scorecardresearch

रफ स्केचेस : किमया

क्षितिजापर्यंत पसरत गेलेली, होरपळून गेलेली जमीन. तप्त काळ्या धुळीने आणि धुराने काळवंडलेले आकाश.

सुभाष अवचट

रेखाचित्र : अन्वर हुसेन

क्षितिजापर्यंत पसरत गेलेली, होरपळून गेलेली जमीन. तप्त काळ्या धुळीने आणि धुराने काळवंडलेले आकाश. त्यात अस्पष्ट दिसणारा हलता सूर्य. जळलेले, मोडून तसेच उभे राहिलेले अधू झाडांचे सांगाडे. ढासळलेल्या जमिनीत रुतलेले सिमेंट पाईप्स. त्याच्या आत घाबरून बसलेली, भुकेली, हाडांचे सांगाडे झालेली कुत्री-मांजरे, एकमेकांवर अडकलेल्या, आदळलेल्या कारचे असंख्य सांगाडे, मोडून पडलेले टीव्ही टॉवर्स, धुळीत गाडले गेलेले पूल, घराचे पत्रे, टीव्ही सेट्स, सोफे, दरवाजे.. गरम वाऱ्याबरोबर गरम धुळीचे लोट येऊन उरल्यासुरल्या घरांवर घिरटय़ा घालतात. अचानक लाल-पिवळा तप्त प्रकाश भाजून काढतो. चेहरे नसलेली एक-दोन माणसे कुणाची तरी चाहूल घेण्यासाठी बाहेर उभी असतात. पलीकडे विटा, दगड, कॉंक्रीटच्या ढिगात काहीतरी शोधताना दिसतात. हे कोठले गाव? कोणता प्रदेश? ही कोठली वेळ? त्या उद्ध्वस्त गावामधून क्षितिजापर्यंत गेलेल्या हायवेची एक चकाकती रेघ दिसते. डांबर वितळलेली, खड्डय़ांमधून थोडी नागमोडी झालेली असते. विशेषत: अशा ठिकाणी मी काय करतो आहे, हा प्रश्न जसा अधांतरी आहे, तसेच दूर क्षितिजापासून या हायवेवरून इकडे चालत  येणाऱ्या व्यक्तीचा ठिपका मला दिसतो. तिला सावली नाही. ठिपका हळूहळू दृष्टीजवळ येतो तेव्हा कळते- त्याचे केस उडत आहेत. पांढरी कफनी फाटलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावर बहुधा करुणा आहे. तिच्या मागे मागे धूळ, धुराचे गडद ढग उडत आहेत आणि समोरचा हायवे अधिक चमकतो आहे. ती चालत येते. इतक्या जवळ, की ती माझ्या पेंटिंगमध्ये येऊन उभी राहते. येथेच माझ्या ‘जिझस ऑन द वॉल’ या सीरिजची सुरुवात होते.

खालच्या दरीपाशी उलगडत गेलेले हे माळरान. त्याच्या अंगावर हिरव्या, पिवळ्या धाग्यांची गवती चादर. त्यावर काळ्या करपलेल्या दगडांचे पेपरवेट. अधूनमधून फिस्कारलेली रानटी काटेरी झुडपे. त्यावर बसलेला, तहानलेला लांब शेपटीचा काळा पक्षी. त्याची माळरानावर पडलेली चिमूटभर काळी सावली. निळ्याभोर आकाशात क्षितिजावर थांबलेला ढगांचा पांढरा भटका पुंजका. खोल दरीतून विरत येणाऱ्या प्रार्थना.. हे नेहमीचेच स्टॅटिक दृश्य झाले. त्यात सिमेट्री आली- जी मला आवडत नाही. आणि मग मला पाहिजे तसे दोन-तीन ऑरेंज कलर्समधले साधू दरीतून वर चालत येताना दिसू लागले. दुरून दरीतून माळरानावर चढताना त्यांच्या मागोमाग प्रार्थनाही सावलीसारख्या वर आल्या. माळरान तिरके कापत थेट माझ्यापर्यंत चालत आल्या. माझ्या ‘परंपरा’ सीरिजची त्यांनी सुरुवातही केली.

जुना प्रिंटिंग प्रेस. एका  वाडय़ातला. ट्रेडल मशिनचे झाप झाप आवाज. सर्वत्र एकमेकांना चिकटून रचलेले कोऱ्या कागदांचे गठ्ठे. कटिंग मशीनने कापलेल्या कागदांचे कपटे सर्वत्र पसरलेले. कागदाचा, प्रिंटिंग शाईचा प्रेसमध्ये पसरलेला वास. छतावरून लोंबकळणाऱ्या दोऱ्या. कागदी गठ्ठय़ावर निवांत झोपलेली मांजर. कोपऱ्यातला गडगड आवाज करीत अडखळत फिरणारा पंखा. कागदाच्या घडय़ा घालणारे बनियनमधले कामगार. लंचची घंटा वाजते. सारे शांत होते. कामगार डबे घेऊन एकत्र बसतात. जमिनीवर कागद अंथरून डबे ठेवतात. हात धुऊन कागदानेच पुसतात. कोणी कागदानेच घाम पुसतात. जेवण झाल्यावर कागदाच्या गठ्ठय़ांवर थोडा वेळ झोपतात. सर्वत्र कागदाचेच विश्व. येथे मी काय करतोय? शिल्लक राहिलेल्या कोऱ्या कागदांचे बाईंड करून एक कामगार मला प्रेमाने पॅड देतो.  मी ते उघडतो आणि ‘पेपर अँड पीपल’ या नवीन पेंटिंगची सुरुवात करतो.

अशी अनेक दृश्ये येत-जात असतात. ती आपापल्या अ‍ॅबिलिटीच्या फॉर्ममध्ये प्रकट होतात. ‘दृष्टी’ हा विषयच अ‍ॅबस्ट्रॅक्ट आहे. कोणाला काय दिसते! या सृष्टीत प्रचंड माणसं आहेत. राहतीलही. त्यातल्या किती लोकांना ही सृष्टी वेगळी दिसते! तुम्ही दुसऱ्यांना कसे दिसता? आरशातल्या तुमच्याच प्रतिबिंबात तुम्ही काय पाहता? समाजातील काही माणसे वेगळीच असतात. त्यांना भाग्यवान म्हणावं लागेल. त्यांना प्रथम एक समजलेले असते- “The two most important days of your life are the day you born and the day find out why?” या जीनिअस माणसांनी आपण कशासाठी जगायचं हा मार्ग ठरवलेला असतो. त्यामुळे समोर पसरलेल्या लँडस्केपमध्ये लपलेलं त्यांचं वेगळं लँडस्केप ते पाहू शकतात. समुद्राच्या अफाट पसरलेल्या किनाऱ्यावर वाळूत दडलेले शंख-शिंपले लहान लेकरं गोळा करतात, तेव्हा त्यांचा आनंद त्यांच्या छोटय़ा ओंजळीत मावत नाही. या जीनिअस माणसांची हीच दृष्टी सृष्टीत धुळीत लपलेली ही अलौकिक रत्ने पाहू शकते. त्यावर फुंकर मारून त्यांचं सौंदर्य जगापुढे ठेवू शकते. आन्द्रे मातीस म्हणत असे, ‘आकाश नेहमीच निळे असत नाही आणि गवत नेहमी हिरवे असत नाही.’ त्याच्या दृष्टीचीच ही किमया म्हणावी लागेल. आपण काहीतरी वेगळं करीत आहोत किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याची जाणीव त्यांना नसते. त्यांना जन्मत: मिळालेली ही देणगी असते. पण अशा प्रतिभावान लोकांचा इतिहास पाहिला तर त्यांना नादिष्ट, एकलकोंडा, खुळा, विक्षिप्त, गावाकडे ‘येडझवा’ अशाच संबोधनात ओळखले जायचे. त्यांची परिभाषा वेगळीच असायची. त्यामुळे एरव्हीच्या सरळसोट समाजात ते वेगळे पडायचे. याचे दु:ख वगैरे त्यांना नसते. जगात झालेल्या अशा जीनिअस माणसांच्या कहाण्या जवळपास यामुळे एकसारख्याच दिसतात. ते गावातून पळ काढतात. त्यांचे संसार टिकत नाहीत. त्यांचे दु:ख त्यांना जाणवत नाही. ते एका टार्गेटच्या शोधात चालत राहतात. जसा पंढरीच्या वाटेवरचा वारकरी! फक्त त्यांच्या वाटांमध्ये टार्गेटचा फरक असतो. याच वाटांवर बिथोवेन, ब्रँडो, शेक्सपिअर, हेमिंग्वे, कालिदास, तुकारामांची पावले उमटलेली दिसतात.

दृष्टीबद्दलचे ‘निश्चित ज्ञान’ हा विज्ञानाचा विषय असतो. पण या निश्चित ज्ञानापलीकडचे अनेक पैलू ईश्वरवादात मोडतात. विज्ञान आणि ईश्वरवाद यादरम्यान एक प्रचंड पोकळी धक्के देत संभ्रमित करत असते. ही पोकळी म्हणजे ‘तत्त्वज्ञान’ होय. ही दृष्टीच किमया करीत असते. ‘आहे-नाही’च्या वादातून बाहेर पडून सृजनाचा उत्सव सतत साजरा करते. मायकलॅंजलोला संगमरवरी ब्लॉकमध्ये मूर्ती दिसते आणि तो अनावश्यक भाग छिनून मूर्तीला मोकळा करतो. कालिदास ढगातून निरोप द्यायला निघतो. भक्ताच्या घरी त्याच्या दर्शनाला विठ्ठल दारात येतो. जगरहाटीत ज्यांना फुले पाहायची दृष्टी आहे, त्यांच्यासाठीच जगात फुले असतात. सृजनशीलता ही गर्दीतदेखील स्वत:चा श्वास ऐकण्याचा धीर देते. आडवाटेला असलेल्या छोटय़ा रेल्वे फाटकावरून एक्सप्रेस गाडय़ा शिट्टय़ा मारीत धडाधड निघून जातात. तसा हा अलिप्त प्रवास असतो. पण असं म्हटलं जातं की, ‘Talent hits target, no one else can hit; Genius hits target, no one else can see.’

शॉपनहॉवर या तत्त्वज्ञाने एका निबंधात लिहिले आहे- ‘मनुष्याला आनंदाने, सहजतेने जगायला तीन गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे महत्त्वाकांक्षेला सुट्टी, दुसरी म्हणजे निसर्गाचा सहवास, तिसरी महत्त्वाची म्हणजे लिटिल बिट क्रिएटिव्हिटी!’ जीवनाचे हे सार आहे. यात सृजनशीलतेचा भाग फार मोठा आहे. ती कोणत्याही स्वरूपात अवतरू शकते. तिच्या या छंदामुळे नेहमीच्या रूटिन, दमलेल्या आयुष्यात अलौकिक आनंदाच्या दालनाचे एक दार सतत खुले राहते.

दिसणे, पाहणे, निरखून पाहणे यांत सूक्ष्म बदल असतात. त्यात मनाचा वाटा मोठाच. चित्रकाराने रंगवलेले चित्र, त्यातला आशय हा पाहणाऱ्याला नेमका दिसतो का? भावतो का? याची उत्तरे सापडणे फार कठीण होत जाते. तर्कवितर्काच्या पातळीवर ती गुंतून पडतात. आरशातल्या प्रतिबिंबातला स्वत:चा चेहरा खरोखरीच माझा स्वत:चा आहे का? की मी त्यापेक्षा वेगळा आहे? सवयीमुळे आपण अनेक गोष्टी मान्य करतो. माझ्या असिस्टंटला रंग दिसत नाहीत हे मला उशिरा कळले. माझ्या स्टुडिओमधली पेंटिंग्ज त्याला कशी दिसत असतील? रंगांधळा म्हणून सोडून देणे सोपे असते; पण समोर चित्र असून त्यांना ते दिसत नाही, समजत नाही. गाणे ऐकू येत नाही, पण पदार्थाचे वास मात्र येतात. यावर खूप संशोधन झाले आहे. त्यावर नाना पुस्तकेही आहेत. त्याचं सार एवढंच निघतं की, ज्यांना ज्यात रस आहे ते दिसते, ऐकू येते. ती भाग्यवान जात म्हणावी लागेल. निसर्गातला हा खजिना त्यांना उपभोगता येतो. येथे उच्च शिक्षणाचाही संबंध येत नाही. गुरं राखताना गुराखी पावा वाजवतो आणि सारं माळरान ते ऐकताना मग्न होते. लहान पोर त्याच्या बालविश्वातले आकार भिंतीवर रेघोटय़ा मारून उडय़ा मारते. त्याचं आपण चित्र म्हणून कौतुक करतो. कलेतला आनंद इतका साधा आणि निष्पाप असतो. ती बघण्याच्या, टिपण्याच्या दृष्टीची गरज असते.

जगात शेकडो वर्षे अहोरात्र हे कलाकार निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्यापाशी बुद्धी, वेळ, जीवघेणी ओढ, वेडेपणा, जिद्द असते. तीच त्यांना या सौंदर्याची मर्मस्थळे शोधण्यात मदत करते. या जगाकडे पाहण्याची दृष्टी त्यांनी पालटून टाकली. साहित्य, संगीत, कला, शिल्पं, आयुर्वेद, स्थापत्यकलेची पैठणी नेसून हे विश्व नटले. ही प्रक्रिया अद्भुत म्हणावी लागेल.

दृश्य आणि अदृश्य यांचा हा खेळ आहे. जे लपलेलं आहे अथवा तुमच्या दृष्टीआड जे आहे, ते तेथेच आहे हे पाहण्याची दृष्टी या लोकांना लाभली. आचार, विचार आणि आकाराची ही सांगड आहे. मन हे दृश्य दाखवते; त्यात बंधन नसते. अथवा प्रत्यक्ष डोळ्यांना जे दिसते त्यापलीकडेच जग तो बघतो. आपापल्या माध्यमातून त्याची निमिंती करतो. आपण त्याला ‘किमया’ म्हणतो.

पण ‘किमया’ हा शब्द तयार होण्यामागची गोष्ट मजेशीर आहे. इजिप्त या देशाचं नाव फार पूर्वी ‘केमी’ असे होते. केमीचा शब्दश: अर्थ- काळे करपलेले! नाईल नदीच्या काळ्या चिखलामुळे हे नाव पडले असावे. तर या देशातील लोकांनी सर्वप्रथम धातूकाम करण्यास सुरुवात केली आणि ते त्यात तरबेज झाले. निकृष्ट धातूचं सोन्यात रूपांतर करण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. त्यांच्या या कलेमुळे ‘अल- केली’ असा शब्द तयार झाला. हा शब्द ग्रीस आणि अरबस्तानात पोहोचला. तो ‘अल्- किमया’ बनला. त्यातील ‘किमया’ हा शब्द आपल्याकडे पोहोचला. यात आणखी एक गंमत आहे- ‘अल्-केमी’ शब्दावरूनच पुढे ‘केमिस्ट्री’ (म्हणजे रसायनशास्त्र) हा शब्द तयार झाला.

या शब्दाची गंमत सोडली तरी या अद्भुत लोकांना आपण काही किमया करतो आहोत, किंवा आपण इतरांपासून वेगळे आहोत याची जाणीव नसते. निसर्गानं त्यांचा साचा तसाच बनवलेला असतो. त्यात प्रदेश, वर्ण, गरीब, श्रीमंत हा भेदभाव नसतो. दैनंदिन रहाटगाडय़ामध्ये जगताना तुमच्या आत्म्यावर धूळ बसते. ही किमया ती धुऊन साफ करते. जन्मत: तुम्हाला प्रतिभा प्रमाणात मिळालेलीच असते. पण त्या प्रतिभेच्या जाळ्यातून अनेकजण बाहेर पडू शकत नाही. हीच किमया जीवनात लय आणते. दृष्टीपलीकडच्या सृष्टीचे दर्शन घडवते. नदीवर झालेल्या नवीन उड्डाण पुलाशेजारी खोल नदीवरचा मोडलेला जुना ताटकळता दगडी पूल, रेल्वे फलाटावर एक्सप्रेस गाडीची रोजंदारीसाठी वाट पाहणारे लाल डगल्यातले हमाल, सायंकाळी घराच्या ओढीनं माळरानावरून उतरत गेलेली पाऊलवाट, भरउन्हात लिंबाच्या पारावर धुळीनं माखलेला आंधळा म्हातारा, लाराला शोधत मैलोन् मैल बर्फ तुडवीत चालत येणारा डॉ. झिवॅगो, वेंगुल्र्याच्या किनारी अपरात्री ऐकलेला अमीर खाँसाहेबांचा मारवा, सकाळी सकाळी पाळण्यातलं हसणारं तान्हं बाळ, जैसलमेरच्या वाळूत टेकलेला पिवळा चंद्र, सकाळी सकाळी पाठीवर बॅगा लटकवून एकामागे एक ऑफिसला जाणारी एकसारखी दिसणारी माणसं.. या साऱ्या दृश्यांना एक कलात्मक रूप देतात तेव्हा ‘किमया’ हा शब्द उच्चारला जातो.

प्राचीन भारतीय महाकवी राजा भर्तृहारीने ‘नीतिशतकम्’ या भागात बाराव्या श्लोकात केवळ शरीरालाच महत्त्व देणाऱ्या माणसाला ‘पशू’ म्हटले आहे. याचा अर्थ साहित्य, संगीत, कला यांत रस नसणारा, त्यात कसलीही रुची न घेणारा माणूस म्हणजे बिनशेपटाचे आणि बिनशिंगाचे साक्षात् जनावर असते. हे जनावर गवतसुद्धा न खाता जगू शकते. त्याचे असे जगणे हे इतर प्राण्यांचे नशीबच समजावे. त्यांनी जर गवत खाल्ले असते तर बिचारे प्राणी उपाशी मेले असते. म्हणून ही बिनशेपटीची, बिनशिंगी जनावरे गवत खात नाहीत, हे प्राण्यांचे नशीबच मानले पाहिजे. अन्यथा सारं सुरळीत दिसत असणाऱ्या या जगात अशा अलौकिक माणसांचं योगदान नसतं, त्यांच्या या दृष्टीची जर किमया झाली नसती तर धुळीत आकंठ लपलेलं हे अनमोल विश्व आपल्याला पारखं झालं असतं.

Subhash.awchat @ gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rough sketches subhash awchat article about sketches painting anwar hussain ssh