तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला विनाकारण दुर्बोध का केले जाते मला कळत नाही. विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञानाच्या वर्गात एक गरज म्हणून संकल्पनात्मक भाषा मला वापरावी लागते. पण बऱ्याचदा संकल्पनात्मक भाषा न वापरता राजकीय तत्त्वज्ञानातले, सौंदर्यशास्त्रातले किंवा ज्ञानमीमांसेतले मुद्दे सांगता येतात. सगळेच सांगू शकतात, सांगत असतातही; पण आपण काय सांगतो आहोत याचे भान असणं हे महत्त्वाचे आहे. हे भान तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून मिळू शकते.
‘कार्टेशियन कोऑर्डिनेटस्’सारखी ज्ञानमीमांसेतली कल्पना तर सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातही उपयुक्त ठरते – त्यातून, तात्कालिक आणि चिरकालिक अशा दोन रेषांच्या अक्षावर प्रत्येक संकल्पनेचे स्थान (कोऑर्डिनेट) सांगता येऊ शकते. पण तत्त्वज्ञान कसे शिकवले जाते हेही महत्त्वाचे आहे.
जेएनयूमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांची हजेरी घेत नसूनही बहुतेक वर्ग विद्यार्थ्यांनी भरलेले असतात; याचे कारण शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाचे तत्त्वज्ञान काय असते, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातून एक चर्चाविश्व कसे उभे राहते, त्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक स्वायत्तता म्हणजे काय, याची जाण तिथल्या शिक्षकांना (सर्वच विषयांच्या शिक्षकांना) असते. दुतर्फा व्यवहार सुरू राहिल्यामुळे ‘जेएनयू’सारख्या संस्थेत अजूनही जिवंतपणा टिकून आहे. काही जण म्हणतात की परिस्थिती वाईट आहे… पण म्हणून काही जगबुडीच होणार असे वाटणाऱ्यांपैकी मी नाही. मूल्यसंघर्ष नेहमीच घडत राहिलेले आहेत.
स्वातंत्र्यच नष्ट करून टाकण्याची ‘लिबर्टिसाइड’ प्रवृत्ती (इथे ‘लिबर्टिसाइड’ हा शब्द होमिसाइड, इन्फंटिसाइड, सुइसाइडसारखा- ‘स्वातंत्र्यहत्या’ अशा अर्थाचा आहे) आणि स्वातंत्र्य हे मूल्य सर्वोच्च मानणारी ‘लिबर्टेरियन’ प्रवृत्ती यांचे द्वंद्व जगात कुठेही, कुठल्याही काळात नेहमीच चालत असते. अलीकडल्या काळात या द्वंद्वाचे उदाहरण फ्रान्समध्ये १९६०च्या दशकात घडले, आपल्याकडे १९९० नंतर घडले इतकाच फरक. पण हे द्वंद्व सुरू असताना ते कोणत्या मूल्यांना किती महत्त्व दिल्यामुळे घडते आहे, याचं विश्लेषण करणे हे तत्त्वज्ञाचे काम. स्पिनोझा म्हणतो – ‘घडणाऱ्या गोष्टींचा शोक करणे, हे तत्त्वज्ञाचे काम नाही’. ही मूल्यांची द्वंद्वे नेहमीच घडत आली आहेत.
देशीयता आणि वैश्विकता हे एक द्वंद्व झाले. पण चिरकालिक आणि तात्कालिक हेही द्वंद्वच आहे. जे आज चिरकालिक वाटते ते तात्कालिक ठरू शकते, हा व्यवहार घडत असतो. तत्त्वज्ञाने अशा वेळी स्थितप्रज्ञ राहायला हवे. ‘स्थितप्रज्ञता’ हे भारतीय आध्यात्मिक मूल्य आहे, असे म्हणून चालणार नाही. पाश्चात्त्य आणि भारतीय विचारांचे आदानप्रदान होत राहिलेले आहेच, पण ते होण्यापूर्वीही काही मूल्ये- आणि त्यांचे झगडे वा त्यांची द्वंद्व- ही दोन्हीकडे होती.
त्यामुळेच खरे तर, हे पाश्चात्त्य आणि ते इथले, अशी कप्पेबंदी करणे निरर्थक आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान केवळ इथले नाही म्हणून ते आपले नाही, असे मानणे हे ‘काळ आणि अवकाश’ या दोन मितींपैकी एकाच (म्हणजे काळाच्याच) मितीतून विचार करण्याचे लक्षण ठरते. पाश्चात्त्यांनीही शतकानुशतके असाच दृष्टिकोन ठेवला होता. ते फक्त युरोपात कायकाय विचार झाला, हेच पाहात होते आणि अवकाश न भेदता फक्त मागचा – ग्रीक तत्त्ववेत्त्यांपर्यंतचा- काळ अभ्यासत होते. साधारण १९६० च्या दशकापासून हे चित्र बऱ्याच प्रकारे बदलले. या चिकित्सक (क्रिटिकल) तत्त्वज्ञानात ‘जेनेसिस’चा – ज्ञानाच्या उगमाचा- विचार मागे पडून ‘जीनिऑलॉजी’चा (शाखा आणि पाळेमुळे यांच्या शोधाचा) विचार सुरू झाला; त्यातून एपिक्युरस आणि चार्वाक यांच्यातल्या साम्याविषयी किती तरी पुस्तके पाश्चात्त्य परंपरेत लिहिली गेलेली आहेत.
ज्ञानव्यवहाराला एकच एक केंद्रबिंदू नाही, असे १९६० नंतर विशेषत: फ्रान्समध्ये मानले जाते. ‘जेनेसिस’चा मूळ अर्थ विश्वोत्पत्तीशी संबंधित आहे आणि विश्वोत्पत्तीविषयीच्या कल्पना अनेकपरींच्या असू शकतात, हे लक्षात घेऊनच ‘जीनिऑलॉजी’चा विचार फक्त मागच्या-मागच्या काळाचा शोध न घेता युरोपच्या बाहेर कोणत्या विचारपरंपरा होत्या, याचाही शोध घेऊ लागला. अशा शोधात आपापल्या संस्कृतीलाही निव्वळ महान म्हणून तिचे देव्हारे न माजवता, तिला प्रश्न विचारले जातात. फ्रेंच विचारवंत जिल दलझ याने बुद्धाच्या विचाराचा कसा प्रभाव पाश्चात्त्य तत्त्वज्ञानावर पडला हेही दाखवून दिलेले आहे. यानंतरच्या आजच्या काळात खरे तर, गांभीर्यानं तत्त्वज्ञानाचा विचार करणारा कोणीही ‘हे आमचे, ते त्यांचे’ असा विचार करत नाही. संकल्पना आणि विचारप्रवाह वैश्विक आहेत, त्यांच्या प्रवासाला बंधने नाहीत.
पण आपल्याला हा बंधनमुक्त प्रवास दिसू शकत नाही, याचे कारण आपल्यावरच आपल्या जीवितकाळाची आणि स्थळाचीही बंधने असतात. पण इतिहासातल्या काळाने अनेक द्वंद्वे पचवली आहेत. गेल्या १० वर्षांत दुसऱ्याचे विचारस्वातंत्र्य नाकारण्याची प्रवृत्ती वाढली असे आपण म्हणतो. आपल्याकडे वैचारिक अवकाश किंवा इंग्रजीत ज्याला ‘पब्लिक स्फिअर’ म्हणतात, तो संकोचतो आहे, असे अनेक जण म्हणतात. पण तोही या ना त्या प्रकारे जिवंत असतोच.
पब्लिक स्फिअर ही नागरी समाजाची गरज आहे. त्यासाठी शिक्षणासारखी काही क्षेत्रे तर, विषमतांनी भरलेल्या आपल्यासारख्या देशात अत्यावश्यकच ठरतात. ती क्षेत्रे आज पुरेशी स्वायत्त नाहीत, म्हणून शोक करण्यात अर्थ नाही. कारण इतिहासानं तर कॅलिग्युलाचंही पतन पाहिले आहे. फार कशाला- आजही पुतिनसारख्यांना आवर घातला जातो आहे. तेव्हा पूर्णत: निराशावादी होणे, हा काही मार्ग नाही.
