शोध.. समर्थकृत दखनी-उर्दू रचनांचा!

समर्थ रामदासांनी १६३२ ते १६४४ या कालखंडात भारतभर भ्रमंती केली. यानिमित्ताने त्यांनी मराठीतर समाजांपर्यंत आपले विचार व तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी दखनी-उर्दू, कन्नड, तेलुगू, अरबी, फारसी, पंजाबी, गुजराती, मारवाडी अशा अनेक भाषांमध्ये काव्यरचना केल्या.

समर्थ रामदासांनी १६३२ ते १६४४ या कालखंडात भारतभर भ्रमंती केली. यानिमित्ताने त्यांनी मराठीतर समाजांपर्यंत आपले विचार व तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी दखनी-उर्दू, कन्नड, तेलुगू, अरबी, फारसी, पंजाबी, गुजराती, मारवाडी अशा अनेक भाषांमध्ये काव्यरचना केल्या. समर्थाना केवळ एका विशिष्ट समाजापुरतेच सीमित करण्याची संकुचित वृत्ती आज डोके वर काढत असताना त्यांच्या दखनी-उर्दूतील पदावल्या प्रसिद्ध होण्याला म्हणूनच महत्त्व आहे. ‘समर्थ रामदासकृत दखनी-उर्दू पदावल्या’ या संशोधनपर ग्रंथाच्या लेखिकेचा हा शोधप्रवास.. त्यांच्याच शब्दांत!
‘समर्थ रामदासकृत दखनी-उर्दू पदावल्या’ या पुस्तकाचा प्रवास मांडताना दशकापूर्वीचा काळ डोळ्यांसमोर उभा राहिला. आयुष्याच्या त्या टप्प्यापर्यंत समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास हा माझ्या रामदासी रुटिनचा भाग झाला होता. २००१ मध्ये समर्थ ग्राफिक्स हा प्रकाशन-साहाय्य करणारा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या निमित्ताने िहदी, मराठी, इंग्रजी, संस्कृतशिवाय गुजराती, कन्नड व तेलुगूचे औपचारिक शिक्षण घेतले. उर्दू कौन्सिल, िपपरी येथून उर्दूचे शिक्षणही घेतले. कौमी कौन्सिल एच. आर. मिनिस्ट्रीचाlr04 कोर्स पूर्ण केला. याचदरम्यान समर्थाबद्दल काही विचित्र विधाने करणारी पुस्तके, लिखाण तसेच संस्था समाजात जोर धरू लागल्या होत्या. त्याचा एक समर्थप्रेमी म्हणून मला त्रास होत होताच. त्याचवेळी ‘रामदास काय म्हणाले?’ हे डॉ. गिरीश बापटलिखित पुस्तक अर्थात ‘दासबोधार्क’ रामदासी आचरणात आणत होते. अशा वादग्रस्त विधानांचे खंडन करायचे तर स्वत:ची पातळी न सोडता त्यांना अभ्यासपूर्वक उत्तर देणे, हा एकच पर्याय होता.
त्यानुसार प्रथम समर्थाच्या ‘मुसलमानी अष्टके’ या हस्तलिखिताची नक्कल प्रत ‘श्री समर्थ वाग्देवता, धुळे’ येथून मागविली. तत्कालीन उर्दूचा सांगोपांग अभ्यास अन् त्यात माझ्यासारखी नवशिकी व्यक्ती! त्यामुळे प्रथम उर्दू भाषेच्या पुस्तकी अभ्यासापेक्षा मुद्रण-अनुवाद या माध्यमातून मुस्लीम समाजाचा पुरेसा अनुभव घ्यायचं ठरवलं. त्यानुसार समर्थाच्या संपूर्ण वाङ्मयाचा मागोवा घेण्यास सुरुवात केली.
अनेक रामदासी सांप्रदायींनादेखील हे माहीत नाही, की समर्थ रामदासांचे वाङ्मय मराठी, संस्कृतखेरीज दखनी उर्दू (िहदुस्तानी), कन्नड, तेलुगू, मारवाडी, गुजराती, पंजाबी, अरबी, फारसी या भाषांमध्येही उपलब्ध आहे. त्यामुळे समर्थासंबंधीच्या वादग्रस्त विधानांच्या खंडनार्थ दखनी उर्दू वाङ्मयाची निवड मला आवश्यक वाटली. माझ्या व्यावसायिक कामांमध्ये आधुनिक उर्दूचा वापर सुरूच होता. परंतु जुनी उर्दू वा दखनी उर्दूच्या अभ्यासाचा मार्ग सापडेना. आणि जोवर तत्कालीन उर्दूचा अभ्यास होत नाही तोवर समर्थकालीन भाषेवर लिहिणे म्हणजे ‘अभ्यासोनी प्रकटावे..’ हा समर्थ-उपदेश स्वत:च मोडण्यासारखे होते. त्यामुळे मग कासीम झुबेरी यांच्या साहाय्याने दिल्लीच्या कौमी कौन्सिलच्या सदस्यांशी संपर्क साधला. उर्दूचे विविध शब्दकोश, व्याकरणाची पुस्तके मिळवली; ज्यातून हे स्पष्ट झाले की, दखनी हीच आधुनिक उर्दू व िहदीची जननी आहे. त्यासाठी जदीद हिंदी-उर्दू लुगत शब्दकोश- नासीर अहमद खान, (कौमी कौन्सिल फॉर उर्दू लँग्वेज, दिल्ली), उर्दू-हिंदी शब्दकोश- मुहम्मद मुस्तफा खाँ ‘मद्दाह’ (उत्तर प्रदेश हिंदी संस्थान, लखनौ), लुगमते सईदी- सं. मौलवी अब्दुल अजिम्जम् (मतबा मजिदी, कानपूर), फ़ीरोज़ुल्लुगमते उर्दू (जदीद)- सं. फिम्रोज़ुल्ला खान (फ़िरोज सन्स, लाहौर) हे ग्रंथ खरेदी करून ते अभ्यासले.
या अभ्यासातून कळले की, १६ व्या शतकात दखनी उर्दू (पुरानी उर्दू) भाषेत १८ बोलीभाषांचा समावेश होता. समर्थाच्या पदावल्यांचे लिखाण यापैकी १३ बोलीभाषांमध्ये झालेले आहे. ज्यात अरबी, फारसी, तुर्की, संस्कृतसह खडीबोली, ब्रज, अवधी, भोजपुरी, हरियाणवी, पहाडी, राजस्थानी, गौडी, हैदराबादी या बोलींतील शब्दांचा प्रभावी वापर हा या बोलींवरील समर्थाचे प्रभुत्व दाखवतो. मग प्रश्न आला- दखनीचा स्वतंत्र कोश मिळवता येईल का? कारण समर्थाच्या पदावल्यांतील जे शब्द उर्दू शब्दकोशांमध्ये अपभ्रंशित वाटत होते ते सिद्ध करता यायला हवे. त्याचवेळी प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचे पुस्तक वाचनात आले. त्यांना याबद्दलचे संदर्भ विचारले. त्यांनी पहिल्यांदा श्रीधर रघुनाथ कुलकर्णी यांच्या दखनी प्रबंधाची माहिती दिली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘दखनी भाषा’ (१८ बोलीभाषांच्या शब्दसूचीसह) या पुस्तकाच्या मदतीने दखनी शब्दार्थाचे काम पूर्ण झाले.
दरम्यान, भावार्थ लिहिण्यासाठी मला इस्लाम समजून घ्यावा लागेल हे कळून आले. समर्थकृत ३०० पदावल्यांपकी ९५ पदावल्या ‘खुदा, आला’ या विशेषणांना धरून केल्या होत्या. त्यातही ‘मुसलमानी अष्टका’सारखा भागही होताच. त्यामुळे परिचित उर्दू व्यक्तींच्या सल्ल्याने मी आझम कॅम्पस येथे अरेबिक डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. तिथल्या शिक्षकांनी कुराणाच्या अभ्यासाला मदत केली. तिथेच एका युवतीशी चांगली मत्री झाली. तिच्या ओळखीतून मला जमाते-इस्लामी िहदची माहिती मिळाली. येथे धार्मिक गोष्टी विनामूल्य शिकवतात व प्रशिक्षणासाठी महिलांची स्वतंत्र व्यवस्थाही असल्याचे समजले. या संस्थेच्या नजमाआपा शेख यांचे नाव कळले. त्यांनी त्यांच्या घरी बोलावून जवळजवळ वर्षभर मला इस्लामचे तत्त्वज्ञान, नमाज, अजाणीपर्यंत सर्व गोष्टी शिकवल्या. अर्थात या सगळ्या अनुभवांच्या शिदोरीवरच समर्थानी मुसलमानी अष्टकांमध्येदेखील अद्वैतनिष्ठ शुद्ध अध्यात्म- शिक्षण एवढाच हेतू ठेवल्याचे मला आढळून आले आणि तसे स्पष्टपणे या ग्रंथात मांडता आले. समर्थ रामदासांनी केलेले अद्वितीय राष्ट्रीय आध्यात्मिक संघटन व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे धडे सहज उलगडले.
समर्थानी हिंदुंव्यतिरिक्त समाजगटाला अद्वैत तत्त्वज्ञानाचे धडे देणे हे काही भारतात नवे नव्हते. कारण त्याआधी १२ व्या शतकात अफगाणिस्तान सीमेवर जन्माला आलेल्या सूफी पंथानेही इस्लामचा भाग असूनही अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे. तसे भारतीय समाजाची संमिश्र संस्कृती लक्षात घेऊन समर्थानी या मुसलमानी पदावल्यांची रचना केली. ईश्वराची उपासना हव्या त्या धर्मपद्धतीने करा, तरीही भारतातील मूळ अद्वैत तत्त्वज्ञान हे सर्वसमावेशकच आहे.
महाराष्ट्राबाहेरील १८ ठिकाणांसह ९२ स्थानी समर्थस्थापित रामदासी मठ- संपर्कस्थाने आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे रामदासांना मराठीव्यतिरिक्त इतर राज्यांतील संपर्कासाठी दखनी-उर्दूचा वापर हा अनिवार्य होता हे लक्षात येऊ लागले. कारण बाकी २०१ पदावल्या या फक्त अमराठी िहदूंसाठी तसेच तत्कालीन समाजाची गरज दर्शवीत होत्या. रामदासांचा परिपूर्ण अभ्यास करण्याच्या माझ्या ध्यासात समर्थचरित्रामधील भारतभ्रमणाच्या इतर पलूंचाही अभ्यास सुरू होताच.     २०१० साली सज्जनगडावरील श्री समर्थ रामदासस्वामी संस्थानाने शतकांच्या व्यत्ययानंतर पहिले मठपती संमेलन घेऊन भारतभर आजही सुरू असलेल्या रामदासी मठांना संघटित करण्याच्या योजलेल्या उपक्रमाबद्दल समजले. तशी मी मूळची साताऱ्याची व जुनी संप्रदायी असल्याने सज्जनगडावर मोहनबुवांशी संपर्क साधला. तेथील मुख्य अधिकारी बाळासाहेब स्वामींकडून या संमेलनाची माहिती घेतली. या अभ्यासाला चार वर्षांपूर्वी आणखी एक नवी दिशा मिळाली. कारण समर्थाच्या समकालीन असलेल्या अनेकांनी दखनी-उर्दू रचना केल्या होत्या, परंतु त्यांच्या साहित्यातील वर्णने ही स्थानिक असल्याचे जाणवते. त्यास ‘राष्ट्रस्थिती’ म्हणता येत नव्हती. परंतु समर्थ-साहित्यातील विचारदृष्टी ही अफगाणिस्तान ते श्रीलंकेपर्यंतच्या भ्रमणात उभ्या केलेल्या ११०० मठांतून व्यापकरीत्या जाणवत होती. हा फरक आपण अभ्यासला पाहिजे अशी मनाने उचल खाल्ली. त्यासाठी पदावल्यांचे नुसते अनुवाद, शब्दार्थ इतकेच पुरेसे नाही, तर त्यांना शक्य तितक्या तत्कालीन घटनांच्या पुष्टी द्यायला हव्यात असे वाटले.
रामदासी संप्रदायात सर्वाधिक प्रमाण मानलेली बखर म्हणजे गिरीधरलिखित- ‘समर्थ प्रताप’ ही होय! या अभ्यासातून जी टिपणे निघाली ती माझ्या ग्रंथात विषयांतर न करता पुष्टी म्हणून कशी वापरावी, याचा विचार सुरू झाला. मग कल्पना सुचली- नकाशा तयार करूया. त्या अनुषंगाने माहिती मिळाली की, वाग्देवता मंदिर, धुळे येथे असा थोडासा प्रयत्न सुरू आहे. मग उपलब्ध नकाशात स्वअध्ययनाची भर घालून तो पूर्ण केला अन् या ग्रंथात समाविष्ट केला. समर्थाच्या दखनी-उर्दू साहित्यातील प्रेरणा ही फक्त हिन्दुतर वा मुस्लिमांचे अध्यात्मशिक्षण करणे इतकेच नव्हते, तर त्याखेरीज महाराष्ट्राबाहेरील िहदू संघटनांचे अध्यात्म व राष्ट्रीय शिक्षण करणे हेही होते.
समर्थ रामदासांच्या दखनी साहित्यातील आणखी एक ठळक व महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे उत्तर प्रदेशी शैलीतील चती गीत, फाग गीत, अवधी लोकगीतांतून गीत-रामायण, ब्रज भाषेतील कृष्णलीला, पहाडी भाषाशैलीतील शिव-काव्ये आदी लोकगीते. खरं तर या लोकगीतांमध्ये श्रीराम-कृष्णाच्या प्रेम व बाललीलांची वर्णने करण्याची पद्धत असलेल्या या प्रांतांना समर्थ रामदासांनी शंभरहून अधिक रचनांमध्ये या द्वयींच्या पराक्रमाची कालसापेक्ष गाथा कथन करणारी गीते दिली. ब्रज भाषेतल्या कृष्णलीलांमध्ये शृंगारिक वर्णन नसलेली, परंतु कृष्णभक्तीच्या रसाने ओथंबलेली काव्ये या ग्रंथात सापडतील. राधेचे वर्णन श्रीकृष्णाच्या पाळण्याची दोरी ओढणारे आहे. तसेच शिवस्तवनांतील शंकर हा पहाडी रौद्ररूपात बद्रिकेदारप्रमाणे जाणवतो. तर गणेशस्तवनांमधील गजाननाचे वर्णन हे देशोदेशीचे असल्याचे आढळते.
समर्थ रामदासांच्या रामदासी मठांमधील गुप्तहेर रचना व प्रत्यक्ष अवशेषांमध्ये शिल्लक असलेला मठांतील इतिहास याचा मेळ घालणारी काही वेगळीच काव्ये वाचनात आली. सुरुवातीला मलाही ‘नाथजी’ या विशेषणातून नवनाथ वाटले. परंतु पुढील ओळ ही ‘नाथ चले मथुरा, भाग बडे तिनको,अहो भाग बडे तिनको’ या काव्यामुळे अखेर गुजरात व राजस्थान अशा दोन राज्यांच्या इतिहासात अडकलेला नाथद्वारचा इतिहास अन् पाचही काव्यरचनांचा क्रम हा सहजपणे जुळला. त्यांची मांडणी अभ्यासणाऱ्यांना याची प्रचीती येईल.
‘समर्थ रामदासकृत दखनी-उर्दू पदावल्या’ या पुस्तकाचा प्रवास तब्बल दशकभराचा ठरला. अनेकांच्या मदतीमुळे हा अभ्यास साध्य झाला. त्यात प्रमुख मार्गदर्शन डॉ. गिरीश बापट, समीक्षण विसुभाऊ गुर्जर आणि श्रीसमर्थ रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड आदींचे साहाय्य लाभले. घडलेला मला घडलेला हा समर्थ-वाङ्मयाचा अभ्यासप्रवास वाचकासाही घडावा, हीच इच्छा!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samarth ramdas and urdu creations