scorecardresearch

प्रगाढ शांतीचे अमूर्त रूप

‘सेक्रेड गार्डन्स’ चित्रप्रदर्शनातील केवलवादी चित्रांचा आस्वाद घेण्यासाठी त्यांच्या समग्र कलानिर्मितीचा प्रवास समजून घेणं गरजेचं ठरतं.

प्रगाढ शांतीचे अमूर्त रूप
(संग्रहित छायाचित्र)

 शार्दूल कदम

ज्येष्ठ चित्रकार व लेखक सुभाष अवचट यांचं ‘सेक्रेड गार्डन्स’ हे चित्रप्रदर्शन ११ ते १६ डिसेंबपर्यंत मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत भरत असून, त्यानंतर ८ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन वरळीच्या ‘आर्ट अँड सोल’ गॅलरीत रसिकांना पाहता येईल. त्यानिमित्ताने त्यांच्या चित्रकृती आणि कलानिर्मिती- प्रक्रियेचा मागोवा..

सुभाष अवचट हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतात मोठय़ा मानवाकृती, सोनेरी व तजेलदार रंगांनी व्यापलेले भव्य कॅनव्हास, अगणित पुस्तकांची मुखपृष्ठं आणि एक उंचपुरा, स्वच्छंदी, हसतमुख कलावंत. गेली सुमारे ५० वर्ष सुभाष अवचट सातत्याने दृश्यकलेमध्ये प्रयोगशील कलानिर्मिती करीत आहेत. मुखपृष्ठांसारख्या उपयोजित कलाप्रकारामध्ये दर्जेदार कलानिर्मिती करून त्यांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. अभिजात चित्रकलेतही सकस चित्रकृतींसाठी त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. ‘सेक्रेड गार्डन्स’ या त्यांच्या चित्रप्रदर्शनातील केवलवादी चित्रांचा आस्वाद घेण्यासाठी त्यांच्या समग्र कलानिर्मितीचा प्रवास समजून घेणं गरजेचं ठरतं.

सुभाष अवचट यांचं बालपण पुणे जिल्ह्य़ातील ओतूर इथे गेलं. ओतूर हे तसं परंपरा जपणारं, धार्मिक आणि निसर्गसौंदर्यानं नटलेलं गाव. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना वारकरी प्रवचनकार, कीर्तनकार आणि गोरक्षनाथ यांसारख्या अनेक प्रकारच्या माणसांची ओळख होत गेली. माणसांसोबतच त्यांच्या नेणिवेमध्ये राहिले ते तिथल्या निसर्गाचे रंग. शेतांचा गडद पिवळा, मातीच्या ढेकळांचा व्हॅण्डॅग ब्राऊन असे अनेक रंग पुढच्या काळात त्यांच्या चित्रांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आशयानुरूप येत गेलेले दिसतात. डोंगर-टेकडय़ांच्या रांगांमध्ये त्यांना वेगवेगळ्या रंगजुळण्या दिसून येत. निळ्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांचे डोंगर, गर्द हिरवी झाडी, जंगलं, आजूबाजूची हेमाडपंथी देवळं त्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिली. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आणि प्रत्येक गोष्ट करून पाहण्याची तसेच निरनिराळी ठिकाणं प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची ओढ लागली. पुण्यामध्ये त्यांनी अभिनव कला महाविद्यालयात उपयोजित कलेचं शिक्षण घेतलं. यादरम्यान त्यांचे बंधू अनिल अवचट यांच्यामार्फत ‘युक्रांद’सारख्या चळवळीशी व इतर अनेक साहित्यिक गटांशी त्यांचा संबंध येत गेला. ते ‘साधना’ परिवाराशी जोडले गेले. जी. डी. आर्ट सुरू असतानाच शनिवार पेठेतल्या साधना प्रेसमध्ये ते काम करू लागले. तिथे त्यांचा एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, यदुनाथ थत्ते, बाबा आमटे, वसंत पळशीकर, मधू दंडवते अशा अनेक थोर व्यक्तींशी परिचय झाला आणि त्यांच्या सहवासात सुभाष अवचट यांची कलात्मक व सामाजिक जाणीव प्रगल्भ होत गेली. कलाशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पुण्यात स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. पुस्तकांची मुखपृष्ठं व आतील रेखाटनांचा हा काळ त्यांनी खूप गाजवला. माहितीपट, टाइम्स ऑफ इंडिया, एचएमव्ही तसंच अनेक संस्थांची कामं अवचट यांनी केली. कॅग वार्षकिात त्यांच्या मुखपृष्ठांची दखल घेतली गेली आणि जाहिरात क्षेत्रातील मानाचे पुरस्कारही त्यांना मिळाले. ‘साधना’ प्रेसमधल्या न्यूज प्रिंटवर चित्रं काढताना कागदावर शाई फुटत असे. त्यामधूनच अवचट यांनी स्वत:ची अशी एक शैली विकसित केली. अशा प्रकारची रंगलेपन पद्धती त्यांनी अनेक वर्षे मराठी पुस्तकं व मासिकांमध्ये रेखांकनं करताना वापरली. आताच्या त्यांच्या ‘सेक्रेड गार्डन्स’ या चित्रमालिकेतही या प्रकारच्या रंगलेपनाचा संस्कारित अंश दिसून येतो. पुस्तकं, वाचन हा त्यांचा आस्थेचा विषय. मुखपृष्ठ तयार करण्याच्या निमित्ताने त्यांना पुस्तकांच्या संहिता वाचायला मिळत. त्यामुळे मराठीतल्या जवळपास सगळ्या मोठय़ा लेखक-कवींशी त्यांची मत्री झाली. व्यंकटेश माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी, श्री. दा. पानवलकर, दि. बा. मोकाशी, कुसुमाग्रज, गो. नी. दांडेकर, पु. ल. देशपांडे, वसंत बापट ते नामदेव ढसाळ अशा अनेकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठं त्यांनी केली आणि त्यातून त्यांच्या कलानिर्मिती प्रक्रियेमधील आशयघनता बळकट होऊ लागली. सत्तरच्या दशकाचा तो काळ सर्वव्यापी परिवर्तनाचा होता. नाटक, कविता, संगीत, सिनेमा सारंच बदलत होतं. त्या अनुषंगाने त्यांची चित्रंही बदलत होती. आजूबाजूला जे बदल होताना त्यांनी पाहिले ते त्यांच्या चित्रांतून उतरत गेले. याच काळात त्यांचा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला आणि त्यांच्याबरोबर पिकासो, पाश्चात्त्य व भारतीय सौंदर्यशास्त्र यांसारख्या अनेक विषयांच्या चर्चातून कलेसंदर्भातील त्यांचा दृष्टिकोन अधिक विकसित होत गेला. उपयोजित कलेमध्ये मिळालेल्या प्रचंड यशानंतरदेखील त्यांच्यातील अभिजात चित्रकार त्यांनी कसोशीने जागा ठेवला होता. एका मोठय़ा यशस्वी जाहिरातीदरम्यान जाहिरात कलेचे अशाश्वत व अल्पजीवी स्वरूप त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अमेरिकेहून परतताच त्यांनी उपयोजित कलेची कामे बंद करून पूर्णवेळ चित्रनिर्मितीस प्रारंभ केला.

सुभाष अवचट यांचा पूर्णवेळ चित्रकार म्हणून काम करतानाचा सुमारे पस्तीसेक वर्षांचा कालखंडही रोचक आहे. या काळात त्यांनी जलरंग, तलरंग, डिजिटल प्रिंटिंग अशा अनेक माध्यमांत चित्रनिर्मिती केली. त्यांच्या या जीवनप्रवासात त्यांना अनेक ध्येयवादी माणसं भेटली. ती त्यांना खूप काही देऊन गेली. त्यांच्यासोबत वावरताना, त्यांच्या सहवासात अवचटांना चित्रांचे विषयही सहजतेनं सुचत गेले. उदाहरणार्थ, हमालांवरील त्यांची चित्रमालिका. बाबा आढावांबरोबर ते हमाल पंचायतीत जाऊन बसायचे. त्यांचे भाऊ अनिल अवचट आणि वहिनी हमालांसाठी तिथं दवाखाना चालवीत. त्याआधी अनेक वर्षे सुभाषजींनी रेल्वेस्टेशनवर बसून हमालांची स्केचेस केलेली होतीच. हमालांचं जगणं, त्यांचे प्रश्न त्यांना माहीत होते. त्यातूनच त्यांना हमाल रंगवावेसे वाटले. वर्तमानातील मानवी जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचे निरीक्षण आणि अनुभव ते घेत होते. त्यामधून निर्माण होणाऱ्या अनेक विषयांना त्यांनी कागद, कॅनव्हास यांसारख्या पृष्ठभागांवर मूर्तरूप दिले. प्रेसमधील कागदावर जगणारी माणसं या ‘साधना’मधील अनुभवावर आधारित ‘पेपर अँड पीपल’ ही अशीच एक चित्रमालिका. मुळशीच्या शेतकऱ्यांचीही एक चित्रमालिका त्यांनी साकारली. सुभाषजींच्या लहानपणी तंबूतल्या सर्कशीतील विदूषकाचे त्यांना खूप आकर्षण वाटत असे. त्यांच्या वडिलांकडे एकदा सर्कशीतल्या कपडय़ांतच एक विदूषक उपचारासाठी आला होता. त्याचा हात मोडल्याने तो रडत होता. पण छोटय़ा सुभाषना त्या विदूषकाच्या चेहऱ्यावरील रंगरंगोटीसमोर त्याची वेदना दिसली नव्हती. पण पुढे अमेरिकेहून परत आल्यावर त्यांच्या चित्रांतून याच हात मोडलेल्या विदूषकाच्या प्रतिमा अवतरल्या. रंगरंगोटी केलेल्या मुखवटाधारी चेहऱ्यांमागची आर्त करुणा त्यांनी त्यात रंगवली. या त्यांच्या चित्रमालिकेस समीक्षकांनीही दाद दिली आणि या प्रदर्शनास खूप प्रसिद्धीदेखील मिळाली. थिएटरशी जोडले गेलेले असल्याने त्यांनी ‘फेसलेस अ‍ॅक्टर्स’ या आशयाची चित्रमालिकादेखील साकारली. मधल्या काळात ओशो (आचार्य रजनीश) यांच्यासारख्या आध्यात्मिक गुरूंशी त्यांची भेट झाली. ‘जिम्पग इन ऑरेंज’ ही चित्रमालिका त्या भेटीतूनच त्यांना सुचलेली. परंपराप्रधान व्यक्तिमत्त्वांवर आधारित बटू-बालक, साधू व वारकरी संप्रदाय अशा विषयांवरदेखील त्यांनी काही चित्रमालिका रंगवल्या. या चित्रमालिकांमध्ये त्यांच्या चित्रांतून नारिंगी रंग येत गेला. ऐंशीच्या दशकात अवचट यांनी प्रचंड भटकंती, प्रवास केला. अनेक गुहा पाहिल्या. त्यामधील प्राचीन संस्कृतींचे बारीक अवलोकन केले. जॉर्डनमधील पेट्रा येथील अजस्र पहाडातील मानवी संस्कृतीचे अवशेष पाहताना ओतूरचे डोंगर, महाराष्ट्रातल्या बॅसॉल्ट पाषाणाच्या गुहांमधील प्राचीन संस्कृती अशा अनेक घटकांशी नाळ जुळत गेली. इजिप्त, चीन, मेक्सिको, बँकॉक अशा जगभरच्या वेगवेगळ्या संस्कृती त्यांनी पालथ्या घातल्या. मायोनिअन संस्कृती असो वा चिनी वा भारतीय संस्कृती असो; त्यांतलं सारं तत्त्वज्ञान फिरून दगडापाशीच येतं असं त्यांना जाणवलं. दगडात माणूस काहीतरी शोधत आला आहे असं त्यांना वाटतं. बँकॉकमधील ‘वाट फो’ येथील सोन्याच्या वर्खाने मढलेला ‘पहुडलेला सोनेरी बुद्ध’ पाहून त्या मंदिरात ध्यान लावताना बारुपी झगमगीत राजसी सुवर्णातील मानवी भक्ती आणि अंतर्मनातील प्रशांत विरक्ती यांच्यातील द्वंद्वाचा विलक्षण प्रत्यय त्यांना आला. त्यातूनच ‘गोल्ड : द इनरलाइट’ ही चित्रमालिका निर्माण झाली. या अनुभूतीमधूनच त्यांच्या चित्रांमध्ये सोनेरी रंगाचे अस्तित्व ठळकपणे जाणवू लागले ते आताच्या त्यांच्या चित्रमालिकेतही दिसून येते. गुहांच्या आत मनोविश्वात निर्माण होणारी शांतता रंगविण्याचा प्रयत्न त्यांनी या चित्रांतून केला. ‘गोल्ड : द इनरलाइट’ या चित्रमालिकेत भक्तीमार्गाने जाताना मानवी अंतर्मनामध्ये निर्माण होणारी संन्यस्त धारणा दृश्यकलेचे मूर्त रूप सोडून अमूर्त स्वरूपात त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. याच अनाम, अमूर्त शांततेचा धागा पकडून आताची ‘सेक्रेड गार्डन्स’ चित्रमालिकेतील चित्रे निर्माण झालेली दिसून येतात.

दोन-तीन वर्षांपूर्वी सुभाष अवचट असेच एके ठिकाणी भटकंती करत असताना त्यांचं भरदुपारी गावाबाहेरील गर्द जंगलसदृश्य भागात जाणं झालं. असे गावाबाहेरील देवाच्या नावाने राखलेले व पवित्र मानले जाणारे वन म्हणजे देवराई. परंपरेने राखलेल्या या देवराईमध्ये वृक्षतोड करता येत नाही. तिथली वाळकी लाकडं, फुलं वा फळंही माणसं वापरत नाहीत. त्यामुळे ही वनं अत्यंत निबीड असतात. देवराईमध्ये उंचच उंच वृक्ष, जाडजूड खोडे असलेल्या आणि कधी कधी जमिनीवर सर्वत्र पसरलेल्या महालता, पाऊल बुडेल असा पाचोळ्याचा थर, क्वचित त्यातून धावणारे नानाविध प्राणी, मधूनच दिसणारे विविध पक्षीगण आढळून येतात. या देवराईत वावरताना दाट झाडी व थंड हवा याव्यतिरिक्त अवचट यांना सभोवताली काहीच जाणवत नव्हते. अशा या घनगर्द देवराईत दाटून आलेली गूढगर्भ रिक्तता तत्पूर्वी पाहिलेल्या गुहांमधील घनगंभीर शांत अनुभवाशी तादात्म्य पावत सुभाषजींच्या संवेदनशील मनाला भारावून गेली. ते अनामिक रितेपण व निर्गुण अलिप्ततेच्या पोकळीत वावरताना त्यांना ध्यानमग्न होऊन स्वत्वाचा पुन्हा नव्याने शोध घेण्याची आस प्रकर्षांने जाणवू लागली आणि मग अगोदरच्या परंपराधारित चित्रमालिकांचा संस्कारित मानवाकृतीविरहित विस्तार या ‘सेक्रेड गार्डन्स’- म्हणजेच दैवी वन म्हटल्या जाणाऱ्या देवराईच्या चित्रमालिकेच्या रूपाने आकारास येत गेला. याबाबत सखोल चिंतन करताना दृश्यभाषेत द्विमित पटलावर हा अतिशय गूढ आशय मांडायचा असल्यास अमूर्त किंवा केवलवादी चित्रणातूनच त्याचा आत्मा जिवंत ठेवता येईल अशी त्यांची ठाम धारणा होत गेली. देवराईत वावरताना अनेक सूक्ष्म गोष्टींचे आकलन त्यांना होत होते. तात्या माडगूळकर व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांच्यासोबत सुभाषजींनी अनेक वने पालथी घातली होती. त्यामध्ये अनुभवलेलं समृद्ध अनुभवविश्व त्यांच्या नेणिवेत होतंच. या देवराईच्या आशयास भारतीय वैदिक व झेन तत्त्वज्ञानातील अनेक बोधकथांची तात्त्विक बैठक लाभली आहे. आत्मज्ञानाच्या शोधात या जंगलाचे अनन्यसाधारण स्थान आणि त्यातून माणसाला होणारा आत्मबोध याचाही अवचट यांच्या मनावर खोलवर परिणाम झालेला दिसतो. तत्त्वज्ञान व पौराणिक कथांमधील आत्मज्ञान, विलक्षण कल्पनारम्यता, मानवी मोह अशा अनेक प्रकारे वापरली गेलेली हरणाची प्रतिमा त्यांच्या चित्रांतील आशयघनतेमध्ये भर घालते. या देवराईतल्या महाकाय पर्णसंभार असलेल्या अजस्र वृक्षांचे वेगवेगळे आकार, दिवसातील विविध प्रहरी त्यांच्या या गर्द पर्णसंभारातून झिरपणारा प्रकाश आणि त्याच्या भुईवर पडणाऱ्या चित्रविचित्र सावल्या यांतून एक विस्मयकारी शांत दृश्याकार त्यांच्या सर्जनशील मनात तयार होत गेले. या मालिकेतील चित्रांमध्ये घनदाट गडद निळा, हिरव्या, जांभळ्या अशा अनेक रंगांच्या छटा असलेल्या असंख्य ठिपक्यांतून तयार होणाऱ्या कॅनव्हासच्या संपूर्ण पृष्ठभागावर पसरलेल्या विस्तीर्ण केवलाकारातून, आपणास देवराईमधील महाकाय वृक्षांचा आभास निर्माण होतो. त्या गडद आकारांतून पृष्ठभागावर येणारे एमराल्ड ग्रीन, सेरेल्यून ब्ल्यू किंवा पिवळा सोनेरी अशा तेजस्वी रंगांचे काही अस्फुट बिंदू त्या महाकारांमध्ये स्पंदने निर्माण करतात आणि त्यामधून आपणास चित्रकारास जाणवलेल्या निसर्गातील वायुमंडलाची अद्भुत प्रचीती येत जाते. काही आकार दोन-तीन ठिकाणी मधून उभे चिरत जातात, तर काही आडव्या पसरलेल्या आकारांच्या आजूबाजूच्या कडा चित्रातील अवकाश कातरत जातात. हे आकार अनेकदा चित्रांत मध्यभागी जाड बुंध्यासारखे बनून चित्रातील तो प्रचंड आकाराचा पोतमय संभार सहजतेने तोलून धरताना दिसतात. सहज ओघवते रंगलेपन चित्राच्या आशयाशी पूरक ठरलेले दिसते. या चित्रांमध्ये अवचट यांनी- फुटलेल्या पारदर्शक रंगद्रव्यांतून निर्माण होणाऱ्या पोत-सौंदर्याचा निखळ वापर केलेला दिसतो. मग या पोत-सौंदर्यात बोगनवेलीसारखा जर्द जांभळा व गुलाबी, पारदर्शक उन्हात पानांचे जाणवणारे वरीडीयन ग्रीन, एमराल्ड ग्रीन, अल्ट्रामरीन व पर्शियन ब्ल्यू, त्याचबरोबर करडे, तपकिरी असे अनेक रंग असंख्य छटांच्या पारदर्शक थरांच्या स्वरूपात आच्छादित होतात व प्रकाश अपवर्तनातून असीम तेजस्वी दृश्यानुभव चित्रांतून मिळत जातो. या चित्रांमध्ये आधी नमूद केल्याप्रमाणे हरणांसारखे काही प्राणी किंवा भगव्या रंगामधील चित्त एकाग्र करणाऱ्या मनुष्यप्रतिमा दिसून येतात. मात्र, त्या अगदी अस्पष्ट स्वरूपातच जाणवतात. त्याने चित्राशयाच्या गाभ्यास धक्का पोहोचत नाही. चित्रचौकटीमधल्या सोनेरी रंगाच्या कातरलेल्या बंदिस्त अवकाशात हे बिंदूमय एकसंध भव्याकार एकाच वेळी आध्यात्मिक अलिप्तता, अरूपता आणि तेजोमय अनुभूती अशा अनेक स्तरांवर चमत्कारिक अनुभव मिळवून देतात. त्यांच्या काही चित्रांमध्ये अनेक केवलाकाराच्या सहज रचना दिसून येतात. अनेक प्रकारच्या पारदर्शक आकृतिबंधांतून निर्माण होणारे ब्राऊनिश व रेडीश ऑरेंज अनियमित आणि त्रिकोणी आकारसमूह, डार्क वँडॅग ब्राऊनजवळ जाणारे उभे झाडांसारखे भासणारे आकार आणि त्यामधून डोकावणारे तेजस्वी सोनेरी सपाट प्रतल या सर्वातून ऊर्जामय अरण्याची प्रचीती येते. स्वत:च्या आक्रमक चित्रपद्धतीला मुरड घालून घनगंभीर, शांत, अनलंकृत अशा दृश्यरूपांतून अतिशय नाजूक व उत्कट मनोवस्थेची अनुभूती सुभाष अवचट यांनी या चित्रमालिकेमधून साकारली आहे. प्रदर्शनाची उत्कृष्ट मांडणी व नावीन्यपूर्ण सादरीकरण यामुळे अतिशय निखळ व सहजतेने साकारलेली ही सौंदर्यपूर्ण चित्रे पाहताना रसिकांना देवराईचा हा असीम दृश्यानुभव अधिक प्रभावीपणे जाणवेल.

kadamshardul@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या