बाबा आमटेंच्या मनातील ‘आनंदवन प्रतिमाना’मध्ये केवळ कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसन वसाहतीचा विचार नव्हता. त्यांचं लक्ष आजूबाजूच्या परिसरातील प्रश्नांकडेही असे. जगण्याची कोणतीच बाजू बाबांकडून दुर्लक्षित राहणं शक्य नव्हतं. कारण विविध योजनांच्या माध्यमातून ते त्यांना पटलेला जीवनविचार प्रत्यक्षात आणत होते. ‘शिक्षण’ हा बाबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. ‘शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया आहे..’ ही त्यांची शिक्षणाची परिभाषा होती. शिक्षणाचं प्रमाण वाढल्याशिवाय ग्रामीण भागात सुधारणा होणार नाहीत याची त्यांना पूर्णत: जाणीव होती. वरोरा गावात प्राथमिक-माध्यमिक शाळा होत्या; पण महाविद्यालय नव्हतं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नागपूर किंवा चंद्रपूरला जावं लागायचं. पण तिथे जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण अल्प होतं. कारण वसतिगृहाचा, जेवणाखाण्याचा खर्च बहुतेकांना परवडायचा नाही. त्यामुळे वरोराच नव्हे, तर चांदा जिल्ह्य़ातल्या गावखेडय़ांतील गरीब, होतकरू तरुण मुलं-मुली उच्च शिक्षणापासून पारखी राहू नयेत यासाठी या भागात महाविद्यालय सुरू व्हायला हवं असं बाबांना कळकळीने वाटायचं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदा एखादी गोष्ट डोक्यात आली की ती आणखी कोणीतरी करेल असं म्हणत वाट बघणं बाबांना मान्य नव्हतं. जे आपल्याला करावंसं वाटतं ते आपणच केलं पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका असायची. आणि ‘महारोगी सेवा समिती’तर्फे महाविद्यालय सुरू करायचं, हे बाबांनी मनाशी पक्कं केलं. खरं तर त्यांना आधी वैद्यकीय महाविद्यालयच स्थापन करायचं होतं. चांदा जिल्ह्य़ातल्या ग्रामीण भागातील मुलांना वैद्यकीय शिक्षण मिळेल आणि आनंदवन आणि कुष्ठकार्यात कार्यरत संस्थांना हक्काचे डॉक्टरही मिळतील असा दुहेरी हेतू त्यामागे होता. पण गांधीजींच्या सहकारी आणि तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. सुशीलाबेन नायर यांनी सेवाग्रामला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने बाबांना वैद्यकीय महाविद्यालयासाठी परवानगी नाकारण्यात आली. मग बाबांनी आनंदवनात विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय स्थापन करायचं ठरवलं.

समाजाने कुष्ठरुग्णांना कायमच झिडकारलं असलं तरी समाजाविषयी त्यांच्या मनात कटुता नसावी अशी बाबांची आग्रही भूमिका होती. महाविद्यालय स्थापनेबाबत विचार करण्यासाठी १६ ऑक्टोबर १९६३ ला महारोगी सेवा समितीच्या विश्वस्तांची सभा पार पडली. त्यात मंजूर ठरावात लिहिलं आहे-

या सभेच्या मते,

१) होतकरू मुले व ज्ञानार्जनाची आकांक्षा असलेले कर्तृत्वसंपन्न तरुण शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांच्या मानसशास्त्रीय व आर्थिक गरजा ध्यानात घेऊन उचित शिक्षण त्यांना मिळावे.

२) समाजकार्याच्या परिसरात नव्या पिढीला शिक्षण मिळाले तर प्रचलित शिक्षणव्यवस्थेपेक्षा ते अधिक संस्कारक्षम व जीवनसन्मुख ठरू शकेल. समाजकार्य करणाऱ्या संस्थांना व विशेषकरून कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या संस्थांना कुष्ठनिवारणाचे कार्य सातत्याने, आपुलकीने, योग्यतेने चालविणारी प्रशिक्षित, ध्येयपूर्णतेने काम करणारी कार्यकर्त्यांची परंपरा मिळत नाही असा संस्थेचा अनुभव आहे. या अभावाच्या पूर्तीसाठी संबंधित विज्ञानाचे, जीवनकलेचे व उद्योगधंद्यांचे शिक्षण आनंदवनासारख्या परिसरात मिळाल्यास सामान्यपणे समाजसेवा व विशेषत्वाने कुष्ठसेवा करणारे कार्यकर्ते तयार होऊ  शकतील.

३) महारोगी सेवा समितीला आतापर्यंत अपेक्षातीत व अपार सहकार्य देऊन या देशातील व परदेशांतील समाजाने जिवंत, वाढते ठेवले आहे. संस्थेतील रुग्ण समाजाने दिलेल्या प्रेमाने व सक्रिय सहकार्याने आता आत्मनिर्भर होऊन एक निर्माणशील घटक म्हणून कामगिरी बजावीत आहेत. समाजाबद्दल वाटणाऱ्या या गोड कृतज्ञतेची परतफेड करणे ते रुग्ण आपले कर्तव्य समजतात व म्हणून या कर्तव्यबुद्धीने प्रेरित होऊन समाजातील अज्ञानाच्या, दैन्याच्या निराकरणासाठी या शिक्षणसंस्थेच्या रूपाने ही समिती उपक्रमशीलतेचा अवलंब करीत आहे.

४) येथील रुग्णांनी कुष्ठनिवारण कार्यातील जो हा जागतिक स्वरूपाचा अभिनव व कौतुकास्पद उपक्रम करण्याचा निर्धार केला आहे, त्याबद्दल या महारोगी सेवा समितीला धन्यता वाटते व ती त्या सर्वाचे अभिनंदन करते.

वरील सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी ही समिती व्यापक शैक्षणिक प्रवृत्ती सुरू करण्याच्या दृष्टीने प्रारंभिक पाऊल म्हणून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय आज दि. १६. १०. ६३ रोजीच्या समितीच्या खास सभेत सर्वानुमते घेत आहे आणि त्यांच्या आवर्त (Recurring) खर्चासाठी सव्वा लाख रुपये व अनावर्तक (Non-recurring) खर्चास्तव पंचाहत्तर हजार रुपये असे एकूण दोन लाख रुपये मंजूर करीत आहे.

एरवी जात-धर्म-पंथ यांवरून आपापसात लढणाऱ्या ज्या माणसांनी कुष्ठरोग्यांना वाळीत टाकण्यात, त्यांना बहिष्कृत करण्यात मात्र कुठलाच दुजाभाव बाळगला नाही, त्यांना मोठय़ा मनानं क्षमा करायची.. एवढंच नव्हे, तर त्या समाजातील मुलांना मदत म्हणून कुष्ठरोग्यांनी घाम गाळायचा.. कष्ट उपसायचे.. बाबा हे असं म्हणू तरी कसं शकतात? असंही कोणी विचारू शकलं असतं. तसे प्रश्न बाबांपुढे उपस्थित केले गेलेसुद्धा. कारण सारासार विचार करणाऱ्या कुणालाही ही कल्पना विक्षिप्त वाटली असती! पण बाबांच्या विचारांची झेप फार पुढली होती. क्षमाशीलतेचा परिणाम किती मोठा, किती सखोल असतो, याचं बाळकडू बाबांना गांधीजींकडून मिळालं होतं. आनंदवनातील कुष्ठमुक्त व्यक्तींना सर्वार्थाने बरं करणारी ही एक दूरगामी प्रक्रिया आहे, हे त्यांना माहीत होतं. त्यांचं म्हणणं होतं, ‘‘हे महाविद्यालय म्हणजे कुष्ठरुग्णांनी बाहेरच्या समाजाला दिलेली देणगी असेल. या माध्यमातून समाजाचं ऋण फेडण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.’’ समाजाने कुष्ठरुग्णांना अव्हेरलं असलं तरीही या रुग्णांना सामाजिक बांधीलकीची जाण आहे, हे दाखवून दिल्यावर हा दुरावा कमी होईल याबद्दल बाबा आश्वस्त होते. जेव्हा समाजातली तरुण मुलं आनंदवनातील महाविद्यालयात शिकू लागतील, कुष्ठरोगी करीत असलेलं रचनात्मक, उत्पादक कार्य त्यांना पाहायला मिळेल; तेव्हा कुष्ठरोग्यांविषयी स्वत:च्या मनात असलेले पूर्वग्रह ते पुन्हा नीट तपासून बघतील आणि पिढय़ान्पिढय़ा कुष्ठरोग्यांविषयी चालत आलेले पूर्वग्रह हळूहळू आपोआपच विरून जातील असा विश्वास त्यांना होता. बाबा याला ‘Socializing of Health’ असं म्हणत. महाविद्यालयाचं नामकरण झालं- ‘आनंद निकेतन विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय.’

बाबांनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडे महाविद्यालयाच्या परवानगीसाठी रीतसर अर्ज केला आणि दुसरीकडे इमारत बांधण्याची तयारी सुरू झाली. जी दोन लाख रुपयांची  बँक डिपॉझिट्स महाविद्यालयाच्या खर्चासाठी बाजूला काढण्यात आली होती, ते कुष्ठरुग्णांनी अपार कष्ट करत शेती, शेतीपूरक उद्योग आणि टीन-कॅन प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळवलेलं उत्पन्न होतं. नागपूर-चंद्रपूर रस्त्यालगत जी ५३ एकर जागा बाबांनी आनंदवनासाठी विकत घेतली होती, त्या जागेत महाविद्यालयाचं बांधकाम करायचं असं ठरलं. अक्षरश: पाया खोदण्यापासून ते प्रत्येक वीट न् वीट रचेपर्यंत आणि छत उभारण्यापासून ते त्यावर कौलं चढवण्यापर्यंत सर्व कामं करत कुष्ठरुग्णांनी महाविद्यालयाची इमारत आपल्या बोटं झडलेल्या हातांनी बांधायला सुरुवात केली. महाविद्यालयाचे नकाशे तत्कालीन हैदराबाद संस्थानाचे चीफ आर्किटेक्ट नानासाहेब पळशीकर यांनी तयार केले. (नानासाहेब आणि त्यांचे चिरंजीव वसंत- १९५४ साली आनंदवनात पार पडलेल्या ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’च्या निवासी शिबिरात स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.) महाविद्यालयास परवानगी देण्यापूर्वी पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी नागपूर विद्यापीठाकडून समिती आली तेव्हा अर्धीअधिक इमारत बांधूनही झाली होती. एवढंच नव्हे, तर कॉलेजसाठी बाजूला काढलेल्या दोन लाखांच्या बँक डिपॉझिट्सच्या पावत्या बाबांनी या समितीसमोर सादर केल्या. त्यामुळे त्यांना ‘नाही’ म्हणण्याचं प्रयोजनच उरलं नाही. कारण बाबांचं नियोजन होतंच तसं काटेकोर!

आनंद निकेतन महाविद्यालयास विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडेमिक कौन्सिलकडून लवकरच परवानगी मिळाली आणि शैक्षणिक वर्ष १९६४-६५ पासून पहिल्या वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं निश्चित झालं. आता महाविद्यालयासाठी निष्णात प्राध्यापक निवडण्याची कसोटी होती. शिक्षण क्षेत्रातल्या आपल्या ओळखींमधून बाबांनी प्रयत्नपूर्वक प्रत्येक विषयातले उत्तमोत्तम प्राध्यापक शोधले. महाविद्यालयाच्या मुलाखतीसाठी आलेल्या प्राध्यापकांची मनं बाबांनी जिंकली ती आपल्या अनोख्या कार्यपद्धतीने. मुलाखतीच्या आधी त्या व्यक्तीची आत्मीयतेने विचारपूस व्हायची, आग्रहाने जेवायला वाढलं जायचं आणि मगच पुढे मुलाखत घेतली जायची. मुलाखत आटोपल्यानंतर त्याच दिवशी परतीची सोय नसल्यास बाबांनी त्यांच्या राहण्याचीही सोय आनंदवनात केलेली असायची. आनंद निकेतन महाविद्यालयाच्या माध्यमातून आनंदवनात एका आगळ्या पर्वाची सुरुवात झाली. मी आणि प्रकाश १९६४ च्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी. महाविद्यालय प्रत्येक क्षेत्रात उत्तम असलं पाहिजे यासाठीही बाबांनी खूप कष्ट घेतले. त्यामुळे महाविद्यालयामधल्या प्राध्यापकांनाही कायम काहीतरी नवं करून बघण्याची, उत्तमरीत्या विद्यादान करण्याची प्रेरणा मिळाली आणि महाविद्यालयाने उत्तरोत्तर घवघवीत यश संपादन केलं.

दरम्यान, वाढती लोकसंख्या व अन्नोत्पादनाची निकड या देशव्यापी समस्यांची तीव्रता बाबांना सतत अस्वस्थ करत होती. हे प्रश्न भारतीय शेती अद्ययावत झाल्याशिवाय सुटणार नाहीत हे त्यांना जाणवत होतं. कृषिशास्त्रज्ञ तरुण तयार करणाऱ्या महाविद्यालयांची संख्या देशात गरजेपेक्षा फारच कमी होती. आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तर एकही कृषी महाविद्यालय नव्हतं. गावपातळीवर कृषिशास्त्राचे उच्च शिक्षण मिळण्याची सोय झाल्यास कृषिशास्त्राचा विद्यार्थी आपल्या निर्मितीशील निसर्गक्रमापासून तोडला जाणार नाही, या भावनेतून बाबांनी आनंद निकेतन विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालयात १९६५-६६ या शैक्षणिक सत्रापासून कृषिशास्त्र विभाग Faculty of Agriculture)) सुरू करण्याचा निर्णय घेतला. या विभागासाठी आनंदवन कृषी-औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील दहा विहिरींनी युक्त (विजेच्या पंपांसह) ३५० एकर जमीन, ३० बैलजोडय़ा, नवा ट्रॅक्टर, एक्स्टेन्शन सव्‍‌र्हिस व्हॅन, दुग्धकेंद्र, पशुपालन व कुक्कुटपालन केंद्र, तसंच विद्यमान विज्ञानशास्त्र विभागातील रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र यांच्या सुसज्ज प्रयोगशाळा असं सारं उपलब्ध करून देण्यात आलं. या विभागातून बाहेर पडणारा कृषिशास्त्रज्ञ तरुण हा नव्या शेतीचा अग्रदूत म्हणून खेडय़ात परत जाईल आणि विस्तार सेवा योजनेद्वारे परिसरातील खेडय़ांचे चित्र अल्पावधीतच बदललेलं दिसेल असा बाबांचा आशावाद होता. पुढे १९६९ साली अकोल्याला डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर आनंद निकेतन महाविद्यालयाचा कृषिशास्त्र विभाग या नव्या विद्यापीठाशी संलग्न झाला आणि ‘आनंद निकेतन कृषी महाविद्यालया’चा जन्म झाला. त्यानंतर बाबांनी विद्यापीठाशी संपर्क साधत कृषी महाविद्यालयासाठी चांगला शिक्षकवर्ग मिळवला. या महाविद्यालयामध्ये अगदी पहिल्याच तुकडीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावले. ही परंपरा आजही कायम आहे.

आजवर हजारोंच्या संख्येत विद्यार्थी घडविणाऱ्या या दोन्ही महाविद्यालयांच्या माध्यमातून समाजाचं आनंदवनाशी नातं दृढ होत गेलं. ज्या आनंदवनाची हवाही दूषित आहे असं मानलं जायचं, तिथल्या आनंद निकेतन महाविद्यालयात आमचा मुलगा शिकला आहे आणि तो आज उच्चपदस्थ अधिकारी आहे, असं पालक अभिमानानं सांगू लागले. समाजाने टाकून दिलेल्या माणसांना समाजाचे उपकारकर्ते करून दाखविण्याचे अद्भुत काम करणाऱ्या बाबांचा दृष्टिकोन अगदी सुरुवातीपासूनच किती व्यापक होता याची कल्पना यावरून येऊ  शकते!

विकास आमटे vikasamte@gmail.com

मराठीतील सर्व संचिताचे कवडसे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand niketan college
First published on: 09-07-2017 at 01:14 IST