डॉ. टॉय्ज स्मार्ट प्ले स्मार्ट टॉईज’ या स्टीव्हन ऑरबॅक यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद प्रभाकर देवस्थळी यांनी केला आहे. आपण बुद्ध्यांक, भावनांक याविषयी बरेचदा बोलतो, पण खेळण्यांक याविषयी बोलत नाही. किंबहुना ही संकल्पना आपल्याला माहीत नसते. या पुस्तकात या खेळण्यांकाविषयी लेखकाने सांगितले आहे. मूल जन्मल्यापासून ते बारा वर्षांपर्यंत मुलांना कुठली खेळणी द्यायला हवीत याविषयी मार्गदर्शन केले आहे.

या पुस्तकात सुरुवातीला अनेक तज्ज्ञांची ‘मूल आणि खेळ’ याविषयीची मते उद्धृत केली आहेत. खेळ आणि खेळणी यांचे महत्त्व विशद करताना लेखिका म्हणते की, तुमच्या मुलाच्या उत्तम शारीरिक, बौद्धिक सर्जनशीलतेसाठी पीक्यू अर्थात प्ले कोशंट अर्थात खेळण्यांक खूप महत्त्वाचा आहे. बालसंगोपनात खेळणी किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे लेखिका सांगते. लेखिकेने खेळाची ताकद, फायदे यांवरही प्रकाश टाकला आहे.

या पुस्तकात खेळणी शोधणं इथपासून ते खेळण्यांची यादी करणं, आपल्या मुलांना कोणती खेळणी हवीत याचा अभ्यास करणं, खेळणी खरेदी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे यांचा बारकाईने विचार केला आहे. तसंच खेळण्याचे अर्थशास्त्र, खेळणी आपल्याला काय शिकवतात, मुले खेळताना त्याचं निरीक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे लेखिकेने म्हटले आहे.

मुलांना जन्मल्यापासून ते एक किंवा तीन ते पाच वर्षापर्यंत कोणती खेळणी द्यावीत, तसेच मुलांचे वाचन चांगले होण्यासाठी कोणते नियम पाळावेत, मूल आणि पालक यांनी एकत्र खेळायच्या गोष्टी, संगीत, वाद्यांविषयी सांगताना मुलांसाठी काही खेळही सुचविले आहेत. त्या त्या वयोगटांसाठी खेळण्यांची निवड कशी करावी, खेळामुळे आणि खेळण्यांमुळे मुलांचा आत्मविश्वास, त्यांची विचार करण्याची क्षमता, परिपक्वता यांत कशी वाढ होते याचे उत्तम मार्गदर्शन या पुस्तकातून होते.

‘डॉ. टॉय्ज स्मार्ट प्ले स्मार्ट टॉईज’, स्टीव्हन ऑरबॅक, प्रभाकर देवस्थळी, मेहता पब्लिशिंग हाऊस, पाने-२५१, किंमत-४३० रुपये.

समृद्ध जीवनासाठी…

माणसाचे अनेक आजार हे त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवणं आवश्यक असतं. आयुष्यात चिंतातुर राहण्यापेक्षा आपण समाधानी, समृद्ध आहोत का याचा विचार करणं गरजेचं आहे. वृषाली लेले यांचे ‘समृद्धी… एक भावना’ हे पुस्तक म्हणजे मनाला समृद्ध करून उत्तम आयुष्य जगण्याची गुरुकिल्लीच आहे. मानवी मन आणि ताण, भावना म्हणजे नेमकं काय, भावनांचा आपल्या मनावर चांगला-वाईट कसा परिणाम होतो, स्मृती म्हणजे काय, पूर्वस्मृती हिलिंगची गरज का आहे याची माहिती लेखिका करून देते. या पुस्तकात पूर्वस्मृती हिलिंग म्हणजे नेमकं काय, त्याचा कशा प्रकारे सकारात्मक फायदा होतो, त्याची गरज कोणाला असते याचीही माहिती या पुस्तकात मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘समृद्धी… एक भावना’, – वृषाली लेले, प्रकाशक : चिन्मयी लेले, पाने-२१६, किंमत-३०० रुपये.