो. रस्त्याला लागूनच मोकळी खिडकी तेथे होती. मी डोकावले तर आत मोठा मातीचा हौद उकरत मुलं व्यायाम करीत होती. वरच्या चौथऱ्यावर काही पहेलवान दंड-बैठका मारीत होते. अचानक एक माझ्याच वयाचा मुलगा माझ्यापाशी आला. तो लाल मातीनं भरला होता.

तो म्हणाला, ‘‘आत ये! वस्ताद बोलावतात.’’

मी आत गेलो. एका लाकडी खोक्यावर अगडबंब वस्ताद बसला होता. त्याच्या कानाच्या सुपाऱ्या झाल्या होत्या. त्याच्या लाल लंगोटावर पोट उतरलं होतं. त्यानं विचारलं, ‘‘तालीम करणार का?’’

त्याचा आवाज जवळपास बाईसारखा होता. एवढय़ा मोठय़ा शरीरातून असा बायकी आवाज कसा येतो हे पाहून मी मनातल्या मनात हसलो होतो. खरं तर मी अवघडलो होतो. तरी मी म्हणायचो म्हणून ‘‘हो’’ म्हणालो.

‘‘लंगोट आहे का?’’ वस्तादांनी विचारलं.

‘‘नाही!’’ म्हटल्यावर त्यांनी हाक मारली, ‘‘नाथा! याला कपाटातला लंगोट दे.’’

मला खिडकीतून बोलावणारा तोच हा नाथा! त्यांनी मला लंगोट बांधला आणि आमची मैत्री तेव्हापासून तशीच घट्ट बांधली गेली. मी नाथाला भेटण्यासाठी म्हणून तालमीत जायचो. तो मला उकडलेली अंडी घेऊन यायचा. कधीमधी हिरव्या पालेभाज्याही. एक-दीड वर्षांनी नाथा फुरसुंगीला आपल्या शेताकडे गेला. माझी तालीम तशी बंद झाली. लंगोटही नंतर कधी बांधला नाही.

आम्हाला सांभाळायला कल्याणहून आईची आई आली होती. आम्ही तिला आईच म्हणायचो. अत्यंत देखणी होती. नऊवारी साडी, मोठा अंबाडा, गोल सोन्याच्या रिमचा नाजूक चष्मा, हातात चांदीची तपकिरीची डबी असं तिचं स्केच म्हणावं. ती अत्यंत प्रेमळ आणि हवीहवीशी होती. तिला वाचनाची मोठी आवड होती. पोथ्या वगैरे नव्हेत, तर ऐतिहासिक कादंबऱ्या आणि बाबूराव अर्नाळकरांची पुस्तके! तिच्यामुळेच आम्हाला वाचनाची तेव्हापासून आवड निर्माण झाली. बाबूरावांच्या पुस्तकांना आमच्याकडे तुफान मागणी होती. प्रत्येक जण पुस्तके लपवत असत. आई कुठे ते पुस्तक लपवायची हे शेवटपर्यंत कळलं नाही.

तिच्या या वेडापायी शेवटी माझ्या वडिलांनी मुंबईला काकांना पत्र पाठवलं. माझे हे थोरले काका. ते गिरगावात हेमराज वाडीत राहायचे. त्यांचे शेजारी म्हणजे बबन प्रभूंचे वडील होत! ते अर्नाळकरांच्या पुस्तकांचे प्रकाशक किंवा वितरक असावेत. मग काय, दरमहा नव्याकोऱ्या पुस्तकांचा गठ्ठा पोष्टाने आईच्या नावाने यावयाचा.

आईचं आणि माझं एक सिक्रेट होतं. ते कोणालाच माहीत नव्हतं. सारे बहीण-भाऊ कॉलेजला गेले की मला ती एक चिठ्ठी द्यायची, म्हणायची, ‘‘मास्तरांना दे आणि मधल्या सुट्टीत घरी ये.’’ मास्तर सोडायचे. मी घरी आलो की आई नटून तयार असायची. मला कपडे बदलायला सांगायची. टांगा यायचा आणि आम्ही टांग्यातून कॅम्पातल्या वेस्ट एंड थिएटरला जायचो. आईनं आणि मी सिनेमा पाहिला तो होता- ‘अबसेंट मायंडेड प्रोफेसर’. अख्ख्या थिएटरमध्ये आई फक्त नववारी साडीत असायची. आई माझ्या मास्तरांना चिठ्ठीत काय लिहायची, टांगा कशी बोलवायची, कोठला सिनेमा कोठे लागला आहे हे तिला कसं कळायचं हे सारं सिक्रेट होतं. तिच्यामुळे मी प्रथम कॅम्प एरिया पाहिला. जुनं, वेतांच्या खुच्र्यातलं एम्पायर थिएटर, वेस्ट एंड, अलका टॉकीज हे आईबरोबर पाहिलं. शाळेला दांडय़ा मारून मला सिनेमा दाखवणारी, पुस्तकांच्या वाचनाची आवड तयार करणारी अशी माझी आई शोधून सापडणार नाही. थोडे मोठे झाल्यावर आम्ही ऑफिशियली राजा परांजपे, राजा गोसावी ते अगदी देव आनंदचे सारे चित्रपट एकत्र पाहिले. सिनेमाच्या तिकिीटांची अर्धी फाडलेली तिकिटे ती पुस्तकाच्या आत बुकमार्क म्हणून वापरायची.

अभिनवमध्ये पहिल्या वर्षांला शिकत असताना आम्हाला आऊटडोअर स्केचिंगला जावं लागायचं. नव्या पुलाच्या कडेला कुंभारवाडा होता. एकदा त्या स्पॉटवर जायचं ठरलं. अनेक मडकी, माठ, भांडय़ांनी तो परिसर भरलेला असायचा. एक मोठं आजोबांच्या वयाचं लिंबाचं झाड तेथे होतं. त्या सावलीत अनेक कुंभार काम करीत असत. नदीच्या कडेलाही या मडक्यांच्या रांगा वाळायला ठेवलेल्या असायच्या. मी, माझे मित्र एक कोपरा गाठून स्केचिंग करीत होतो. समोर आमच्याच वयाचा मध्यम उंचीचा गोरा मुलगा काम करीत होता. अधूनमधून तो आमच्याकडे पाहत होता. बाजूला बहुतेक त्याचे आईवडील काम करीत होते. मागच्या बाजूला घराची भिंत, त्याचा दरवाजा, त्यात उभी एक छोटी मुलगी, पत्र्यावर पडलेलं ऊन, घरासमोर रचलेली काळी मडकी! मला ते कम्पोझिशन करावंसं वाटलं म्हणून मी जवळ जाऊन बसलो. एका बाजूला मी झोळीतून पॅड काढीत असताना अर्नाळकरांची दोन पुस्तकं बाहेर पडली. मी ती एका मडक्यावर ठेवली. स्केच पूर्ण झालं तेव्हा पाहिलं, तो मुलगा माझ्या जवळ उभा होता. तेवढय़ात हाक ऐकू आली, ‘‘शंभो! चल, आईला हात लाव!’’

तो मदतीला धावला खरा! आम्ही आवराआवरी करून सायकलींकडे निघालो तसा तो परत आला. मला वाटलं, त्याला चित्र बघायचं आहे. तसा तो अवघडून म्हणाला, ‘‘मला ती पुस्तकं वाचायला द्याल का?’’

आम्ही मित्र एकमेकांकडे पाहायला लागलो. ‘‘ती अर्नाळकरांची!’’ तो म्हणाला.

‘‘अरे हो की!’’ मी पुस्तकं त्याला दिली. त्यांनी मातीचे हात पुसत ती घेतली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. ‘‘मी वाचून परत करीन. कोठे येऊ?’’

‘‘कॉलेजला ये!’’

आम्हा सर्वानाच आश्चर्य वाटत राहिलं ते असं की, हा कुंभाराचा पोरगा आणि वाचन! बाबूराव अर्नाळकर कोठे कोठे पोहोचू शकतात!

मी हे विसरून गेलो. कॉलेजच्या मधल्या सुट्टीत आम्ही चहाला निघालो. तेव्हा गेटपाशी स्वच्छ पांढऱ्या शर्टातला स्मार्ट पोरगा माझ्या पुढय़ात आला आणि म्हणाला, ‘‘तुमची पुस्तकं!’’

मी शंभोला ओळखलं नाही. तो कुंभारवाडय़ातला असावा हे सांगूनही पटलं नसतं. आमच्याबरोबर तो चहाला आला, पण काही बोलला नाही. मी त्याला माझा पत्ता सांगितला आणि म्हणालो, ‘‘कधीही ये. मी तुला पुस्तके देईन.’’ थोडय़ाच दिवसांत तो घरी आला, येत राहिला. अर्नाळकरांचा एवढा भक्त आईच्या नंतर मी प्रथमच पाहिला. मी त्याला ‘वीरधवल’ कादंबरी दिली. तो म्हणाला, ‘‘नको, अर्नाळकरांच्या पुस्तकातला खुनी बेस्ट असतो.’’

एकदा दुपारच्या सुमारास मी कुंभारवाडा पास करीत होतो. शंभोला भेटावे म्हणून त्याच्या घरी गेलो. त्याचं जेवण झालं होतं. स्वच्छ बनियन आणि पायजम्यात तो मांडी घालून अर्नाळकरांचं पुस्तक वाचत होता. एखादा भटजी पूजेला बसतो इतक्या एकाग्रतेनं तो वाचत होता. जाताना म्हणाला, ‘‘माझ्याबरोबर सिनेमाला येणार का अलका टॉकीजला?’’

‘‘कोणता सिनेमा?’’ मी विचारलं.

‘‘मर्डर आहे. कोणी हिजकॉकचा आहे!’’

‘‘हिजकॉक?’’

‘‘हां, फार भारी मर्डर असतो. खुनी शेवटपर्यंत कळत नाही. मला इंग्लिश कळत नाही. नंतर मला गोष्ट सांगा!’’

त्याला खरं तर हिचकॉक म्हणायचं होतं. त्याच्या हौसेसाठी मी त्याच्याबरोबर गेलो. त्यानेच तिकीट काढलं होतं. नटून आणि एक्साइट होऊन आला होता. ‘व्हर्टिगो’ फिल्म सुरू झाली. मधूनच तो माझा दंड पकडे आणि विचारी, ‘‘खुनी कोण?’’ मी त्याला सांगितलं, ‘‘फिल्म संपल्यावर चहा पिताना सर्व इंग्रजी सिक्रेट सांगतो.’’ समोरच्या रिगल हॉटेलमध्ये चहा पिताना मी सर्व कथा त्याला रंगवून सांगत असे. ऐकताना त्याचे डोळे खाली-वर होत. शेवटी सारा प्लॉट सांगून झाला की तो उठून उभा राही आणि म्हणे, ‘‘लई भारी! शेवटपर्यंत खुनी कळत नाही.’’ हा चित्रपट महोत्सव बराच काळ चालला. एव्हाना हिजकॉक मला तोंडपाठ झाला होता.

शंभो खरं तर भुईनळे बनवत असे. पहाटेपासून तो मातीत काम करे. वाळलेले भुईनळे तो भोरी आळीत देऊन पैसे घेऊन घरी येई. अंघोळ, जेवण करून स्वच्छ कपडय़ांत मांडी घालून मर्डर मिस्ट्री भक्तिभावाने वाचत बसे. पुढे मी त्याला दुसऱ्या गूढ कथांची सवय लावली. एका उन्हाळ्यात तो एक माठ घेऊन घरी आला. मला म्हणाला, ‘‘आईनं बनवला आहे!’’

नंतर म्हणाला, ‘‘बाबानं माझं लग्न जमवलंय!’’

‘‘अरे, मग लाजतो काय?’’

‘‘नाही माझं एक शिक्रेट आहे. माझा जीव गावाकडच्या पोरीवर जमलाय!’’

पुढे संगनमत झालं असावं. शंभोचं त्या शिक्रेट पोरीबरोबर लग्न झालं. पत्रिका देऊन गेला, पण जाणं झालं नाही.

पुण्यात त्या काळी उन्हाळा वाढला की कुंभारवाडय़ात जाऊन माठ घेऊन यायची प्रथा होती. अनेक वर्षांनी मी पुण्यात आलो होतो. माझी जिवाची मैत्रीण अनुया गुप्ते म्हणाली, ‘‘चल, बाजार करून येऊ!’’ तिच्या मर्सिडीजमधून आम्ही कुंभारवाडय़ात गेलो. सारा कुंभारवाडा आता बदलला आहे. ते लिंबाचं झाड तेथे नाही. नदीच्या किनाऱ्यावरच्या मडक्यांच्या चळती नाहीत आणि शंभोचं घरही नाही! प्रचंड उन्हाळा होता. मी गाडीतच होतो. अनुयानं येताना दोन माठ आणले. मी विचारलं, ‘‘दोन कशाला?’’ ‘‘अरे, जाता जाता एखादा फुटतोच.’’ तसंच झालं. तिच्या गेटपाशी एक फुटलाच! त्याच्या ठिकऱ्या झाल्या. दुसऱ्या भेटीत अनुयाने मला माठातलं वाळ्याचं पाणी दिलं. झिरपलेल्या माठातलं पाणी पिताना मला शंभोच्या आईनं बनवलेला माठ आठवला.

एका दिवाळीत मी नातवासाठी भुईनळे आणले. ते मी पेटवले, तसे उंच निळ्या पांढऱ्या चांदण्या क्षणात पसरल्या. त्या प्रत्येक चांदणीत शंभोच्या आठवणी दाटल्या होत्या. ते शिक्रेट मी कोणाला सांगितले नाय.

हे माझे बालपणीतले लपाछपीचे विस्कळीत रफ स्केच आहे. लपंडावात अनेक सिक्रेट्स असतात. वाडेकर वाडय़ातला सोन्याचा खजिना, राजवाडे वाडय़ातल्या गूढ अग्नीच्या आहुत्या, आईच्या मनातली थिएटरमधली स्वप्नं अथवा शंभोचा कुंभारवाडा नाहीसा होणं.. याला बालपणातले लपंडाव म्हणावे, की या परिकथेतील डोंगरातली सिक्रेट्स मानावीत? हे खरं आहे, माझ्या रफ स्केचेसमधील आठवणीतल्या या रेघा आहेत.

Subhash.awchat @gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rough sketches secrets article abn
First published on: 07-03-2021 at 00:34 IST