पराग कुलकर्णी
या लेखमालेच्या सुरुवातीला आपण डावी-उजवी अशी विचारसरणींची मांडणी बघितली. त्यानंतर भांडवलशाही आणि त्याला विरोध करणाऱ्या समाजवादी आणि साम्यवादी व्यवस्था कशा असतात, हे थोडक्यात बघितले. याच मालिकेत आज आपण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धादरम्यान उदयास आलेल्या आणि दुसरे महायुद्ध पेटवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या विचारसरणीबद्दल बोलणार आहोत- फॅसिझम!
‘मुक्त व्यापार आणि नफा’ हे भांडवलशाहीचे आणि ‘समानता’ हे समाजवादी-साम्यवादी विचारसरणीचे तत्त्व मानले तर ‘तीव्र राष्ट्रवाद’ हे फॅसिस्ट विचारसरणीचे तत्त्व आहे. या राष्ट्रवादा- भोवतीच फॅसिस्ट विचारसरणीच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेची मांडणी होते.
‘फॅसेस’ म्हणजे इटालियन भाषेत ‘एका लाकडाच्या मोळीत बांधलेली कुऱ्हाड.’ प्राचीन रोमन साम्राज्यात ही मोळी म्हणजे सत्ता, अधिकार आणि सामर्थ्यांचं चिन्ह होतं. त्या प्राचीन रोमन साम्राज्याशी नातं सांगतच बेनिटो मुसोलिनी याने पहिल्या महायुद्धाच्या काळात (१९१४-१९१७) फॅसिस्ट विचारसरणीच्या पक्षाची स्थापना केली. पहिल्या महायुद्धानंतर इटली जरी विजयी राष्ट्रांच्या बाजूने असली तरी बाकीच्या युरोपियन राष्ट्रांनी इटालीसोबत युद्धापूर्वी केलेले करार पाळण्यास नकार दिला (ज्याद्वारे इटलीला ऑस्ट्रियावर ताबा मिळाला असता). युद्धानंतर इटालियन जनतेला हा त्यांचा अपमान वाटला. त्याच सुमारास रशियामध्ये क्रांती होऊन साम्यवादी सरकार सत्तेवर आलं होतं. इटलीतही जर क्रांती झाली तर आपली मालमत्ता साम्यवादी सरकार जप्त करेल अशी भीती तिथल्या मध्यमवर्ग आणि श्रीमंत भांडवलदारांत पसरली. घसरलेली आर्थिक परिस्थिती, जगासमोर झालेला अपमान, साम्यवादी आणि समाजवादी क्रांतीची भीती या वातावरणात बेनिटो मुसोलिनीने इटालियन राजकारणात एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. मध्यम वर्ग आणि श्रीमंत भांडवलदार यांच्या पाठिंब्याने त्याने इटलीला पुन्हा रोमन साम्राज्याचे गत वैभव आणि सामर्थ्य परत मिळवून देण्याची स्वप्ने दाखवली. ‘ब्लॅकशर्टस्’ नावाने त्याने सनिकांचा एक सशस्त्र दल स्थापन केला. समाजवादी-साम्यवादी व्यक्ती व संस्थांवर दहशत बसवणे हाच त्याचा उद्देश होता. १९२२ साली ३०,००० ब्लॅकशर्टस् रोममध्ये जमले (March on Rome) आणि त्यांनी फॅसिस्ट सरकार स्थापनेची मागणी केली. इटलीच्या राजाने ती मान्य करून बेनिटो मुसोलिनीला पंतप्रधान म्हणून नेमले. एक सामर्थ्यवान राष्ट्र निर्माण करण्यासाठी राष्ट्रहित प्रथम ठेवून त्याभोवतीच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था असली पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. इटलीची सत्ता मिळताच मुसोलिनीने काही वर्षांतच हुकूमशाही प्रस्थापित केली. फॅसिस्ट विचारानुसार, हिंसा हे एक महत्त्वाचं साधन आहे- राष्ट्राच्या बळकटीकरणासाठी आणि अंतर्गत राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीसुद्धा! फॅसिस्ट असे मानत की, शक्तिशाली राष्ट्रांना साम्राज्य- विस्ताराचा पूर्ण अधिकार आहे आणि यासाठी कमजोर देशांवर आक्रमण करणे हा त्यांच्या धोरणाचाच एक भाग असतो. मुसोलिनीच्या फॅसिस्ट विचारसरणीची- अतिराष्ट्रवाद, उदारमतवादाला विरोध, एक शक्तिशाली नेता आणि त्याच्या तालावर नाचणारी व्यवस्था, साम्राज्यवाद, हिंसेचा मुक्त वापर अशी काही ठळक तत्त्वे सांगता येतील.
मुसोलिनीच्या ‘March on Rome’ ने प्रभावित होत अजून एका माणसाने ‘March on Rome’ चा प्रयत्न करून आपला प्रवास फॅसिस्ट विचारांच्या मार्गावर सुरू केला. त्याचं नाव होतं- अडॉल्फ हिटलर. हा प्रयत्न जरी फसला आणि हिटलरला त्यासाठी जेलमध्ये जावे लागले तरी हीच हिटलरच्या राजकारणाची सुरुवात होती. जेलमधेच त्याने ‘Meine kampf’ (माझा लढा) या नावाचे त्याचे आत्मचरित्र लिहिले, ज्यातून त्याने त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशाच जणू दाखवली. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या व्हर्सायच्या तहाच्या जर्मनीवर लादल्या गेलेल्या अपमानकारक अटी, ढासळलेली अर्थव्यवस्था, जर्मनीची दुर्दशा आणि त्याला (त्याच्या मते) कारणीभूत असलेला ज्यू लोकांचा प्रभाव असे विषय त्याने त्यात मांडले. पुढे १९३३ पर्यंत त्याने स्वत:ला जर्मनीचा हुकूमशहा बनवले आणि फॅसिस्ट विचारसरणीची बाकी तत्त्वे त्याने अमलात आणायला सुरुवात केली. एकच शक्तिशाली आणि लोकप्रिय नेता, हुकूमशाही, विरोधकांना संपवणे, हिंसेचा वापर, निवडणुकीत हस्तक्षेप आणि सर्वात भयंकर असा पद्धतशीरपणे घडवलेला ज्यूंचा नरसंहार. पुढे १९३९ मध्ये साम्राज्यविस्तारासाठी त्याने पोलंडवर आक्रमण केले आणि त्यातूनच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले.
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाला मुसोलिनी आणि हिटलर दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले. मुसोलिनी आणि हिटलर हे फॅसिस्ट विचाराचे प्रत्यक्ष मानवी रूप होते. किंवा खरे तर फॅसिस्ट विचारसरणी म्हणजे नेमकं काय, हे त्यांच्याकडे बघूनच ठरवलं गेलं. उजव्या-डाव्या मोजपट्टीवर फॅसिझम नेमका कुठे असावा यावरही वेगवेगळी मते आहेत, पण ‘उदारमतवादी डाव्यांचा विरोध’ हे सूत्र लक्षात घेतले तर फॅसिझम अति उजवे म्हणून गणले जातात. स्वत:ला फॅसिस्ट म्हणून घेणारे पक्ष दुसऱ्या महायुद्धानंतर कमी झाले. आजच्या जगात राजकीय विरोधकांना उद्देशून वापरण्याची तिरस्कारयुक्त संज्ञा म्हणून ‘फॅसिस्ट’ या शब्दाचा वापर होतो. त्यामुळेच आपण वेगवेगळे राजकीय पक्ष एकमेकांवर फॅसिस्ट असल्याचा आरोप करताना पाहतो.
लोकशाही व्यवस्थेतून हिटलर आणि मुसोलिनीसारखे हुकूमशहा कसे निर्माण होतात- जे जगाची घडीच विस्कटून टाकतात, याची बरीच कारणे देता येतील; जी त्या काळच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीकडे बोट दाखवू शकतील. पण त्यातील बाकीची बोटं एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याकडेही असू शकतात, असतीलच. वर्ण, वंश, देश, धर्म, जाती-पाती या आणि यांसारख्या माणसांना माणसांपासून वेगळ्या करणाऱ्या बऱ्याच गोष्टीचं विष समाजात आधीपासूनच असतं. गरज असते ती कोणीतरी मुसोलिनी, हिटलर येण्याची आणि त्या रागाचा, द्वेषाचा वापर हत्यारासारखा करून घेण्याची. पण हे विष कमी करून आपणच जर घट्ट मोळी बांधू शकलो तर न जाणो कुऱ्हाडीचीपण हिंमत होणार नाही घाव घालण्याची. इतिहासातून आपण तेवढं तरी शिकू शकतो. नाही का?
parag2211@gmail.com