|| समीर गायकवाड
सकाळची वेळ सरत आली होती. दादासाहेबाचा जीव कासावीस झाला होता. उन्हं कपाळावर तिरपी कलंडत होती आणि दादासाहेबाचे पाय पावलागणिक ढेकळात घसरत होते. घसा खाकरत तो पुढे निघाला. नकळत विहिरीजवळ पोहोचला. नंतर त्याच्या लक्षात आलं.. सुखदेवनाना आपल्यामागून चालत आलाय. चाहूल लागूनही त्यानं ओळख दिली नाही. हाताची तिप्पड घालून मुकाट बघत राहिला. विहिरीचं पोट खपाटीला गेलं होतं. सगळी आतडीकातडी वर यावीत तसे गाळातले दगडधोंडे वर आलेले. गाळही सुकला होता. खालच्या सांदीतल्या झऱ्याजवळचं शेवाळ कोरडं झालं होतं. मागच्या दोन-तीन वर्षांत पावसानं हात आखडता घेतल्यावरही असं दृश्य दिसलं नव्हतं. गाळ दृष्टीस पडला तरी त्यात ओल असायची. दादासाहेबाला तसा खुळ्यागत बसलेला बघून सुखदेवाच्या पोटात कालवलं.
सुखदेव काशीनाथ अनभुले. सत्तरी गाठलेला कष्टकरी जीव. आता पन्नाशीत असलेल्या दादासाहेबाचे आजोबा आबासाहेबांकडं तो बालवयापासून राबायचा. कैक वष्रे त्यांच्याकडं कामाला असलेल्या काशीनाथला आपलं पोरगं शिकत नाही हे उमजताच त्याला त्याने आबासाहेबांच्या पदरात घातलेलं. त्याचं कोवळं वय पाहून त्यांनी त्याला किरकोळ कामंच दिली. तरीही आबासाहेबांची नजर चुकवून सुखदेव सगळी कामं शिकला. त्या शिवारातल्या कणाकणावर त्याचा जीव जडला होता. कालांतरानं त्याचं लग्न झालं, पोरंबाळं झाली. ती मोठी होऊन रांकेस लागली. त्यांना थोडंफार अक्षरवळण लागलं. त्याच्या जोरावर त्यांनी कामं मिळवली. सुखदेवाला नातवंडं झाली, तरी त्याचं मातीतलं राबणं थांबलं नव्हतं.
आबासाहेब भोसल्यांना चार मुलं होती. आबासाहेबांच्या मागं त्यांनी खातेफोड करून घेतली. ज्याचं त्याचं रान ‘वायलं’ झालं. आबासाहेबांची तिसरी पिढी रानात आली तशी विचारांत तफावत वाढू लागली. पिकपाण्यावरून वाद होऊ लागले. गुरं चारण्यावरून, बांध टोकरण्यावरून मनं कलुषित होऊ लागली. सगळ्यांकडं काम करत असल्याने सुखदेवावर चहाडय़ा लावण्याचा आळ आला तेव्हा खरं तर त्याला गहिवरून आलं होतं. तेव्हा तरण्या दादासाहेबानं सुखदेवाला कवेत घेतलं. त्याच्या मनातलं मळभ दूर केलं. दादासाहेब हा आबांच्या थोरल्या मुलाचा एकुलता एक मुलगा. आबांचा सर्वात थोरला नातू. सुखदेवापेक्षा वीसेक वर्षांनी लहान. वडिलोपार्जति शेत त्यानं जोमानं कसलं होतं. रक्ताचा घाम गाळताना त्यानं सुखदेवाला बापासारखं मानलं होतं. अंगमेहनतीची कामं त्याला कधीही लावली नव्हती. लहानपणापासून या माणसाला त्यानं आपल्या शेतात राबताना पाहिलं होतं. त्याचं बालपण, तारुण्य आणि आता वार्धक्य सगळं आपल्या शिवारात गेलंय. आता त्याच्या घरचे त्याला अडवतात तरीही त्याचे पाय आपल्या शेताकडेच ओढतात. इथल्या मातीची त्याला ओढ आहे हे दादासाहेब जाणून होता.
बापानंतर, आज्ज्यानंतर शेती टिकवणाऱ्या दादासाहेबाची पोरं आता हाताशी आली होती. त्यांना शिकून मोठं व्हायचं होतं. काळ्या रानात झिजत जगायचं नव्हतं. बराच काळ सगळं नीट चाललं होतं. पण मागच्या पाचेक वर्षांपासून शेताची घडी विस्कटली होती. गावात उताराच्या दिशेनं पाझर तलाव झाल्यावर भोसल्यांच्या विहिरी एकेक करून आटत गेल्या. कितीही खोल बोअर मारलं तरीही पाणी लागेनासं झालं. सुरुवातीला टँकरने पाणी आणून पाहिलं. पण उलटं नुकसान झालं. भाव पडले. दुसऱ्या वर्षी रोगराई झाली. तिसऱ्या वर्षी पाणीच मिळालं नाही. मागच्या वर्षी पाणी देऊनही बागा नीट फुलल्या नाहीत. यंदा सगळे प्रयत्न पुन्हा एकदा करून झाले होते. पण उन्हाचा माराच इतका तीव्र होता, की दिलेलं पाणी जमीन घटाघटा पिऊन टाकायची. चौबाजूनं खांदलेले चर कोरडे पडले. शेततळं सुकलं. ओढेनाले तर दोन वर्षांपासून कोरडेठाक पडलेले. आदल्या साली त्यानं गुरांना बाजार दाखवला. फक्त बलजोडी ठेवली होती. द्राक्षाचा बाग मोडून काढला. तुरीवरनं नांगर फिरवला. एकेक करून त्यानं सगळं रान यंदा मोकळं केलं होतं. जिकडं नजर जाईल तिकडं मातीची सुकलेली ढेकळंच दिसू लागली होती. मागच्या आठवडय़ात त्यानं मुक्या जिवाचा शाप नको म्हणून बलजोडीदेखील देऊन टाकली.
एप्रिलमध्ये सालगडय़ाचा करार संपला तेव्हा त्यानं त्याच्या गावाकडं परत पाठवलं. तेव्हाही सुखदेवाच्या काळजात कालवाकालव झालेली. एकेकाळी जिथं ऊसाचं जंगी गुऱ्हाळ चाललं होतं, अख्खं गाव रसाच्या काहिल्या बघायला गोळा झालं होतं, तिथं आता कढईदेखील चुलीवर चढत नव्हती! ज्या रानात सोन्याची कणसं तटतटली होती, तिथं गाजरगवतसुद्धा वाळून गेलं होतं. जिथल्या सावलीत बसून खंडीभर शेतमजूर दुपारची भाकरी सोडत, तिथं आता माणसाशी बोलायला एक जित्राबसुद्धा नव्हतं. जिथलं खळं सरता सरत नव्हतं, तिथं आता पसाभर धान्य पिकत नव्हतं. गोठय़ात जनावर नाही, कणगीत धान्याचा दाणा नाही, रानात एक हिरवा कोंब नाही आणि डोक्यात मात्र शेकडो बोंडअळ्या वळवळताहेत.. ही गोष्ट सुखदेवास छळायची. आपला धनी गुडघ्यात तोंड खुपसून बसतो याचं सुखदेवाला वैषम्य होतं.
खरं तर आज दादासाहेब मनाचा हिय्या करून आलेला. ‘काहीही झालं तरी रानात पुन्हा पाय टाकायचा नाही. सुखदेवासही बजावून सांगायचं, की नाना, आता पुरं झालं या मातीचे लाड! आता थांबलंच पाहिजे. कितींदी पदर जाळायचा?’ मनात खूप काही होतं, पण ओठावर येत नव्हतं. तितकी हिंमत त्याच्यात नव्हती. त्यामुळंच आता सुखदेव पाठोपाठ आला तर त्याचा रागच आलेला. ‘‘काय गरज काय आहे या म्हाताऱ्याला? बसावं ना आपलं घरी. वेळ जात नसंल तर रामकृष्णहरीचा जप करावा. पण इथं कशाला यायचं? खरं तर त्याच्यामुळंच आपण पुन्हा पुन्हा इथं येतोय. आता मात्र यायचं नाही.’’ मनाशी विचार करून दादासाहेब उठला. दरादरा ढांगा टाकत वस्तीसमोरच्या िलबाखाली बाजेवर जाऊन बसला. चुंबकानं ओढल्यागत सुखदेव धापा टाकत त्याच्यामागोमाग तिथंही आला. तेव्हा काहीशा त्राग्यानं, सुखदेवाची नजर चुकवत दादासाहेब एका दमात बोलला, ‘‘नाना,
आता उद्यापासनं घरीच थांबायचं. इकडं फिरकायचं नाही. मी पण येणार नाही, तुम्हीही यायचं नाही. तुमचा हिशोब केलाय. उद्या घरी येऊन पसे चुकते करतो. मोरव्याचा गणू कालपरवा तोडलेली चिलारी सकाळच्याला आपल्या वहीवाटंच्या रस्त्यावर टाकून देईल. रानात गुरंढोरं, चोरचिलटं शिरणार नाहीत.’’ त्याची निर्वाणीची भाषा सुखदेवाला दंश करत होती.
धन्याच्या निरवानिरवीनं त्याच्या काळजाला पीळ पडला. हाताची घडी आवळून तो िलबाच्या बुंध्यालगत बसून राहिला. दोघंही एकही शब्द न बोलता दिवस मावळेपर्यंत तिथं बसून होते. अखेर दादासाहेबानंच शांतताभंग केली. सुखदेवाला गाडीवर सोबत घरी जाण्यासाठी आग्रह केला, पण म्हातारा बधला नाही. ‘तुम्ही गाडीवर पुढं जावा. मी चालतच येतो. गाडीवर हादरे बसतील. बाकी उद्याचं तुम्ही म्हणताय तसं होईल.’ हादऱ्याचं निमित्त करून त्यानं सोबत यायचं टाळलेलं दादासाहेबानं ओळखलं. लिंबाच्या फांदीला खोचलेली डब्याची पिशवी दादासाहेबानं गाडीला अडकवली. सुखदेवाशी आपण असं रुक्ष बोलायला नको होतं असा विचार घोळवत तो निघाला. पायवाट संपून गाडीवाट लागली तसं गाडीच्या हँडलजवळून खडखडाट ऐकू येऊ लागला. शेवटी त्यानं गाडी थांबवली. तसं त्याच्या लक्षात आलं की त्यानं चुकून सुखदेवाची पिशवी आणलीय आणि त्या पिशवीतली वस्तू हँडलमध्ये अडकून वाजतेय. कुतूहलाने त्यानं पिशवी उघडून पाहिली. पाहताच डोळ्यांत टचकन् पाणी आलं. लहान मुलांच्या खेळातली लाकडी बलजोडी त्यात होती! बलजोडी विकल्यापासून सुखदेव ही पिशवी आणत होता. म्हणजे त्या दिवसापासून तो शेतात जेवत नव्हता! तो सारखा गोठय़ात का जायचा, हे दादासाहेबाला आता उमगलं होतं. फार वाईट वाटलं त्याला. पिशवी परत देऊन त्याची माफी मागून गोडीगुलाबीनं त्याचं मन वळवू असा विचार करून त्यानं ताबडतोब गाडी माघारी फिरवली. एव्हाना वाऱ्याने दिशा बदलली होती. मातीचे लोट उठलेले. वावटळींना जोर आलेला.
दादासाहेब गेल्यानंतर सुखदेव विहिरीच्या कडय़ापाशी समाधिस्थ बसला होता. मागोवा घेत दादासाहेब तिथं आला. पिशवीतली बलजोडी काढून त्यानं सुखदेवाच्या चेहऱ्यापुढं धरली. त्यानं सुखदेव भानावर आला. त्याचे डोळे आसवले. पुसटसे स्मितही उमटले. त्याची ती भावूक अवस्था पाहून दादासाहेबाला राहवलं नाही. पुढं होत त्यानं सुखदेवाला मिठीत घेतलं. आपल्या स्वर्गस्थ पित्यास आिलगन देतो आहोत असंच त्याला वाटत होतं. सुखदेवाच्या डोळ्यातला अश्रूंचा बांध फुटून दादासाहेबाचा खांदा ओला होताच मेघांचाही अबोला संपला. एकाएकी भरून आलेल्या मेघांना त्या दृश्यानं गहिवरलं. निमिषार्धात वळवाचा पाऊस ताडताड बरसू लागला. कावरीबावरी झालेली झाडंही अश्रूंच्या त्या उत्सवात सामील झाली आणि तापलेल्या मातीला मायेचं उधाण आलं..
sameerbapu@gmail.com