पराग कुलकर्णी

‘पोस्ट-ट्रथ’ (Post-Truth) हा शब्द ऑक्सफर्ड शब्दकोशाने २०१६ चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केला होता. ‘पोस्ट-ट्रथ’ म्हणजे वस्तुस्थिती, तथ्य याकडे काणाडोळा करून भावनिकतेवर सत्य-असत्य ठरवणे! आज आपण ‘पोस्ट-ट्रथ’ जगात वावरतोय. भावना, अस्मिता यांवर आधारित कल्पक, रंजक गोष्टींचा आज सत्य म्हणून सहजपणे स्वीकार होतो आहे. जगण्याचा वाढलेला वेग, ‘फास्ट-फूड’सारखी सहज उपलब्ध असलेली आणि आपल्या विचारसरणीला पूरक असणारी मतं आणि समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याची घाई.. ही याची काही कारणे सांगता येतील.

पण जगाचं आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं आकलन करून घेण्यासाठी आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत, त्यांची उत्तरे शोधता आली पाहिजेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील संज्ञा व संकल्पना आपल्याला समजावून घेता आल्या पाहिजेत. या सदरातून आपण हा प्रयत्न करणार आहोत. राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास, कला, पर्यावरण यांसारख्या विविध विषयांतील काही संज्ञा, संकल्पना, घटना आपण साध्या-सोप्या पद्धतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण दृश्यभाषेचा, चित्रांचा खूप वापर करतो. स्माइली, व्हायरल होणारे मीम्स आणि समाजमाध्यमांवर असलेले व्हिडीओज् हे याचेच निदर्शक आहेत. या सदरासाठी आपणही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती सोप्या रीतीने देणाऱ्या ‘इन्फोग्राफिक्स’चा (Infographics) वापर करणार आहोत. त्यामुळे वाचनाबरोबरच ‘पाहणं’ही महत्त्वाचं ठरणार आहे.

तथापि, यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे- शिकण्यातला, समजून घेण्यातला निखळ आनंद! चला तर मग दर आठवडय़ाला या आनंदाचा प्रत्यय घेऊ या..

parag2211@gmail.com